गोव्यात काँग्रेसला खिंडार!

सत्तासंपादन करण्याचा ‘चमत्कार’ भारतीय जनता पक्षाने यापूर्वीही गोव्यात करून दाखविला आहे.
गोव्यात काँग्रेसला खिंडार!

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ३५७० कि. मी. ची ‘भारत जोडो’ पदयात्रा आठ दिवसांपूर्वी सुरू केली असतानाच गोव्यामध्ये काँग्रेसच्या ११ पैकी आठ आमदारांनी पक्षत्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने त्या राज्यात काँग्रेसला भले मोठे खिंडार पडले आहे. सत्तेची फळे चाखण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे हे काही गोव्याच्या राजकारणास नवे नाही. तसेच बहुमत नसताना फोडाफोडीचे राजकारण करून सत्तासंपादन करण्याचा ‘चमत्कार’ भारतीय जनता पक्षाने यापूर्वीही गोव्यात करून दाखविला आहे. गोव्यामध्ये सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे; पण आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पक्षाचा पाया विस्तारण्याच्या आणि गोवा काँग्रेसमुक्त करण्याच्या हेतूने भाजपने जे जाळे टाकले आहे, त्यामध्ये काँग्रेसचे ११ पैकी आठ आमदार गळाला लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसला जबर हादरा बसला आहे. काँग्रेसमधून फुटून निघालेल्या या आठ जणांनी पक्ष बदलल्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यानुसार या आमदारांवर कारवाई होणार नाही. त्यांच्या आमदारकीला काही धक्का लागणार नाही. राहुल गांधी ‘भारत जोडो’ अभियान चालवत असताना गोव्यात मात्र ‘काँग्रेस छोडो’ आंदोलन सुरू झाले आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेस पक्षात जी बंडखोरी झाली, त्याबद्दल बोलताना म्हटले आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याचे काँग्रेस आमदारांचे प्रयत्न गेल्या जुलैपासूनच सुरू होते; पण बंड करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ मिळत नसल्याने बंडखोरी लांबणीवर पडत होती. अखेर काँग्रेसच्या आठ आमदारांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतल्याने हे आमदार बुधवारी भाजपवासी झाले. काँग्रेस पक्षात झालेल्या या बंडखोरीबद्दल काँग्रेसचे गोवा राज्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या आमदारांना भरपूर पैसा आणि मंत्रिपदाचे आमिष दाखवून फोडले आहे. विरोधी पक्षांना संपविण्याचे हे एकप्रकारे कटकारस्थान असल्याचे गुंडू राव यांनी म्हटले आहे. ही बंडखोरी म्हणजे लाचारी आणि निर्लज्जपणाचा कळस असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे. तर गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी, भाजपची हिंमत एवढी वाढली आहे की, ते दिवसाढवळ्या दुसऱ्या पक्षांचे आमदार फोडत आहेत. या बंडखोर आमदारांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. जनता त्यांना माफ करणार नाही, असेही पाटकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या आमदारांनी, आम्ही काँग्रेसशी प्रतारणा करणार नाही, अशी शपथ सर्व धर्मांच्या देवासमोर घेतली होती, असे सांगण्यात आले; पण या बंडखोर आमदारांना त्या शपथेचे विस्मरण झाल्याचे बंडखोरीवरून दिसून आले. ज्या आठ काँग्रेस आमदारांनी बंडखोरी केली, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी नेते मायकेल लोबो यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ४० सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपचे संख्याबळ आता २८ झाले आहे. भाजपला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दोन आणि तीन अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी, देवानेच आपणास पक्षांतराची बुद्धी दिली. देवाचा कौल घेऊनच पुढे जाण्याचा निर्णय आपण घेतला, असे भन्नाट विधान त्यांनी केले आहे. मग त्याआधी देवापुढे काँग्रेस सोडणार नाही, अशी जी शपथ घेतली होती त्याचे काय? पण पक्षांतर केलेल्या या बंडखोरांना त्या शपथेचा विसर पडला. देवाने आपल्याला ‘तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल, असे सांगितले आहे’, हे सांगण्यासही कामत विसरले नाहीत! गोवा राज्यात काँग्रेसमध्ये फूट पडण्याचा प्रकार तसा नवा नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये त्या राज्यातील काँग्रेस पक्ष चार वेळा फुटला आहे. २०१७च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळूनही दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रिकर यांच्या डावपेचांमुळे काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर काही काळाने दोघांनी काँग्रेसला राम राम ठोकला. २०१९मध्ये काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये आले आणि आता काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये आले आहेत. गोव्यात काँग्रेसला खिंडार पडून त्या पक्षाचा एक मोठा गट भाजपमध्ये विलीन झाल्याने आता मंत्रिमंडळाच्या खांदेपालटाची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री सावंत हे कोणाला वगळतात आणि कोणाची वर्णी लावतात, याकडे गोव्यातील जनतेचे लक्ष आहे. काँग्रेसला जे खिंडार पडले आहे, त्याचा लाभ भावी राजकारणामध्ये भाजपला नक्की होणार आहे. काँग्रेसमधील बंडखोरीमुळे त्या पक्षाची अवस्था दयनीय झाली आहे. पक्षाला या अवस्थेतून वर आणण्यासाठी काँग्रेसला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in