बोर्डाची कॉपीमुक्त परीक्षा शक्य आहे?

या वर्षी राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी तयारी केली असून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि नैतिकता वाढवण्यावर भर दिला आहे.
बोर्डाची कॉपीमुक्त परीक्षा शक्य आहे?
Published on

विशेष

जगन घाणेकर

या वर्षी राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सरकारने सर्वतोपरी तयारी केली असून विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि नैतिकता वाढवण्यावर भर दिला आहे.

राज्यात बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. प्रत्येकाच्या शैक्षणिक जीवनात या दोन्ही परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. नोकरीकरिता 'बायोडेटा' बनवताना त्यामध्ये दहावी आणि बारावीची टक्केवारी नमूद करण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. या परीक्षेतील टक्केवारीनुसार माणसाच्या बौद्धिक क्षमतेची कल्पना 'बायोडेटा' पाहणाऱ्याला येते. शिवाय या दोन्ही परीक्षा नेहमीच्या शाळा आणि महाविद्यालयांत न होता या परीक्षांसाठी अन्य केंद्रात जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांवर अपरिचित वातावरणात परीक्षा देण्याचा ताणही असतो. परीक्षा काळात समस्त परीक्षा केंद्रात पोलीस शिपाई नियुक्त केले जातात, कॉपी करण्याच्या प्रथेवर आळा घालण्यासाठी शासनाचे भरारी पथक कार्यरत असते. शाळेतील पर्यवेक्षकांचे विद्यार्थ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष असते. यंदाच्या या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी राज्याचे सरकार राज्यभर मोहीम राबवणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी तसे आदेश संबंधितांना दिले आहेत. परीक्षा केंद्रांवर नजर ठेवणासाठी ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत अशा ठिकाणी शिक्षकांची अदलाबदल करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. परीक्षा केंद्रात गैरप्रकार घडल्यास तत्परतेने गुन्हा नोंदवण्यात येणार आहे.

या दोन्ही परीक्षांच्या कालावधीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात कॉपी केली जाते, कॉपी करणारे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणारे त्यांचे हितचिंतक कॉपी करण्याच्या आणि कॉपी पुरवण्याच्या विविध क्लुप्त्या शोधून काढतात. दरवर्षी परीक्षाकाळात प्रतिदिन यासंदर्भातील बातम्या वाचायला मिळतात. काही ठिकाणी आपल्या शाळेचा निकाल चांगला लागावा यासाठी पर्यवेक्षक शाळेतील मुलांना पुस्तके पुरवतात. काही ठिकाणी तर बोर्डाच्या परीक्षेच्या काळात ठराविक कमिशनच्या मोबदल्यात थेट बाकापर्यंत कॉपी पुरवणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेल्या पाहायला मिळतात. या मंडळींनी पोलिसांपासून शाळेच्या पर्यवेक्षकांनाही ‘मॅनेज’ केलेले असते. बोर्डाच्या परीक्षेकरिता एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्याची सक्ती असताना परीक्षा केंद्रांमध्ये २ विद्यार्थ्यांना एकाच बाकावर बसवून एकमेकांच्या संगनमताने पेपर सोडवण्याची अनुमती दिली जाते. काही ठिकाणी पेपर सोडवण्याचा कालावधी संपण्याच्या काही मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांना कॉपी करण्याची, एकमेकांना उत्तरे विचारण्याची अनुमती दिली जाते. काही शाळांमध्ये शाळेच्या खिडक्यांबाहेर विद्यार्थ्यांना कॉपी पुरवणाऱ्यांची जत्रा भरलेली असते. यांना पोलीसही हटकण्याची तसदी घेत नाहीत. काही विद्यार्थी तर कॉपी करण्यात अगदीच पटाईत असतात त्यांना इतका आत्मविश्वास असतो की ते परीक्षेसाठी कधीही अभ्यास न करता मिळालेला संपूर्ण वेळ कॉपी तयार करण्यामध्ये घालवतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको म्हणून काही ठिकाणी पर्यवेक्षक स्वतःच विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे सांगतात किंवा कॉपी करण्याची खुली अनुमती देतात. सरकारने यंदा ज्या पद्धतीने सिद्धता केली आहे ते पाहता यंदा कॉपी करण्यावर बऱ्याच प्रमाणात आळा बसेल, असे म्हणण्यास हरकत नाही.

मुलांचे वय हे संस्कारक्षम असते. लहान वयात होणारे संस्कारच त्यांचे भवितव्य ठरवत असतात. शालेय जीवनात परीक्षेत कॉपी करून उत्तीर्ण होण्याची सवय जडलेले महाभाग पुढील आयुष्यातही यश मिळवण्यासाठी ‘शॉर्टकट’चा किंवा गैरमार्गाचा अवलंब करू पाहतात. पौगंडावस्थेत असतानाच कॉपी करण्याची सवय लागल्याने भविष्यात असे करण्यात काही चुकीचे आहे असेही त्यांना कधी वाटत नाही. कॉपी केल्यामुळे आपण परीक्षा उत्तीर्ण होऊ, मात्र पुढील व्यावहारिक जीवनात परीक्षेचे प्रसंग हे पदोपदी येणार आहेत त्यावेळी आपल्या बुद्धिमत्तेची आणि विवेकाची कसोटी लागणार आहे, तेव्हा आपल्याला कोण सहाय्य करणार? कॉपी करणे म्हणजे निव्वळ आपल्या स्वार्थासाठी गैरमार्गाचा अवलंब करणे. कॉपी करणे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर प्रामाणिकपणे आणि नेटाने अभ्यास केला आहे त्यांच्यावर अन्याय करणे. कॉपी करणे म्हणजे स्वतःला गुन्हेगारीची सवय लावून घेणे. कॉपी करणे म्हणजे मेहनतीला डावलून शॉर्टकट शोधण्याची सवय अंगीकारणे. वर्षभर अभ्यास करून परीक्षेला आनंदाने सामोरे जाणे ही नैतिकता आहे, तर वर्षभर उनाडक्या करून ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास झाला नाही म्हणून कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करणे ही अनैतिकता आहे. परीक्षेचे पेपर सोडवण्यासाठी अनैतिक मार्गाचा अवलंब करण्याची सवय विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात भ्रष्टाचाराने आणि गैरमार्गाने धन कमावण्याची सवय लावते.

गुन्हेगारी क्षेत्रात विद्यार्थ्यांचे आणि उच्चशिक्षितांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शाळांमध्ये नीती आणि नैतिक मूल्ये यांचे शिक्षण देणे मध्यंतरी अनिवार्य करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास साधत असला तरी मानसिक आणि भावनिक विकासासाठी तसेच योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक यांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता येण्यासाठी शालेय जीवनात नीती आणि नैतिक मूल्ये यांचे शिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजमितीला हा विषय शिकवण्याकरिता अनेक शाळांनी शिक्षकच नियुक्त केलेले नाहीत. बऱ्याच शाळांमध्ये या विषयाच्या तासिकेत विद्यार्थ्यांना अन्य विषय शिकवले जातात, एकूणच या विषयाला शाळांकडून दुय्यम स्थान देण्यात येत आहे. बालपणापासून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक आणि अनैतिक गोष्टींविषयी सजगता आली की मुले कॉपीसारख्या कुप्रथेच्या आहारी जाणार नाहीत.

jagan.patralekhan@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in