भाजपची नवी चाणक्यनीती गरज सरो, वैद्य मरो

मराठीतील एक अजरामर नाट्य म्हणजे नटसम्राट. स्वार्थ साध्य झाल्यावर एखाद्याने आपल्याला फेकून देण्याचे दुःख काय असते, ते या नाटकाने जगाला दाखवले.
भाजपची नवी चाणक्यनीती गरज सरो, वैद्य मरो
rss.org/ website

- ॲड. हर्षल प्रधान

मत आमचेही

मराठीतील एक अजरामर नाट्य म्हणजे नटसम्राट. स्वार्थ साध्य झाल्यावर एखाद्याने आपल्याला फेकून देण्याचे दुःख काय असते, ते या नाटकाने जगाला दाखवले. भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी जेव्हा आता आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही असे जाहीर विधान केले तेव्हा संघालाही याच दु:खाचा अनुभव आला असेल. कुणी पक्ष देता का पक्ष या संघटना बांधून देणाऱ्यांना? असे मोहन भागवत आर्त स्वरात म्हणत असतील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक हिंदुत्ववादी सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. समर्थ राष्ट्राच्या निर्माणासाठी संघाचे अथक, अविरत प्रयत्न सुरू आहेत. निद्रिस्त भारत पुन्हा जागृत व्हावा यासाठी आपल्या उपसंस्थांद्वारे अनेक माध्यमांतून त्यांचे कार्य सुरू असते. अशा संघाची आता आपल्याला गरज नाही, असे भाजपच्या अध्यक्षांनी जाहीर केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी केली. संघटनेचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आहे. हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व या गोष्टींचा सर्वसामान्यांमध्ये अभिमान जागृत करणे व भारत देशाला परम वैभवाकडे नेणे हे आपले कर्तव्य आहे, असे संघकार्यकर्ते समजतात.

फाळणीनंतर तुकडे झालेल्या हिंदुस्थानचे एकत्रीकरण होऊन परत अखंड भारताची निर्मिती व्हावी अशी संघाची मनीषा आहे. या राष्ट्राला पुन्हा वैभवाकडे घेऊन जाण्यासाठी संघाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. वनवासी कल्याण आश्रम, विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महिलांसाठी राष्ट्र सेविका समिती, पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष इत्यादी. मात्र यातील भारतीय जनता पक्ष आता वेगळी भूमिका घेत आहे. भाजपचे आताचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी अशी जाहीर भूमिका घेतली आहे की आता भाजपला संघाची आवश्यकता राहिलेली नाही. भाजप आता स्वयंपूर्ण झालेला आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा मुद्दा मांडला आहे.

मुलाखतीत जे. पी. नड्डा यांनी दिलेल्या उत्तरानुसार, ‘सुरुवातीला आम्ही अक्षम असू, थोडे कमी असू. आरएसएसची गरज लागायची. आज आम्ही वाढलोय. सक्षम आहोत. त्यामुळे भाजपच स्वत:ला चालवते. हा फरक आहे.’ भाजपला आता आरएसएसच्या पाठिंब्याची आवश्यकता नाही का? या प्रश्नावर नड्डा म्हणाले की, ‘आता पक्ष विस्तारलाय. प्रत्येकाला त्यांची कर्तव्य, जबाबदाऱ्या आहेत. आरएसएस एक सांस्कृतिक, सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय पक्ष आहोत.’ ते पुढे म्हणाले, ‘हा गरज असण्याचा विषय नाहीय. संघ ही एक वैचारिक फ्रंट आहे. संघ वैचारिकदृष्ट्या आपले काम करत असतो. आम्ही आपलं. आम्ही आमच्या पद्धतीने आमचा कारभार चालवतो. राजकीय पक्षांनी तसंच केलं पाहिजे.’ असं जे. पी. नड्डा म्हणाले. थोडक्यात काय तर भाजपला आता संघाची गरज नाही.

गरज सरो, वैद्य मरो

पुढच्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षं पूर्ण होत आहेत. अलीकडे मोहन भागवत यांना एका पत्रकाराने विचारले होते की, संघाला भाजपमध्ये आपले कार्यकर्ते का पाठवावे लागतात? त्यावर मोहन भागवत म्हणाले होते, संघ हा राष्ट्रीय कार्य करतो. संघटनात्मक बांधणी करून देणे हे आमचे कार्य आहे. इतर कुठल्या पक्षाला आमची आवश्यकता असेल तर त्यांनी जरूर तसे कळवावे. आम्ही विचार करू. यावर पुढे चर्चा झाली नाही. पण तेव्हाच बहुधा मोहन भागवत यांना याची कुणकुण लागली असावी की, भाजपला आता आपली गरज राहिलेली नाही. तसेही ‘गरज सरो, वैद्य मरो’ हीच शिकवण संघाने भाजपला दिलेली असल्यामुळे त्यांनी पहिला ‘वैद्य’ हा संघाचाच केला, असे म्हटल्यास अयोग्य होणार नाही.

भाजप अध्यक्षही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष हे भाजपचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकांचे अध्यक्षपद आणि पक्षाच्या युवा शाखा आणि शेतकरी शाखा अशा पक्षाच्या उपसंघटनांचे अध्यक्ष नियुक्त करणे यासह अनेक भूमिका पार पाडतात. अध्यक्षपदासाठी कोणताही उमेदवार किमान १५ वर्षे पक्षाचा सदस्य असणे आवश्यक आहे. पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्य परिषदांमधून काढलेल्या सदस्यांनी बनलेल्या निवडणूक महाविद्यालयाद्वारे अध्यक्षाची नाममात्र निवड केली जाते, परंतु व्यवहारात पक्षाच्या वरिष्ठ सदस्यांची एकमताने निवड केली जाते. १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी त्याचे पहिले अध्यक्ष झाले. १९८६ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आणि तीन वेगवेगळ्या कालावधीत ते सर्वात जास्त काळ अध्यक्ष राहिले. २०२२ पर्यंत ११ नेत्यांनी भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे, ज्यात राजनाथ सिंह आणि अमित शहा यांचाही समावेश आहे. जे. पी. नड्डा हे सध्याचे अध्यक्ष आहेत. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष हा नेहमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांशी प्रामाणिक राहिलेला आहे. अटलबिहारी वाजपेयी १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेनंतर त्याचे पहिले अध्यक्ष बनले. ते संघाच्याच मुशीत घडले होते. वाजपेयींनंतर लालकृष्ण अडवाणी यांनी १९८६ मध्ये भाजपचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यांच्या अध्यक्षपदाखाली भाजप कट्टर हिंदुत्वाकडे वळला. १९९० मध्ये अडवाणींच्या नेतृत्वाखालील राम रथयात्रेने हिंदू राष्ट्रवादाला आवाहन केले. अडवाणीही जवळपास ५० वर्षे संघाच्याच तालमीत तयार झाले होते. १९७३ मध्ये त्यांनी भारतीय जनसंघाचेही अध्यक्षपद भूषवले होते. भाजपचे विचारवंत मुरली मनोहर जोशी हे १९९१ मध्ये भाजपचे अध्यक्ष होण्यापूर्वी सुमारे पन्नास वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न होते. त्यांनीही लालकृष्ण अडवाणींप्रमाणेच रामजन्मभूमी आंदोलनात मोठी भूमिका बजावली होती. कुशाभाऊ ठाकरे हेही १९४२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले होते. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांनी १९९८ मध्ये ते भाजपचे अध्यक्ष झाले तेव्हा ते भाजपबाहेर फारसे प्रसिद्ध नव्हते. त्यांच्या कार्यकाळात भाजपने मोठ्या युतीसाठी विविध विचारांना सामावून घेण्यासाठी हिंदुत्वावरचा जोर कमी केला. उदा. भारतीय संविधानातील कलम ३७० रद्द करण्याची मागणी ही कुशाभाऊंच्या काळात झाली होती. आरएसएसचे दीर्घकाळ सदस्य असलेले बंगारू लक्ष्मण २००० मध्ये भाजपचे पहिले दलित अध्यक्ष बनले. एक वर्षानंतर ‘तहलका’ मासिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांना लाच घेताना पाहायला मिळाले. त्यानंतर बंगारू लक्ष्मण यांनी तत्काळ राजीनामा दिला. लक्ष्मण यांच्या राजीनाम्यानंतर जना कृष्णमूर्ती कार्यवाहक अध्यक्ष बनले. त्यानंतर व्यंकय्या नायडू यांची भाजप अध्यक्षपदी निवड झाली. २००४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएकडून एनडीएचा पराभव झाल्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते म्हणून काम करत असताना लालकृष्ण अडवाणी हे तिसऱ्यांदा भाजपचे अध्यक्ष बनले. अडवाणी विरोधी पक्षनेतेपदावर कायम राहिले. याचदरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या भेटीदरम्यान मुहम्मद अली जिना यांचे धर्मनिरपेक्ष नेता म्हणून वर्णन केल्याने आणि त्यांच्या कबरीचे दर्शन घेतल्याने झालेल्या गदारोळावरुन अडवाणी यांनी २००५ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी अध्यक्षपद स्वीकारले. राजनाथ सिंह हेही संघविचारातच घडले होते. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी भाजपला हिंदुत्वाच्या व्यासपीठावर परतण्याचा सल्ला दिला. २००९ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचा पराभव झाल्यानंतर राजनाथ सिंह यांनी राजीनामा दिला. २००९ मध्ये महाराष्ट्रातील नितीन गडकरी हे भाजपचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेल्या गडकरींनी महाराष्ट्रातील युती सरकारमध्ये मंत्री म्हणून आणि भाजप युवा शाखेचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांना संघनेतृत्वाचा भक्कम पाठिंबा होता. २०१३ मध्ये गडकरी पायउतार झाल्यानंतर राजनाथ सिंह यांची दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली. राजनाथ सिंह यांनी २०१४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारात मोठी भूमिका बजावली. नरेंद्र मोदी यांच्या नावाला भाजपमध्ये अंतर्गत विरोध असूनही नरेंद्र मोदी यांचे नाव पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा निर्णय त्यांनी निर्णय घेतला. पक्षाच्या दणदणीत विजयानंतर सिंह यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यासाठी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे विश्वासू असलेले अमित शहा नंतर भाजपचे अध्यक्ष बनले. अमित शहा यांच्या नियुक्तीचे वर्णन ‘भाजपवर मोदींचे नियंत्रण आले’ या शब्दांमध्ये करण्यात आले.

कोणाला हवा आहे का संघ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच दीर्घकाळ सहयोगी असलेले जगतप्रकाश नड्डा हे महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये कार्यरत होते. ते भाजपच्या युवा विंगमधून उदयास आले. २०१९ मध्ये नड्डा भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि भाजपमध्ये पहिल्यांदा सामूहिक निर्णय प्रक्रियेचा उदय झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणे सामूहिक जबाबदारीची प्रक्रिया भाजपमध्ये सुरू झाली. अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी एक वर्ष अमित शहांसोबत त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी कार्य केले. ही सर्व उजळणी करण्याचे कारण एवढेच की, आता एवढ्या काळानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपला नकोसा होऊ लागला आहे. जगतप्रकाश नड्डा यांनी तसे थेट जाहीरच करून टाकले आहे. भाजपच्या दृष्टीने त्यांना आता या वैद्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे संघ नष्ट होण्याआधी एखाद्या चळवळीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आवश्यकता असेल तर त्यांनी मोहन भागवत यांच्याशी संपर्क साधावा आणि आपला उद्धार करून घ्यावा!

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in