आंध्रात काँग्रेसची मुत्सद्देगिरी!

तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी येथे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मतदारसंघांमध्ये संपर्कावर भर दिला असताना तेलंगणाप्रमाणेच इथेही सत्तांतर घडवण्यासाठी काँग्रेसने नवे मित्रपक्ष जोडायला सुरुवात केली आहे.
आंध्रात काँग्रेसची मुत्सद्देगिरी!

शैलेश रेड्डी

राज्यरंग

आंध्र प्रदेशमध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठीही वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत; इथे सत्ताधारी वायएसआर काँग्रेसविरोधात वेगवेगळ्या आघाड्या तयार होण्याची शक्यता आहे. तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी येथे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मतदारसंघांमध्ये संपर्कावर भर दिला असताना तेलंगणाप्रमाणेच इथेही सत्तांतर घडवण्यासाठी काँग्रेसने नवे मित्रपक्ष जोडायला सुरुवात केली आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांना आंध्र प्रदेशमध्ये पक्षप्रमुख म्हणून सामील करून घेतले आहे. शर्मिला यांच्यावर काँग्रेसने पक्षाची सर्व जबाबदारी दिली आहे. आंध्र प्रदेशमधला प्रमुख विरोधी पक्ष असलेला तेलगू देसम पार्टी हा पक्ष खिळखिळा झाला आहे. अलीकडेच शर्मिला यांनी नायडू यांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात आहे. काँग्रेसला या राज्यात पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. त्यांच्या सर्व उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्या होत्या. आता शर्मिला यांना पक्षाने सर्वाधिकार दिले आहेत. त्यांच्यामुळे पक्षाला चांगले दिवस येतील, असे काँग्रेसजनांना वाटते. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशमध्ये निवडणुकांसाठी बिगूल वाजला आहे. शर्मिला यांनी आपल्या भावाचा वायएसआर काँग्रेस हा पक्ष सोडून तेलंगणामध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली होती; परंतु त्यांना त्यात अपयश आल्याने त्या पुन्हा आंध्र प्रदेशमध्ये आल्या. पुढील वर्षीच्या सुरुवातीला आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यापूर्वी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांच्या निर्मितीमुळे जनता काँग्रेसवर नाराज होती. मात्र तेलंगणामधील ताज्या निकालामुळे जनतेचा काँग्रेसवरचा राग एका दशकात कमी झाला आहे, असे मानायला जागा आहे. आंध्र प्रदेशमधील जनतेचेही काँग्रेसविरुद्धचे वैर जवळपास संपले आहे. तिथे काँग्रेसकडे नेतृत्वाची पोकळी तयार झाली होती. शर्मिला यांचा काँग्रेस प्रवेश पक्ष संघटना मजबूत करण्यास सक्षम आहे की नाही हे येणारा काळच ठरवेल.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना आशा आहे की नवीन नेता यशस्वी होईल. आजघडीला आंध्रमध्ये काँग्रेसला गमावण्यासारखे काही नसल्याने शर्मिला यांना आपला ठसा उमटवणे सोपे जाईल. काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, जगनमोहन यांच्या भगिनी या आधारावर यश मिळवून देण्यासाठी त्या सक्षम असू शकतात. त्यांनी आपला भाऊ जगनवर थेट हल्ला केला. जगन आणि शर्मिला हे दोघेही ख्रिश्चन आहेत. मात्र जगन यांच्या कार्यकाळात ख्रिश्चनांना राज्यात योग्य वागणूक मिळत नाही, असा समज आंध्र प्रदेशमध्ये रूढ आहे. मणिपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारामधील बळींमध्ये ख्रिश्चनांचाही समावेश आहे. मात्र जगन हे हिंदूंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला. आपल्यावर दाखल केलेल्या खटल्यांमुळे ते तुरुंगात गेले. त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे अद्याप प्रलंबित आहेत. त्यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना अधिकारांचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून ‘सीबीआय’ने हे गुन्हे दाखल केले आहेत.

दक्षिणेत लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण तयार होत असताना आंध्र प्रदेशमध्ये फारसे अस्तित्व नसलेल्या भाजपला जगन यांच्या पक्षाचा वापर करायचा आहे. यापूर्वी भाजपची तेलगु देसम पार्टी (टीडीपी) सोबत युती होती; पण २०१८ च्या उत्तरार्धात नायडू यांनी भाजपसोबतची भागीदारी अचानक मोडली. जाणकारांच्या मते तेव्हा नायडू यांना पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडत होती. ती त्यांना भाजपच्या मदतीशिवाय पूर्ण करायची होती. आंध्र प्रदेशला दिलेला विशेष दर्जा आता पूर्ण होत नसल्याचा युक्तिवाद करत नायडू यांनी भाजपसोबतची युती तोडली. विशेष दर्जा म्हणजे राज्यासाठी अधिक पैसा. केंद्रातले भाजपचे सरकार ही मागणी पूर्ण करण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा परिस्थिती अशी बदलली की भाजपने जगन यांच्या पक्षाशी जवळीक राखली. आज मात्र तेलंगणातील जनतेचा कल पाहून जगन यांच्या पोटातही भीतीचा गोळा आला असल्यास नवल नाही. काही विद्यमान खासदारांनी त्यांची संगत सोडली आहे. त्यामुळे त्यांनी जनतेवर सवलतींचा वर्षाव सुरू केला आहे; परंतु राज्याच्या तिजोरीत पुरेसा पैसा नसल्याने त्यांना भाजपची मदत लागते आहे. २०१४ ते २०१९ दरम्यान मुख्यमंत्री राहिलेल्या नायडू यांचे पुन्हा सत्तेत येणे जातीय समीकरणांवर अवलंबून आहे. आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ जागा आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगु देसम पक्षाचा पराभव करणाऱ्या जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसमध्ये जवळपास संपूर्ण काँग्रेस विलीन झाली होती. परिणामी कट्टर प्रतिस्पर्धी तेलगु देसमविरुद्ध त्यांनी सर्वात मोठा विजय नोंदवला. काळानुरूप भाजपने वायएसआर काँग्रेस आणि तेलगु देसम या दोन्ही पक्षांशी काळानुरूप जुळवून घेतले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपने वायएसआर काँग्रेस आणि टीडीपी या दोन्ही पक्षांबद्दल अवलंबलेल्या ‘गाजर आणि काठी’च्या धोरणामुळे राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. दोन्ही प्रादेशिक पक्षांमध्ये भाजपच्या कथित ब्लॅकमेलिंगच्या डावपेचांबद्दल संताप आहे. मात्र ते कोणत्याही खऱ्या वैचारिक कारणांसाठी नाही, तर केवळ सोयीसाठी केंद्रासोबत काम करत आहेत. आंध्र प्रदेशमध्ये सध्या उलगडत असलेल्या गुंतागुंतीच्या बहुस्तरीय राजकारणात २०२४ मध्ये एकाच वेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची तयारी बघायला मिळणार आहे. टीडीपी नेते नारा लोकेश यांनी काँग्रेस आणि भाजप या दोघांप्रति समान अंतर राखण्याचे धोरण स्पष्ट केले आहे. टीडीपी ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेसविरोधी व्यासपीठ आहे आणि यापूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग होता हे लक्षात घेता या पक्षाची नवी भूमिका महत्त्वपूर्ण आहे. लोकेश यांनी नजीकच्या भविष्यात संभाव्य टीडीपी-भाजप युती सूचित करणाऱ्या सर्व वृत्तांचे खंडन केले.

दरम्यान, केंद्राच्या अनेक वादग्रस्त विधेयकांचे समर्थन केल्याबद्दल जगन यांच्यावर टीडीपीने हल्ला चढवला आहे. टीडीपीची प्रचारशैली मोदी सरकारविरोधातील प्रमुख विरोधकांच्या प्रचारासारखीच आहे. जगन सरकार काम करण्याच्या बाबतीत मोदी सरकारपेक्षा वेगळे नाही; तरीही टीडीपीने केंद्राविरुद्ध उघड भूमिका घेतलेली नाही. २०१८ मध्ये नायडू राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडले, तेव्हा भाजपप्रणीत एनडीएने पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखालील जनसेनेसोबत युती केली. राज्यातील निरीक्षकांचा विश्वास आहे की जगन यांनी नायडू यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक करवून जगन यांनी टीडीपी आणि भाजप यांच्यातील युतीची आशा धुळीस मिळवली आहे. त्यामुळे भाजपला टीडीपीशी अधिकृतपणे युती करणे कठीण झाले. जगन यांनी टीडीपी आणि भाजप या दोन्ही पक्षांना व्यावहारिकदृष्ट्या रोखले. आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही प्रादेशिक पक्षांना स्वबळावर लढू देण्याचा कठोर संदेश केंद्राला दिला; मात्र जगन यांना आता स्वतःच्या समस्यांनी ग्रासले आहे. २०१९ मध्ये त्यांनी बहुसंख्य आणि दलित मते खेचली. गेल्या पाच वर्षांमध्ये भक्कम धर्मनिरपेक्ष राजकीय मार्ग स्वीकारला तसेच गरीबांसाठी अनेक कल्याणकारी उपाययोजना केल्या. तथापि, संसदेत केंद्र सरकारच्या वादग्रस्त विधेयकांना दिलेल्या समर्थनामुळे एक मोठा वर्ग त्यांच्यापासून दुरावला असून आता तो काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे.

जगन रेड्डी २०२४ च्या निवडणुकीपूर्वी आपले घर सुरळीत ठेवण्यासाठी धडपडत आहेत. अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची बहीण वाय. एस. शर्मिला येत्या काही दिवसांमध्ये आंध्रच्या राजकारणात मोठी भूमिका बजावण्याची तयारी करत आहेत. नुकत्याच तेलंगणात झालेल्या निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्याच्या त्यांच्या निर्णयाने तेलंगणा विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आता आंध्र प्रदेशमध्ये जगन यांच्या अनेक आमदारांना सत्ताविरोधी वातावरणाचा जोरदार सामना करावा लागत आहे. जगन यांना अनेक नवीन चेहरे पुढे आणणे भाग पाडले आहे. शिवाय, त्यांनी गरीबांसाठी केलेल्या कल्याणकारी उपायांमुळे मध्यमवर्गीय मतदारांचा मोठा वर्ग दुरावला आहे. एवढ्या अडचणी असूनही आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये गरीबांमध्ये त्यांची स्वत:ची लोकप्रियता कितपत उपयोगी पडते, हे येणारा काळच ठरवेल. मतदारांमधील वर्गविभाजन अधिकाधिक स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, नायडू यांनी लागोपाठच्या धक्क्यांमुळे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता गमावली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये पाय रोवण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या भाजपने मान्य केले आहे की त्यांना किनारपट्टीच्या राज्यात कोणताही फायदा होण्याची आशा नाही. काँग्रेसने आंध्र प्रदेशमध्ये वाय. एस. शर्मिला यांचा समावेश करून मात्र मुत्सद्देगिरी दाखवली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in