काँग्रेस ‘जोडो’

या नौकेत असणाऱ्यांनीच नौकेला लहान-मोठ्या भेगा पाडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
काँग्रेस ‘जोडो’

काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात जी काही पडझड सुरू आहे, ती काही थांबायचे नाव घेत नाही. एकापाठोपाठ एक दिग्गज नेते पक्षातून बाहेर पडत आहेत. त्यांना रोखायला कुणीही पुढे सरसावत नाही की त्यांचे मन वळविण्याचेसुध्दा कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. काँग्रेसमध्ये ‘गोंधळात गोंधळ’ सुरू असून कुणीही कुणाचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. अशातऱ्हेने काँग्रेसच्या ऱ्हासाला परपक्षातील मंडळींपेक्षा स्व:पक्षाची प्रमुख मंडळीच प्रामुख्याने जबाबदार ठरत आहेत. त्यांच्यामुळे काही राज्यांमध्ये असलेल्या सत्तेवर काँग्रेस पक्षाला पाणी सोडावे लागले आहे, ही पक्षाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. त्यातून काही बोध घेऊन पक्षात काही सुधारणा कराव्यात, असे ना श्रेष्ठींना वाटत, ना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना. त्यामुळे काँग्रेसची नौका पूर्णत: भरकटली आहे. या नौकेत असणाऱ्यांनीच नौकेला लहान-मोठ्या भेगा पाडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. चारही बाजूंनी संकटात सापडलेल्या काँग्रेसला वाऱ्यावर सोडून ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, सुनील जाखर, हार्दीक पटेल, अमरिंदर सिंग, आरपीएन सिंग, अश्विनीकुमार यांच्यासह अनेकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. या नेत्यांच्या जाण्याने काँग्रेस कमकुवत होत आहेच, शिवाय, ज्या राज्यात सत्ता होती, तीही हातातून निसटत आहे. याशिवाय, जी-२३ या असंतुष्टांच्या गटातील बहुसंख्य नेत्यांनी आजवर सत्तेसोबतच पक्षातील महत्त्वाची पदे उपभोगली आहेत. याच असंतुष्टांनी आता संकटात सापडलेल्या काँग्रेस पक्षाला सावरण्याऐवजी केवळ विरोधी राग आळवण्याशिवाय काहीही केलेले नाही. मुळात देशाच्या कानाकोपऱ्यात हातपाय पसरलेल्या काँग्रेसची जागा घेऊन भाजप अधिकाधिक बलशाली होत चालली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस अधिकाधिक कमकुवत होत चालली आहे. खरेतर, देशवासीयांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, महागाई नियंत्रणात आणू, देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करू अशी आश्वासने भाजपने दिली होती; परंतु ही आश्वासने काही प्रत्यक्षात उतरलेली नाहीत. देशाची अर्थव्यवस्था रुळावरून घसरली आहे. देशात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. महागाईने अगदी कहर केला आहे. सर्वसामान्यांचे घरचे बजेट कोलमडून पडले आहे. त्यामुळे देशवासीय अस्वस्थ आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात पुन्हा पंचप्राण फुंकण्यासाठी व जाती-धर्माच्या नावाने देशात फूट पाडण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला दक्षिणेकडील राज्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. त्याचवेळी, राजस्थानमध्ये सत्तारुढ काँग्रेस पक्षातील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, शशी थरुर यांची नावे अग्रक्रमाने चर्चेत आली असतानाच, ‘एक व्यक्ती एक पद’ ही संकल्पना काँग्रेस श्रेष्ठींनी उचलून धरली आहे. त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष व्हायचे म्हटल्यास गेहलोत यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावे लागेल. मात्र, गेहलोत यांना एकाच वेळी दोन्ही पदे हवी आहेत. त्यामुळे गेहलोत यांच्याच इशाऱ्याने स्वपक्षाच्या ८० आमदारांनी राजीनामाअस्त्र परजले आहे. हा एक प्रकारे पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याचाच प्रयत्न आहे. मुळात विकलांग झालेल्या काँग्रेससमोर पक्षवाढीसह अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांचा मुकाबला करतानाच, राजस्थानचे मुख्यमंत्रीपद व काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्याची दुहेरी कसरत करणे गेहलोत यांना केवळ अशक्यप्राय आहे. मात्र, गेहलोत यांनी दबावाचे राजकारण आरंभल्याने ते काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले जाण्याचीच शक्यता अधिक आहे. खरेतर, गेहलोत यांनी आपले वय लक्षात घेऊन सन्मानाने पद व सत्येचा त्याग करण्याची भूमिका घ्यायला हवी होती व आपला उत्तराधिकारी म्हणून युवा नेते सचिन पायलट यांच्याकडे सत्तापदे सुपूर्द करण्याची आवश्यकता होती. मागील चाळीस वर्षे अनेक संवैधानिक पदांवर काम करूनही गेहलोत हे सत्ता सोडायला तयार नाहीत. गेहलोत यांनी सचिन पायलट यांना राज्याचे भावी नेतृत्व म्हणून स्वीकारले पाहिजे, असे काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, गेहलोत यांनी ताठर भूमिका घेतल्याने राजस्थानमधील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर उभी ठाकली आहे. ही फूट काँग्रेसला आणखी महागात पडण्याची चिन्हे आहेत. अलीकडच्या काळात सर्वपक्षीय ज्येष्ठ नेतेमंडळी वर्षानुवर्षे सत्ता उपभोगूनही नव्या दमाच्या तरुणांकडे सत्तेची सूत्रे द्यायला तयार नाहीत. ‘श्रध्दा व सबुरी’चा त्यांना विसर पडला आहे. देशातील राजकीय वारे लक्षात घेता, गटातटात विभागल्या गेलेल्या काँग्रेसला एकसंघ करण्याचे काम नव्याने व प्राधान्याने हाती घेण्याची गरज आहे. त्यासाठी ‘जोडो भारत’ मोहिमेप्रमाणेच ‘काँग्रेस जोडो’चेही आव्हान पक्षाला अधिक गांभीर्याने घ्यावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in