
मत आमचेही
ॲड. हर्षल प्रधान
गेल्या दशकात जितके मुस्लिम भाजपला पाठिंबा देत होते त्यापेक्षा आता जास्त मुस्लिम भाजपला पाठिंबा देत आहेत. आता तर भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानात ५० लाख अल्पसंख्यांक सदस्यांची नोंदणी करण्याची सक्ती भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर करण्यात येत आहे. जो अधिक अल्पसंख्यांकांची नोंदणी करून त्यांना भाजपचे सदस्य बनवेल त्यांना अधिक महत्त्वाचे पद पक्षात दिले जाणार आहे म्हणे. घ्या हिंदूंनो आणि कट्टर भक्तांनो, ‘हेचि फळ काय मम् तपाला’ म्हणण्याची वेळ आता तुमच्यावर लवकरच येणार आहे!
भारतीय जनता पक्षाला मुस्लिमांची समस्या आहे हे सर्वमान्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदूरमधील सैफी मशिदीला भेट देऊन बोहरा मुस्लिम समुदायाच्या मेळाव्याला संबोधित केले तेव्हा पक्षाचे विरोधकही गोंधळले होते हे आश्चर्यकारक नव्हते. इतकेच नव्हे, तर नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) ने आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या परिषदेत बोलताना, आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, ‘हिंदुत्व’ म्हणजे समावेशकता आणि मुस्लिमांना स्वीकारणे हा त्याचा एक भाग आहे. “हिंदू राष्ट्राचा अर्थ असा नाही की मुस्लिमांसाठी जागा नाही. जर आपण मुस्लिमांना स्वीकारले नाही तर ते हिंदुत्व नाही”, असेही ते म्हणाले. मोहन भागवत तर थेट मशीद दर्शन देखील करून आले आहेत.
हवेत ५० लाख अल्पसंख्यांक सदस्य
१ सप्टेंबरपासून भाजपचे राष्ट्रीय सदस्यत्व नोंदणी अभियान सुरू होणार आहे. याअंतर्गत ५० लाख अल्पसंख्यांक सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रमुख जमाल सिद्धीकी यांनी तर जाहीर केले आहे की, “आम्ही अल्पसंख्यांक समुदायातील ५० लाख सदस्य भाजपशी जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी आम्ही एक योजना आखली आहे.” याशिवाय २७ ऑगस्ट रोजी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रभारी दुष्यंत कुमार गौतम उपस्थित राहणार आहेत. भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य जोजो जोस यांची ‘सदस्यत्व नोंदणी अभियाना’चे राष्ट्रीय प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय निसार हुसेन शाह, मौलाना हबीब हैदर, फहीम सैफी, मोहम्मद सद्दाम आणि जफरीन महजबीन हे सहप्रभारी असणार आहेत. या कार्यशाळेद्वारे पक्षातील सदस्यांना मिस्ड कॉल, क्यूआर कोड, नमो वेबसाइट आणि भाजपची अधिकृत वेबसाइट याद्वारे सदस्य नोंदणी करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मुस्लिम हे भाजपचे सर्वात अल्प समर्थक असले तरी, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की २०१४ मध्ये मुस्लिम समुदायाकडून पक्षाला दर १० मतांपैकी एक मत मिळाले होते. काही दुर्मिळ उदाहरणे वगळता, हा पक्ष क्वचितच मुस्लिम उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी नामांकित करतो किंवा त्यांना महत्त्वाच्या पक्ष पदांवर नियुक्त करतो किंवा राज्य पातळीवरही त्यांना उल्लेखनीय मंत्रिपदे देतो. तरीही भाजपला मुस्लिमांच्या पाठिंब्याबाबत कायम चाचपडत राहावे लागले आहे. मे २०१८ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात जवळपास ८० टक्के मुस्लिम प्रतिसादकर्त्यांनी त्यांच्या समुदायावर होणाऱ्या अत्याचार, गुन्हे आणि हिंसाचाराबद्दल मोदी सरकारच्या वृत्तीविषयी असमाधान व्यक्त केले होते. पण हे मुस्लिम धर्मीयांतील काही विशिष्ट जमातीचे मत असावे. भाजपला असलेला मुस्लिमांचा पाठिंबा मुस्लिमांमधील काही विशिष्ट जातींमधून आहे. आर्थिकदृष्ट्या संपन्न, चांगली शैक्षणिक पात्रता असलेले, धार्मिक आणि आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना थोडा जास्त विरोध करणारे, मुक्त विचारांचे, बोहरी समाजाचे असे काही विशिष्ट मतं असणारे भाजपच्या सोबत आहेत. भाजपच्या मुस्लिम मतदारांपैकी २२ टक्के शिया आहेत, तर इतर राजकीय पक्षांच्या मतदारांमध्ये हे प्रमाण १७ टक्के आहे. भाजपचे मुस्लिम मतदार इतर पक्षांच्या मुस्लिम मतदारांपेक्षा आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. भाजपचे मुस्लिम मतदार अधिक शिक्षित आहेत, त्यापैकी ५५ टक्के लोकांनी दहावी आणि त्याहून अधिक शिक्षण घेतले आहे. इतर पक्षांसाठी ही संख्या ५० टक्के आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला काही राज्यात मोठा फटका बसला होता. २०१९ च्या तुलनेत अनेक राज्यात भाजपच्या जागांची संख्या घटली होती. परिणामी २०१९ मध्ये स्वबळावर सत्ता मिळवणाऱ्या भाजपला यंदा बहुमताचा आकडाही पार करता आला नाही. या निवडणुकीत दलितांबरोबरच अल्पसंख्यांक मतदार भाजपपासून दूर गेल्याने भाजपवर ही परिस्थिती ओढवली, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. १ सप्टेंबरपासून भाजपचे राष्ट्रीय सदस्यत्व नोंदणी अभियान सुरू होणार आहे. याअंतर्गत ५० लाख अल्पसंख्यांक सदस्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या मुख्यालयात २७ ऑगस्ट रोजी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रभारी दुष्यंत कुमार गौतम आणि राज्य प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याद्वारे अल्पसंख्यांक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे बोलले जात आहे.
भाजपचे आगामी राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्यांक समाजाचे?
खरे तर, अल्पसंख्यांक समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार नाही. भाजपकडून अल्पसंख्यांक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणून या कार्यशाळेकडे बघितले जात आहे. पसंमदा मुस्लिम समुदायाकडून पाठिंबा मिळवण्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर ही कार्यशाळा होत असल्याने याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी भाजपने अशाचप्रकारे अल्पसंख्यांकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘सुफी संवाद यात्रा’ आयोजित केली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने केरळमध्ये ख्रिश्चन अल्पसंख्यांकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा फायदाही भाजपला झाला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने केरळमध्ये खाते उघडत पहिला विजय नोंदवला. भाजपचे उमेदवार सुरेश गोपी हे त्रिशूर मतदार संघातून निवडून आले. त्यामुळे अशा प्रकारे अल्पसंख्यांक मतदारांपर्यंत पोहोचल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, असा विश्वास भाजपच्या नेत्यांना आहे. काँग्रेसचे लोकप्रिय खासदार शशी थरूर यांनाही भाजपचे नेते आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. केरळ राज्याकडेही भाजपचे बारीक लक्ष आहे. येथील मुस्लिमबहुल मतदारसंघातून राहुल गांधी आणि आता प्रियांका गांधी देखील निवडून आल्या आहेत. दुसरीकडे या सदस्यत्व नोंदणी अभियानामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबरोबरच संघटनात्मक पातळीवरील निवडणुकीचा मार्गही मोकळा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपच्या संविधानात अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांच्या प्रमुखांची नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक घेता येते, अशी तरतूद आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपला आहे. त्यामुळे पक्षाद्वारे त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता फारशी निवडणूक नसल्यामुळे भाजपच्या आणि संघाच्या मनात राष्ट्रीय अध्यक्षपदी एखादा अल्पसंख्यांक चेहरा बसवण्याचाही विचार असल्याची चर्चा आहे. त्यासाठीच हा ५० लाख अल्पसंख्यांक सदस्य नोंदणीचा उपक्रम राबवण्यात येत आहे.
मुस्लिम मतांसाठी भाजपचा जोगवा
भाजपच्या मुस्लिम समर्थनात महिलांचा वाटा सुमारे ५६ टक्के आहे, तर पुरुषांचा वाटा फक्त ४४ टक्के आहे. अनेक टीकाकारांनी असा युक्तिवाद केला आहे की, मुस्लिम महिलांमध्ये भाजपला असलेला पाठिंबा तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरील पक्षाच्या भूमिकेमुळे आहे, तिहेरी तलाकच्या परंपरेला विरोध करणारे भाजपला मतदान करण्याची शक्यता जास्त आहे. त्याचप्रमाणे, भाजपच्या ५२ टक्के मुस्लिम मतदारांचे वय ३५ वर्षांपेक्षा कमी आहे, तर ४६ टक्के लोकांनी इतर पक्षांना मतदान केले आहे. भाजपचे मुस्लिम मतदार अधिक धार्मिक आहेत. ते प्रार्थना करतात, धार्मिक मेळाव्यांमध्ये सहभागी होतात, उपवास करतात आणि मशिदींना भेट देतात. ते आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना विरोध करण्याची शक्यता जास्त असते. या मुस्लिमांनी भाजपला मतदान करण्यामागे कोणते कारण असू शकते? मुस्लिमांमधील महत्त्वाकांक्षी वर्ग भाजपला मतदान करण्याची शक्यता जास्त आहे. शिया हे भारतातील मुस्लिम लोकसंख्येच्या एक षष्ठांश आहेत आणि ते अशा राज्यांमध्ये केंद्रित असण्याची शक्यता जास्त आहे जिथे भाजपला त्यांच्या मुस्लिम मतांचा पाठिंबा मिळतो. २०१४ मध्ये, गुजरात, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये भाजपने मुस्लिम मतांचा पाठिंबा मिळवला होता. छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांना मध्यम प्रमाणात पाठिंबा मिळाला. त्यामुळे भाजपचे सध्याचे लक्ष मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करून बिहार आणि त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, झारखंड आणि सरतेशेवटी जम्मू आणि काश्मीर या राज्यांवर पूर्ण सत्ता मिळवायची आहे. भाजपचा अजेंडा केवळ आणि केवळ सत्ता मिळवणे एवढाच आहे. त्यांना कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या अंथराव्यात आणि खुर्च्या लावाव्यात एवढेच वाटते. सत्ता आली की भाजपचे हे कार्यकर्ते आपोआप बाहेर फेकले जातात आणि इतरांना महत्त्वाचे पद दिले जाते. मग कार्यकर्त्यांवर ‘हेचि फळ काय मम् तपाला’ असेच म्हणण्याची पाळी येते.
प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष.