चैतन्यसाधना

चाणक्य म्हणतात की काही काही वस्तूंचे मर्दन केले की नंतरच त्यांचे गुण वाढतात. ऊस पिळून त्याचा रस निघतो.
चैतन्यसाधना

इक्षुदण्डस्तिलाः शूद्राः कान्ता हेम च मेदिनी |

चन्दनं दधि ताम्बूलं मर्दन गुणवर्धनम् ||

(लेख : निताबेन)

भावार्थ :- उस, तीळ, शूद्र, पत्नी, सोने, पृथ्वी, चंदन, दही आणि विडा चांगल्या तऱ्हेने त्यांना मळले की त्यांचे गुण वाढतात.

स्पष्टीकरण :- चाणक्य म्हणतात की काही काही वस्तूंचे मर्दन केले की नंतरच त्यांचे गुण वाढतात. ऊस पिळून त्याचा रस निघतो. तिळाचा घाण्यावर दळल्यामुळे त्यातून तेल निघते. शूद्राला आपल्यासाठी कष्ट करावे लागेल की त्याच्यातील सेवागुण वाढतात. पत्नीशी समागम केल्याने, सोन्याला ठोकल्यामुळे, पृथ्वीला नांगरून तिच्यातून पिके घेतल्यामुळे त्यांचेही गुण वाढतात. चंदन उगाळले की सुंदर लेप मिळतो, दही घुसळले की ताक मिळते आणि विडाही भरपूर चावल्यामुळे त्याची लज्जत वाढते.

जसे चंदन घासले की त्याचा सुगंध वाढतो, गुलाबाच्या पाकळ्या कुचकरल्या की त्याचा सुवास येतो. अर्थात काही गोष्टी मळल्या की त्याचा गुण प्रकर्षाने जाणवतो. निसर्गा आपला शिक्षक आहे. किती गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. मनुष्याने त्यातून खूप काही घ्यायला हवे. प्रत्येक मनुष्यामध्ये ईश्वराने काही गुण भरलेत आहेत, त्याचा वापर प्रत्येकाने करायला हवा. जसे अन्न चावून खाल्यानंतर ते आपल्या शरीराची ताकत बनते तसेच आपल्यातील गुणांचा वापर करण्यासाठी त्याचा पहिले विचार करणे किंवा त्याला कसे वाढवावे यावर मंथन करणे आवश्यक आहे. कारण पहिले त्या गुणांची जाणीव स्वतःला करून देणे आवश्यक आहे.

दहयाला घुसळले की थंड ताक मिळते, ताकापासून लोणी व लोण्यापासून तूप बनते. अर्थात सर्वात पौष्टिक गोष्ट प्राप्त होते. तसेच मनामध्ये चांगल्या विचारांना घुसळले की त्यातून गुणरूपी लोणी निघते. त्याचा वापर करत गेलो तर जीवन सशक्त आणि निरोगी बनते. ईश्वराने मनुष्याला शरीर आणि बुद्धी दिली आहे त्याचा उपयोग योग्य मार्गाने करायला हवा. जितके कष्ट करू तितके गुणवान बनू. ऊस जर तसाच ठेवला तर त्याचा गोडवा कळत नाही. पण त्याला चावून खाल्ले किंवा पिळले की त्याचा गोड रस चाखायला मिळतो. म्हणजेच कोणतीही गोष्ट तशीच ठेवली, वापरली नाही तर त्याच्या गुणांची प्रचिती येत नाही. आपण सुद्धा स्वतःला घासावे, पिळावे, घुसळावे, उगाळावे .. अर्थात आपल्यात जे आहे त्याचा खूप उपयोग करावा तेव्हा त्या गुणांची प्रचिती आपल्याला व सर्वांना येईल. नाहीतर आपले जीवन साधारण मनुष्यासारखेच राहील.

logo
marathi.freepressjournal.in