बदल

जीवनात सगळ्याच प्रकारचे बदल घडत राहतात, चांगलेही आणि वाईटदेखील...
बदल
Published on

मित्रहो, जुनी पाने गळून जातात,नवीन पालवी येते. फळं येतात, फुलं येतात आणि एकदिवस झाडं ही संपून जातं. माग त्याच्या खोडातूनच नवीन रोपाचे अंकुर हळूहळू वर येतात. पुन्हा एक जीवन फुलू लागते, बदल हा निसर्ग नियमच. मग निसर्ग, परिसर, समाज सर्वत्र बदल होतच रहातात. Change is inevitable असं इंग्रजी वाक्य म्हणून तर अगदी सुप्रसिद्धच! आपल्या आयुष्यात देखील असंच असतं ना..? शरीर बदलतं, विचार बदलतात, सवयी बदलतात, मित्र बदलतात. जीवनात सगळ्याच प्रकारचे बदल घडत राहतात, चांगलेही आणि वाईटदेखील...

कित्येकदा माणसं खूप बदलतात. ज्यांचं भलं चिंतलेलं असतं तीच माणसं आपल्याला त्रास देऊ पाहतात, आपल्याशी दुराव्याने राहतात तेंव्हा माणुसकीवरील विश्वासच उडून जातो. मात्र अशा कृतघ्न लोकांना विसरण्याची मानसिकता तयार करणं हा बदल स्वतःलाच करायला हवा ना?

जसं आयुष्यात येणारे दिवस बदलत राहतात तसंच समाजही बदलत राहतो. खाणे पिणे, कपडे यासारख्या प्रत्येक गोष्टीत सतत काहीतरी बदल होत असतात. इतकंच काय तर रोजरोज आपण वाचतो ते वृत्तपत्र असो की टीव्हीवरील कार्यक्रम ते देखील कायमच बदलत असतात म्हणूनच वाचकांच्यात टिकून राहतात. समाजमन मोठं विचित्र असतं, एकीकडं त्याला काही बदल हवे पण असतात आणि नको पण असतात. जे आपल्याला सोईस्कर असतं ते बदललं तरच समाजमन त्या बदलांना

स्वीकारते हेच वास्तव आहे.

समाजात घडलेल्या अनेक बदलांचा स्त्रियांना मात्र चांगला फायदा झाला. एकेकाळी जात्यावर धान्य दळून मग स्वयंपाक करणारी स्त्री पटकन दुकानातून धान्य, पीठ असं काही घेऊन येऊ लागली. ज्या स्वयंपाकाला पूर्वी 2,3 तास लागायचे, ती प्रक्रिया नव्या काळात, विविध उपकरणांमुळे सोईस्कर झाली. एकेकाळी घरात अडकून पडलेली स्त्री आज शब्दश: वैमानिक वगैरे होऊन आकाशात मुक्त विहार करू शकते हा किती मोठा आश्वासक बदल आहे ना?

कित्येकदा एखादी मोठी समस्या आपल्याला भेडसावत असते. खूप वेळा त्याच्याशी झुंजल्यावर एखादा छोटासा बदल करताच सगळी समस्या चुटकीसारखी सम्पून जाते. आणि मग लक्षात येते की प्रश्नाचं उत्तर इतर कुणाकडे नाही तर आपल्याकडेच होते, आपण बदललो आणि प्रश्न सुटून गेले..!

जशी जशी वैज्ञानिक प्रगती होत गेली तसतसे अनेक बदल मानवी आयुष्याला सुखकर ठरत गेले. आपल्या दैनंदिन वापरातील असंख्य वस्तू पाहता पाहता बदलून गेल्या. इतकंच नव्हे तर देशाची संरक्षण सिद्धता, नवनवीन युद्ध तंत्रज्ञान, बस- रेल्वे- विमान आदि उपयुक्त गोष्टीमधले बदल हे समाजात जसे स्वीकारले जातात तसंच विचार देखील. काळानुसार जो आपले विचार बदलून पुढे जातो तो काळाच्या कसोटीवर उतरतो असं म्हणतात. माणसाइतकेच ते देशानाही लागू पडतेय ना?

समाजात, जगात होणारे विविध बदल हे प्रत्येकाचं आयुष्य समृद्ध करणारे असावेत, त्यामुळे ती व्यक्ती, तो प्रांत आणि तो देश एका वेगळ्या अनुभवानी समृद्ध होत राहावा, प्रगतीकडे वाटचाल करत राहावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

logo
marathi.freepressjournal.in