इथे संधी आहे... (भाग एक)

पालक आणि विद्यार्थ्यांना हमखास उत्कृष्ट करिअर घडवणारे अभ्यासक्रम कोणते, हा प्रश्न मुलगा १० वी आणि १२वीत गेला की पडू लागतात.
इथे संधी आहे... (भाग एक)

लेखक : सुरेश वांदिले

पालक आणि विद्यार्थ्यांना हमखास उत्कृष्ट करिअर घडवणारे अभ्यासक्रम कोणते, हा प्रश्न मुलगा १० वी आणि १२वीत गेला की पडू लागतात. मुलगा वा मुलगी किती पाण्यात आहे, हे जर पालकांना जोखता आले तर मुलांना करिअर घडवणारे अभ्यासक्रम निवडण्यास त्यांना कठीण जाणार नाही. हे पाणी कसे ओळखाचे ? मुलगा/ मुलीला दहावी बारावी पर्यंत कोणत्या विषयांमध्ये गती वा आवड निर्माण झाली आहे? त्याला गणित खरोखरच जमते का ? भौतिकशास्त्र जमते का? भाषांविषयांमध्ये रस निर्माण झाला आहे का ? विज्ञानापेक्षा त्याला चित्र काढणे, पेंटिग्ज करणे, आकृत्या तयार करणे, वस्तू तयार करणे, रंगांशी खेळणे, लिहिणे, उत्तम इंग्रजी/मराठीत बोलणे, प्रचंड अवांतर वाचन करणे, भटकंती करणे, गाणे म्हणण नाटकात काम करणे, खेळातच मन रमणे इत्यादी इत्यादी बाबी पालकांच्या नक्कीच लक्षात येत असतीलच. किंबहुना त्या यायला पाहिजे. तशा त्या आल्या तर करिअर दिशा कोणती हे ठरवण्यासाठी समुपदेशन करणाऱ्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. मुलाची बुध्दीमत्ता किती, स्मरणशक्ती किती,अभ्यास करण्याचा आवाका, अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमता, पाठांतरावरच भर आहे की संकल्पना समजून उमजून अभ्यास करण्याकडे कल आहे,या बाबीही पालकांच्या लक्षात यायला हव्यात.अभ्यासक्रम कोणता निवडावा यासाठी या बाबी महत्वाच्या ठरतात.

विपुल संधी

सध्याच्या काळात अनेक क्षेत्रात विपुल संधी आहेत. काही क्षेत्रात तर मागणी जास्त आणि दर्जेदार मनुष्यबळाचा पुरवठा कमी अशीही परिस्थिती आहे. हा काळ उत्कृष्ठ सेवा पुरवण्याचा आहे. अशी सेवा जर देता आली तर करिअर घडवणे सुलभ होऊ शकते. अभियांत्रिकी वा वैद्यकीय शाखांपलिडे फार मोठे विश्व आहे याची जाणीव ठेवायला हवी. मुलगा फूटवेअर डिझायनिंगचा अभ्यासक्रम करतो किंवा तबला शिकायला जातो किंवा अर्थशास्त्रात बी.ए करतो, हे मुलगा अभियांत्रिकी वा वैद्यकीय शिक्षण घेतोय हे ज्या अभिमानाने पालक सांगतात तसेच सांगता आला पाहिजे. करिअर घडवण्याची खूप मोठी क्षमता असणारे व तशी हमीही देणारे काही

अभ्यासक्रम

(१) इंग्रजीचा अभ्यास - सध्या उत्तम इंग्रजी लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, शिकवणाऱ्या मनुष्यबळाची मोठी वाणवा आहे. आपल्या मातृभाषेचा कितीही अभिमान ठेवला वा आपली अस्मिता आहे असे समजले तरी उत्तम इंग्रजी येण्याला पर्यायच नाही. राज्य आणि केंद्राच्या प्रशासनातील ज्या व्यक्ती इंग्रजीवर प्रभुत्व मिळवून असतात, त्या प्रगतीच्या शिड्या भराभर चढू शकतात.अशा व्यक्तींसाठी नियमांना मुरड घालणे, नव्या जागा निर्माण करणे अशाही बाबी घडतात. कुणाशिवाय काही अडत नाही,असे जरी म्हंटले जाते व ते खरेही असले तरी प्रशासनात उत्तम इंग्रजी येणारी व्यक्ती स्वत:चे अढळ स्थान निर्माण करु शकते. कार्पोरेट क्षेत्रातही अशीच स्थिती आहे. सध्या मराठी वा इतर भाषांमधून इंग्रजीत भांषातर/ अनुवाद/ रुपांतर करण,भाषणे लिहिणे, मसुदा तयार करुन देणे, संशोधनपर लेखन तयार करुन देणे, संपादन करणे, जाहिरातींच्या कॉपी लिहिणे अशा बाबींसाठी उत्तम मनुष्यबळ मिळणे दुरापास्त होत आहे. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवल्यास इंग्रजी वृत्तपत्रे/ मासिके/इंग्रजी वृत्त वाहिन्या/ डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रातही करिअर घडू शकते. इंग्रजीचा अभ्यास मात्र अतिशय काटेकोरपणे, गणित वा शास्त्र विषयांचा अभ्यास जितक्या गांभीर्याने वा वेळ देऊन करतो, तितक्याच गांभीर्याने करणे गरजेचे आहे. इंग्रजीमध्ये पदवी वा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चांगल्या महाविद्यालय वा विद्यापीठांच्या इंग्रजी विभागात शिकवले जातात.

(२) संशोधन - यंदा आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जॉईंट एंट्रस एक्झामिनेशन मध्ये मुलींमधून पहिली आलेल्या गीता राठी या गुणवंत मुलीने आयआयटीत न जाता संशोधन करण्यासाठी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बॅचलर ऑफ सायंस हा संशोधन अभ्यासक्रम करण्याचे ठरवले आहे. पालक व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेणारी ही बाब आहे. विज्ञान संशोधनास दिवसेंदिवस खूप महत्व येत आहे. भारत सरकारसुध्दा त्याला प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करुन देत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रात पदव्युत्तर पदवीनंतर संशोधनाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (संपर्क संकेतस्थळ- http://www.iiserpune.ac.in/ ) या संस्थेने बी.एस-एम.एस हा पाच वर्षे कालावधीचा ड्युएल डिग्री अभ्यासक्रम याच दृष्टिने तयार केला आहे. या संस्थेचे एक कॅम्पस पुण्यात आहे. भूवनेश्वरस्थित नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्च (www.niser.ac.in) आणि मुंबई विद्यापीठ व डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक रिसर्च सेंटर फॉर एक्सलेंस इन बेसिक सायंस (www.cbs.ac.in) यांनी संयुक्तपणे पाच वर्षे कालावधीचा इंटिगेटेड एम.एस्सी हा अभ्यासक्रम संशोधनास चालना देण्यासाठी सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनिंग टेस्ट (www.nestexam.in) घेतली जाते. बी.एस-एम.एस आणि एम.एस्सी या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ५००० हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

(३) फॅशन तंत्रज्ञान - सर्वसाधारणत: विद्यार्थी आणि पालकांना फॅशन डिझाइन या अभ्यासक्रमाबाबत माहिती असते. मात्र फॅशन तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाबाबत अनभिज्ञता असते. फॅशन उद्योग वा वस्त्रप्रावरणे निर्मिती उद्योगातील तांत्रिक मनुष्यबळ निर्मितीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. १२वी विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र ,गणित आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. गेल्या काही वर्षात अल्पसंख्येत या अभ्यासक्रमासाठी मराठी मुले/मुली निवडली गेली आहेत. अभ्यासक्रमपूर्ण केल्यावर नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या विविध कॅम्पसमधील प्लेसमेंट सेलद्वारे वेगवेगळया कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध करुन दिली जाते. हा अभ्यासक्रम बेंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, चंदिगढ, कानपूर, कोलकता,मुंबई,नवी दिल्ली, पाटणा, कलिंगा, जोधपूर, भूवनेश्वर या कॅम्पसेस मध्ये करता येतो.या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एनआयएफी ॲडमिशन टेस्ट घेतली जाते. संपर्क संकेतस्थळ- http://nift.ac.in.महाराष्ट्रातील संस्था नवीमुंबई येथील खारघर येथे आहे.या ठिकाणी या अभ्यासक्रमासाठी आवश्यक अत्याधुनिक व जागतिक दर्जाची यंत्रसामग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संपर्क- एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट नंबर- १५, सेक्टर-४, खारघर, नवी मुंबई- ४१०२०, दूरध्वनी- ०२२-२७७४५५४९, संकेतस्थळ - http://www.nift.ac.in/mumbai/

(४) अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान - सध्या अन्नप्रक्रिया उद्योगासाठी गरज असणारे पुरेसे मनुष्यबळ भारतात उपलब्ध नाही. त्यामुळे किफायतशीर व अधिक नफा मिळवून देणारी संयत्रे निर्मिती तंत्रज्ञान विकसित होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. या क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन भारत सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी या संस्थेची स्थापना केली आहे.या संस्थेने बी.टेक इन फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे किंवा 8 सत्रे. आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन- JEE-MAIN,मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. मात्र यासाठी संबंधित विद्यार्थ्यास संस्थेचा अर्ज भरावा लागतो. संकेतस्थळ- http://www.iifpt.edu.in/

(५) शास्त्रीय संगीत - पंडित विष्णू नारायण भातखंडे यांनी संगीत शिक्षणाला संस्थात्मक स्वरुप देण्यास फार मोठे ऐतिहासिक कार्य केले. १९२६ साली त्यांनी लखनौ येथे मॅरीस कॉलेज ऑफ म्युझिक या नावाने संगीत शिक्षण सुरु केली. १९६६ साली हे विद्यालय उत्तरप्रदेश शासनाच्या अखत्यारित आले. या विद्यालयास भातखंडे कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक असे नाव सरकारने दिले. आक्टोबर २००० मध्ये या संस्थेस केंद्र सरकारने डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान केला. या विद्यालयात पुढील विषयांचे शिक्षण- प्रशिक्षण दिले जाते.

(१) कंठसंगीत (शास्त्रीय कंठसंगीत, ठुमरी, दादरा, सुगम संगीत),

(२) नृत्य (कथ्थक, भरतनाट्यम, कुचिपुडी, लोकनृत्य),

(३) स्वरवाद्ये (सितार, सरोद, गीटार, व्हायोलिन, सारंगी, हार्मोनिअम, बासरी),

(४) तालवाद्य-(तबला ,पखवाज) आणि

(५) संगीतशास्त्र. या पाचही प्रकाराचे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पाच स्वतंत्र विभाग आहेत.

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा दरवर्षी साधारणत: ९ जुलै ते १७ जुलै रोजी घेतली जाते. संकेतस्थळ- http://bhatkhandemusic.edu.in/ (पूर्वार्ध)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in