शिवाजी राजे आणि पेशवाई : शिक्षणातील फरक
शिक्षणनामा
रमेश बिजेकर
शिवाजी महाराजांच्या शिक्षणातील विचारसरणीला सामाजिक समतेचा दृष्टिकोन होता. त्यांनी जातीव्यवस्थेच्या मर्यादा ओलांडून मावळ्यांबरोबर स्वराज्य स्थापन केले; परंतु त्यांनी शिक्षण धोरणात ठोस भूमिका घेतली नसली, तरी संभाजी महाराजांच्या शिक्षणात अब्राह्मणी दृष्टिकोन दिसतो. याउलट पेशवाई काळात शिक्षण उच्चवर्णीयांपुरते मर्यादित होते आणि जातीभेद, स्त्रीविरोधी प्रथा बळावल्या. त्यामुळे शिवाजी महाराजांचा शिक्षणातील दृष्टिकोन समतेचा, तर पेशवाईचा शिक्षण दृष्टिकोन जातीय होता, असे म्हणता येईल.
महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण व धर्मकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्त्वाचे स्थान आहे. राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक अंगाने शिवाजी महाराजांची प्रतिमा रयतेतही रुजलेली आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष आपल्या सोयीने शिवाजी महाराजांचा वापर करत आलेले आहेत. महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवन, इतिहास, संस्कृती, सामाजिक रचना, शिक्षण समजून घेण्यासाठी शिवाजी महाराजांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. शिवाजी महाराजांकडे बघण्याचे मुख्य दोन दृष्टिकोन प्रचलित आहेत. शिवाजी महाराज 'गो-ब्राह्मण प्रतिपालक' होते, हा एक दृष्टिकोन प्रचलित आहे. शिवाजी महाराजांनी मोगलाशी संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, असे त्यांचे प्रतिपादन आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हिंदू-मुस्लिम संघर्षाचा इतिहास, अशी मांडणी ते करतात. शिवाजी महाराज हिंदू म्हणून नायक, तर मोगल मुस्लिम म्हणून खलनायक अशी प्रतिमा जनसामान्यात रुजवण्यात ते यशस्वी झाले आहेत. असाच इतिहास शाळांमध्ये शिकवला गेला, शिकवला जात आहे. बालवयातच हिंदू-मुस्लिम संघर्ष त्यांच्या नेणिवेमध्ये रुजवण्यासाठी शिक्षण व्यवस्थेने मोठा हातभार लावला आहे. शिक्षण व्यवस्थेचा पुनर्विचार करताना इतिहास शिक्षणातून पिढ्या कशा घडल्या या चिकित्सेकडे दुर्लक्ष करता येत नाही. म्हणून शिवाजी महाराजांच्या इतिहास मांडणीची दुसरी बाजू समजून घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या पंथाचे इतिहासकार हा दावा खोडून काढतात. त्यांच्या मते, शिवाजी महाराज जाती व्यवस्थाविरोधी शाक्त पंथाचे होते. रयतेचे कल्याणकारी राजे होते. मोगलांविरुद्ध शिवाजी महाराजांचा राजकीय संघर्ष होता, धार्मिक संघर्ष नव्हता. त्यांना जाती व्यवस्थेचा प्रचंड सामना करावा लागला. स्वकर्तृत्वाने राजा म्हणून स्वत:ला सिद्ध केले. परंतु शिवाजी महाराजांना राजा म्हणून मान्यता देण्यास ब्राह्मण तयार नव्हते. शरद पाटील म्हणतात, "...गागाभट्टाने म्हणून वैदिक राज्याभिषेकाआधी शिवाजी महाराजांना संस्कारलोपाबद्दल प्रायश्चित्त दिले आणि नंतर उपनयन केले. शूद्र शिवाजी महाराजांना क्षत्रिय बनविण्याची किमया केली गेली, परंतु शूद्राला राजा होण्याची मान्यता दिली गेली नाही. क्षत्रिय झाल्यानंतरही त्यांचा राज्याभिषेक वेदोक्त मंत्रांनी न करता पुराणोक्त मंत्रांनी केला गेला." वर्णजाती व्यवस्थेतील बंदिस्त पोलादी भिंत कशी काम करत होती, हे या उदाहरणावरून लक्षात येते.
त्यावेळच्या राज्याभिषेक संस्काराला आजच्या परिभाषेत शपथविधी म्हणतात. शपथविधीनंतरच त्या पदाला अधिकृतता येते. म्हणून शिवाजी महाराजांनी गागाभट्टांकडून राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेकातील ब्राह्मणी कर्मकांड व अनुभवाने व्यथित होऊन तीन महिन्यांनी दुसरा तांत्रिक (शाक्त) राज्याभिषेक शिवाजी महाराजांनी करवला. त्यासाठी शिवाजी महाराजांनी अस्पृश्य स्त्रीशी विवाह केला. शिवाजी महाराज देवी उपासक होते, असे ना. सी. बेंद्रे सांगतात, तर शरद पाटील तांत्रिक पंथाचा संबंध स्त्रीसत्ताक व्यवस्थेशी जोडतात. तांत्रिक पंथ जाती व्यवस्थाविरोधी होता. यातून शिवाजी महाराज जाती व्यवस्थाविरोधी होते, असा निष्कर्ष इतिहासकार काढतात.
शहाजींनी शिवाजी महाराजांना युद्ध कौशल्य व राज्यकारभाराचे शिक्षण देण्याची व्यवस्था करवली होती. मल्लविद्या, तलवार, दांडपट्टा चालविणे, घोड्यावर बसणे, कारभार पाहणे इत्यादीचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. शहाजींच्या मर्यादित शिक्षण दृष्टिकोनात राज्यकारभाराचे (राजकीय) शिक्षण व त्यासाठी आवश्यक कौशल्य शिक्षणाचा प्रभाव होता; मात्र समग्र शिक्षण दृष्टिकोनाचा अभाव होता. त्यावेळी मुख्य शिक्षण प्रवाह म्हणून ब्राह्मणी गुरुकुले कार्यरत होती. मक्तब व मदरसे या मुस्लिम शिक्षण संस्था समांतर कार्यरत होत्या. गुरुकुलात किंवा मदरसात शिवाजी महाराजांना शिक्षण देण्यासाठी शहाजींनी प्रयत्न केल्याचे वा शिवाजी महाराजांचे गुरुकुलात वा मदरसात शिक्षण झाल्याचा उल्लेख इतिहासात सापडत नाही. परंतु शहाजींना ज्ञानाची, संस्कृतची आवड होती, असा उल्लेख सापडतो. जिजाबाई रामायण, महाभारताचे श्रवण करीत असत, त्यांच्यावर पारंपरिक (ब्राह्मणी) नीती, मूल्य शिक्षणाचा प्रभाव होता, असा उल्लेख डॉ. व्ही. जी. बसू यांच्या लिखाणात सापडतो. त्या ब्राह्मणी नीती, मूल्याच्या समर्थक होत्या, असे ते सांगतात. शिवाजी महाराजांवर ब्राह्मणी संस्कार जिजाबाईंनी केले, अशी मांडणी ब्राह्मणी इतिहासकारांकडून होताना दिसते. शहाजी, शिवाजी महाराजांचा काळ कर्मठ जाती व्यवस्थेचा काळ होता. स्त्रीशूद्रातिशुद्रांना वेदांतिक शिक्षणाची सक्त बंदी होती. अशावेळी जिजाबाईंनी रामायण, महाभारत कुठे ऐकले? जाती नियमांना बाजूला सारून अठरापगड जातीतील मावळ्यांबरोबर शिवाजी महाराजांचे बालपणापासून संबंध कसे तयार झालेत? खेळणे, बागडणे ते खानपानपर्यंत शिवाजी महाराजांचे संबंध मावळ्यांबरोबर होते. जिजाबाईंच्या परवानगीशिवाय हे संबंध प्रस्थापित होणे शक्य नव्हते. पुढे याच प्ररणेतून शिवाजी महाराजांनी मावळ्यांचे सैन्य उभारून स्वराज्य स्थापन केले.
छत्रपती होण्यापूर्वी व झाल्यानंतर शिवाजी महाराजांना इथल्या जातीधारणा, रीतीरिवाज, परंपरा यांच्याशी मूळ संघर्ष करावा लागलेला आहे. त्यांची कारकीर्द व वेळोवेळी घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येते. परंतु सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेबद्दल शिवाजी महाराजांनी ठोस राजकीय भूमिका घेतल्याचे दिसत नाही. शिवाजी महाराज छत्रपती झाल्यानंतर त्यांनी सार्वजनिक शिक्षण व्यवस्था सुरू केल्याचे वा ब्राह्मणी किंवा मुस्लिम शिक्षण संस्थात हस्तक्षेप केल्याचे उदाहरण सापडत नाही. परंतु संभाजी महाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था करताना त्यांचा शिक्षण दृष्टिकोन स्पष्ट होतो. या दृष्टिकोनाविषयी परस्परविरोधी मत अभ्यासकांमध्ये आढळतात. डॉ. व्ही. जी. बसू यांनी रामायण, महाभारतासह राज्यकारभार व युद्धनीतीचे शिक्षण संभाजी महाराजांना दिले व त्यासाठी काशी येथील पंडिताच्या घरी त्याचे शिक्षण झाले, असे मांडले आहे. गागाभट, कवी महेशदास, कवी कलश यांनी संभाजी महाराजांना शिक्षण दिल्याचे ते सांगतात. त्यांच्या मांडणीतून संभाजी महाराजांचे शिक्षण ब्राह्मणी नीती, मूल्य चौकटीत झाल्याचे निष्कर्ष निघतात. शरद पाटील, वा. सी. बेंद्रे ही मांडणी नाकारतात व अब्राह्मणी नीती, मूल्याचे शिक्षण झाल्याचे पुरावे देतात. हे पुरावे मांडण्यापूर्वी शिवाजी महाराजांना संस्कृत शिकण्यासाठी आलेल्या अडचणीकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो, राज्यकारभाराची गरज म्हणून आणि ब्राह्मणांवर विसंबून राहावे लागू नये म्हणून शिवाजी महाराजांना संस्कृत शिकायचे होते. परंतु ब्राह्मणांनी संस्कृत शिकायची परवानगी दिली नव्हती. त्यांच्या या अनुभवाचे प्रक्षेपण त्यांच्या शिक्षण विचारात दिसून येते. संभाजी महाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था व तरतूद करताना त्यांचा अब्राह्मणी दृष्टिकोन प्रगट होतो. त्यांचा हा दृष्टिकोन अभ्यासकांनी पुढीलप्रमाणे स्पष्ट केला आहे. शिवाजी महाराजांनी शाक्त विद्वानांकडून संभाजी महाराजांना शिक्षण दिले. वाराणसीला शाक्तपंथीय सामवेदी पंडित कवी कलश आणि शाक्त पंडित केशव भट यांच्याकडे शिक्षणासाठी ठेवले. वयाच्या १२व्या वर्षांपासून केशव भट संभाजी महाराजांचे गुरू होते. संभाजी महाराजांना विद्या, कला, प्रशासन, युद्धनीती, राजकारण, इतिहास, काव्यालंकार, संस्कृत, हिंदी इत्यादी विषय शिकवले गेले. त्यांनी ‘बुद्धभूषणम्’ हा ग्रंथ लिहिला. नवशिखा व नायिका भेद हे दोन काव्य लिहिले. जाती व्यवस्थाविरोधी दृष्टिकोन संभाजी महाराजांच्या लिखाणात आढळतो. यातून शिवाजी महाराजांचा शिक्षण दृष्टिकोन अब्राह्मणी होता, असा निष्कर्ष काढू शकतो.
बाजीराव पेशव्यांचा काळ हा जाती व्यवस्थेचा अत्यंत कर्मठ व अमानवीय काळ मानला जातो. विकासाच्या अंतिम टप्प्याला जातीव्यवस्था पोहचली होती. ती उर्मट व क्रूर झाली होती. दलितांच्या कमरेला झाडू, गळ्यात मडके, बालविवाह, विधवा विवाहास बंदी, विधवांचे विद्रुपीकरण, सतीप्रथा याची सक्तीने अंमलबजावणी पेशवाईत केली जात होती. जाती व्यवस्थेच्या नियमान्वये या प्रथांची अंमलबजावणी होत होती. शिक्षण याला अपवाद नव्हते. पेशवाईतील शिक्षण उच्च जातीपुरते मर्यादित व शिक्षण आशय धार्मिक, परलोकवादी होते. स्त्रीशूद्रातिशूद्रांना शिक्षण बंदी होती.
जनतेचा शिक्षण जाहीरनामा, शिक्षण बचाव समन्वय समिती, महाराष्ट्र
Ramesh.bijekar@gmail.com