

मत आमचेही
केशव उपाध्ये
आधुनिक युगात निवडणुका लढविणे आणि त्यात यश मिळवणे याचे व्यवस्थापन शास्त्र तयार झाले आहे. या शास्त्राला अनेक पैलू आहेत. बूथ पातळीवरची पन्ना समिती हा भाजपच्या निवडणूक रणनीतीचा प्रमुख भाग आहे. मात्र भाजपचे हे यश अनेकांना पचत नाही.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेला दणदणीत विजय अनेकांना पचलेला नाही. ११ वर्षे मुख्यमंत्री असूनही स्वतःचा विधानसभा मतदारसंघही सांभाळू न शकलेल्या ममता बॅनर्जी, 'थोर विचारवंत' राहुल गांधी यांनी या विजयाबद्दल शंका उपस्थित करणे अपेक्षितच होते. मात्र अनेक ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत यांनाही भारतीय जनता पक्षाचे हे निर्भेळ यश भाजपला असलेल्या तीव्र विरोधामुळे पचवता येईनासे झाले आहे. काही ज्येष्ठ पत्रकारांना या विजयामागे ‘गौडबंगाल’ असल्याची शंका येते आहे. अशा मंडळींना ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष कधीच पराभूत होऊ नये, अशी इच्छा असल्याने त्या इच्छेपोटीच या मंडळींनी वस्तुस्थितीपासून दूर पळण्याचा मार्ग पत्करला आहे. आधुनिक युगात निवडणुका लढविणे आणि त्यात यश मिळवणे याचे व्यवस्थापन शास्त्र तयार झाले आहे. या शास्त्राला अनेक पैलू आहेत. या शास्त्राचा पहिला प्रयोग अरविंद केजरीवालांनी यशस्वीरीत्या सादर केला. २०१३ मध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमताजवळ जाण्याची कामगिरी केली. २०१५ मध्ये विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकत विक्रमी यश मिळवले. तोपर्यंत आणि आजपर्यंतही भारतीय राजकारणात एवढे मोठे यश कोणी मिळवले नाही. मतदारांचा डेटाबेस तयार करणे, त्यांच्या अपेक्षा-गरजा जाणून घेऊन त्यानुसार रणनीती आखणे, समाजमाध्यमांचा वापर करून आपली विचारसरणी निर्धारित केलेल्या मतदारांपर्यंत पोहचवणे, असे हे केजरीवालांचे निवडणुकीचे आधुनिक व्यवस्थापन शास्त्र होते. गेल्या १०-११ वर्षांत निवडणुकीच्या या व्यवस्थापन शास्त्रात कालानुरूप अनेक बदल झाले आहेत. प्रशांत किशोर हे याच निवडणूक शास्त्राचे कुलगुरू मानले जातात. केजरीवाल यांनी २०१५ आणि २०२० मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला तरी त्यांच्या विजयावर पत्रकार, विचारवंतांनी शंका घेतली नव्हती. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील सातही जागा प्रचंड मताधिक्याने जिंकल्या होत्या. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहाच महिन्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मात्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आम आदमी पक्षाला मोठा जनादेश दिला. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हा जनादेश नाकारला नाही.
‘आप’च्या नेतृत्वाने मतदारांशी संपर्क साधण्याचे अत्याधुनिक तंत्र प्रत्यक्ष अवलंबिताना वीज-पाणी बिल माफ, मोहल्ला दवाखाने, सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे यासारखे लोकोपयोगी कार्यक्रम मतदारांपुढे ठेवले. निवडणुका लढविण्याचे आणि जिंकण्याचे हे तंत्र भाजप विरोधकांनी अवलंबले तर विचारवंत आणि पत्रकारांना त्या विजयात कोणतेही गौडबंगाल वाटत नाही. क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या कमकुवत बाजूंचा अभ्यास करण्यासाठी त्या फलंदाजांच्या पूर्वीच्या सामन्यातील चित्रफितीचा अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे वारंवार यशस्वी ठरणाऱ्या गोलंदाजाच्या शैलीचाही अभ्यास केला जातो. निवडणुकीच्या खेळातही विरोधी पक्षांच्या कमकुवत बाजूंचा अभ्यास केला जातो. विरोधी पक्ष जर सत्तेत असेल तर त्या सरकारविरोधातील मुद्दे जनमताचा अंदाज घेऊन शोधले जातात. त्यानुसार निवडणूक प्रचारात कोणत्या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे, जाहीरनाम्यात कोणत्या मुद्द्यांचा समावेश केला पाहिजे, प्रमुख नेत्यांनी भाषणांमध्ये कोणत्या मुद्द्यांवर बोलले पाहिजे, अशा अनेक गोष्टींचे आकलन होऊ शकते. पूर्वी पक्ष आणि नेत्याच्या वैयक्तिक लोकप्रियतेच्या बळावर निवडणुका जिंकल्या जात होत्या. २१ व्या शतकात मतदार पूर्वीप्रमाणे भाबडा राहिलेला नाही.
भारतीय जनता पक्ष संघटना सर्वतोपरी हा विचार प्रत्यक्षात आणणारा पक्ष आहे. बूथ पातळीवरची पन्ना समिती हा भाजपच्या निवडणूक रणनीतीचा प्रमुख भाग आहे. २०२१ मध्ये भाजपने प्रथमच पश्चिम बंगालमध्ये सर्व ताकदीनिशी निवडणुका लढविल्या होत्या. तोपर्यंत जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालमधील अस्तित्व नाममात्रच होते. भाजपचे संघटन २०२१ मध्ये बूथपातळीपर्यंत पोहचले नव्हते. असे असतानाही २०२१ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ३८ टक्के मते मिळवली होती. ममता बॅनर्जींच्या पक्षाने २०२१ मध्ये ४८ टक्के मते मिळवली होती. बूथपातळीपर्यंत ताकदवान असलेली तृणमूलची मनगटशाही हा खुल्या वातावरणात निवडणुका होण्यातील प्रमुख अडथळा होता. तृणमूलचे गावपातळीवरील कार्यकर्ते मतदारांना मतदानापासून प्रतिबंध करीत असत. शहरी भागातही असेच चित्र होते. निवडणूक आयोगाने निर्भय वातावरणात मतदान व्हावे यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सुमारे अडीच लाख जवान बंदोबस्तासाठी ठेवले होते. तृणमूलच्या कार्यकर्त्यांची प्रचंड दहशत केंद्रीय पोलीस दलाच्या बंदोबस्तामुळे कमी झाली. ९२ टक्क्यांपर्यंत झालेले विक्रमी मतदान हे त्याचेच द्योतक आहे. शहरी व निमशहरी भागात मोठ्या गृहनिर्माण संस्थांच्या आवारातच मतदान केंद्र सुरू करण्यामुळे मतदारांना निर्भयपणे मतदान करता आले. पडद्यामागच्या रणनीतीत प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची फळी उभी करणे, पक्षाचे हक्काचे मतदान सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत करून घेणे, व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे तृणमूल सरकारविरोधातील मुद्द्यांचा प्रसार करणे याचा समावेश होता. भाजप कार्यकर्त्यांच्या मदतीला विचार परिवारातील अनेक संघटनांचे कार्यकर्ते होते. तृणमूलच्या १५ वर्षांच्या राजवटीत बांगलादेशींच्या अनुनयामुळे निर्माण झालेला असंतोष आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेपुढे उभे ठाकलेले गंभीर आव्हान पाहून विचार परिवाराने आपली सारी ताकद तृणमूलच्या विरोधात मैदानात लावली होती. घुसखोरांची नावे वगळली गेल्यानंतर ममतांनी आकांडतांडव केला. मात्र या घुसखोरांच्या भारतीय नागरिकत्वाचे पुरावे कोणालाच सादर करता आले नाहीत. ज्या मतदारसंघात 'एसआयआर'मुळे मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात वगळली गेली त्या २० मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांत तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगावर आगपाखड करणाऱ्या ममतांनी या आकडेवारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. समशेरगंज, लालगोला, भगवानगोला, रघुनाथगंज, मेतियाबुर्ज, सुटी, मोतआभारी, गोलपोखर, मालातीपूर, छोप्रा, सुजापूर, राजरथ, बशीरहट अशा मतदारसंघात आठ हजारांपासून ८० हजारांपर्यंत मतदार वगळले गेले. तरीही तृणमूल काँग्रेसचा या १३ मतदारसंघांमध्ये मोठ्या मताधिक्याने विजय झाला. मोठ्या सभांऐवजी नुक्कड सभांवर भर देऊन अधिकाधिक स्थानिक नेतृत्वाला मतदारांपर्यंत पोहचवण्याची भाजप नेतृत्वाची योजना होती. २०२४ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे ममता सरकारचा बुरखा पूर्णपणे फाटला. या घटनेमुळे महिला आणि नव मतदारांमध्ये निर्माण झालेला असंतोष तृणमूलच्या मोठ्या पराभवात परिवर्तित झाला. ममतांच्या गैरकारभाराचे मुद्दे सातत्याने जनतेच्या मनावर बिंबवण्यात आले. या साऱ्याचा एकत्रित परिणाम भाजपच्या विजयात झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे १५ दिवस पश्चिम बंगालमध्ये ठाण मांडून होते. सातत्याने बूथपातळीच्या कार्यकर्त्यांपर्यंत अमित शहा संपर्क साधत होते. वॉररूममध्ये बसून पक्षाच्या प्रचाराचा आढावा घेत होते. अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे तृणमूलच्या दडपशाहीविरुद्ध वातावरण तयार होत गेले. या सर्व गोष्टींची जाणीव भाजपविरोधी पत्रकारांना, विचारवंतांना नक्कीच असते. मात्र त्यांना भाजपचा विजय कधीच होऊ नये, असे सातत्याने वाटत असल्यामुळे भाजपचा विजय मोकळ्या मनाने स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते.
(प्रदेश उपाध्यक्ष, भाजप)