दहशतवाद्यांच्या हातचे कोलित!

या बैठकीत बोलताना समाजमाध्यमांच्या रूपाने दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांच्या हाती कोलित मिळाले
दहशतवाद्यांच्या हातचे कोलित!

नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीच्या दहशतवाद प्रतिरोधक समितीची बैठक झाली. दोन दिवसांच्या या बैठकीचे पहिले सत्र मुंबईमध्ये आणि दुसरे सत्र नवी दिल्लीत संपन्न झाले. या बैठकीस सुरक्षा समितीच्या १५ सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना समाजमाध्यमांच्या रूपाने दहशतवादी कारवाया करणाऱ्या गटांच्या हाती कोलित मिळाले आहे, याकडे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लक्ष वेधले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनांमुळे संपर्काची विविध साधने उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मानवी जीवन अधिक सुकर होत आहे आणि या साधनांमुळे जग खूपच जवळ आले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ जसजसा सर्वसामान्य जनतेला होत आहे त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून जगात दहशतवाद कसा माजविता येईल, तो अधिक कसा पसरविता येईल यासाठी कार्यरत असलेले अनेक दहशतवादी गट जगात अस्तित्वात आहेत. अशा काही दहशतवादी गटांना काही सरकारेही मदत करताना दिसून येत आहेत. समाजमाध्यमांच्या क्षेत्रात जी नवनवीन संपर्कमाध्यमे आली आहेत त्यांचा वापर करून दहशतवाद्यांकडून आपले जाळे विस्तारले जात आहे. समाजमाध्यमांद्वारे पाठविले जाणारे ‘इनि्क्रप्टेड मेसेज’ आणि ‘क्रिप्टो करन्सी’ यांचा दहशतवादी गटांकडून, समाजविघातक शक्तींकडून होणारा वापर रोखण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे याकडे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लक्ष वेधले आहे. दहशतवादास आश्रय देणारे देश दहशतवाद म्हणजे ‘सरकारकडून प्राप्त होणाऱ्या निधीवर चालणारा उद्योग’ असल्याचे समजून चालले आहेत, पण संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने अशा राजवटींविरुद्ध जे दहशतवाद प्रतिरोधक निर्बंध लादले त्याचे दृश्य परिणाम दिसून येत असल्याचे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले. अशा गटांपैकी ‘लष्कर ए तय्यबा’, ‘जैश ए मोहम्मद’ यांसारख्या संघटनांच्या म्होरक्यांवर संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली असली तरी अजून अनेक दहशतवादी मोकाट आहेत. मुंबईवर ‘२६/११’चा दहशतवादी हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्यास चीनकडून मोडता घातला जात आहे, याकडे परराष्ट्र मंत्र्यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानला आपल्या कह्यात ठेवण्यासाठी आणि भारताचा पाणउतारा करण्यासाठी नकाराधिकाराचा वापर करून चीनकडून या दहशतवाद्यांना पाठीशी घातले जात आहे हे उघड आहे. दहशतवादी गट, त्यांचे वैचारिक साथीदार, एकेकटे हल्लेखोर यांच्याकडून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपली क्षमता वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत, याकडे या बैठकीत लक्ष वेधण्यात आले. समाजमाध्यमे हे दहशतवाद्यांच्या हाती लागलेले कोलित असल्याचे दिसून येत आहे. समाजमाध्यमांचा वापर करून जगातील अनेक दहशतवादी गट कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच ‘क्रिप्टो करन्सी’च्या माध्यमातून दहशतवादी कारवाया करण्यासाठी पैसा पुरविणे सोपे झाले आहे, पण दहशतवाद्यांना किंवा त्यांच्या समर्थकांना या माध्यमांचा वापर करण्यापासून रोखायचे कसे, हा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न झाले तरच त्यास आळा बसू शकेल. समाजमाध्यमे, आभासी चलन यांचा दहशतवाद्यांकडून होणारा वापर हा जसा चिंतेचा विषय आहे त्याचप्रमाणे दहशतवाद्यांकडून ड्रोनचा केला जाणारा वापर हीदेखील चिंतेची बाब आहे. अमेरिकेने दहशतवाद्यांविरुद्ध ड्रोनचा वापर करून त्यांची पाळेमुळे उखडून टाकण्याचा प्रयत्न अफगाणिस्तानमध्ये केला होता. आता अशी ड्रोन विमाने वापरून त्याद्वारे दहशतवाद्यांकडून हल्ले केले जातील, हे परराष्ट्र मंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद प्रतिरोधक समितीने, दहशतवादासंदर्भात कसलीही दयामाया न दाखविण्याचे धोरण अवलंबावे, असे आवाहन सदस्य देशांना केले आहे. पाकिस्तानसारखे देश तर उघडपणे दहशतवाद्यांना आसरा देताना दिसत आहेत, तर चीनसारख्ाा देश नकाराधिकाराचा वापर करून दहशतवाद्यांना पाठीशी घालत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांमध्ये दहशतवादाविरुद्ध लढण्यावर एकमत होत नसेल, तर जागतिक पातळीवर दहशतवादाची पाळेमुळे कशी खणून काढणार हा मोठा प्रश्न आहे. या बैठकीत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. दहशतवाद्यांकडून नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, त्या आव्हानास सामोरे जाण्यासाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे गुटेरस यांनी म्हटले आहे. पण जोपर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांचे दहशतवादाचा बीमोड करण्यावर मतैक्य होत नाही तोपर्यंत दहशतवादी कारवाया बंद होणार नाहीत हे कटू सत्य आहे. समाजमाध्यमे म्हणजे दहशतवाद्यांच्या हाती मिळालेले कोलितच आहे. हे लक्षात घेऊन अत्याधुनिक अशा समाजमाध्यमांचा वापर दहशतवाद्यांकडून केला जाणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता जागतिक पातळीवर घेणे अत्यावश्यक आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in