मुलं आणि पालकांना वेध लागलेत ते भविष्यात काय करावं ?

रस्ते, पाणी, वीज आणि वाहतूक व्यवस्था हे सामील असतं त्यातही कायमच संधी असणार आहेत. हे सगळं लक्षात ठेवून मुलांना शिक्षण द्यायला हवं
मुलं आणि पालकांना वेध लागलेत ते भविष्यात काय करावं ?

सुप्रभात... कुठे कधी जन्म घेणं हे काही आपल्या हाती नसतं, पण प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन शिकत आयुष्य पुढे जात राहतं. शिक्षण ही गोष्ट आयुष्यभर आपल्या सोबत राहते. शाळा, कॉलेजमधील औपचारिक शिक्षणापलीकडे आयुष्यभर खूप काही आपण शिकत राहतो. परिस्थितीकडून, माणसांकडून आणि आलेल्या अनुभवातून. नुकत्याच १० वी, १२ वीच्या परीक्षा संपल्या. आता मुलं आणि पालकांना वेध लागलेत ते भविष्यात काय करावं याचे.

लहानपणी शाळा, मग कॉलेजचं शिक्षण. तिथंही कुठं कळायचं की आपल्याला नेमकं काय हवं? हल्लीची शिकणारी मुलं तरी खूप फोकस्ड असतात, पण पुढील आयुष्यात आपल्या मुलाने/मुलीने काय शिकायचं, काय करायचं हे सारं मुख्यत: आई-वडीलच ठरवत असतात. ९० च्या दशकात जसे इंजिनिअर, डॉक्टर, वकील, अकॉऊंटंट अशा मुख्य प्रकारात आम्ही सगळे शिकायला जात होतो.

नवनवीन क्षेत्रे उपलब्ध होत असली तरी मानसशास्त्र, वैद्यकीय सेवा सुविधा, शेती, पर्यटन आणि आर्थिक व्यवहार ही पाच मूलभूत क्षेत्रे ज्ञानाधिष्ठित रचनेसाठी महत्त्वाची आहेत. इथं जे संशोधन होते, जे बदल घडतात किंवा घडवले जातात ते समाजावर दूरगामी परिणाम करणारे असतात. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्यामध्ये रस्ते, पाणी, वीज आणि वाहतूक व्यवस्था हे सामील असतं त्यातही कायमच संधी असणार आहेत. हे सगळं लक्षात ठेवून मुलांना शिक्षण द्यायला हवं.

त्यासाठी अनेक पर्याय, अनेक संधी योग्य त्या खर्चात उपलब्ध व्हायला हव्यात. मुख्यत: शिक्षणाचा बाजार व्हायला नको. भविष्यातील खर्च पेलता येतील इतके पैसे मिळावेत म्हणून मुलांनी करियरच्या वाटा निवडायला हव्यातच, मात्र त्यासोबतच मुलांच्यात Empathy (सहृदयता) आणि coperation (सहकार्य) या भावना वाढल्या पाहिजेत असं प्रकर्षाने वाटतं मला.

वैयक्तिक यश, प्रतिष्ठा तर त्यांनी मिळवावी मात्र त्याचबरोबर अशा मुलांनी भरलेल्या त्या समाजाने एकत्रित मोठं व्हायला हवं. माणूस म्हणून जात, धर्म, भाषा, प्रांत, देश आदींच्या पलीकडे जावं, जगभर एक माणुसकीची चळवळ उभी राहावी असं वाटतं. एकेकाळी ज्ञानेश्वरांनी सांगितलेली विश्व बंधुता वाढत राहण्यासाठी मुलांना आपणच शिकवायला हवं ना? हे शिक्षण पाठ्यपुस्तकातून मिळणार नाही. ते माणसांच्याकडूनच मिळू शकतं. मिळायला हवं. शिक्षण असं असावं ज्यामुळे आपला आणि इतरांचा विकास व्हावा, विनाश नव्हे. तुम्हाला काय वाटतं?

logo
marathi.freepressjournal.in