काँग्रेस आक्रमक

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून हे सूडबुद्धीचे राजकारण खेळले जात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे
काँग्रेस आक्रमक

कॅंाग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची गेल्या तीन दिवसांपासून नवी दिल्लीत नॅशनल हेराल्ड प्रकरणी ‘ईडी’कडून चौकशी सुरु आहे. राहुल गांधी यांच्या या चौकशीविरुद्ध काँग्रेस पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून हे सूडबुद्धीचे राजकारण खेळले जात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. गेल्या सोमवारपासून ‘ईडी’ने राहुल गांधी यांची एकूण ३० तास चौकशी केली. बुधवारी ‘ईडी’ने राहुल गांधी यांची सुमारे दहा तास चौकशी केल्याचे या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांकडून सांगण्यात आले. ‘ईडी’ने येत्या २३ जून रोजी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही चौकशीसाठी येण्यासाठी समन्स बजाविले आहे. राहुल गांधी यांना ‘ईडी’ने पाचारण केल्याच्या दिवसापासून काँग्रेस कार्यकर्त्यांचे त्याविरुद्ध आंदोलन सुरु आहे. बुधवारी निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्ष मुख्यालयात घुसून पोलिसांनी ताब्यात घेतले आणि लोकशाहीला काळिमा फसला, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. मात्र काँग्रेस मुख्यालयात घुसून कार्यकर्त्यांना मारहाण केल्याच्या आरोपांचे पोलिसांनी खंडन केले आहे. तर भारतीय जनता पक्षाने अशा निदर्शनाबद्दल काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. आपल्या पक्षाच्या नेत्यांनी जे गैव्यवहार केले त्यावरून इतरत्र लक्ष वळविण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून हिंसाचाराचा मार्ग अवलंबून काँग्रेस भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावरूनच त्या पक्षाच्या नेतृत्वाची कोती वृत्ती दिसून येत आहे, असे भाजपने म्हटले आहे. राहुल गांधी यांची आतापर्यंत ३० तास चौकशी करूनही ईडीला समाधानकारक उत्तरे मिळू न शकल्याने ईडीने राहुल गांधी यांना आज पुन्हा बोलाविले आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध जी कारवाई ईडीकडून केली जात आहे त्याविरुद्ध केवळ दिल्लीतच नव्हे, तर देशभर वातावरण तापविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. गुरुवारी काँग्रेसने देशातील विविध ठिकाणच्या राज भवनास घेराव घालण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. मुंबईतही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या नेतृत्वाखाली राज भवनांवर मोर्चा नेण्यात आला होता. पण हा मोर्चा पोलिसांकडून वाटेत अडविण्यात आला. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरु असलेले हे आंदोलन पुढेही सुरूच राहील, असे नाना पटोले यांनी घोषित केले आहे. सोनिया गांधी ज्या दिवशी ‘ईडी’समोर जातील त्यावेळी काँग्रेस पक्ष यापेक्षा अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्या पक्षाच्या विद्यमान भूमिकेवरून दिसत आहे. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड ही कंपनी ताब्यात घेताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी ही सर्व चौकशी सुरु आहे. यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे प्रत्येकी ३८ टक्के भाग भांडवल आहे. तर उर्वरित २४ टक्के भाग भांडवलापैकी प्रत्येकी १२ टक्के भाग भांडवल काँग्रेसचे दिवंगत नेते मोतीलाल वोरा आणि वयस्कर फर्नांडिस यांच्या नावे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चौकशीच्या दरम्यान, पक्षाचे तत्कालीन कोषाध्यक्ष मोतीलाल वोरा हे यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यांच्यामध्ये जो व्यवहार झाला त्यास जबाबदार असल्याचे सांगितल्याचे कळते. हे खरे असेल तर या सर्व प्रकरणास वेगळेच वळण मिळणार हे स्पष्ट आहे. पण यावर कसलेही भाष्य करण्यास काँग्रेसचे सचिव प्रणव झा यांनी नकार दिला. ‘ईडी’चे कामकाज हे न्यायालयीन स्वरूपाचे असते. त्यातील माहिती उघड करणे हा फौजदारी गुन्हा ठरतो. त्यामुळे यावर आपण काही भाष्य करू इच्छित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामकाजात केंद्र सरकार हस्तक्षेप करीत नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी त्यावर काँग्रेस पक्षासह अन्य विरोधकांचा विश्वास नाही. राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी ‘ईडी’ आणि अन्य केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. पण ज्या ज्या नेत्यांना ‘ईडी’ने समन्स पाठविले त्यांचे हात जर स्वच्छ असतील आणि त्या नेत्यांनी कसलाही गैरव्यवहार केला नसेल तर ते ताठ मानेने ‘ईडी’ला सामोरे जातील आणि ताठ मानेने माघारी येतील याबद्दल शंका नको! त्यासाठी आंदोलन, मोर्चे, निदर्शने अशा मार्गांचा अवलंब कशाला? आपली बाजू सत्याची आहे यावर विश्वास असेल तर एवढा कोलाहल कशासाठी? या तपासातून काहीच निष्पन्न झाले नाही तर तपास यंत्रणा आणि केंद्र सरकारच तोंडघशी पडणार आहे, हे लक्षात येत नाही का?

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in