कम्फर्ट झोन

दैनंदिन जीवनातील तोचतोचपणा सोडून वेगळं काही तरी करण्याची थोडी तरी भीती प्रत्येकाच्या मनात असते.
कम्फर्ट झोन

आईचं गर्भाशय प्रत्येक माणसाचा पहिला कम्फर्ट झोन असतो. हा पहिला कम्फर्ट झोन सोडताना त्या गर्भालाही प्रचंड त्रास होतो. हा त्रास नको म्हणून जर बाळाने गर्भाशयच सोडलं नाही, तर बाळ हे जग पाहूच शकणार नाही. अर्थात बाळाला हा झोन कधीतरी सोडावाच लागतो. त्याच्यासमोर दुसरा पर्याय नसतो. एकदा का बाळ या जगात आलं, की मग मात्र त्याचा झोन ते तयार करू लागतं. ते मोठं होईल, तसं एकतर त्याची त्या झोन मधून बाहेर पडण्याची इच्छा कमी होत जाते. किंवा सतत झोन बदलण्याची प्रक्रिया चालू राहते.

दैनंदिन जीवनातील तोचतोचपणा सोडून वेगळं काही तरी करण्याची थोडी तरी भीती प्रत्येकाच्या मनात असते. अशा झोनचं वलय ज्यांच्या भोवती असतं, त्यांना घरकोंबडा, पुस्तकी कीडा, आई वेडा, बाईल वेडा, काम वेडा अशी विशेषणं भोवतालच्या जगातून मिळतात. आपलं घर, आपली आई, आपली पत्नी, पुस्तकं, आपलं काम इ. गोष्टींमध्ये ज्याचा त्याचा कम्फर्ट झोन असू शकतो, अशा व्यक्तीना स्वत:चा कम्फर्ट झोन सहजासहजी सोडता येत नाही.

दीपिका वीस वर्षं एका कंपनीत नोकरी करत होती. वीस वर्षांनंतर तिच्यापेक्षा वयाने लहान असणारी एक तरूणी तिची बॉस म्हणून ऑफिसमधे नव्याने रूजू झाली. बॉस आधुनिक विचारसरणीची, तंत्रज्ञानाचा पुरेपुरे वापर करणारी, अत्यंत व्यावसायिक वृत्तीची तरुणी होती. कंपनीच्या फायद्याशिवाय दुसरा कोणताही विचार न करणारी बॉस होती. दीपिका साधीसुधी, तंत्रज्ञानात कच्ची, भावनाप्रधान, जुन्या विचारांना पकडून ठेवणारी अशी होती. नवी बॉस आल्यापासून सतत त्या दोघींमधे वाद होऊ लागले. न राहवून एकदा दीपिका बॉसला म्हणाली, ‘‘मी वीस वर्षे या कंपनीत काम करते. तू काल आलेली...मला काय शिकवतेस गं. उलट तू इथल्या कामाची पध्दत विचार आम्हाला.’’ त्यानंतर बॉसने एकदाच समजावून सांगितलं. ‘‘मी नवीन आहे, पण कंपनीचा फायदा हा माझा एकमेव हेतू आहे. तुम्हाला यापुढेही इथेच काम करायचं असेल तर तुम्हाला नवीन तंत्रज्ञान आणि नव्या गोष्टी शिकाव्या लागतील. नवे नियम पाळावे लागतील. वेळ चुकवणे, वेळ घालवणे इथून पुढे चालणार नाही. कुणाच्याही सारख्या सारख्या चुका झाल्यास कोणतीही नोटीस न देता कामावरून काढून टाकण्यात येईल.’’

बॉसचं ऐकून कंपनीतले सगळेच थोडे नाराज झाले होते. कारण आतापर्यंत कंपनीत आरामात, कुठल्याही ध्येयाशिवाय फक्त समोर आलेलं काम पूर्ण करणं एव्हढंच होतं. आज नव्या बॉसने कंपनीच्या ध्येयाशी कर्मचाऱ्यांचं ध्येय जोडलं होतं. दीपिका व्यतिरिक्त सगळे जुनं सोडून नव्याशी जोडले गेले होते. तीन महिन्यात कंपनीच्या फायद्यात वाढ झाली होती. दीपिकाला सगळं समजत होतं, पण तिची कार्यशैली तिला तिच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडू देत नव्हती. शेवटी एक दिवस बॉसने तिला राजीनामा द्यायला लावला. जेंव्हा तिला बॉसचा त्रास होत होता, तेंव्हाही दुसरी नोकरी बघण्याचं धाडस तिने केलं नव्हतं. कारण चाललंय तसंच चालू दे. कुठे आता नवं काही करायचं. या विचाराने तिचं खूप मोठं नुकसान झालं होतं.

एखादं काम करताना मनाला बरं वाटतं. परत परत तेच केलं तरी छानच वाटतं. ती गोष्ट आपल्या सोयीची, सवयीची, मनाला सुखावणारी असते. ती पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. विनासायास जे सहज मिळतं, ते हवंच असतं. मात्र थोडीशी गैरसोय झाली तर अवघडलेपण येतं. काय करावं, सुचत नाही. अशा आरामदायी, सहज मिळणाऱ्या सुखासीन, मानसिक अवस्थेला कम्फर्ट झोन म्हणू शकतो.

मुलीचं लग्न झाल्यावर ती सासरी येते तेंव्हा तो काही तिचा कम्फर्ट झोन नसतोच. तिला त्यासाठी मनाची तयारी करावी लागते. तिथे तिला तिचा झोन शोधावा लागतो. खूप सगळ्या तडजोडी कराव्या लागतात. जवळजवळ पंचवीस वर्षे तिचं माहेर तिच्यासाठी तिचा झोन असतो. लग्नानंतर ते बदललं तरी तिला ते नवं आयुष्य हवं हवं वाटत असतं. त्यामुळे ती काही महिन्यात सासरी रमून जाते. सासरी जर ती कम्फर्टेबल नाही झाली तर तिच्या नव्या संसारात अनेक अडचणी येऊ शकतात. काही कालावधीनंतर तिचं सासर हाच तिचा कम्फर्ट झोन होतो.

मी जीन्स टॉपमध्येच कम्फर्टेबल असते. मी आपली किचनमधेच बरी, आमचा मैत्रिणींचा एक ग्रुप आहे तोच बरा..मी दुसऱ्या ग्रुपमधे जातंच नाही. मला तर केसांचा हाच कट आवडतो. मला घर सोडून अजिबात करमत नाही. मला ना पुण्यातच नोकरी हवी. पुण्यातलाच नवरा हवा. मी आणि माझी पुस्तकं बास, आई असेल तर मला कुणी लागत नाही, मित्र हेच माझी दुनिया, काम काम आणि काम इतकंच माझं विश्व. अशा पध्दतीने अनेक प्रकारामध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा कम्फर्ट झोन असू शकतो. जेंव्हा हा झोन काही कारणाने सोडावा लागण्याची शक्यता निर्माण होते, तेंव्हा लगेच समस्यांची मालिका डोक्यात घोळू लागते. कसं होणार, काय होणार, नवीन जागा कशी असणार. तिथली माणसं कशी असणार. आपल्याला तिथलं वातावरण सोसेल की नाही. इ.इ.

सततचा कम्फर्ट झोन माणसाचा शत्रू आहे, असं म्हटलं जातं. कारण सातत्याने एकाच कम्फर्ट झोनमधे अडकून राहणाऱ्या कुणालाही यश मिळण्यात अडचणी येऊ शकतात. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून थोडं नवं स्वीकारलं पाहिजे. माइंड सेट बदलण्याची वृत्ती असायला हवी. मी नव्याची कास धरणार नाही, जुन्याचा ध्यास सोडणार नाही, असं म्हणणाऱ्या माणसांना यश हुलकावणी देत राहतं. जसं की वरील उदाहरणात दीपिकाला नोकरीत नवं काही नको होतं. कंपनीचे नवे नियमही नको होते. नोकरीही बदलायची नव्हती. कारण तिला जुनं तेच हवं होतं. परंतु त्याचमुळे तिला बरंच काही सहन करावं लागलं. अनेकांना कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचं असतं परंतु त्यांना जमत नाही कारण ते सवयीचं असतं. सवयी सोडायला मन सहजासहजी तयार होत नाही. मग काय करायचं..?

कम्फर्ट झोन समजून घेणे -

आपला नेमका कम्फर्ट झोन काय आहे, ते समजून घेतलं पाहिजे. मी माझा कम्फर्ट झोन का सोडत नाही, याची किमान पाच कारणं लिहावीत. त्या कारणांमधे भीती, अवघडलेपण, कंटाळवाणी परिस्थिती, गैरसोय इ. असू शकतं. दीपिकाने नव्या बॉसला स्वीकारताना होणाऱ्या कोंडमाऱ्याची कारणं लिहायला हवी होती. भावना समजून घ्यायला हव्या होत्या.

काहीतरी चुकतंय -

कम्फर्ट झोन शोधताना किंवा त्यातून बाहेर पडताना ज्या भावना मनामधे तयार होतात, त्या प्रत्येक वेळी तीव्र स्वरूपाच्या असतीलच असं नाही. त्या भावनांना प्रतिसाद देणं खूप कठीण असेलच असंही नाही. परंतु त्या भावनांकडे लक्ष द्यायला हवं. तो प्रतिसाद सौम्य असायला हवा. तरच नव्या दिशा शोधणं सोयीचं होईल. दीपिकाने तिच्या भावनांना सौम्यपणे प्रतिसाद दिला असता, नव्या नियमांचं स्वागत केलं असतं. आपलं काहीतरी चुकतंय, याकडे लक्ष दिलं असतं तर परिणाम चांगला आला असता.

प्रतिक्रियांचा दुष्परिणाम -

कम्फर्ट झोन सोडत असताना कधीतरी भावनांची तीव्रता वाढूही शकते. ग्रामीण भागातील मुलीना फाईव्ह स्टार हॉटेलमधे पहिल्यांदा जाताना भीती, अवघडलेपण यासारख्या ताणाला सामोरं जावं लागतं. अशावेळी त्यानी ‘मला नाही यायचं कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये. मला नाही आवडत असं पैसे उधळायला’ बाहेर जाण्याच्या भीतीमुळे अशी प्रतिक्रिया दिल्याने नातेसंबंध खराब होऊ शकतात. कुठलीही तीव्र प्रतिक्रिया न देता भावना सौम्य करण्याचा प्रयत्न करावा.

ध्येयात नेमकेपणा हवा -

आपल्याला ठेविले अनंते...असंच राहायचं असेल तर जे आपण करतो आहोत, तेच आपलं ध्येय राहिल. तोच आपला कम्फर्ट झोन असेल. पण आपल्याला काहीतरी नाविण्यपूर्ण आव्हानात्मक करायचं असेल तर त्यातही स्पष्टता हवी. ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनी...जाळुनी किंवा पुरूनी टाका’ असं कवी केशवसूत सांगतात. ते पुढे असंही म्हणतात की, ‘सावध ऐका पुढल्या हाका...खांद्यास चला खांदा भिडवूनी...’ नव्या ध्येयातील नेमकेपणा, नवे विचार, नवी दिशा, नवा उत्साह, ध्येयाप्रती समर्पण भाव या पंचसूत्रीमुळे यश मिळण्याची खात्री पटते.

कृतीवर लक्ष देणे -

ध्येयनिश्चितीनंतर आपल्याला योग्य ती कृती करावी लागेल. ताबडतोब बदल करुन, परिस्थिती बदलून लगेचच गुणवत्तापूर्ण परिणाम मिळू शकत नाही. आपल्या आतून बदलांसाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. त्या बदलांसाठी आपण करणार असणाऱ्या कृतीची आखणी केली गेली पाहिजे. त्याचा पाठपुरावा करायला हवा.

उदा.- घर सोडून कधीही बाहेर न गेलेल्या गृहिणीला शहरात जावं लागणार असेल तर तिने मनाच्या तयारीसाठी, मनातील भीती घालवण्यासाठी मनाला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. या प्रशिक्षणाचा कृतीमधे उपयोग करून घेतला पाहिजे.

दृष्टिकोन -

कम्फर्ट झोन सोडण्याच्या कारणामध्ये स्वत:बरोबर समाजाची उन्नती, प्रगती हा हेतू जर एखाद्याचा असेल, तर आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोन तर ठेवायला हवाच. नव्याचं कुतुहल, जिज्ञासा, धाडस यामुळे ध्येयाची परिपूर्ती होणार, यात शंकाच नाही.

माणसाचा जन्म, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचं मोठं होणं, अगदी ज्येष्ठत्व प्राप्त होणं, हे बदल माणसामधे नैसर्गिकरित्या होतात. प्रत्येकवेळी माणसाला त्या त्या वयातील त्याचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो. तो सहज सुटतो देखील, कारण या झोनमधून त्या झोनमधे जाण्याचं नैसर्गिक ज्ञान पिढ्यान‌पिढ्या मिळत आलं आहे. हे बदल होणार याची मानसिक तयारी झालेली असते. त्यामुळे अपरिहार्य असणाऱ्या झोनमधून बाहेर पडणं तुलनेनं सोपं जातं. हेच नोकरी, व्यवसाय, लग्न, शैक्षणिक टप्पे इ. ठिकाणचे झोन सोडताना त्रास का होत असावा.

वेदना, संघर्ष, नैराश्य, भीती, ताण, काळजी या भावना कम्फर्ट झोनमधून बाहेर पडताना निर्माण होऊ शकतात. या भावना समजून घेतल्या तर नवनवीन कल्पना, नवी स्वप्नं, नवी आव्हानं, आपल्यामध्ये असणारी नवी जुनी कौशल्ये, आपली बुध्दिमत्ता, आपलं शारीरिक-मानसिक सौंदर्य, वेगवेगळे सेमिनार्स, व्यवसाय या सगळ्याला एक अर्थ प्राप्त होतो. सुखासीन अवस्था आपल्याकडे आहे की नाही, हेच काहीना कळत नाही आणि काहीना कळलं तर ते त्या अवस्थेला चिकटून बसतात. कितीही त्रास झाला तरी दीपिका तिचा माइंडसेट बदलू शकली नाही. कुठल्याही आघातापेक्षा त्या आघातांचे धोके मोठे असतात. कम्फर्ट झोन सोडला नाही तर संकटाचा सामना करावा लागू शकतो. संकटातून धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कम्फर्ट झोन सोडा म्हणजे नवीन अनुभव मिळेल. नव्या संधी शोधता येतील.

logo
marathi.freepressjournal.in