संघटन एक, फायदे अनेक

कल्पना करा की एका माणसाला एखादी तक्रार एखाद्या उत्पादकाकडे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या संस्थेकडे करायची आहे. अशा वेळी तो काय करतो? तर आपले म्हणणे त्यांच्यापुढे तोंडी किंवा लेखी स्वरुपात मांडतो. दुसऱ्या परिस्थितीत...
संघटन एक, फायदे अनेक
Published on

ग्राहक मंच

- मंगला गाडगीळ

एखादी तक्रार संघटितपणे केल्यास तिचा प्रभाव अधिक पडतो. मात्र त्यासाठी ग्राहक म्हणून एकत्र येण्याची आणि आपले संघटन उभारण्याची गरज असते. मुंबई ग्राहक पंचायत हे असेच एक संघटन आहे. ग्राहक हित जपण्यासाठी माणसे जोडण्याचे आणि त्यांची एकत्रित शक्ती उभी करण्याचे काम ही संघटना सातत्याने करत आहे. केवळ आपले हक्क माहीत असून चालत नाही तर ते मिळवण्यासाठी संघर्षही करावा लागतो. आणि संघर्ष करण्यासाठी संघटन असावे लागते.

कल्पना करा की एका माणसाला एखादी तक्रार एखाद्या उत्पादकाकडे किंवा एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या संस्थेकडे करायची आहे. अशा वेळी तो काय करतो? तर आपले म्हणणे त्यांच्यापुढे तोंडी किंवा लेखी स्वरुपात मांडतो. दुसऱ्या परिस्थितीत पंधरा-वीस जणांना एक समान तक्रार करायची असते. अशावेळी ते सर्वजण एकत्र येतात आणि त्यांची तक्रार किंवा त्यांचे म्हणणे एकत्रितपणे तोंडी किंवा लेखी मांडतात. या दोन्ही परिस्थितींपैकी दुसऱ्या परिस्थितीत तक्रार ऐकली जाणे किंवा तक्रार सुटणे याचा संभव जास्त असतो. याचे साधे कारण म्हणजे गटाने म्हणणे मांडल्यामुळे त्यांचा आवाज बुलंद होण्यास मदत होते. त्यांचा एक दबाव गट तयार होतो. त्यामुळे तक्रार सुटण्यास मदत होते.

अशी तक्रार किंवा गाऱ्हाणे जर शेकडो किंवा हजारो लोकांचे असेल तर त्यांचा मोठा दबाव तयार होतो. गट जेवढा मोठा तेवढे त्या गटाच्या तक्रारीला वजन येते आणि एका चळवळीचे स्वरूप प्राप्त होते. कोणत्याही चळवळीत आवाज बुलंद होणे, दबाव गट तयार होणे याला फार महत्त्व असते. त्यामुळेच जास्तीत जास्त लोक एकाच आवाजात एखादी मागणी करत असतील तर ती मान्य होणे शक्य होते. ग्राहक हितासाठी लिहिल्या जाणाऱ्या या सदरासाठी ग्राहक चळवळीचा विचार करू या.

जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकजण ग्राहक असतो. सर्वजण काही ना काही विकत घेत असतात. मग ती वस्तू असेल किंवा सेवा. असे असून देखील ग्राहकांना पदोपदी फसवले जाण्याच्या घटना घडत असतात. वजन मापातील फसवणूक, जाहिरातींच्या माध्यमातून होणारी फसवणूक, ऑनलाईन खरेदीमधील फसवणूक, ऑनलाईन बँकिंगमधले गैरव्यवहार, भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा पदार्थांचा खराब दर्जा अशा असंख्य प्रकारे फसवणूक चालू असते. रोज नवीन पद्धतींची त्यात भर पडत असते. थोडक्यात ग्राहकांच्या असंख्य तक्रारी असतात. पण आधी म्हटल्याप्रमाणे यांचा एकत्रित गट नसतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलेला मंत्र इथेही लागू पडतो. तो म्हणजे 'शिका- संघटित व्हा- संघर्ष करा.’ शिका म्हणजेच आपल्या अधिकारांची माहिती करून घ्या, वस्तू किंवा सेवा याबद्दलची संपूर्ण माहिती खरेदी करण्यापूर्वीच जाणून घ्या. संघटित व्हा म्हणजे एकत्र या. त्यामुळे आपोआप तुमचा आवाज बुलंद होऊन तो योग्य ठिकाणी पोहोचण्यास मदत होईल, दबाव गट तयार होईल. शेवटी संघर्ष करा म्हणजे आपल्या अधिकारांसाठी लढा. त्यासाठी पूर्ण ताकदीने तयार व्हा.

या पातळीवर ‘मुंबई ग्राहक पंचायत’ या संघटनेचा एक उत्तम उदाहरण म्हणून विचार करू या. या संघटनेचे २५ हजारांहून अधिक सभासद महाराष्ट्रभर पसरलेले आहेत. त्यामुळे ही संघटना आशियातील सर्वात मोठी संघटना ठरते. शिवाय ही संघटना ‘ना नफा - ना तोटा’ तत्त्वानुसार काम करणारी स्वयंसेवी संघटना आहे. ग्राहकांना एकत्र करण्याचे काम ही संघटना या १९७५ सालापासून मासिक वितरणाच्या माध्यमातून करत आलेली आहे. यंदा संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष चालू आहे. हजारो सभासदांना एकत्र करणे आणि टिकवून ठेवणे हे ग्राहकांचे संघटनच आहे. ग्राहकांच्या या संघटनाच्या जोरावर संस्थेने आजवर अचाट आणि अफाट काम केले आहे.

ग्राहक संरक्षण कायद्यान्वये ग्राहकांना 'मत ऐकले जाण्याचा अधिकार' प्राप्त झाला आहे. जेव्हा कधी सरकार नवीन कायदा आणण्याच्या तयारीत असते, किंवा काही बदल करण्याच्या तयारीत असते तेव्हा लोकांकडून सूचना मागवल्या जातात. रेरा कायदा किंवा नवीन ग्राहक संरक्षण कायद्याचा मसुदा तयार होत असताना संस्थेने अभ्यास करून हे कायदे जास्तीत जास्त ग्राहकाभिमुख कसे होतील याबद्दल सूचना केल्या. त्यातील बऱ्यचशा स्वीकारल्या गेल्या आणि त्याची मधुर फळे आज ग्राहक अनुभवत आहेत. याशिवाय ग्राहकांच्या वतीने ग्राहक न्यायालयात कितीतरी तक्रारी करून ग्राहकांना त्याचा लाभ करून दिला आहे. न्यायालयाबाहेर तक्रारी सोडवण्यासाठी काही काळापूर्वी 'समेट' नावाचा प्लॅटफार्म तयार केला आहे. ग्राहकांना त्यांच्या हिताबाबत जागरूक करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात. लेख, भाषणे, पथनाट्य, रेडिओ किंवा टीव्हीवरील कार्यक्रम यांचा त्यात समावेश असतो. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने काही विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात.

सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीनेही काही कार्यक्रम राबवले जातात. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो 'सेतू बांधा रे' या विशेष पेठेचा. महाराष्ट्रात अनेक संस्था विशेष मुलांसाठी, स्त्रियांसाठी काम करत असतात. अनेक उत्पादने तयार करून त्या बाजारात विकून अशा विशेष लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत असतात. या उत्पादनांना मुंबई ग्राहक पंचायत बाजारपेठ मिळवून देते. मुंबईतील अंधेरी येथील 'सिम्फनी बँक्वेट' येथे ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अशी पेठ भरवण्यात आली आहे. या पेठेत दागिने, तयार कपडे, दिवाळीसाठी पणत्या/रांगोळ्या, रुमाल /डस्टर/ पिशव्या अशी अनेकविध उत्पादने उपलब्ध आहेत. या मंडळींना 'नाही रे' स्तराकडून 'आहे रे' स्तराकडे नेणाऱ्या या ‘सेतू’ ला सर्वांनी आवर्जून भेट द्यावी. जास्तीत जास्त लोकांनी या पेठेस भेट देऊन ही उत्पादने खरेदी करावी असे सर्व वाचकांना या लेखाच्या निमित्ताने आवाहन आहे.

ही सर्व कामे पार पाडायची म्हणजे कार्यकर्त्यांच्या भल्या मोठ्या फळीची आवश्यकता असते. सभासदांची संख्या जास्त असल्यास त्यातून कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात उभे राहू शकतात. ज्याला जे काम आवडते आणि जमते ते काम त्याला करण्याची मुभा इथे आहे. संस्था आणि संस्थेची कामे सर्वदूर पसरली असल्याने या कार्यकर्त्यांचा सामाजिक परिघ सर्वसाधारणपणे मोठा असतो. हा परिघ सोशल मीडिआसारखा अप्रत्यक्ष नसून प्रत्यक्ष असतो हे विशेष. कोणत्याही संस्थेची गंगाजळी किती आहे त्यापेक्षा त्यांच्याकडे कार्यकर्ते किती आहेत यावर संस्थेची श्रीमंती अवलंबून असते. या बाबतीत मुंबई ग्राहक पंचायत अत्यंत सुदैवी आणि श्रीमंत म्हणावी लागेल. अर्थात या चित्रावर आत्मसंतुष्ट न राहता संस्थेच्या सभासदांमध्ये आणि त्यायोगे कार्यकर्त्यांच्या संख्येत नित्यनेमाने भर पडणे आवश्यक आहे. त्यासाठीच सर्व वाचकांना मनापासून आवाहन आहे की ‘मुंबई ग्राहक पंचायती’चे सभासद व्हा, संस्थेला बळकट करा आणि स्वतःचाच फायदा करून घ्या.

मुंबई ग्राहक पंचायत (mgpshikshan@gmail.com)

logo
marathi.freepressjournal.in