विधान परिषदेच्या निवडणूकीत चुरस

भाजपचे लक्ष्य काँग्रेस उमेदवार भाई जगताप आहेत की, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, हे आजच होणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होणार
विधान परिषदेच्या निवडणूकीत चुरस

राज्यसभेच्या निकालानंतर सोमवारी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी २, काँग्रेसकडे मताधिक्य नसतांना त्यांनीही दोन उमेदवार उभे केले असून भाजपने ५ उमेदवार उभे केल्याने निवडणुकीत रंगत भरली आहे. विशेष म्हणजे भाजपचे लक्ष्य काँग्रेस उमेदवार भाई जगताप आहेत की, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे, हे आजच होणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

देवेंद्र फडणवीस एका दगडात दोन पक्षी मारण्यास निघाले असले तरी एकच पक्षी गारद होणार आहे. त्यात खडसे आहेत की, जगताप हा खरा प्रश्‍न आहे. भाजपचा पाचवा उमेदवार गारद होऊ शकतो. विशेष म्हणजे गुप्त मतदान असल्याने काय चमत्कार घडणार, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

आजपर्यंत भाजपच्या प्रचार यंत्रणेचे नेतेही पाच जागा निवडून येणार, अशी हाळी पिटत आहेत. यापूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीचे नेतेही आमच्या चार जागा हमखास निवडून येतील, अशी गर्जना करीत होते; परंतु शिवसेनेचे प्रवक्ते व महाविकास आघाडी सरकारचे चाणक्य खा.संजय राऊत हे जेमतेम निवडून आले तर संजय पवार या शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा पराभव होऊन भाजपचे मुन्ना तथा धनंजय महाडिक हे निवडून आले. त्यामुळे आता या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने वाचाळपणा थांबवला असून शिवसेनेने ज्यांनी त्यांनी आपले उमेदवार निवडून आणावेत, असे म्हटल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवारासाठी १० अतिरिक्त मते हवीत. त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसकडे मताधिक्य ४४ फक्त असल्याने त्यांनी दुसरी जागा लढवू नये, असे शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांचे स्पष्ट म्हणणे होते. परंतु काँग्रेसने अट्टहास करून दोन जागा लढवल्या आहेत.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेना व महाविकास आघाडी यांच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाल्यानंतर उभ्या महाराष्ट्रात काय देशभर त्याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला धोबीपछाड दिला. विशेष म्हणजे शिवसेनेचे नंबर एकचे उमेदवार संजय राऊत यांना भाजपच्या मुन्ना महाडिक यांच्यापेक्षा कमी मते पडून जेमतेम निवडून आले. आता तर संजय राऊत यांनी ज्या सहा आमदारांनी शिवसेना उमेदवारांंच्या विरोधात मतदान केले, त्यांची नावे जाहीर केल्याने आता त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. भाजपचे किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगासमोर हाच मुद्दा उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी करप्ट प्रॅक्टीस केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे आणि नेमके अशाच वेळी विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे.

राज्यसभा निवडणूक १० जूनला झाली. त्याचे पडसाद गेले दहा दिवस उमटत आहेत. राज्यसभा निवडणुकीत मतपत्रिका दाखवून मतदान केले जाते. असे असतांनाही छोटे पक्ष-अपक्ष व इतर दहा ज्ाादा मते भाजपला मिळाली. भाजपचे संख्याबळ हे जेमतेम ११३ पर्यंत होते. (१०६+ ७ = ११३). तर भाजपच्या तिन्ही उमेदवारांना राज्यसभा निवडणुकीत १२३ मते पडली. ही रणनीती देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वी करून दाखवली आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये घबराट निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडे १६९ संख्याबळ असतांनाही राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार निवडून आणता आला नाही. या राज्यसभा निवडणुकीतील पराभवाने शिवसेना व महाविकास आघाडीतील पक्षांची दाणादाण उडाली आहे. त्याचे प्रतिबिंब आज होत असलेल्या विधानपरिषद मतदानाच्यावेळी दिसून येत आहे.

राज्यसभा निवडणुकीत ज्या तीन अपक्षांची मते भाजपकडे गेली, ती रसद राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोहचविल्याची चर्चा गेले आठवडाभर सुरू आहे. बहुजन विकास आघाडीकडे तीन मते होती. या घटक पक्षाचे नेते हितेंद्र ठाकूर यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी गेली तीस वर्षे सख्य होते; मात्र त्यांनीही शिवसेनेला मते न देता आपली तीनही मते भाजपच्या पारडयात टाकली. ही सर्व पार्श्वभूमी पाहता महाविकास आघाडीत गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सुतोवाच केले की, राज्यसभा निवडणुकीत अपक्षांची जबाबदारी शिवसेना नेतृत्वाने घेतली होती. त्यामुळे या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना सावध झाली आहे व त्यांनी तुम्ही तुमचे पाहून घ्या, असे सांगून हात झटकले आहेत.

या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी गुप्त मतदान होत असून यामुळे महाविकास आघाडीत घबराट पसरली आहे, यात शंका नाही. विशेष म्हणजे, एमआयएम हा पक्ष भाजपची बी टीम आहे, असा प्रचार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हे तिन्ही पक्ष करीत होते. यावेळी एमआयएम व समाजवादी पक्षाने राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराकडे आपली मते टाकल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी आपले पत्ते शनिवारपर्यंत उघडे केले नव्हते; मात्र आश्‍चर्याची बाब म्हणजे एमआयएम व समाजवादी पक्षांच्या नेत्यांची दाढ्या कुरवाळण्यात शिवसेना मागे राहिली नाही. एकूण सगळे रागरंग राज्यसभा निवडणुकीत दिसून आल्याने आता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने या विधानपरिषद निवडणुकीत सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येते.

एका बाजूला आघाडीतील बिघाडी दिसून येत असून दुसऱ्या बाजूला भाजपचे देवेंद्र फडणवीस यांची व्यूहरचना मागील दोन दिवस पध्दतशीरपणे चालू असल्याचे दिसून येत आहे. फडणवीस यांचे लक्ष काँग्रेस उमेदवार भाई जगताप यांच्या पराभवाकडे असले तरी फडणवीसांचे खरे लक्ष्य त्यांचे जुने सहकारी व भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेलेले एकनाथ खडसेंवर असल्याचे दिसून येते. तसं पाहू गेल्यास राष्ट्रवादीकडे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा कोटा बरोबरीचा आहे. उलट अनिल देशमुख व नवाब मलिक हे दोघेही विधानपरिषद निवडणुकीतील मतदानास येऊ शकत नाही, हे लक्षात घेता राष्ट्रवादीला रामराजे निंबाळकर व खडसे यांना निवडून आणण्यासाठी एक दोन मते कमी पडतात, असे दिसते. राष्ट्रवादीची मते फुटल्यास एकनाथ खडसेंचा पराभव होऊ शकतो.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमधील त्यांच्या विरोधकांना त्यांनी अलगद बाजूला केले व आपल्या समर्थकांना आणून बसविले. भाजपच्या कोअर कमेटीमध्ये महाराष्ट्रात सहा नेते होते. आता त्यापैकी केवळ फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील (प्रदेश अध्यक्ष) राहिले आहेत. खडसे पाठोपाठ विनोद तावडे, पंकजा मुंडेही गेल्या आहेत. विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना उमेदवारी न मिळाल्याने पंकजाताईंच्या समर्थकांनी बीड, औरंगाबादमध्ये धुमाकूळ घातला होता. विशेष म्हणजे पराभूत झालेले माजी मंत्री राम शिंदे यांना मात्र विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. राज्यसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीचे नेते सावध झाले असून सेना, राष्ट्रवादी आपले प्रत्येकी दोन-दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यतत्पर झाल्याचे गेल्या आठवडाभरातील घटनेनंतर दिसून येते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in