वाळवंटातील हिमवृष्टी काय सांगते?

जगभरात सध्या काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. सौदी अरेबियातील वाळवंटात बर्फ पडल्याचे. बर्फाच्छादित भागात उंटांना पाहून सारेच आश्चर्यचकित होत आहेत. मात्र, हे अचानक कसे घडले? ही घटना आहे की आपत्ती?
वाळवंटातील हिमवृष्टी काय सांगते?
Photo : X (@deby2628)
Published on

देश-विदेश

भावेश ब्राह्मणकर

जगभरात सध्या काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. सौदी अरेबियातील वाळवंटात बर्फ पडल्याचे. बर्फाच्छादित भागात उंटांना पाहून सारेच आश्चर्यचकित होत आहेत. मात्र, हे अचानक कसे घडले? ही घटना आहे की आपत्ती?

सौदी अरेबिया म्हटले की, सर्वांच्या डोळ्यांसमोर येते ते अंतहीन वाळवंट, घाम फोडणारा तप्त उन्हाळा, भाजून काढणारे ४५ ते ५० अंश सेल्सिअस तापमान आणि असह्य असे कोरडे हवामान. अशा वातावरणात चक्क बर्फवृष्टी झाल्याचे तुम्हाला कुणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल? सोशल मीडियावर सध्या काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ते खरे की खोटे? कृत्रिम बुद्धिमत्तेने ते बनविलेले नाहीत ना? वाळवंटी असलेल्या प्रदेशात हिमवर्षाव होणे ही कल्पनाच मुळात अविश्वसनीय वाटावी अशी आहे. मात्र काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या उत्तर भागात पडलेल्या बर्फाने ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. सोशल मीडियावर व्हायरल झालेले बर्फाच्छादित डोंगर, पांढऱ्या शुभ्र चादरीत लपलेले वाळवंटी प्रदेश, बर्फातून मार्गक्रमण करणारे ऊंट, वाळवंटातील पिवळसर वाळूवर बर्फाचा थर आणि आश्चर्यचकित स्थानिक नागरिक या आणि अशा अनेक दृश्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हा हिमवर्षाव आनंददायी आहे का? ही घटना आहे की आपत्ती? केवळ निसर्गाचा लहरीपणा आहे की जागतिक हवामान बदलाचे धोकादायक संकेत? असे अनेकानेक प्रश्न सध्या अनेकांच्या मनात घोळत आहेत. त्यांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे आणि ही बाब अधिक गंभीरपणे चर्चिली जाणे अगत्याचे आहे.

सौदी अरेबियाच्या ताबुक, हैल, अल जौफ आणि उत्तर सीमेवर दुर्मिळ हिमवर्षाव झाला आहे. तशी नोंद तेथील हवामान विभागाने केली आहे. विशेषतः जबल एल लाव्ज या पर्वतरांगेत बर्फाचा थर साचलेला दिसून आला. हा भाग समुद्रसपाटीपासून तुलनेने उंच असल्याने येथे हिवाळ्यात तापमान शून्याच्या जवळ किंवा खाली जाते. तरीही, एवढ्या प्रमाणात बर्फ पडणे हे ३० वर्षांतील अत्यंत दुर्मिळ दृश्य असल्याचे स्थानिक हवामान तज्ज्ञ सांगतात. काही भागांत तापमान उणे २ ते उणे ५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. वाळवंटातील थंड वारे, भूमध्य समुद्राकडून आलेली आर्द्रता आणि उत्तरेकडून घुसलेली तीव्र थंड हवा या तिन्ही घटकांच्या संयोगातून हा हिमवर्षाव घडून आला, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. महत्त्वाचे म्हणजे, सौदी अरेबियामध्ये कधीच बर्फ पडत नाही असे नाही. २०१६ आणि २०२२ मध्येही उत्तर भागात हलक्या स्वरूपाचा हिमवर्षाव झाल्याच्या नोंदी आहेत. मात्र यंदा घडलेली घटना अधिक व्यापक, तीव्र आणि दृश्यदृष्ट्या ठळक आहे. त्यामुळेच ती जागतिक चर्चेचा विषय बनली आहे.

साधारणतः सौदी अरेबियाच्या बहुतांश भागात उष्ण वाळवंटी हवामान आहे. पर्जन्यमान अत्यल्प, उन्हाळा अत्यंत तीव्र आणि हिवाळा तुलनेने सौम्य असतो. अशा परिस्थितीत हिमवर्षावासाठी आवश्यक असलेले वातावरण फार क्वचित तयार होते. त्यामुळेच हा प्रसंग केवळ हवामानाच्या आकस्मिक बदलापुरता मर्यादित मानता येणार नाही, असे अभ्यासकांना वाटते. जगभरात सध्या जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचे संकट घोंघावत आहे. त्याचा आणि सौदीतील बर्फवृष्टीचा काही संबंध आहे का, हे पडताळणे आवश्यक आहे. हवामान बदलाचा संबंध बहुतेक वेळा वाढते तापमान, दुष्काळ, पूर किंवा चक्रीवादळांशी लावला जातो. मात्र हवामान बदलाचा आणखी एक परिणाम म्हणजे अत्यंत टोकाच्या आणि विसंगत हवामान घटना. जसे वाळवंटात आता बर्फ पडला आहे. जगात उष्मा वृद्धी होत असताना, हवामान व्यवस्था अधिक अस्थिर होत आहे. याचा अर्थ असा की, उष्ण प्रदेशात अचानक तीव्र थंडी, कोरड्या भागात अतिवृष्टी आणि थंड प्रदेशात उष्णतेच्या लाटा अशा विसंगत घटना वाढत आहेत. सौदी अरेबियामधील हिमवर्षाव हे याचे ठळक उदाहरण आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, जेट स्ट्रीममधील बदल, ध्रुवीय थंड हवेचे असामान्य स्थलांतर आणि वातावरणातील आर्द्रतेतील वाढ हे सर्व घटक हवामान बदलाशी संबंधित आहेत. हा हिमवर्षाव स्थानिक नागरिकांसाठी उत्सुकतेचा आणि आनंदाचा विषय ठरला आहे. अनेकांनी आयुष्यात पहिल्यांदाच बर्फ पाहिला आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही या घटनेला मोठे महत्त्व मिळाले. मात्र याची दुसरी बाजूही आहे.

सौदी अरेबियाची पायाभूत रचना, वाहतूक व्यवस्था आणि शेती हिमवर्षावासाठी तयार नाही. ही बाब तेथे अतिशय प्रतिकूल आहे. त्यामुळेच अचानक पडलेल्या बर्फामुळे काही भागांत रस्ते बंद झाले, वाहतूक विस्कळीत झाली आणि स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचा इशारा द्यावा लागला. ही घटना भविष्यात अधिक तीव्र स्वरूपात घडल्यास त्याचे परिणाम गंभीर असू शकतात, असा इशारा शास्त्रज्ञ देत आहेत. हिमवर्षावाचे व्हिडीओ व्हायरल होताच काहींनी हे दृश्य कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय निर्मित किंवा बनावट असल्याचा दावा केला. मात्र सौदी हवामान विभाग, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आणि उपग्रह चित्रांनी या घटनेची सत्यता स्पष्ट केली आहे. यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, निसर्ग आता कल्पनेपलीकडे वागत आहे.

खगोल शास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ मोहम्मद बिन रेड्दा अल थकाफी सांगतात की, हिमवर्षाव अचानक किंवा पहिल्यांदा घडलेला नाही. मात्र, ही घटना अत्यंत दुर्मिळ असली तरी पूर्णपणे असामान्य नाही. ती हवामान आणि वायुमंडळातील परिस्थितींचा परिणाम आहे. नॅशनल सेंटर फॉर मेटरॉलॉजीचे म्हणणा आहे की, थंड हवामान लाट आणि वर्षावाचे ढग यामुळे हिमवर्षाव घडला आणि या ठिकाणी तापमान शून्याखाली गेले. जागतिक हवामान संघटनेच्या तज्ज्ञांचे मत आहे की, ही घटना पूर्णपणे अनपेक्षित असली तरी हवामान बदलामुळे अशा वेगळ्या परिणामांची शक्यता वाढते.

सौदी अरेबियामधील हिमवर्षाव ही घटना भारतासाठीही विचार करायला लावणारी आहे. भारतातही अलीकडच्या वर्षांमध्ये कधी अवकाळी पाऊस, कधी तीव्र उष्णतेच्या लाटा, तर कधी अतिवृष्टी या घटना वाढल्या आहेत. हवामान बदल ही भविष्यातील समस्या नसून सध्याची वास्तव समस्या आहे, याची ही आठवण करून देणारी घटना आहे. वाळवंटात पडलेला बर्फ हा केवळ निसर्गाचा चमत्कार नाही, तर मानवजातीस दिलेला इशारा आहे. हवामान व्यवस्था बिघडत असल्याची ही स्पष्ट खूण आहे. सौदी अरेबियामधील हिमवर्षाव हा जागतिक हवामान बदलाच्या कोड्यातील एक महत्त्वाचा तुकडा आहे. आज हा प्रसंग पाहून आपण आश्चर्य व्यक्त करतो, फोटो शेअर करतो, चर्चा करतो. पण उद्या अशा घटनांची तीव्रता किंवा वारंवारता वाढली, तर त्याचे सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम गंभीर असतील. त्यामुळेच विकास, ऊर्जा वापर आणि पर्यावरण संवर्धन यांचा नव्या दृष्टीने विचार करण्याची वेळ आता आली आहे. वाळवंटात पडलेला हा बर्फ कदाचित विरघळून जाईल, पण तो देऊन गेलेला संदेश मात्र दीर्घकाळ लक्षात ठेवावा लागेल. त्यादृष्टीने आपण तयार आहोत का?

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार.

logo
marathi.freepressjournal.in