नागपंचमी साजरी करताना...

नागपंचमीच्या सणाला भावनेबरोबरच अन्य विचारांचंही कोंदण लागतं आणि तो अधिक सुशोभित होतो
नागपंचमी साजरी करताना...

आपली संस्कृती जगण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्‍या प्रत्येकासंबंधी आभार व्यक्त करण्याची, कृतज्ञ राहण्याची शिकवण देते. लहानपणापासूनच आपल्यावर भूतदयेचे संस्कार होतात. प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे आपल्या कामी येणाऱ्‍या सर्व भूतांप्रति आभार व्यक्त करण्याची संधी आपण सोडत नाही. अशी संधी देणारे अनेक सण-उत्सव आपल्या जगण्याचं अविभाज्य अंग असतात. या अर्थाने बघता आजच्या तंत्रयुगातही आपण नागपंचमीचा सण उत्साह आणि आस्थेने साजरा करतो. एक ना अनेक अर्थाने सर्पवर्गीय जीव आपल्या विश्‍वाचा एक खण व्यापून राहिलेले दिसतात. अगदी लहान असताना साप-नागादी जीव कथांमधून आपल्याला भेटतात. कळत्या वयात कृषिप्रधान राष्ट्रासाठी त्यांची उपयुक्तता समजते आणि नंतरच्या काळात अनेक लसींच्या निर्मितीसाठी वा वैविध्यपूर्ण निसर्ग संरचनेमध्ये त्यांचं महत्त्व काय, हे आपण जाणतो. आजच्या शहरीकरणाच्या रेट्यात या जीवांच्या अस्तित्वावर उभं राहिलेलं प्रश्‍नचिन्ह आपल्याला अस्वस्थ करतं आणि पर्यावरण संतुलनासाठीही हे जीव किती महत्त्वाचे आहेत, याची जाणीव होते. त्यामुळेच आजच्या प्रगत युगातही समाजजीवनाने जपलेला नागपंचमीसारखा सण किती महत्त्वपूर्ण आहे, याचा अंदाज आपण बांधू शकतो. ही जाणीव असल्यामुळेच नागपंचमीच्या सणाला भावनेबरोबरच अन्य विचारांचंही कोंदण लागतं आणि तो अधिक सुशोभित होतो.

नाग हा आपला मित्र असल्याने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी हा सण साजरा केला जातो. नागाचं प्रमुख खाद्य आहे उंदीर आणि हेच उंदीर शेतातल्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत असतात. काही धोका नसेल आणि पुरेसं खाद्य उपलब्ध असेल तर एका उंदराच्या जोडीपासून एका वर्षात ८८८ उंदीर तयार होतात; मात्र उंदरांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याचं काम नाग करतात. त्याद्वारे अन्नधान्य वाचवण्याची मोलाची कामगिरी पार पाडली जाते. हे नाग वाचावेत म्हणून आपल्या पूर्वजांनी नागपंचमीच्या सणाची योजना केली. श्रावण महिन्यात शेतात मोठ्या प्रमाणावर पीक आलेलं असतं. त्यामुळे हा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो. या सणानिमित्त प्राचीन काळातील महिलांना घराबाहेर पडण्याची आणि काही खेळ खेळण्याची संधी उपलब्ध होत असे; परंतु आता शहरं वाढली आहेत आणि वाढत्या वस्तीमुळे माळरानावरची वारुळं नष्ट झाली आहेत. अशा परिस्थितीत नागपंचमीचा सण कसा साजरा करायचा, असा प्रश्‍न अनेकांच्या मनात येत होता. या परिस्थितीचा फायदा वैदू समाजातील लोकांनी घेतला. खरं तर नाग, साप पाळणं हे त्यांच्या रोजच्या उदरनिर्वाहाचं साधन नाही; परंतु हे लोक नाग पकडून घरोघरी आणतात आणि त्या बदल्यात कपडे, धान्य, पैसे गोळा करतात.

नाग हा विषारी जीव आहे. त्यामुळे त्याची पूजा करताना हळद-कुंकू वाहण्यासाठी हात जवळ नेला तर तो डंख करेल आणि यातून मृत्यूसारख्या घटनासुद्धा घडू शकतील. यावर वैदूंनी अघोरी उपाय शोधला. पूजा करताना नागाने दंश करू नये, यासाठी ते त्याचं तोंड दाबणानं शिवतात. काही नागांच्या विषग्रंथी काढल्या जातात. अशा नागाचं तोंड बंद असलं तरी त्याची जीभ आत-बाहेर होऊ शकते. नाग आपल्या जिभेद्वारे परिस्थितीचं ज्ञान घेऊ शकतो; परंतु नागाची जीभ आत-बाहेर होत असल्याने त्याचं तोंड शिवलेलं असल्याची कल्पना इतरांना येत नाही. लक्षात घेण्यासारखी आणखी एक बाब म्हणजे दूध हे नागाचं अन्न नाही; परंतु नागपंचमीच्या दिवशी त्यानं समोर ठेवल्याला दुधाला तोंड लावावं, यासाठी वैदू लोक त्याला काही दिवस पाणी न देता ठेवतात. पाणी समजून नाग दूध पितात. यामुळे त्यांच्या घशाला इन्फेक्शन होतं. चुकीच्या प्रथेमुळे नागपंचमीच्या सणानंतर राज्यात जवळपास ४५ हजारांच्या वर नाग मृत्युमुखी पडतात. त्यामुळेच हा सण साजरा करताना भावनेपेक्षा सुबुद्धतेनं विचारांना महत्त्व द्यायला हवं.

आज अनेक संस्था सर्पवर्गातल्या या जीवांप्रति जागृतीच्या कामात सहभागी आहेत. अनेक जण वैयक्तिक पातळीवरही साप-नागांविषयी जागृतीचं काम करतात. गेल्या काही वर्षांमध्ये या संख्येत मोठी वाढ बघायला मिळते. त्यामुळे अतिग्रामीण वा दुर्गम भाग वगळता मोठ्या वस्त्या वा अगदी निमशहरी भागातही नागपंचमी साजरी करताना भान पाळल्याचं स्पष्ट दिसतं. आता शहरांमध्ये पूर्वीप्रमाणे जिवंत नागांची पूजा करण्याची प्रथा पाहायला मिळत नाही, टोपलीत जिवंत साप घेऊन घरोघरी फिरणाऱ्‍या गारुड्यांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. अर्थात, हे प्रमाण पूर्णपणे संपुष्टात आलं नसलं, तरी दिसणारा बदल नक्कीच सकारात्मक आहे. हा बदल घडून येण्यास सर्पस्नेही, सर्पमित्रांच्या कामाला मीडियाकडून मिळणारी प्रसिद्धीही कारणीभूत आहे. धोकादायक स्थितीतले नाग वाचवणं, त्यांची सुटका याबरोबरच त्यांना पकडणाऱ्‍यांवर गुन्हा दाखल करण्यापर्यंत तसंच त्यांना शिक्षा करणं, अशा कामांनी गती घेतली आहे. त्यामुळेच आता गैरव्यवहार करणाऱ्‍यांवर एक प्रकारचा दबाव, भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेही अवैध कामं कमी झाल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

अर्थातच एकीकडे ही सकारात्मक बाजू असली तरी काही वर्गात आजही साप-नागांविषयीच्या अंधश्रद्धा बघायला मिळतात. आजही विविध वाहिन्यांवर इच्छाधारी नाग-नागिणीच्या रंजक कथा दाखवल्या जातात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्गही लाभतो. त्या अंधश्रद्धा पुढे पोहोचवण्याचं काम करतात आणि यानिमित्ताने तंत्रज्ञानाचा घातक चेहरा पुढे येतो. तंत्रज्ञानाचा सकारात्मक परिणामही बघायला मिळतो. अशा प्रकारे आपलं भावविश्‍व व्यापून राहणारे हे जीव... आपण त्यांना देवत्व देतो. धोकादायक स्थितीतून सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात नेतानाही गावातल्या काही बायाबापड्या श्रद्धेनं नमस्कार करतात, पूजा करतात. मग त्यांच्या भावनांचा आदर ठेवत प्रबोधन करावं लागतं. म्हणजेच आजही प्रबोधनाचं काम पूर्णत्वाला गेलेलं नाही. आजही श्रावणातल्या सोमवारी गावातल्या शंकराच्या पिंडीवर नाग अवतीर्ण झाल्याची बातमी पसरते, तेव्हा गाव गोळा होतो. ‘देव आले...’ असं म्हणून पूजा केली जाते. अंधश्रद्धेची ही मुळं उपटणं गरजेचं आहे. खरं सांगायचं तर हे काम करणं म्हणजेच नागपंचमी साजरी करणं..!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in