धम्मचक्र गतिमान होत असताना...

महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून संपूर्ण मानवजातीसाठी एक आदर्श जीवनपद्धती आहे. समता, बंधुता, अहिंसा आणि विश्वशांती यांचे तत्वज्ञान बौद्ध धम्माच्या केंद्रस्थानी आहे. भारतात स्थापन झालेला हा धम्म जगभर प्रसारित झाला, परंतु ऐतिहासिक कारणांमुळे भारतात त्याचा प्रभाव कमी झाला.
धम्मचक्र गतिमान होत असताना...
सोशल मीडिया
Published on

मत आमचेही

हेमंत रणपिसे

महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून संपूर्ण मानवजातीसाठी एक आदर्श जीवनपद्धती आहे. समता, बंधुता, अहिंसा आणि विश्वशांती यांचे तत्वज्ञान बौद्ध धम्माच्या केंद्रस्थानी आहे. भारतात स्थापन झालेला हा धम्म जगभर प्रसारित झाला, परंतु ऐतिहासिक कारणांमुळे भारतात त्याचा प्रभाव कमी झाला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र पुनर्प्रवर्तन केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बौद्ध धम्माला नवी ऊर्जा मिळाली. आज महाराष्ट्र आणि भारतात बौद्ध चळवळ गतिमान होत असून, विविध बौद्ध गुरु, अभ्यासक आणि संघटनांचे मोठे योगदान आहे. धम्माच्या प्रसारासाठी होणाऱ्या कार्यांमुळे ‘चलो बुद्ध की ओर’चा नारा अधिक प्रभावी होत आहे.

महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला 'बौद्ध धम्म' हा केवळ धर्म नसून मानव कल्याणासाठी एक आदर्श जीवन मार्ग आहे, समता बंधुता स्वातंत्र्य अहिंसा आणि विश्वशांतीचा विचार आहे. आजही जगाला युद्ध नको, तर बुद्ध हवा आहे. भारतात स्थापन झालेला बौद्ध धम्म जगभर प्रसारित झाला आहे. संपूर्ण जगात भगवान बुद्धांना लाईट ऑफ एशिया म्हटले जाते. संपूर्ण जगात पोहोचलेला बौद्ध धम्म ज्या भारतात स्थापन झाला तेथून लोप पावत असताना महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध धम्म पुनर्जीवित केला. १४ ऑक्टोबर १९५६ साली बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या लाखो अनुयायांना देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात धम्मचक्र प्रवर्तित केले. भगवान बुद्धांचे धम्मचक्र सम्राट अशोकानंतर मोठ्या प्रमाणात भारतात धम्मचक्र प्रवर्तन बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाचा पहिला संदर्भ त्यांनी २ मार्च १९३० रोजी केलेल्या ऐतिहासिक काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहात आहे. आम्ही दलित अस्पृश्य सुद्धा माणूस आहोत. हिंदू धर्माचा आम्ही भाग असू तर आम्हाला हिंदू मंदिरात प्रवेश का नाही? दलितांच्या हक्काचा समतेचा निर्णायक लढा म्हणून काळाराम मंदिर प्रवेशाच्या लढ्याकडे पहायला हवे. प्रस्थापित हिंदू धर्ममार्तंडांच्या अन्यायकारक वृत्तीला जगाच्या वेशीवर मांडणारा; हिंदू धर्मातील जातिभेदाला; स्पृश्य अस्पृश्य या अमानवी भेदभावाला उघड करणारा आणि त्याविरुद्ध पुकारलेला मानवमुक्तीचा संगर म्हणजे काळाराम मंदिर सत्याग्रह आहे. २ मार्च १९३० ते १९३५पर्यंत काळाराम मंदिर सत्याग्रह लढला गेला. हिंदू धर्माच्या मंदिराचे दरवाजे दलितांसाठी उघडले गेले नाहीत. ज्या धर्माचे दरवाजे आपल्यासाठी कायम बंद आहेत, त्या धर्माचा त्याग करण्याचा निर्णय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. त्यानुसार १३ ऑक्टोबर १९३५ रोजी महामानव क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिकच्या येवला येथे मी हिंदू धर्मात जन्माला आलो. पण हिंदू म्हणून मारणार नाही ही ऐतिहासिक धर्मांतराची प्रतिज्ञा घेऊन हिंदू धर्माचा त्याग केला. त्यानंतर २१ वर्षांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बोधीसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तित केले. ऐतिहासिक धर्मांतर केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवर्तित केलेले धम्मचक्र भारतात वेगाने गतिमान होत आहे. शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक आक्रमणाला विरोध करणाऱ्या युगप्रवर्तक संघर्षाची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांवर सोपविली. बौद्ध धम्माचा आदर्श जीवन मार्ग अनुसरताना शेकडो वर्षांच्या अज्ञानातून आलेल्या चुकीच्या चालीरीती; रूढी; दैवी संकल्पना श्रद्धा यांना नाकारून मानवतेचा समतेचा अहिंसेचा विश्वशांतीचा विचार घेऊन जीवन मार्ग अनुसरणे ही आत्मिक पातळीवर धर्मांतर झालेल्या बौद्धांसाठी मोठे आव्हान होते. हे आव्हान सर्व आंबेडकरी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील अतूट विश्वासामुळे पेलले आहे.

शेकडो वर्षांच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीतून बाहेर पडून पुन्हा बौद्ध धम्माच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आंबेडकरी जनतेला या देशातील शेकडो वर्षांचा सांस्कृतिक संघर्ष कळलेला आहे. त्यामुळे 'चलो बुद्ध की ओर'चा नारा आंबेडकरी जनतेच्या घराघरातून दिला जात आहे. देशात अनेक ठिकाणी उत्खननातून सापडलेल्या बौध्द धम्माच्या खुणा; देशभरात अनेक प्राचीन लेण्या आहेत. या बौद्ध लेणी प्रकर्षाने प्राचीन बौद्ध संस्कृतीची ग्वाही देत आहे. एक काळ असा होता की, हा संपूर्ण देश बौद्धमय होता. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पाहिले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म चक्र प्रवर्तन केले. त्याची गती सुरुवातीला जाणवली नाही. शेकडो वर्षांच्या सांस्कृतिक संघर्षापुढे धम्मदीक्षेने सुरू झालेले बौद्ध धम्म चक्र हे निश्चित वेग घेईल. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पूर्ण विश्वास होता. त्यानुसार, शेकडो वर्षांच्या संस्कृतिक आक्रमणाला बौद्ध धम्म दिक्षेच्या केवळ ६८ वर्षांत आंबेडकरी जनतेने आत्मिक आणि सामाजिक पातळीवर संघर्ष करून धम्मचक्र गतिमान केले आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र गतिमान करण्याची आपल्यावर जबाबदारी दिली आहे. याची जाणीव आंबेडकरी जनतेला झाली असल्यामुळे धम्मचक्राची गती महाराष्ट्रात वाढू लागली आहे.

महाराष्ट्रात अनेक चांगले बौद्ध धम्मगुरु धम्म चळवळीचे; धम्मचक्र गतिमान करण्याचे काम करीत आहेत. त्यांना अनेक निष्पक्ष दानशूर अधिकारी मदत करीत आहेत. महाकरुणी भगवान बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली त्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे अधिकार पूर्णतः बौद्धांकडे द्यावेत या मागणीसाठी संघर्ष सुरू आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथून प्राचीन अजिंठा लेणीकडे जाताना आपल्याला खूप सुंदर बुद्धमूर्ती दिसते. तेथील जमीन परदेशी बौद्ध उपासकाने दान केली आहे. बौद्ध अधिकारी हर्षदीप कांबळे यांनी या धम्मसंकुलसाठी मोठी मदत केली आहे. भदंत बोधीपालो महाथेरो यांचे येथे धम्मकार्य फार मौलिक आहे. गावागावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी; बुद्ध विहारासाठी आपली जमीन दान करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या गरीब माणूस ही पुढे येत आहे एवढा बौद्ध धम्माचा विचार मनामनात रुजत आहे.

नाशिकमधील त्रिरश्मी लेणी येथे भदंत सुगत; कल्याण मध्ये भंते गौतम रत्न; भदंत वीरत्न; छत्रपती संभाजीनगर येथील भदंत बोधिपालो महाथेरो; मुंबईत भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो यांचे चांगले काम आहे. यासह राज्यभरात अशी अनेक उदाहरणे आहेत. अनेक बौद्ध भंते धम्म प्रसाराचे चांगले काम करीत आहेत. या पद्धतीने राज्यात सर्वत्र बौद्ध धम्माचे धम्म चक्र गतिमान झालेले पहावयास मिळत आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी आग्रही असणारी आंबेडकरी जनता आता रिपब्लिकन ऐक्य होत नाही म्हणून बौद्ध धम्माकडे वळली आहे. आंबेडकरी जनता बौद्ध धम्माच्या कार्यक्रमांना गर्दी करून आपली बौद्ध म्हणून ओळख आणि बौद्धांचे शक्तिप्रदर्शन घडवीत आहे. येत्या २ मार्च रोजी नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत नाशिक च्या गोल्फ क्लब मैदानात भव्य बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या बौद्ध धम्म परिषदेस विविध देशातील बौद्ध धम्मगुरु; विचारवंत आणि बौद्ध धम्माचे अभ्यासक उपस्थित राहतील. देशभरातील बौद्ध धम्मगुरू उपस्थित राहतील. या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे. रामदास आठवले यांचा धम्म चळवळीतील सहभाग हा निष्पक्ष आणि धम्मचक्र गतिमान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. अनेक नियतकालिके धम्म चळवळीला वाहिली आहेत. पद्मश्री कल्पना सरोज; प्रकाश लोंढे; यशवंत जाधव ; नागसेन कांबळे; युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश कांबळे असे अनेक धम्म उपासक बौद्ध धम्म चळवळीला आपल्या परीने योगदाना देत आहेत. ही यादी खूप मोठी आहे. बौद्ध उपासक; धम्म प्रसारकांची यादी जशी वाढत राहील तशी धम्मचक्राची गती वाढत राहील! येत्या २ मार्चला नाशिकच्या अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदानात उपस्थित राहून पुन्हा एकदा धम्मचक्र गतिमान करू या! भगवान बुद्धांना, त्यांच्या धम्माला, त्यांच्या संघाला, त्रिवार शरण जाऊया! नमो बुद्धाय! जय भीम !

प्रसिद्धी प्रमुख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)

logo
marathi.freepressjournal.in