शारीरिक शिक्षा हा हिंसाचार

अलिकडेच एका शिक्षिकेने विद्यार्थिनीला पाठीवर दप्तर घेऊन शंभर उठाबशा काढायला लावल्याने त्या मुलीची प्रकृती बिघडून त्यात तिचा मृत्यू झाला. शारीरिक शिक्षा हा हिंसाचार आहे, हे शिक्षक व पालकांनी तातडीने लक्षात घेणे आवश्यक आहे.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
Published on

दखल

प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

अलिकडेच एका शिक्षिकेने विद्यार्थिनीला पाठीवर दप्तर घेऊन शंभर उठाबशा काढायला लावल्याने त्या मुलीची प्रकृती बिघडून त्यात तिचा मृत्यू झाला. शारीरिक शिक्षा हा हिंसाचार आहे, हे शिक्षक व पालकांनी तातडीने लक्षात घेणे आवश्यक आहे.

जगभरातील अठरा वर्षांखालील लाखो बालकांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारची शारीरिक शिक्षा भोगावी लागते. याकडे अनेकदा ‘शिस्त’ किंवा ‘सुधारणेचे’ साधन म्हणून बघितले जाते. मात्र वास्तवात अशा कृतींमुळे बालकांना वेदना, अपमान आणि मानसिक आघात जाणवतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अलिकडच्या अहवालात असे म्हटले आहे की, बालकांशी आक्रमक वर्तन करणे अत्यंत अनुचित आहे. यामुळे बालकांच्या वागण्यात सुधारात्मक बदल होत नाहीत. आपल्या देशातही बालकांना शारीरिक शिक्षा करणे ही एक मोठी समस्या आहे. घरापासून शाळेपर्यंत बालकांना आक्रमक वर्तनाला सामोरे जावे लागते. अनेकांना यात काही चुकीचे वाटत नाही. पण प्रश्न असा आहे की, अशा प्रकारच्या वर्तनाने खरोखरच बालकांमध्ये सुधारणा होते का ? की त्यामुळे त्यांच्यात हीनत्व आणि हिंसाचाराची भावना निर्माण होते ?

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दिले आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, आपण अनेकदा शारीरिक शिक्षा ही मारहाणीपुरती मर्यादित मानतो, परंतु त्याची व्याख्या खूपच व्यापक आहे. मुलांचे कान ओढणे, त्यांना गुडघ्यात वाकायला लावणे, तासन् तास उभे करणे, त्यांचा अपमान करणे, त्यांना उपाशी ठेवणे किंवा त्यांना शारीरिक अथवा मानसिक वेदना देणारी कोणतीही कृती ह्या सर्व गोष्टी ‘शारीरिक शिक्षा’ या प्रकारात मोडतात. बालकांवर हात उचलणे म्हणजे त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवणे. दुर्दैवाने हे सर्व फक्त घरांमध्येच घडत नाही, तर शाळा आणि वसतिगृहांमध्येही ‘शिस्तीच्या’ नावाखाली असा आक्रमक व्यवहार अनेकदा होत असतो.

शारीरिक शिक्षेमुळे बालकांना केवळ वेदनाच होत नाही तर त्यांच्या मनावर आणि हृदयावर कायमची जखम होत असते. तज्ज्ञांच्या मते शारीरिक शिक्षा भोगलेल्या बालकांची त्यांच्या समवयस्कांपेक्षा विकासात प्रगती होण्याची शक्यता २४ टक्के कमी असते. वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, मारहाणीमुळे बालकांमध्ये ताण वाढतो, ज्यामुळे मेंदूची रचना आणि कार्यावर परिणाम होतो. हा परिणाम केवळ त्यांच्या अभ्यासावरच नाही तर त्यांच्या आत्मविश्वासावर आणि सामाजिक वर्तनावरही होतो. अशी बालके बऱ्याचदा शांत आणि भयभीत असतात. त्यांना स्वतःला व्यक्त करण्याची भीती वाटते. यामुळे त्यांच्यात चिंता व नैराश्य वाढते.

शारीरिक शिक्षा केल्याने समाजात हिंसाचाराला अप्रत्यक्षपणे मान्यता मिळत असते. बालपणात आक्रमक वर्तन अनुभवणारी बालके बऱ्याचदा प्रौढांसारखे वर्तन करतात. हे चक्र पिढ्यानपिढ्या चालू राहते. जेव्हा ही बालके मोठी होतात आणि पालक बनतात तेव्हा ते देखील त्यांच्या स्वतःच्या मुलांशी अशाच पद्धतीने वागतात. बऱ्याचदा हिंसक प्रवृत्ती असलेली हीच बालके समाजात गुन्हेगारीकडे वळतात. शारीरिक शिक्षा ही बालकांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बाल हक्क समितीने अशी कोणतीही कृती ज्यामुळे बालकांना वेदना होते किंवा त्यांच्यात अस्वस्थता निर्माण होण्यासाठी शारीरिक बळाचा वापर करते, मग ती कितीही किरकोळ असो, यांस शारीरिक इजा संबोधले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरात दोन ते चौदा वयोगटातील सुमारे ६० टक्के बालकांना घरी आणि शाळेत नियमित शारीरिक शिक्षा दिली जाते. भारतात ‘बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगा’ने शारीरिक शिक्षेचे अनेक प्रकार सांगितले आहेत. यामध्ये मुलांना अस्वस्थ स्थितीत उभे करणे, डोक्यावर पिशव्या घेऊन बसवणे, गुडघे टेकायला लावणे आणि त्यांना कोंडून ठेवणे यांचा समावेश आहे.

खरे तर बालकांना मारहाण करणे ही केवळ घर किंवा शाळेपुरती मर्यादित असलेली समस्या नाही. ती समाजात हिंसाचाराची संस्कृती वाढवायला खतपाणी घालते. ६५ पेक्षा जास्त देशांमध्ये शारीरिक शिक्षा द्यायला पूर्णपणे बंदी घातलेली आहे. भारतातही शिक्षण हक्क (RTE) कायदा २००९ अंतर्गत शाळांमध्ये बालकांना मारहाण करणे बेकायदेशीर आहे. तथापि कायदा आणि वास्तव यांच्यातील अंतर खूप मोठे आहे. शाळांमध्ये होणाऱ्या बाल शोषणाच्या दैनंदिन घटनांवरून हे दिसून येते. काही प्रकरणांमध्ये तर बालकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.

ग्रामीण भागातील आणि लहान शहरांमधील शाळांमध्ये बालकांना अजूनही मारहाण केली जाते. दुर्दैवाने पालकांना देखील त्यांच्या मुलांना मारहाण करणे अयोग्य वाटत नाही. अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाऊन यात काही चुकीचे आहे असे आपल्याला वाटत नाही. म्हणून जोवर समाजाची मानसिकता बदलत नाही तोवर कायदे कितीही कठोर असले तरी बदल होणार नाहीत. मारझोड केल्याने बालकांना शिस्त लागते का असा प्रश्न अनेकदा विचारला जातो.

मारहाण केली नाही तर शिस्त कशी लागेल असेही लोकांना वाटते. पण हा एक गैरसमज आहे. कारण अशा वर्तनाशिवायही बालकांना योग्य दिशेने मार्गदर्शन केले जाऊ शकते. सकारात्मक शिस्त हा एक पर्याय असू शकतो. यामध्ये बालकांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेता येतात. काही कृती चुकीच्या का आहेत हे स्पष्ट करणे महत्वाचे आहे. बालकांशी संयमाने वागले पाहिजे. मुले अज्ञानातून चुका करतात. जेव्हा ते चुका करतात तेव्हा त्यांना रागावणे-फटकारण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगितले पाहिजे.

बालक जे पाहतात तेच शिकतात हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर त्यांना घरी आणि शाळेत आदर आणि प्रेम मिळाले तर तेही तसेच वागतील. चांगल्या वर्तनासाठी प्रशंसा आणि प्रोत्साहन मुलांना सकारात्मक मार्गांनी प्रेरित करते. शाळांमध्ये नियम, शिस्त आणि मर्यादा आवश्यक आहेत, परंतु बालकांना भीती दाखवून नव्हे तर विश्वास आणि समजुतीने त्यांची अंमलबजावणी करायला हवी. बालकांना शारीरिक शिक्षा करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. निष्पाप बालकांशी निगडीत या संवेदनशील प्रश्नाची जबाबदारी केवळ पालक किंवा शिक्षकांपुरती मर्यादित असू शकत नाही. ही एक सामूहिक जबाबदारी आहे. संपूर्ण समाजाने हे लक्षात घेतले पाहिजे की बालकांसोबत आक्रमक वर्तन हे शिस्तीचे साधन नसून हिंसाचार आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी जाणीव-जागृती मोहिम सुरू केली पाहिजे. बालक आपले भविष्य आहेत. त्यांना आदर आणि सुरक्षिततेने वाढण्याचा अधिकार आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडून हा अधिकार हिरावून घेतला जाऊ नये, यासाठी शासन आणि समाजाने सदैव दक्ष राहण्याची गरज आहे.

लेखक समाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.

logo
marathi.freepressjournal.in