निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आपापली ध्येयधोरणे आपल्या जाहीरनाम्यांमध्ये स्पष्ट करत असले तरी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर यातील बहुसंख्य मुद्दे मागे पडताना दिसतात.
निवडणुकीनंतरही संघर्षमय राजकारण

- डॉ. अशोक चौसाळकर

निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आपापली ध्येयधोरणे आपल्या जाहीरनाम्यांमध्ये स्पष्ट करत असले तरी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर यातील बहुसंख्य मुद्दे मागे पडताना दिसतात. सार्वत्रिक निवडणुकांचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडत असताना याची प्रचिती देशातील जनतेला येत आहे. मात्र यापुढील सभांमध्ये नेत्यांची भाषणे अधिक तीव्र, टोकदार आणि स्फोटक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही आघाड्यांची विचारधारा पूर्णपणे परस्परविरोधी आहे. त्यामुळे निकालानंतरही हे वाद मिटणार नाहीत.

लोकसभा निवडणुकीला सुरुवात होऊन जवळपास निम्मा काळ लोटला आहे. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान दोन ते तीन टक्क्यांनी कमी झाले आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षी उन्हाळा अत्यंत तीव्र असून पहिल्या दोन टप्प्यांमध्ये लोकांना आकर्षित करणारे फारसे मुद्दे मांडण्यात आले नव्हते. परंतु आता प्रचार मोहीम भरात आली असून दोन प्रमुख आघाड्यांचे नेते एकमेकांवर तीव्र आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभांना लोकांची मोठी गर्दी होत आहे. भारतीय जनता पक्षाची प्रचार मोहीम मुख्यत: पंतप्रधानांच्या शिरावर आहे. २०१९ मध्ये मोदींबरोबर सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजनाथ सिंह आदी नेतेही प्रचार मोहिमेत सक्रिय होते. आता तसे चित्र दिसत नाही. राज्य पातळीवर प्रचाराची धुरा भाजपाचे स्थानिक नेते सांभाळत आहेत. ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचार मोहिमेत मुख्यत: राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी हे मुख्य चेहरे आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे नेते प्रचार मोहिमेचे नेतृत्त्व करत आहेत.

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात त्यांना कोणत्या प्रश्नांच्या आधारे पुढील राजकारण करायचे आहे, याची मांडणी केली. भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा मुख्यत: चार बाबींवर भर देतो. त्यातील एक म्हणजे गेल्या दहा वर्षांमधील मोदी सरकारची आर्थिक कामगिरी आणि २०२९ पर्यंत भारताला जगातील तिसऱ्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवणे हे मुद्दे. दुसरा मुद्दा विविध समाजांमधील वेगवेगळ्या वंचित आणि मागास घटकांसाठी अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवणे हा आहे. त्यामध्ये ‘प्रधानमंत्री गृह योजना’ आणि ‘घर तेथे नळ’ ही योजना महत्त्वाची आहे. त्यांनी मांडलेला तिसरा मुद्दा म्हणजे भारतीय राष्ट्रवादाची मांडणी करत असताना सांस्कृतिक राष्ट्रवादाची भूमिका अधोरेखित करणे. त्यासाठी रामजन्मभूमी मंदिर, ३७० कलम रद्द करणे ही दोन आश्वासने भाजप सरकारने पूर्ण केली असून समान नागरी कायदा करण्याच्या दृष्टीने पुढील काळात पावले टाकली जातील, या आश्वासनाचाही समावेश आहे. त्या दृष्टीने त्यांनी ‘एकात्म भारतीय राष्ट्रवादा’ची कल्पना मांडली आहे. चौथा मुद्दा आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला मोठी प्रतिष्ठा मिळवून देण्याचा आहे. परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरणात शस्त्रास्त्र निर्मितीबाबतीत जास्तीत जास्त स्वावलंबन आणणे हे त्यांच्यापुढील ध्येय आहे. थोडक्यात, भाजपाच्या जाहीरनाम्यात विकसित भारत आणि ‘सबका साथ, सबका विकास’ हे दोन मुख्य मुद्दे दिसून येतात.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सामाजिक न्यायाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे. आपल्या जाहीरनाम्यात काँग्रेसने समाजात पाच प्रकारचे न्याय प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या जाहीरनाम्यातील चार महत्त्वाचे मुद्दे म्हणजे समाजातील विषमता दूर करून न्यायाच्या आधारावर समाजाची फेरमांडणी करणे आणि त्या दृष्टीने योग्य ती धोरणे आखणे. दुसरा मुद्दा सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्यासाठी देशभर जातनिहाय जनगणना करणे आणि प्रत्येक जातीच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा विचार करून त्यानुसार राज्यांची धोरणे आखणे. तिसरा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पक्ष बेरोजगारीची समस्या सोडवू शकलेला नाही; त्या पक्षाचे सरकार मक्तेदार भांडवलदारांना, मूठभर उद्योगपतींना सूट देत असून सरकारी मालकीचे उद्योग विक्रीला काढत आहे हा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे. या धोरणामुळे देशात बेरोजगारी वाढत आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे, तर चौथा महत्त्वाचा मुद्दा हा सर्वसमावेशक राष्ट्रवादाचा आहे. भारत हा सर्वधर्मीयांचा देश असून या देशातील अल्पसंख्यांकांना घटनेने दिलेले अधिकार उपभोगण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे काँग्रेसचा जाहीरनामा सांगतो. दरम्यान, मोदी यांच्या काळात केंद्र-राज्य संबंधांमध्ये असमतोल निर्माण झाला आहे आणि राज्यांचे अधिकार कमी होत आहेत. हा समतोल पुन्हा स्थापन करण्याची हमी काँग्रेसने दिली आहे.

असे असले तरी निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये मांडलेल्या मुद्द्यांप्रमाणेच प्रचार मोहिमेत प्रचार होतो, असे नाही. त्यातील काही मुद्दे दोन्ही पक्षांनी सातत्याने मांडले. मात्र त्यांचा मुख्य भर एकमेकांवर आरोप करणे, वैयक्तिक टीका करणे आणि विरोधकांच्या मांडणीला विकृत स्वरूप देऊन ती लोकांसमोर ठेवणे यावरच असलेला दिसून येत आहे. एकूणच, आता प्रचाराची पातळी घसरली असून प्रचार मोहिमेमध्ये अपेक्षित असणारी सभ्यता, लोकशिक्षणाचा विचार आणि विरोधकांनाही सन्मानाने वागवणे या बाबी मागे पडत आहेत. दोन्ही आघाड्यांमधील सदस्य येनकेन मार्गाने विरोधकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नसल्याचे दिसते. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय जनता पक्षाने रामजन्मभूमीत मंदिर उभारण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु एकदा राममंदिर बांधले गेल्यानंतर तो मुद्दा आता तेवढा महत्त्वाचा राहिलेला नाही. पहिल्या टप्प्यातील मतदान सुमारे तीन टक्क्यांनी कमी झाल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी नंतर जास्त आक्रमक भूमिका घेतली आणि काँग्रेस पक्षावर, विशेषत: राहुल गांधींवर कठोर टीका करण्यास सुरुवात केली. या टीकेला मुख्यत: प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी तशाच आक्रमक भाषेत उत्तरे दिली. राहुल गांधी यांच्या प्रचारात काँग्रेसने चार मुद्दे मांडले होते. त्यांचा उल्लेख करत मोदींनी आपल्या भाषणात कठोर हल्ले केलेले दिसून येतात.

काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये ‘सहिष्णू राष्ट्रवादा’ची मांडणी करण्यात आली होती. राहुल गांधींनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आणि त्याप्रमाणे ज्यांची जितकी संख्या त्याला तितकी सरकारी मदत, अशी भूमिका मांडली. त्याचबरोबर काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांनी वारसा कराची कल्पना मांडली. थोडक्यात, समाजाच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये संपत्तीचे योग्य प्रकारे वाटप व्हावे ही त्यामागील भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने मांडलेल्या मुद्द्यांपैकी तिसरा मुद्दा मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय राजकारणात फारसे काही केले नसून एकीकडे चीनने भारताची जमीन ताब्यात घेतलेली आहे तर पाकिस्तानही शत्रुत्वाची भावना जोपासताना दिसत आहे, हा आहे. त्यामुळे परराष्ट्रधोरण अयशस्वी ठरलेले आहे. चौथा मुद्दा अल्पसंख्यांकांवरील अन्यायाचा आहे.

मोदी यांनी आपल्या प्रचार मोहिमेत काँग्रेस पक्षावर तीव्र हल्ला केला आणि अनेक वेळा सत्याचा अपलाप केला. मोदी यांनी मांडलेले काही मुद्दे म्हणजे काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवाद मूलत: हिंदूविरोधी राष्ट्रवाद आहे. रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाला ते आले नाहीत. ज्या उदयनिधी स्टॅलिनने हिंदू धर्म डेंग्यू, मलेरियासारखा आहे असे म्हटले, त्याच स्टॅलिन यांचा पक्ष इंडिया आघाडीतील महत्त्वाचा घटक आहे. काँग्रेस ही ‘तुकडे तुकडे गँग’ असून इंडिया आघाडीत काही घटकांना देशाचे विघटन करायचे आहे, हे मुद्दे मोदी मांडत आहेत. मोदी असेही म्हणाले की, देशात घुसखोरी करणारे आणि अनेक मुले असणाऱ्‍या लोकांना तुमच्या घामाचा पैसा काँग्रेसचे सरकार वाटणार आहे. यामधून त्यांचे ध्रुवीकरणाचे राजकारण स्पष्ट होते. मोदी म्हणतात, काँग्रेसच्या काळातच जातीय दंगे, हिंसाचार आणि दहशतवादी हल्ले झाले. गेल्या दहा वर्षांमध्ये असे हल्ले झाले नाहीत, कारण आम्ही शत्रूच्या घरात घुसून शिक्षा करतो. म्हणूनच काँग्रेसचे सरकार कमकुवत तर आमचे बलवान आहे.

अशा प्रकारे दोन्ही आघाड्यांमध्ये आक्रमक प्रचार मोहीम राबवून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही मांडण्यांवरून दिसते की त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वैचारिक मतभेद आहेत. म्हणूनच निवडणुकीचा निकाल कसाही लागो, नंतरच्या काळात संघर्षाचे राजकारण अधिक तीव्र होण्याची शक्यताच जास्त आहे.

(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in