पूर्व बंगालमधील कोमिल्ला येथील मुलींचे धाडस

कोमिल्लासारख्या लहान प्रदेशात राहून वयाच्या सोळाव्या वर्षी इतके धाडस करणाऱ्या या मुली यांनी शिक्षा होईपर्यंत ब्रिटिश अधिकार्‍यांच्या काळजात धडकी भरवली होती
पूर्व बंगालमधील कोमिल्ला येथील मुलींचे धाडस

संती घोष ही एक भारतीय क्रांतिकारक होती. तिचा जन्म २२ नोव्हेंबर १९१६ रोजी कलकत्ता येथे झाला. पूर्व बंगालमधील कोमिल्ला येथील व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये राष्ट्रवादी आणि तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापक देबेंद्रनाथ घोष यांची ती मुलगी. १९३१ मध्ये, ती छत्री संघाची (मुलींची विद्यार्थी संघटना) संस्थापक सदस्य आणि संघटना सचिव होती. ती नवाब फैजुन्नेसा गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल, कोमिल्ला येथील विद्यार्थिनी प्रफुल्लनंदिनी ब्रह्मा यांच्याकडून प्रेरित झाली आणि त्यांनी ब्रिटिश वसाहतवादी राजवटी उलथून टाकण्यासाठी हत्येचा वापर राजकीय तंत्र म्हणून करणाऱ्या लढाऊ क्रांतिकारी संघटनेत म्हणजेच, जुगंतर पार्टीमध्ये सहभाग घेतला. तिथे तिने तलवारी आणि बंदुकांसह स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले.

१४ डिसेंबर १९३१ रोजी, जेव्हा ती १६ वर्षांची होती आणि तिची मैत्रीण सुनीती चौधरी ही ही १६ वर्षांची होती, या दोघी चार्ल्स जेफ्री बकलँड स्टीव्हन्स, ब्रिटीश नोकरशहा आणि कोमिल्लाचे जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयात गेल्या, ख्रिसमसला दंडाधिकारी ब्रिटनला जाणार होता. त्यांना मिठाई आणि चॉकलेट्स देण्याचे दोघींनी निमित्त साधले. स्टीव्हन्सने कँडी खाल्ली आणि तो म्हणाला, ही खूप स्वादिष्ट आहे. घोष आणि चौधरी यांनी त्यांच्या शालीखाली लपवलेली स्वयंचलित पिस्तूल काढली आणि त्याला खाण्याचा आस्वाद घेत असतानाच गोळ्या घालून ठार केले.

या दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन स्थानिक ब्रिटिश तुरुंगात डांबण्यात आले. फेब्रुवारी १९३२ मध्ये, घोष आणि चौधरी यांना कलकत्ता येथील न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे त्यांना जन्मठेपेची (आजीवन निर्वासन) शिक्षा सुनावण्यात आली. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, घोड्याच्या तबेल्यात राहण्यापेक्षा मरण बरे. तसेच मला फाशीची शिक्षा झाली नाही म्हणून मी निराश झाले होते आणि त्यामुळे मला हौतात्म्य प्राप्त झाले नाही.” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.

संती घोष यांचा तुरुंगात वसाहतवादी अधिकार्‍याकडून अपमान झाला आणि तिचे शारीरिक शोषण करण्यात आले. तिला द्वितीय श्रेणीतील कैदी म्हणून वागणूक देण्यात आली. समकालीन पाश्चात्य नियतकालिकांनी स्टीव्हन्सच्या हत्येला अर्ल ऑफ विलिंग्डनच्या अध्यादेशाविरुद्ध भारतीयांच्या संतापाचे लक्षण” म्हणून शब्दांकीत केले. “स्टीव्हन्सने भारतीयांचे नागरी हक्क दडपले, ज्यामध्ये भाषण स्वातंत्र्याचाही समावेश होता. असे अनेक पाश्चात्य नियतकालिकांनी नमूद केले होते. भारतीय वृत्तपत्रांनी या हत्येचे वर्णन घोष आणि चौधरी यांच्या दडपशाही विरोधातील ब्रिटिश जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल प्रतिक्रिया म्हणून केले होते. स्टीव्हन्सने त्याच्या अधिकारपदावर राहून काही वेळा भारतीय महिलांचा विनयभंग केला होता मात्र त्याला ब्रिटीशांनी अभय दिले होते.

निकाल जाहीर झाल्यानंतर, राजशाही जिल्ह्यातील पोलिसांच्या गुप्तचर शाखेला संती घोष आणि सुनीती चौधरी यांची ‘राष्ट्रवादी नायिका’ म्हणून प्रशंसा करणारे एक वार्तापत्र सापडले. पोस्टरमध्ये तू आता स्वातंत्र्य आहेस आणि प्रसिद्धही आहेस असे लिहिले होते आणि रॉबर्ट बर्न्सच्या ‘स्कॉट्स वॉ हे’ या कवितेतील ओळींसोबत या दोघींची छायाचित्रेही प्रदर्शित केली होती: प्रत्येक शत्रू जुलूम केल्यामुळे मरणार आहे, प्रत्येक धक्क्यात स्वातंत्र्य आहे! तुरुंगातून सुटकेनंतर त्यांनी बंगाली महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढचे शिक्षण चालू झाले आणि भारताच्या कम्युनिस्ट चळवळीतही सहभाग घेतला. नंतर त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाल्या. १९४२ मध्ये घोष यांनी प्रा. चित्तरंजन दास यांच्याशी विवाह केला. संती घोष यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२ ते १९६२ आणि १९६७ ते १९६८ पर्यंत पश्चिम बंगाल विधान परिषदेवर काम केले. १९६२ ते १९६४ त्या पश्चिम बंगाल विधानसभेवर निवडूनही गेल्या होत्या. संती घोष यांचे १९८९ मध्ये निधन झाले. कोमिल्लासारख्या लहान प्रदेशात राहून वयाच्या सोळाव्या वर्षी इतके धाडस करणाऱ्या या मुली यांनी शिक्षा होईपर्यंत ब्रिटिश अधिकार्‍यांच्या काळजात धडकी भरवली होती. आजही या दोघींची छत्री संघ ही संघटना युवतींच्या मनात राष्ट्रप्रेमाचे भरते आणते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in