ऐतिहासिक साफसफाई मोहीम

चीनच्या लष्करात मोठी खळबळ उडाली आहे; जनरल झांग यूक्सियावर भ्रष्टाचार आणि नियमभंगाचे गंभीर आरोप आहेत, आणि त्याची चौकशी फक्त चीनमध्येच नाही तर जागतिक सुरक्षा आणि सामरिक संतुलनावरही परिणाम करू शकते.
ऐतिहासिक साफसफाई मोहीम
Published on

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

चीनच्या लष्करात मोठी खळबळ उडाली आहे; जनरल झांग यूक्सियावर भ्रष्टाचार आणि नियमभंगाचे गंभीर आरोप आहेत, आणि त्याची चौकशी फक्त चीनमध्येच नाही तर जागतिक सुरक्षा आणि सामरिक संतुलनावरही परिणाम करू शकते.

चीनच्या सैन्यातील सर्वांत वरिष्ठ व प्रभावशाली अधिकारी जनरल झांग यूक्सिया यांच्याविरुद्ध गंभीर शिस्तभंग व कायदा उल्लंघनाच्या आरोपांवर चौकशी सुरू करण्यात आली आहे. हे पाऊल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीमधील नेतृत्वाला ढवळून टाकणाऱ्या, अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक बदलांपैकी एक मानले जात आहे. तसेच ही कारवाई केवळ चीनच्या देशांतर्गत राजकारणापुरती मर्यादित नसून त्याचा आंतरराष्ट्रीय सुरक्षा, चीनच्या शेजारच्या देशांवरील धोरणे आणि जागतिक सामरिक संतुलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जनरल झांग यूक्सिया हे चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे (सीएमसी) उपाध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टीच्या पोलिट ब्युरोचे सदस्य होते. याचाच अर्थ झांग हे राष्ट्राध्यक्ष ‘शी जिनपिंग’नंतरचे दुसरे सर्वांत उच्च सैन्य अधिकारी म्हणून काम करत होते.

झांग यांच्या विरोधात गंभीर शिस्तभंग आणि कायदा उल्लंघनाच्या संशयाअंतर्गत चौकशी सुरू असल्याची अधिकृत माहिती चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. भ्रष्टाचार तसेच पदोन्नतीसाठी लाच घेणे आणि अत्यंत संवेदनशील माहिती परक्यांना दिल्याचे गंभीर आरोप आहेत. अण्वस्त्रांशी संबंधित महत्त्वाची माहिती अमेरिकेला लीक केल्याचाही संशय आहे. १९७९ च्या चीन-व्हिएतनाम युद्धातील अनुभव असलेले झांग हे जिनपिंग यांचे ‘युद्धकाळातील मित्र’ मानले जात. मात्र, आता त्यांच्यावरच अण्वस्त्रांशी संबंधित ‘कोअर टेक्निकल डेटा’ अमेरिकेला पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. झांग यांनी स्वतःची एक वेगळी राजकीय टोळी (पॉलिटिकल क्लिक) तयार करून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचे चिनी संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, पक्षीय आदेशाला मान न देणे, खाजगी गटांची रचना, आणि सत्ता संरचनेतील गतिशीलतेला आव्हान देणे हे आरोप त्यांच्यावर होते. चिनी भाषेत याला गंभीर शिस्तभंग मानले जाते. गेल्या वर्षभरापासून चीनच्या ‘रॉकेट फोर्स’मधील (जी अण्वस्त्रांचे नियंत्रण करते) अनेक बड्या अधिकाऱ्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. यामध्ये माजी संरक्षण मंत्री ‘ली शांगफू’ यांचाही समावेश आहे. झांग यांच्या चौकशीमुळे हे स्पष्ट झाले आहे की, चीनच्या अण्वस्त्र विभागात भ्रष्टाचाराची आणि माहिती गळतीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत.

२०१२ मध्ये ‘शी जिनपिंग’ यांनी सुरू केलेली भ्रष्टाचारविरोधी मोहीम आता चीनच्या सैन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. या मोहिमेत आतापर्यंत अनेक वरिष्ठ सैनिक अधिकाऱ्यांना किंवा संरक्षण उद्योगातील प्रमुखांना हटवले किंवा चौकशीत ठेवले गेले आहेत. विशेष म्हणजे, झांग आणि त्यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध ही कारवाई इतकी उच्च पातळीवर कधीही झालेली नव्हती. याआधी इतक्या बड्या संख्येने उच्चस्तरीय नेतृत्वावर कारवाईची कल्पना १९७० च्या दशकातील सांस्कृतिक क्रांतीपुरती मर्यादित होती. ऐतिहासिक साफसफाई मोहिमेत शी जिनपिंग यांनी आपल्या इतक्या जवळच्या अधिकाऱ्यावरही कठोर कारवाई केली आहे. चीनच्या सत्ताधिष्टीत कोणालाही खूप श्रद्धेवर आधारित संरक्षण नाही आणि फक्त पक्ष व शिस्तेची निष्ठा महत्त्वाची आहे, असा संदेशही जिनपिंग यांनी दिला आहे. या सर्व घटनाक्रमांचे जागतिक पातळीवरील प्रभावही गंभीर आहेत. चीनच्या सैन्य नेतृत्वात असामान्य बदलांचा सतत मागोवा तैवानसह अन्य देश घेत आहेत. कारण, चीनमधील नेतृत्वबदल हा तैवानच्या सुरक्षा धोरणावर मोठा परिणाम करू शकतो. अमेरिका आणि त्याचे भागीदार देश चीनच्या सैन्य नेतृत्वातील अस्थिरतेचे परिणामांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण चीनची लष्करी आधुनिकरण मोहिम आणि सामरिक क्षमता यावरही चीनच्या धोरणात प्रभाव पडू शकतो. भारतही या स्थितीचा सखोल अभ्यास करीत आहे.

भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली जिनपिंग यांनी आपल्याच जुन्या मित्राला लक्ष्य केल्यामुळे लष्करामध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे भविष्यात लष्कराची निष्ठा डळमळीत होऊ शकते. तसेच चीन ज्या वेगाने अण्वस्त्रांची संख्या वाढवत आहे, त्या प्रक्रियेला सध्याच्या साफसफाई मोहिमेमुळे ब्रेक लागू शकतो. अंतर्गत गद्दारीमुळे लष्करी मोहिमांच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अण्वस्त्रांची माहिती जर अमेरिकेला देण्यात आली असेल तर हा आधुनिक इतिहासातील सर्वात मोठा लष्करी हेरगिरीचा प्रकार ठरेल.

रशिया-युक्रेन युद्ध आणि तैवानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, चीनच्या सर्वोच्च नेतृत्वामधील हा कलह जागतिक शांततेसाठी नवीन आव्हाने उभी करू शकतो. ड्रॅगन आपल्या अंतर्गत शत्रूंना कशा प्रकारे चिरडतो आणि यातून आपली लष्करी प्रतिमा कशी सावरतो, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.

गेल्या दोन वर्षांत शी जिनपिंग यांनी भ्रष्टाचाराविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि नेत्यांना त्यांच्या पदावरून हटवले आहे. माजी संरक्षण मंत्री ‘ली शांगफू’ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. ऑक्टोबर २०२३मध्ये त्यांना अधिकृतपणे पदावरून हटवण्यात आले. माजी परराष्ट्र मंत्री ‘किन गँग’ यांनाही रहस्यमयरीत्या पदावरून दूर करण्यात आले. सीएमसीच्या सह स्टाफ विभागाचे प्रमुख ‘लियू झेन’ली यांचा सध्या तपास सुरू असून त्यांना सैन्यातून काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे वेयडोंग सीएमसीचे माजी व्हाइस-चेअरमन आणि चीनचे दुसरे सर्वांत वरिष्ठ जनरल होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांना कम्युनिस्ट पक्षातून आणि लष्करातून काढण्यात आले. गंभीर शिस्तभंग आणि कायदा उल्लंघनाचा आरोप त्यांच्यावर होता. मियाओ हुआ हे सीएमसी पॉलिटिकल वर्क डिपार्टमेंटचे प्रमुख होते. त्यांचे मुख्य काम सैन्यात पक्षीय निष्ठा बळकट करणे हा होता. जून २०२५ मध्ये त्यांना सीएमसीमधून हटवण्यात आले. २०२४ मध्ये त्यांच्याविरुद्ध तपास सुरू झाला होता. याशिवाय इतर सात वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार व शिस्त भंग आरोपांवरून बाजूला करण्यात आले. त्यांचा तपासही सुरु आहे. त्यात सीएमसीचे माजी कार्यकारी उपाध्यक्ष हे हॉंगजुन, सीएमसी जॉईण्ट ऑपरेशन्स कमांड सेंटरचे वांग शिउबिन, पूर्व थिएटर कमांडचे कमांडर लिन शियांगयांग, लष्करी पोलिसचे माजी कमांडर ‘वांग चुनिंग’ आणि अन्य काही वरिष्ठ जनरल्स व कमांडर यांचा समावेश आहे.

जिनपिंग यांच्या या मोहिमेमुळे चीनच्या लष्करी आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, याला ‘शुद्धीकरण मोहीम’ असेही म्हटले जात आहे. या मोहिमेत सरकारी मंत्री, प्रांतीय कमिशनर, संरक्षण उद्योग श्रेणीतील अधिकारी आणि इतर सत्ताधारी अधिकाऱ्यांना गेल्या काही वर्षांत घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. २०१२ पासूनच्या हजारो अधिकाऱ्यांना कारवाईचा सामना करावा लागला आहे. २०२५ मध्ये चीनने सुमारे ६५ उपमंत्री स्तरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या संशयानुसार ताब्यात घेतले आहे. म्हणजे सर्व विभागांत ही मोहीम गती घेत आहे. जिनपिंग यांचा उद्देश पक्ष आणि सैन्य दोन्हीही पूर्णतः पक्षनिष्ठ आणि भ्रष्टाचारमुक्त ठेवणे असा असल्याचे अधिकृत धोरणात नमूद आहे, पण तज्ज्ञांच्या मते यामुळे नेतृत्वाची केंद्रीकरण आणि सत्ता-संतुलनालाही जबरदस्त बदल होत आहेत. चिनी नेतृत्व अधिक केंद्रीकृत, कठोर आणि पक्ष प्रधान निर्णय प्रक्रियेकडे वाटचाल करत आहे. चिनी लष्करामधील विश्वास, अनुभव, आणि पारंपरिक नेतृत्वाचे महत्व आता प्रश्नाखाली आले आहे. हे बदल केवळ देशांतर्गत सत्तेचा खेळ नाहीत, तर जागतिक सामरिक संतुलनावरही गंभीर परिणाम करीत आहेत. काही तज्ञांचा अंदाज असा आहे की, या बदलामुळे चीनी सैन्याची एकाग्रता वाढेल. तरीही काही ठिकाणी निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव जाणवेल. ज्यामुळे भविष्यात धोके वाढू शकतात. विशेषतः तैवान आणि आफ्रिका, मध्य आशिया किंवा पॅसिफिक भागात. चीनमधील ही साफसफाई किती यशस्वी होते हे येणारा काळ सांगणार असला तरी त्याकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष आहे हे मात्र नक्की.

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक तसेच मुक्त पत्रकार.

logo
marathi.freepressjournal.in