
भ्रम -विभ्रम
डॉ. दीपक माने
गाईपेक्षा म्हैस हा गोवर्गातील प्राणी उशीरा माणसाळवला गेला. कदाचित त्यामुळेच म्हशीबाबत दुजाभाव दाखवला गेला असावा. पण तरी गोमूत्राची चर्चा करताना आणि त्याचा उपयोग करताना विज्ञान काय सांगते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
जगात अनेक संस्कृतींमध्ये उपयुक्त पशूपक्ष्यांचे पालन पूर्वीपासून केले जात आहे. गाय, म्हैस, रेनडियर, कांगारू, शेळी आणि मेंढी अशा प्राण्यांविषयी काही समज, त्यांच्यापासून मिळणाऱ्या वस्तूंचा वापर, त्यांचे पोषण आणि त्यांच्यावरील उपचारांबाबत अनेक गोष्टी प्रचलित आहेत. या धारणांना पावित्र्य आणि वर्ज्यतेचा मुलामा दिल्याने त्यांची योग्य चिकित्सा आणि संशोधन होऊ शकले नाही. त्यामुळे त्या योग्य आहेत की नाहीत हे पडताळणे कठीण झाले आहे.
आपल्या भारतीय सिंधू संस्कृतीमध्ये गाई-म्हशी-बैल यांचे पालन फार प्राचीन काळापासून सुरू आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये आणि मिथकांमध्ये याचा उल्लेख आहे. आपल्याकडे बहुतांश लोक बालसंस्कारामुळे आणि 'गप्प बस' संस्कृतीमुळे 'शब्दप्रामाण्य' म्हणजे एखादी महान व्यक्ती जे सांगेल तेच खरे आणि 'ग्रंथप्रामाण्य' म्हणजे जुन्या ग्रंथात जे सांगितले आहे ते त्रिकालाबाधित सत्य मानतात.
गोमूत्र म्हणजे ‘गो' वर्गातील पशूंचे मूत्र. यात बैलाच्या मूत्राचाही समावेश व्हायला हवा; पण लिंगभेद आणि भेदाभेद वृत्तीमुळे फक्त गाईचे मूत्रच महत्त्वाचे मानले जाते. विज्ञानानुसार मूत्र, मल आणि घाम हे शरीरातील उत्सर्जित (टाकाऊ) घटक आहेत. आपण हे प्राथमिक शाळेतच शिकतो. गाय आणि म्हैस हे दोन्ही एकाच 'बोव्हाईन' संवर्गात येतात. वशिंड आणि त्वचेच्या प्रकारासारखे काही तुरळक फरक वगळता त्यांची शरीर रचना, चयापचय क्रिया, अन्नग्रहण आणि उत्पादन यामध्ये खूप साम्य आहे. वेगवेगळ्या भौगोलिक रचनेनुसार त्यांच्यामध्ये गुणात्मक फरक दिसून येतो, जसे की खिलार, डांगी, लाल कंधार गाय आणि पंढरपुरी, नागपुरी, मुऱ्हा म्हैस. तुलनात्मक अभ्यास केला तर, गायीच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध पौष्टिक घटक, प्रथिनं, स्निग्धांश आणि घनतेमध्ये अधिक उत्तम आहे. म्हैसपालन फक्त आशिया खंडात होते. बहुधा जंगली वास्तव्य किंवा उपद्रवमूल्य जास्त असल्यामुळे ती उशिरा माणसाळवली गेली असावी. यामुळेच, म्हैस वर्गाला मिथकांमधून आणि दंतकथांमधून खलनायकी रूपात दाखवले जाते. आजही 'रानगवा' जंगली स्वरूपात आहे. उद्या त्याची गरज भासल्यास तोही पाळीव होऊ शकतो.
गोमूत्राची उपयुक्तता प्राचीन 'चरक संहिता' आणि 'मनुस्मृती' ग्रंथात मांडलेली दिसते; पण आधुनिक विज्ञानानुसार निरीक्षण, तर्क, प्रयोग, अनुमान आणि सिद्धता यांवर आधारित अशी त्याची चिकित्सा पुराव्यानिशी झालेली दिसत नाही. तरीही, गोमूत्राला 'वॉटर ऑफ लाईफ' आणि 'नेक्टर ऑफ गॉड' म्हणजे अमृत मानले जाते.
गोमूत्राचा वापर:
पंचगव्य: गोमूत्र, शेण, दूध, तूप आणि दही यांचे मिश्रण.
जीवामृत: गोमूत्र, गूळ आणि रायझोस्पेअर माती यांच्या किण्वन क्रियेतून तयार केले जाते.
आयुर्वेदिक उपचार: प्राशन करणे, जखमांवर आणि त्वचारोगांवर वापर.
खत निर्मिती: सेंद्रिय खत म्हणून वापर.
पारंपरिक विधी: विविध धार्मिक विधींमध्ये शेणासोबत गोमूत्राचा वापर.
परिसर शुद्धता: अपवित्र जागा शुद्ध करण्यासाठी गोमूत्र शिंपडणे.
वैज्ञानिक परिभाषेत गोमूत्रामधील (गोवर्गीय मूत्र) घटक आणि त्यांचे प्रमाण: पाणी - ९५ टक्के, युरिया - २.५ टक्के, क्षार व मिनरल्स इत्यादी - २.५ टक्के. मूत्रात नायट्रोजनचे प्रमाण जास्त असून सोडियम, सल्फर, मँगेनीज असे इतर घटकही असतात. हे घटक खत निर्मितीसाठी उपयुक्त असून वनस्पतींच्या वाढीसाठी योग्य पोषण देतात.
म्हशीच्या मूत्रातही सर्व घटक आणि त्यांचे प्रमाण जवळजवळ सारखेच आहे; पण त्याला पारंपरिक मान्यता नसल्यामुळे त्याची महती सांगणारे कोणी ‘रक्षक' नाहीत.
एप्रिल २०२३ मध्ये, देशातील सर्वोत्तम संस्था असलेल्या भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या (I.V.R.I.) बरेली केंद्रातील डॉ. भोजराज सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक संशोधन प्रसिद्ध केले आहे. जून २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या काळात त्यांनी गाय, म्हैस आणि मानव यांचे ७३ ताजे मूत्र नमुने घेऊन त्यांची तपासणी केली आणि विज्ञाननिष्ठ अभ्यासाचे निष्कर्ष जाहीर केले.
ते असे -
गायीच्या मूत्रात (गोमूत्र) १४ प्रकारचे शरीरासाठी घातक जीवाणू (बॅक्टेरिया) आहेत. जसे की ई. कोलाय (पोटविकार), एस. एपिडर्माइडिस (त्वचा विकार) इत्यादी.
म्हशीच्या मूत्रापेक्षा गोमूत्रात जंतुनाशक (अँटीसेप्टिक) क्षमता कमी आहे.
म्हशीचे मूत्र गोमूत्रापेक्षा जंतुनाशक म्हणून जास्त उपयुक्त आहे.
गोमूत्र प्राशन करणे मानवी आरोग्यासाठी धोकादायक आहे.
भारतात आणि परदेशात वैज्ञानिक शब्दांचा वापर करून आणि काही प्रमाणात स्वानुभवाचे दाखले देत मोठ्या प्रमाणात गोमूत्र विकले जाते. असाध्य आणि दुर्धर आजार, कॅन्सर, संधिवात, विषाणू संसर्ग (कोरोनासारखे), श्वासाचे आणि मेंदूचे आजार यांवर त्याचा हमखास उपयोग होतो, असे सांगितले जाते. यामुळे 'लिबिडो सिंड्रोम' किंवा स्वयंसूचना स्वीकारल्यामुळे तात्पुरते समाधान मिळते, पण आजार वाढत जातो. जो पदार्थ शरीरातून टाकाऊ म्हणून बाहेर टाकला जातो, तोच पुन्हा शरीरात रोग उपचारासाठी घेणे हे फक्त 'जुनं ते सोनं' मानून तर्कबुद्धी न वापरता दुष्परिणामांकडे डोळेझाक करण्यासारखे आणि आत्मविचारांना तिलांजली देण्यासारखे आहे.
संत तुकाराम म्हणतात, ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’. सर्वच मूत्र घातक आहेत, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. त्यामुळे, अवैज्ञानिक आणि अनिष्ट असलेला हा द्रव प्राशन करणे टाळावे.
सुप्रसिद्ध पशुवैद्यक