ज्ञानेंविन वैराग्य ते काइ करावें बापेया?

चक्रधर स्वामींनी ज्ञानाशिवाय केलेले वैराग्य लाभदायक कसे असेल? असे म्हणून ज्ञानाचे महत्त्व प्रतिपादित केले. ज्ञान वास्तव आणि सत्यावर आधारित असते आणि प्रत्यक्ष अनुभव, अभ्यास आणि निरीक्षणातून निर्माण होते, तसेच विचार, विवेक आणि तर्काद्वारे विकसित होते.
ज्ञानेंविन वैराग्य ते काइ करावें बापेया?
Freepik
Published on

अस्वस्थ वर्तमान

डॉ. प्रवीण बनसोड

चक्रधर स्वामींनी ज्ञानाशिवाय केलेले वैराग्य लाभदायक कसे असेल? असे म्हणून ज्ञानाचे महत्त्व प्रतिपादित केले. ज्ञान वास्तव आणि सत्यावर आधारित असते आणि प्रत्यक्ष अनुभव, अभ्यास आणि निरीक्षणातून निर्माण होते, तसेच विचार, विवेक आणि तर्काद्वारे विकसित होते.

एके दिवशी पैठण येथे सर्वज्ञ चक्रधर स्वामींना सकाळचा पूजावसर झाला. त्यानंतर सर्वज्ञांनी दुमजली देवळात गमन केले. देवळाच्या सज्जावर सर्वज्ञांनी आरोहण केले. तेव्हा त्या मजल्यावरील तिसऱ्या खणातील पूर्व सज्जात एक अवधूत पश्चिमेकडे तोंड करून वज्रासनी ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या उजव्या बाजूस सर्वज्ञ विराजमान झाले. तरीही त्याने डोळे उघडलेच नाहीत. चक्रधर स्वामींनी एक श्रीकर (तळहात) त्याच्या खांद्यावर ठेवून दुसऱ्या श्रीकराने त्याच्या हनुवटीस धरले. मग सर्वज्ञ म्हणाले, “बापेया, एसणे जन्म कोणा दादुलेयाकारणें क्षेपीजत असिजे?” परंतु तो काहीच बोलेना. नजरेनं देखील पाहिना. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, “ज्ञानेंविन वैराग्य ते काइ करावें बापेया?”..

ज्ञानाशिवाय केलेले वैराग्य लाभदायक कसे असेल? असे म्हणून ज्ञानाचे महत्त्व प्रतिपादित करतात. ‘मराठी विश्वकोश’मध्ये ‘ज्ञान’ या शब्दाचा अर्थ अत्यंत व्यापक आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित असा दिला आहे. मराठी विश्वकोशानुसार, ‘ज्ञान म्हणजे एखाद्या वस्तू, घटना, तत्त्व किंवा सत्य यांचे योग्य आणि यथार्थ आकलन होणे.’ म्हणजेच, अनुभव, निरीक्षण, अध्ययन आणि चिंतन यांच्या माध्यमातून मिळणारी समज ही ज्ञान होय. ज्ञान वास्तव आणि सत्यावर आधारित असते आणि प्रत्यक्ष अनुभव, अभ्यास आणि निरीक्षणातून निर्माण होते, तसेच विचार, विवेक आणि तर्क यांच्या सहाय्याने विकसित होते.

मानवी प्रगतीचा पाया-ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान समाज आणि संस्कृतीच्या विकासासाठी आवश्यक असते. एखाद्या गोष्टीबद्दल योग्य समज प्राप्त होणे म्हणजे ज्ञान अशी व्याख्या करता येते. पाश्चात्य तत्त्वज्ञानात ज्ञानाचा अभ्यास तर्क, विज्ञान आणि अनुभव यांच्या आधारे केला जातो. येथे ज्ञान म्हणजे सत्यावर आधारित योग्य आणि न्याय्य विश्वास असे मानले जाते. प्लेटो यांनी ज्ञानाची संकल्पना मांडली, तर ॲरिस्टॉटल यांनी निरीक्षण आणि तर्कावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला. यामुळे पाश्चात्य तत्त्वज्ञानात ज्ञानाला वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक महत्त्व प्राप्त झाले, तर भारतीय तत्त्वज्ञानाने मोक्ष, आत्मज्ञान, सत्य, नीती ही मूल्य मानली.

भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान या दोन्ही परंपरा ज्ञानाच्या शोधाला समर्पित आहेत. भारतीय तत्त्वज्ञानात ज्ञान हे आत्ममुक्तीचे साधन मानले जाते, तर पाश्चात्य तत्त्वज्ञानात ते वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध प्रगतीचे आधार मानले जाते. त्यामुळे ज्ञान ही केवळ माहिती नसून सत्य, विवेक आणि प्रगतीचा मार्ग ठरते. भारतीय तत्त्वज्ञानात ज्ञानाला अत्यंत पवित्र स्थान आहे. येथे ज्ञान म्हणजे आत्मा, परमात्मा आणि विश्व यांचे यथार्थ आकलन होय. भारतीय परंपरेनुसार, अज्ञान हे दुःखाचे मूळ कारण असून ज्ञान हे मुक्तीचे साधन मानले जाते. “सा विद्या या विमुक्तये” म्हणजेच मुक्ती देणारी विद्या हेच खरे ज्ञान, असे मानले जाते.

भारतीय तत्त्वज्ञानानुसार, ज्ञान म्हणजे सत्याचे प्रत्यक्ष आकलन. हे ज्ञान मनुष्याला जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त करून मोक्षप्राप्तीकडे नेते. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञानात ज्ञानाचे अंतिम ध्येय आध्यात्मिक उन्नती आणि आत्मसाक्षात्कार हे आहे. भारतीय तत्त्वज्ञानात ज्ञानप्राप्तीच्या साधनांना प्रमाण असे म्हणतात. विविध दर्शने वेगवेगळी प्रमाणे मान्य करतात. प्रत्यक्ष-इंद्रियांद्वारे प्राप्त होणारे ज्ञान, अनुमान-तर्कावर आधारित निष्कर्ष, शाब्द-वेद व गुरुवचन, उपमान-तुलना करून मिळणारे ज्ञान, अर्थापत्ती-परिस्थितीवरून केलेला तर्क, अनुपलब्धी-एखाद्या गोष्टीच्या अभावाचे ज्ञान असे प्रमाण मानले जातात. या प्रमाणावरून गौतम बुद्ध यांनी अनुभव आणि प्रज्ञेवर आधारित ज्ञान मांडले.

कार्ल मार्क्स यांच्या मते, ज्ञान हे केवळ बौद्धिक किंवा सैद्धांतिक नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. ज्ञानाचा उगम भौतिक परिस्थितीतून होतो आणि ते मानवी अनुभव, श्रम व संघर्ष यांच्या आधारे विकसित होते. त्यामुळे मार्क्सवादी दृष्टिकोन ज्ञानाला समाजाच्या प्रगतीसाठी आणि न्याय्य व्यवस्थेच्या निर्मितीसाठी आवश्यक मानतो. ज्याप्रमाणे संपत्ती निर्माण करण्याकरिता श्रमाची गरज असते त्याचप्रमाणे ज्ञान निर्मितीसाठी सुद्धा श्रमाची आवश्यकता असते. ‘जो श्रम करीत नाही तो शोषक असतो’, असे महात्मा गांधी यांनी म्हटले. म्हणजेच विनाश्रमाने ज्ञान निर्मिती होऊ शकत नाही. सुंदर जगाची निर्मिती करायची असेल तर श्रमाला आणि ज्ञानाला पर्याय असू शकत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे ज्ञानाकडे जाण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मार्ग होय. ज्ञानयुक्त समाजाची निर्मिती करायची असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे म्हटले. तथागत गौतम बुद्धांनी ‘प्रज्ञा’, संत नामदेवांनी ‘ज्ञानदीप लावू जगी’, महात्मा जोतिराव फुले यांनी ‘विद्येविना मती गेली.’ असे जे म्हटले, त्याचा गर्भित अर्थ ज्ञानयुक्त समाजाची निर्मिती असाच आहे. भारतातील कोट्यवधी लोकांच्या मागासलेपणाचे हेच प्रमुख कारण होय, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चांगले माहीत होते. ते म्हणतात, “उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हतबल होऊन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी तो दुसऱ्याचा गुलाम बनतो.” यावरून बहुजनांच्या मागासलेपणाची कारणमीमांसा डॉ. आंबेडकर स्पष्ट करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याकरिता इतर काहीही कारण नसून त्यांनी अथक परिश्रमाने प्राप्त केलेली विद्या हेच होय, त्यामुळेच त्यांचे संपूर्ण जीवनच ज्ञानमय होते. डॉ. आंबेडकर म्हणतात, “ज्याप्रमाणं माणसाला जगावयाचे असल्यास त्याला अन्नाची आवश्यकता असते, तशीच विद्येचीही आहे. ज्ञानाशिवाय तो काय करून शकेल” यावरून डॉ. आंबेडकर, माणसाकरिता ज्ञान हेच सर्व काही असल्याचे मानतात. ‘प्रज्ञावंत’ हा ‘शिलवंत’ही असला तरच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा विकास होतो. ‘शिक्षणाला विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची जोड असावी’ याविषयीचा धरलेला आग्रह महत्त्वाचा आहे.

श्रमाशिवाय ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही आणि ज्ञानाशिवाय शील, नीती, चारित्र्य आणि वैराग्य प्राप्त होणार नाही. ज्ञानाशिवाय प्राप्त झालेले वैराग्य उपयोगाचे ठरणार नाही. त्याला जसा त्या काळचा संदर्भ होता तसा आजच्या काळाचाही संदर्भ आहे. सत्ता, संपत्ती आणि सौंदर्याच्या आमिषाने घडलेल्या अनेक प्रकरणांतून वैराग्य कशाला म्हणावे आणि ज्ञानप्राप्ती कशाला म्हणावी हा गोंधळ जनमानसात किती रुजला आहे, हे पाहता पुन्हा एकदा ‘ज्ञानविन वैराग्य कुचकामी ठरेल’ हे कुणीतरी सांगण्याची आवश्यकता आहे. सत्ता मिळवण्यासाठी संपत्ती आणि सौंदर्याचा वापर तर संपत्ती टिकविण्यासाठी सत्ता आणि सौंदर्याची गरज मागील महिन्यात घडलेल्या प्रकरणातून आपण पाहिली आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला प्रचंड धक्का लावणारी अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी ज्ञानावर आधारित समाजाची उभारणी करावी लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in