गोबेल्स नीतीचा पराभव निश्चित

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. आपल्या नादानपणामुळे सत्ता गमावलेल्या राज्यातील विरोधी पक्षांनी गेल्या काही दिवसांपासून कसा अभूतपूर्व गोंधळ घातला, याचे दर्शन संपूर्ण राज्याला या निवडणुकीच्या निमित्ताने घडले.
गोबेल्स नीतीचा पराभव निश्चित

- केशव उपाध्ये

मत आमचेही

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. आपल्या नादानपणामुळे सत्ता गमावलेल्या राज्यातील विरोधी पक्षांनी गेल्या काही दिवसांपासून कसा अभूतपूर्व गोंधळ घातला, याचे दर्शन संपूर्ण राज्याला या निवडणुकीच्या निमित्ताने घडले.

निवडणुकीत काहीही करून आपल्या जागा जिंकून याव्यात, यासाठी विरोधी पक्षांनी लोकशाहीचा अपमान करत कोणताच भलाबुरा मार्ग चोखाळायचा शिल्लक ठेवलेला नाही. मतदार सुजाण आहेत आणि ते आपल्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरूनच मतदान करतात, याचा बहुतेक या नेत्यांना विसर पडला असावा.

महायुतीकडे असलले ठोस मुद्दे आणि देशभरातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचून केलेला प्रभावी प्रचार यामुळे विरोधी पक्षांच्या नेतेमंडळींच्या पायाखालची जमीन सरकली आहे. हादरलेल्या या नेत्यांकडे मतदारांना सामोरे जाण्यासाठी मुद्देच नसल्याने केवळ टीका आणि टीका इतकाच मार्ग त्यांच्याकडे उरला. सत्तेची हाव बेगडी नेत्यांना स्वस्थ बसू देत नाही. सत्तेची ही लालसा कुठे घेऊन जाते हे विरोधी पक्षातील गल्ली ते दिल्लीतील नेत्यांनी आपल्या वर्तनाने आणि वक्तृत्वाने दाखवून दिले. राजकारणात वैचारिक मतभेद असतातच. पण विधायक राजकारण खेळले जाणे सर्वांनाच अपेक्षित असते. त्याऐवजी संभ्रम निर्माण करून आपली पोळी भाजता येईल, असा विचार कोणी करत असेल तर तो कुठल्या नंदनवनात बागडतोय, हे त्याचे त्याने ठरवावे.

राज्यात जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेला सुरुवात झाली तेव्हापासूनच विरोधी पक्षांनी गोबेल्स नीतीचा फुसका प्रयोग करण्यास सुरुवात केली. हा मार्ग कुचकामी असल्याचे स्पष्ट होताच त्यांची पातळी आणखीनच घसरली. वैयक्तिक आरोप आणि चारित्र्यहननाचे प्रयत्न केले. तेही निरुपयोगी ठरत असल्याचे लक्षात येताच मतदारांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी अनिष्ट आघाडीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या कंड्या पिकवल्या. पत्रकारांसमोर हेतुपुरस्सर खोटी विधाने करून प्रतिपक्षांच्या नेत्यांमध्ये कशी दुही निर्माण करता येईल, यासाठी निष्फळ प्रयत्नही केले. हे सगळे भरेबुरे मार्ग अवलंबताना कोणताही विधिनिषेध बाळगला नाही. एकूणच, राजकारणाचे अवमूल्यन करण्याची मोहीमच या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी पक्षांनी उघडली होती.

वेगवेगळ्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी केवळ सत्तेसाठी एकत्र येत आपली मोट बांधली की किती विदारक अवस्था होते, हे विरोधी पक्षांनी या निवडणुकीत दाखवून दिले. निवडणुकांच्या रणांगणावरील राजकारणात वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेऊन उतरलेल्या पक्षांमध्ये वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे. प्रत्येक पक्षाने आपापली भूमिका संयमी शब्दात मांडणे तसेच त्याची पाठराखण करणे हेही मतदार समजू शकतात. मात्र हे सारे खेळीमेळीने होणे अपेक्षित असते. दुर्दैवाने विरोधी पक्षांकडे या गुणाचा पूर्णपणे अभावच आहे, याची जाणीव जनतेला या निवडणुकीत झाली. सत्तालोलुप विरोधी पक्षांच्या या मोळीने प्रचाराच्या प्रारंभापासूनच चिखलफेक करीत खोटेनाटे आरोप करण्यास सुरुवात केली. खोटे दाखले देत मतदारांचा बुद्धिभेद करण्याचे प्रयत्न केले.

महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या राजकारणाने इतके खालच्या पातळीवरील गलिच्छ राजकारण यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. कांगावा करणे म्हणजे काय असते आणि रडीचा डाव कसा खेळतात, याचा वस्तुपाठ घालून देण्यात विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये जणूकाही स्पर्धाच लागली होती. आपल्या तकलादू भूमिकेचे समर्थन करता आले नाही की गद्दार, बेईमान, सूर्याजी पिसाळ अशी बिनबुडाची आणि शेलकी विशेषणे आपल्या प्रभावहीन भाषणात वापरून आपल्या कमतरतेवर पांघरूण घालायचे काम तेवढे या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केले. मात्र त्यातून आपली उरलीसुरली विश्वासार्हता आपण गमावून बसलो आहोत, हे त्यांच्या गावीही नाही.

दीर्घकालीन राजकारणात टिकायचे असेल तर त्यासाठी त्या पक्षांना कायमस्वरूपी वैचारिक वारसा आणि टिकाऊ भूमिका असावी लागते. आपल्या सोयीनुसार पक्षाची भूमिका सातत्याने बदलणारे प्रदीर्घ राजकीय वाटचाल कधीच करू शकत नाहीत. भाजपसारखा ठोस भूमिका असलेला आणि कधीही भूमिका न बदलणारा पक्ष मतदारांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी राजकीय पटलावर टिकू शकतो तो त्यामुळेच. देशभरातील मतदारांचे मन भाजपने जिंकल्याचे हे एक मुख्य कारण आहे. त्यामुळेच भावी काळात देशात स्थैर्य निर्माण होऊन प्रगतीच्या दिशेने देशाची वाटचाल होणार आहे, हे निश्चित.

(लेखक भाजपचे प्रदेश प्रवक्ते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in