आला उन्हाळा, त्वचा सांभाळा

उन्हाळा सुरु झाला, हे आपल्याला कळण्याअगोदर बहुराष्ट्रीय कंपन्यांना कळते. सर्व ठिकाणी वर्तमानपत्रांमधून आणि टीव्हीवर उन्हाळ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती अगदी नियमित सुरु होतात.
आला उन्हाळा, त्वचा सांभाळा

- सुमिता चितळे

ग्राहक मंच

उन्हाळा सुरु झाला, हे आपल्याला कळण्याअगोदर बहुराष्ट्रीय कंपन्यांना कळते. सर्व ठिकाणी वर्तमानपत्रांमधून आणि टीव्हीवर उन्हाळ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती अगदी नियमित सुरु होतात. एअर कंडिशनर्स, पंखे, निरनिराळी सरबतं आणि याच श्रेणीतील भरपूर विक्री होणारे छोटे पण महत्त्वाचे उत्पादन म्हणजे सनस्क्रीन. बाकीच्या वस्तू घेताना जसा आपण विचार करून खरेदी करतो, तसेच सनस्क्रीन खरेदी करताना आणि वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. कारण ते आपल्या त्वचेशी आणि त्यातून चेहऱ्याच्या कोमल त्वचेशी निगडित असते.

उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाशामुळे आपली त्वचा लाल दिसू लागते, त्यावर अचानक डाग येतात आणि ती कोरडी पडते. सूर्याच्या अतिनील किरणांनी (अल्ट्रा व्हॉयलेट रेज) आपल्या त्वचेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन उपयोगी ठरते. सनस्क्रीन विकत घेताना ते जाहिराती पाहून किंवा फक्त आकर्षक रंग व सुगंध असलेले न घेता ते आपल्या त्वचेनुसार निवडायला हवे. कोरड्या त्वचेसाठी आर्द्रता असलेले आणि सिलिकॉन किंवा ग्लिसरीन असे तैलयुक्त सनस्क्रीन लावणे उपयुक्त असते. तेलकट त्वचेसाठी जलयुक्त आणि जेलयुक्त सनस्क्रीन वापरावे. संवेदनशील त्वचेसाठी योग्य ती खनिजं असलेलं आणि गंधविरहित सनस्क्रीन अनुकूल असते. याबरोबरच एसपीएफ (सन प्रोटेक्शन फॅक्टर) हा घटकही महत्त्वाचा आहे. एसपीएफ हा घटक संबंधित सनस्क्रीनची सूर्याच्या अतिनील किरणांपासून (UV Rays) त्वचेचे संरक्षण करण्याची क्षमता दर्शवतो. रोजच्या वापरासाठी कमीत कमी १५ एसपीएफ असलेले सनस्क्रीन उपयोगी असते. पण उन्हातान्हात जास्त वेळ वावरणार असाल तर मात्र एसपीएफ ३० किंवा त्यापेक्षा जास्त असलेलं सनस्क्रिन लावणे कधीही चांगले. तीव्र अतिनील सूर्यकिरणांपासून (UVB, UVA) त्वचेचे होणारे नुकसान रोखण्यासाठी PA + रेटिंग असलेले आणि एसपीएफ ३० पेक्षा जास्त असलेले सनस्क्रिन लावणे फायद्याचे ठरते. एसपीएफ जर १५ असेल तर ९३%, ३० असेल तर ९७% आणि ५० असेल तर ९८% अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. समुद्र किनाऱ्याजवळ राहणाऱ्यांनी किंवा बीचवर सुट्टीत जाणाऱ्यांनी एसपीएफ ३० ते ५० असलेले सनस्क्रीन निवडावे.

खनिजयुक्त सनस्क्रीन लावल्यावर त्याचा पातळ थर त्वचेवर बसतो आणि अतिनील सूर्यकिरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. याउलट रासायनिक सनस्क्रीन त्वचेत शोषले जाते. पोहताना किंवा खूप घाम येत असताना मात्र जलयुक्त नाही तर जलरोधक असणारे सनस्क्रीन लावणे उपयुक्त असते. या सनस्क्रीनची क्षमता पाण्यात असताना ४० ते ८० मिनिटेच राहते, त्यामुळे ते पुन्हा पुन्हा लावावे लागते. इतर वस्तूंप्रमाणेच सनस्क्रीन विकत घेताना त्याची कालबाह्यता तारीख बघून घावी. बहुतेक वेळा तीन वर्षे इतकी असते. कारण त्यानंतर त्याची परिणामकारकता कमी होत जाते. तसेच आणखीही काही गोष्टी अवश्य विचारात घ्याव्यात. त्या म्हणजे ग्राहकांनी विशिष्ट सनस्क्रीन वापरल्यावर त्यांचा प्रतिसाद, त्यांची त्याबद्दलची रेटिंग्स, त्याची परिणामकारकता, सुगंध इत्यादी गोष्टी विचारात घ्यायला हव्यात. प्रत्येक सनस्क्रीनमध्ये रासायनिक पदार्थ असतातच. रसायनमुक्त असे कोणतेही सनस्क्रीन नसते. प्रत्येक सनस्क्रीनचे घटक पदार्थ काळजीपूर्वक बघायला हवेत. प्रत्येकाच्या त्वचेला सर्वच सनस्क्रीन अनुरूप किंवा योग्य असतीलच असे नाही. एखाद्या विशिष्ट रसायनाने कोणाला ॲलर्जी होत असेल तर ते पाहणेही आवश्यक आहे. त्यासाठी आधी त्वचेच्या छोट्या भागावर सनस्क्रीन लावून त्याचा काही दुष्परिणाम होत नाही ना, हे पाहणे गरजेचे आहे. कोणतेही दुसरे मलम लावण्यापूर्वी किंवा मेकअप करण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला हवे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी १५ ते २० मिनिटे अगोदर सनस्क्रीन लावल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. उन्हाच्या झळा खूप असतील तर शरीराचा जो जो भाग कपड्याने झाकलेला नाही, त्या सर्व भागावर सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. अशा वेळी सनस्क्रीन जास्त प्रमाणात लावायला हवे जेणेकरून त्याचा योग्य परिणाम होईल. शिवाय दर दोन-तीन तासांनी स्प्रे किंवा पावडर स्वरूपात आपण सनस्क्रीन लावू शकतो. सनस्क्रीन मानवी त्वचेला हानिकारक अशा सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. योग्य त्या सनस्क्रीनचा नियमित वापर केल्यास त्वचेची होणारी हानी टाळू शकते आणि त्वचेचे आरोग्य चांगले राखले जाते. पूर्वी काळी/लाल पडलेली रापलेली त्वचा सनस्क्रीनने नितळ होऊ शकत नाही, पण नंतर होणारे त्वचेचे अधिकचे नुकसान सनस्क्रीन लावल्यामुळे टळू शकते. अशा प्रकारे आपल्या त्वचेचा पोत, आपले वातावरण, आपला भौगोलिक विभाग या सर्व गोष्टींचा विचार करून कोणत्याही जाहिरातींच्या अवास्तव दाव्यांना न भूलता योग्य ते सनस्क्रीन निवडावे. कितीही उच्च दर्जाचे सनस्क्रीन लावले तरीही उन्हातून जाताना टोपी घालावी, काळा चष्मा (सनग्लासेस) वापरावा; तसेच छत्रीचाही आडोसा घ्यावा. शक्य असेल तर दुपारी बाहेर उन्हात जाणे टाळावे.

मुंबई ग्राहक पंचायत

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in