
ग्राहक मंच
मंगला गाडगीळ
एकविसाव्या शतकात व्यसनांची यादी दारु, तंबाखू, ड्रग्ज एवढ्या पुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यात आता मोबाईलची भर पडलेली आहे. रिल्स, मीम्स तयार करुन ते मोबाईलवर टाकणे, तसेच इतरांनी बनवलेल्या रिल्स, मीम्स बघत राहणे, हा प्रकार आता चार घटकेची मजा एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचे रुपांतर व्यसनात झाले आहे आणि हे व्यसन तरुणाईचा मेंदू सडवत आहे. आज जागतिक पातळीवर या आजाराची दखल घेतली जात आहे.
मिलिंद एक हुशार मुलगा. अगदी पहिला नंबर जरी आला नाही तरी पहिल्या पाचात त्याचा नंबर असायचा. मिलिंद नववीत पोहोचला आणि तो थोडासा अभ्यासात मागे पडत असल्याचे त्याच्या निकालावरून दिसू लागले. स्पोर्ट्सची प्रॅक्टिस करावी लागते, शिवाय ‘ॲन्युअल डे’ ची तयारी आहे, अशी वरवरची कारणे तो पालकांना देत होता. अधून मधून पालकांकडून पैसेही मागून घेत होता. पालकांना शंका आली. त्यांनी त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले. त्यांना असे दिसले की तो मित्रांच्या बरोबर मोबाईलवर गेम खेळत आहे. हरल्यावर पैसे द्यावे लागत. जिंकल्यावर पार्टी करावी लागे. गेमचे व्यसन इतके वाढले की रात्रीची जागरणे होऊ लागली. दुसऱ्या दिवशी मग शाळेत उशिरा जाणे किंवा सुट्टी घेणे. मिलिंद एका अतिशय घातक वळणावर उभा होता.
उषा चारजणीत उठून दिसणारी. कुठल्याशा लग्नाला गेली होती. तिथे सहज म्हणून काढलेला फोटो तिने फेसबुकवर टाकला. पहिल्या फोटोलाच मैत्रिणींचे आणि नातेवाईकांचे मिळून २५० लाईक्स आले. खूप खुश झाली. मग तिला असे फोटो शेअर करायचे वेडच लागले. शाळेतले, समुद्र किनाऱ्यावर, सिनेमा थेटरच्या बाहेर जिथे जाईल तिथे फोटो काढायची आणि फेसबुकवर टाकायची. एका मैत्रिणीने तिला सुचवले की सिनेमाच्या गाण्यावर नाच करतानाचा व्हीडियो काढ आणि तो शेअर कर. उषाला एक नवीनच, अधिक आकर्षक रस्ता मिळाला. नवनवीन कल्पनांसाठी ती तासन् तास इतरांची रिल्स बघत बसायची. असा वेळ वाया जायला लागल्यावर अभ्यासासाठी वेळ उरणारच कसा?
मिलिंद आणि उषा ही काही जगावेगळी उदाहरणे नाहीत. ही मुले शाळकरी म्हणून वयाने लहान तरी आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा हे रिल्सचे आणि मीम्सचे वेड दिसून येते. मोठ्या माणसांमध्ये सुद्धा अशी उदाहरणे दिसून येतात. एकूणच विचार करता महिला, पुरुष आणि वृद्ध सगळ्यांच्यात हे वेड प्रमाणाबाहेर जाताना दिसत आहे.
बस स्टॉप, रेल्वे स्टेशन यासारख्या सार्वजनिक ठिकाणी कधीही बघितले तर निम्म्या लोकांच्या माना मोबाईलकडे खाली वळलेल्या आणि डोळे स्क्रीनवर खिळलेले असतात. ही माणसे नेमके काय बघत असतात? अत्यंत दुय्यम किंवा तिय्यम दर्जाच्या, कोणीतरी बनवलेल्या रिल्स आणि मीम्स. ही बिनकामाची, निरर्थक रिल्स आपली इंटरनेट संस्कृती व्यापून टाकत आहेत. त्यात काही लक्षात ठेवावे, संग्रही ठेवावे किंवा अभ्यास करावा असे काहीही नसते. विशेषतः ‘टिक टॉक’ या डिजिटल माध्यमावर अशा रिल्सचे पेव फुटलेले दिसते. जगातील कोणत्याही देशात, कोणीही ती बनवलेली असतात. असे असले तरी ‘दर्जाहीनत्व’ हा सर्वांचा सामायिक अवगुण म्हणता येईल.
या सामाजिक माध्यमाच्या अशा वापरामुळे माणसांचा मेंदू काम करेनासा होतो, एका अर्थी बधिर होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो 'सडतो'. याला इंग्रजीमध्ये एक यथोचित शब्द आहे 'ब्रेन रॉट'. तसे पाहायला गेले तर हा शब्द बराच जुना आहे. १८५४ मध्ये हेन्री डेव्हिड थोरो यांच्या ‘वॉल्डेन’ या पुस्तकात त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आढळतो.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस दरवर्षी एक शब्द 'वर्ड ऑफ द ईयर' म्हणून घोषित करते. या वर्षी या अशा विशिष्ट शब्दाची निवड करण्यासाठी भाषा तज्ज्ञांनी चर्चा करून सहा शब्दांची निवड केली होती. हे शब्द म्हणजे सार्वजनिक विचारांचे प्रतिबिंबच जणू. वर्षात किती जणांनी, किती वेळा एखादा शब्द वापरला त्यावर शब्दाची निवड अवलंबून असते. ३७,००० हून अधिक लोकांनी केलेल्या मतदानानंतर आणि व्यापक चर्चेनंतर २०२४ साठी 'ब्रेन रॉट' हा शब्द घोषित करण्यात आला.
सोशल मीडिया आणि इंटरनेटवर आढळणाऱ्या कमी दर्जाच्या आणि कसलेही मूल्य, महत्त्व नसलेल्या माहिती बाबत हा शब्द नेमकेपणाने बोलतो. तसेच व्यक्ती किंवा समाजावर नकारात्मक परिणाम कसा होतो हे तो सांगतो. या दृष्टीने 'ब्रेन रॉट' हा शब्द अत्यंत चपखल आहे. ‘ब्रेन रॉट’ची व्याख्या आपण ‘एखाद्या व्यक्तीच्या मानसिक किंवा बौद्धिक स्थितीचा कथित बिघाड आणि परिणाम’ अशी करू शकतो. या शिवाय या इंटरनेट आजारातून ‘ ब्रेन रॉट भाषे’लाही जन्माला घातले आहे.
‘ब्रेन रॉट’मुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर, विशेषतः मुले आणि तरुणांवर व्यापक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ही चिंताजनक परिस्थिती आहे. या परिणामांबद्दल लोकांमध्ये जी बेफिकीरी दिसते त्यामुळे तज्ज्ञ व्यथित होत आहेत. त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी या शब्दाला आपले मत दिले यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. खरे तर, हा शब्द तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या हानिकारक प्रभावाबद्दल काहीशी जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे.
आपण आपले अन्नधान्य, भाजी, फळे खराब होऊ नये किंवा सडू नये म्हणून काळजी घेतोच ना! मग आपल्या स्वतःच्या मेंदूबाबत योग्य काळजी घेणे गरजेचे नाही का? काही देशात एक दिवस मोबाईल हातात न घेण्याचा दिवस, No Mobile Day म्हणून पाळला जातो. आपल्याकडे 'वाचाल तर वाचाल' असे म्हटले जाते. उत्तमोत्तम पुस्तके आपल्याकडे आहेत. किंवा क्रीडांगणे आपल्याला आकर्षित करत असतात. ते जर जाणले तर आपल्या शरीराची पर्यायाने मेंदूची काळजी घेतली जाईल. आपल्याकडे असणारा वेळ ही तर आपली खरी संपत्ती असते. जसे आपले पैसे आपण काळजीपूर्वक गुंतवतो तसेच आपला मोकळा वेळ विधायक कामात गुंतवला पाहिजे. ‘दुनिया मुट्ठी में’ म्हणताना आपण मोबाईलच्या मुठीत जाणार नाही ना, याची काळजी घेतली पाहिजे.
मुंबई ग्राहक पंचायत
mgpshikshan@gmail.com