आपल्या राजकीय संस्कृतीचे अधःपतन

स्वातंत्र्योत्तर काळात सुसंस्कृतपणा, सहिष्णुता आणि परस्पर आदर यांवर आधारलेले भारतीय राजकारण आज झपाट्याने बदलत आहे. सत्तेच्या हव्यासापायी मूल्यांची होणारी घसरण ही आपल्या राजकीय संस्कृतीच्या गंभीर अधःपतनाची जाणीव करून देते.
आपल्या राजकीय संस्कृतीचे अधःपतन
Published on

दृष्टिक्षेप

उत्तम जोगदंड

स्वातंत्र्योत्तर काळात सुसंस्कृतपणा, सहिष्णुता आणि परस्पर आदर यांवर आधारलेले भारतीय राजकारण आज झपाट्याने बदलत आहे. सत्तेच्या हव्यासापायी मूल्यांची होणारी घसरण ही आपल्या राजकीय संस्कृतीच्या गंभीर अधःपतनाची जाणीव करून देते.

आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळातील राजकारणी किती सुसंस्कृत, सहिष्णू होते याचे अनेक किस्से आपण ऐकलेले आहेत. विरोधकांची कसलीही भीडभाड न ठेवता प्रखर टीका करणारे ‘मराठा’चे संपादक आचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीचा एक किस्सा अधूनमधून विविध माध्यमांतून प्रसिद्ध होत असतो. यशवंतराव चव्हाण यांना मूल-बाळ नव्हते, यावरून ते निपुत्रिक असल्याची टीका अत्रे यांनी केली असता यशवंतरावांनी अत्रे यांना फोनवर सांगितले की, ‘चले जाव’ आंदोलनाच्या वेळी त्यांना पकडण्यासाठी इंग्रज पोलीस त्यांच्या घरी आले असता त्यांच्या गरोदर पत्नीच्या पोटावर पोलिसांनी लाठीने प्रहार केल्याने गर्भपात होऊन गर्भाशयाला दुखापत झाली आणि त्यामुळे त्यांना मूल होऊ शकले नाही. हे ऐकून आचार्य अत्रे यांना खूप पश्चाताप झाला. त्यांनी यशवंतरावांची, त्यांच्या पत्नीची त्यांच्या घरी जाऊन जाहीर माफी मागितली. या प्रकरणातून दोन व्यक्तिमत्वांचे वेगळे पैलू आपल्याला दिसतात. व्यक्तीगत स्वरूपाची टीका झाल्यावर कसलाही राग जाहीरपणे व्यक्त न करता शांतपणे आपले म्हणणे फोनवर अत्रे यांना कळवणारे यशवंतराव आणि आपल्याकडून चूक झाली हे लक्षात आणून दिल्यावर तेवढ्याच तत्परतेने आणि मनापासून चव्हाण दांपत्याची बिनशर्त जाहीर माफी मागणारे अत्रे. तसेच मोठ्या मनाने त्यांना माफ करणारे यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी वेणूताई.

पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना प्रख्यात व्यंगचित्रकार के. शंकर पिल्लई (शंकर) हे नेत्यांवर तसेच राजकारणावर टीकात्मक भाष्य करणारी व्यंगचित्रे आपल्या ‘शंकर्स वीकली’मध्ये प्रसिद्ध करत. त्या वेळी नेहरू यांनी, द्वेषभाव व्यक्त न करता राजकारण्यांच्या उणिवा व्यंगचित्रातून दर्शविण्याच्या, शंकर यांच्या कौशल्यास दाद दिली आणि म्हणाले होते, “शंकर, तुम्ही मला सोडू नका.” राजकारणावर व्यंगात्मक भाष्य निर्भयपणे व्यक्त करण्यासाठी आपल्या टीकाकारांना अभय देणारी नेहरू यांची भूमिका एकूणच राजकीय संस्कृतीची प्रगल्भता दर्शविते.

नरसिंह राव पंतप्रधान असताना जिनेव्हा येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विरोधी पक्षातले अटल बिहारी वाजपेयी यांना पाठवणे, राजीव गांधी यांनी वाजपेयी यांचा युनोच्या शिष्टमंडळात समावेश करून त्यांच्या गंभीर आजारावर परदेशी उपचार सुलभ करून देणे, वाजपेयी यांनी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जाहीरपणे राजधर्माची आठवण करून देणे, ही आणखी काही अशी उदाहरणे आहेत की, आजचा राजकारणाचा स्तर पाहता नव्या पिढीला अक्षरशः काल्पनिक वाटावीत. परिपक्व लोकशाही कशी असते हे दाखवून देणारा तो काळ असा होता की, विरोधकांना विरोधक मानले जायचे, शत्रू नव्हे. सत्ताधारी पक्ष देशासमोरील गंभीर प्रश्नांवर विरोधकांना विश्वासात घेत असे. विरोधी पक्षदेखील अशा गंभीर प्रसंगी सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहत असत. आणीबाणीच्या काळातील दडपशाही वगळता हे चित्र साधारणतः असे होते.

परंतु, गेल्या काही काळात या राजकीय संस्कृतीने १८० अंशाचे वळण घेतलेले दिसत आहे. महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांच्या दरम्यान आणि त्यानंतरची स्थिति पाहता, ही संस्कृती रसातळलाच गेली की काय असे वाटते. काहीही करून

भल्या-बुऱ्या मार्गाने सत्ता मिळवणे आणि ती टिकवून ठेवणे हेच उद्दीष्ट ठेऊन राजकारण करणे सुरू झाले तेव्हा याची सुरुवात झाली. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अस्त्रांपुढे राजकारणातील सुसंस्कृतता आणि प्रगल्भता कालबाह्य ठरत असून लोकशाहीचा गाभाच धोक्यात येईल की काय अशी भीती वाटत आहे. लोकशाहीच्या मुळावर उठलेली ही अस्त्रे आहेत तरी कोणती?

विरोधक हे शत्रूच ही भूमिका :

पूर्वी विरोधक हे राजकारणातल्या मुद्द्यांपुरतेच विरोधक असत. परंतु आता विरोधक म्हणजे आपला शत्रू ही भूमिका काही पक्षांनी घेतलेली दिसते आहे. सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांना विरोध केला की तो सरकारचा, म्हणजे देशाचा शत्रू, म्हणून तो देशद्रोही. आपला पक्ष धर्माधारीत राजकारण करतो, तर आपल्याला विरोध म्हणजे आपल्या धर्माला विरोध, म्हणून विरोधक धर्मद्रोही. बरे, हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. अशी मांडणी करून विरोधकांना देशद्रोही, धर्मद्रोही ठरवले की त्यांच्या प्रत्येक वक्तव्याची, कृतीची काटेकोर चिकित्सा करून त्यास देश/धर्मद्रोहाचा आयाम दिला जातो आहे.

विरोधकांविरुद्ध अपप्रचार :

एकदा का विरोधकांवर देश/धर्म द्रोहाचा शिक्का मारला की, मग सुरू होतो अपप्रचार. मॉर्फ केलेले फोटो/व्हीडीओ, खोटे आरोप यांची विविध माध्यमांमधून नुस्ती राळ उडवून दिली जाते. हल्ली सामाजिक माध्यमांमध्ये ट्रोल नावाच्या जमातीचा उदय झाला (खरे तर जाणीवपूर्वक केला गेलेला) आहे. या मिथ्या आरोपांच्या ट्रोलधडीला उत्तरे देता देता विरोधकांची दमछाक होते. मोठ्या प्रमाणावर झालेला हा अपप्रचार केवळ सामाजिक माध्यमांवर पोसलेल्या बहुसंख्य जनतेला खरा वाटू लागतो.

अश्लाघ्य भाषेत चारित्र्यहनन :

व्यक्तीगत खऱ्या-खोट्या बाबींना सार्वजनिक स्वरूप देऊन त्या आधारे चारित्र्यहनन करणे आणि त्यासाठी हिणकस भाषा वापरणे हल्ली नित्याचे झाले आहे. बार गर्ल, ५० करोड की गर्लफ्रेंड, नीच व्यक्ति असे हीन अभिरुचीचे शब्दप्रयोग जबाबदार उच्चपदस्थांकडून केले जात आहेत.

मृत व्यक्तींविषयी तिरस्कार :

‘मरणांतानि वैराणी...’ हे आपले पूर्वापार तत्त्व बाजूस ठेऊन मृत विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आपल्या अपयशाचे खापर फोडत राहणे नित्याचे झाले आहे. एवढेच नाही तर अशा व्यक्तींचे पूर्वज वेगळ्या धर्माचे कसे होते, वाईट चालीचे कसे होते याविषयी अपप्रचार करून तिरस्कार पसारविला जात आहे.

विरोधकांकडून त्याच भाषेत उत्तर:

अपप्रचार करणे, ट्रोल करणे हे आजच्या काळात यशस्वी होत असताना पाहून आता काही विरोधकांनीसुद्धा तोच मार्ग पत्करला असल्याचे दृश्य दिसत आहे. परंतु याचा परिणाम अत्यंत घातक होणार आहे. अपप्रचार, ट्रोल या लढाईत सत्य मात्र पराभूत होणार आहे.

विरोधकांवर खटले :

लोकशाहीत विधायक ‘विरोध’ अस्तीत्वात नसेल तर सत्ताधारी निरंकुश होतात हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे, नव्हे, निरंकुश सत्तेसाठीच विरोध नष्ट केला जातो असे इतिहास सांगतो. आपल्याकडे विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी नक्षली, दहशतवादी असल्याचा शिक्का त्यांच्यावर मारला जातोय. शिवाय राजद्रोहासारखे आरोप लावून बेमुदत तुरुंगात टाकले जात आहे. त्यांना जामीनसुद्धा मिळणार नाही याची व्यवस्था केली जात आहे.

राजकीय संस्कृतीचे हे अधःपतन होत असताना लोकांच्या जिव्हाळ्याचे महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य यासारखे मूलभूत प्रश्न मागे पडतात हे खरेच. परंतु त्याचवेळेस लोकशाहीच्या पायालाच हादरे बसणे हे देशासाठी अत्यंत गंभीर आहे. एवढेच नाही तर लोकांच्या नित्य आचरणात देखील ते रुजवले जाऊ शकते. त्याविरुद्ध जनतेनेच आता आवाज उठवला पाहिजे.

uttamjogdand@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in