निराशा ते आत्महत्या

जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त कृतीतून आशा निर्माण करणे, असा संदेश दिला आहे
निराशा ते आत्महत्या

एखादी वाईट बातमी वाचायला, ऐकायला न मिळणं हीच एक चांगली बातमी आहे, असं म्हणायला हवं. अशाच बऱ्याचशा घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत. अशा घटनांमध्ये प्रामुख्याने आत्महत्येच्या घटनांचा समावेश मोठ्या प्रमाणात होतो. अलीकडे बोलता बोलता बरेच जण त्यांच्या ओळखीतील झालेल्या आत्महत्येविषयी बोलत असतात. म्हणजेच बहुतांश व्यक्तीच्या जवळच्या अशा कुणीतरी आत्महत्या केलेली असते. आत्महत्येची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. अशा आत्महत्येला आळा घालण्यासाठी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस साजरा केला जातो. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त कृतीतून आशा निर्माण करणे, असा संदेश दिला आहे. निराशा हे आत्महत्येचे प्रमुख कारण आहे, असं ही संघटना मानते.

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुइसाइड प्रिव्हेंशन (आय. ए. एस. पी) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यू एच ओ) या संस्था अशाप्रकारच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. जगभरात आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवसाचं महत्त्व खूप जास्त आहे; परंतु इतर वार्षिक दिन साजरा करण्यासारखा हा दिवस नक्कीच नाही. आत्महत्या प्रतिबंधासाठी सातत्य, निश्चय आणि चिकाटीच हवी. रोज नव्या समस्यांनी ग्रस्त व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने आत्महत्या करत आहेत. त्याच्या भोवतालचे लोक त्याने उपस्थित केलेल्या अनुत्तरीत प्रश्नांमुळे हतबल होत आहेत.

बाईक दिली नाही. मोबाइल दिला नाही. घरातील लोक मुलांचं प्रेम स्वीकारणार नाहीत. तो कर्जबाजारी झालाय. तो जुगार खेळतोय. प्रेमात फसलाय. वाईट संगतीचा भयानक दुष्परिणाम भोगावा लागतोय. कुणी ब्लॅकमेल करत असेल. मार्क्स कमी पडले. नोकरी धंद्यातील अपयश अशा कोणत्याही कारणास्तव व्यक्ती निराश होतात. निराशा लपवण्यासाठी, स्वत:चं अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्यासाठी असे लोक अनेकविध कारणांचा शोध घेत राहतात. निराशा ते आत्महत्या हा प्रवास प्रचंड दु:खाचा आणि ताणतणावाचा असतो, यात शंकाच नाही.

उदासीनता, एकाकीपण असं काहीही नसलं तरी अगदी एखाद्या किरकोळ कारणास्तव एखाद्याला नैराश्य आलेलं असेल; परंतु प्रत्येक समस्येवर उत्तरं आहेत. फक्त अशा निराश झालेल्या व्यक्तींनी आपल्या माणसांशी एकदा तरी बोलून बघायला हवं. आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती स्वत:चं अस्तित्व संपवतात; परंतु त्यांच्या आजूबाजूचे लोक जिवंतपणी मरणयातना सहन करतात. मृत्यूसाठी कडू विचारांचा एक घोटदेखील पुरतो. त्यामुळे सर्वांनी जगणं नव्याने समजून घ्यावं लागेल. ते समजत नसेल तर एकमेकांना विचारावं लागेल. सगळ्यांशी बोलावं लागेल, आपली मतं मांडायला लागतील. पटत नसेल तर भांडावं लागेल, लढावं लागेल; पण मैदानातून पळ काढून कसं चालेल? त्यातूनही मार्ग दिसत नसेल तर समुपदेशकांची मदत घ्यावी लागेल. जेव्हा काहीच मार्ग दिसत नाही, तेव्हा बाजूला कुठेतरी छोटासा रस्ता असतो. तो नुसता दिसला तरी त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करतो. माहीत नसलेला अडथळ्याचा थोडा मार्ग चालल्यावर पुढचा सगळा रस्ता बऱ्यापैकी मोकळा आणि मोठा दिसतो. असं बऱ्याच वेळा घडतं. माणसांची बदलती जीवनशैली, विचारातील वाढलेली अविवेकी दृष्टी, निर्णय घेण्यातील गतिमानता ही कारणं आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतात.

बऱ्याचदा निराशा येण्याच्या कारणांमधे शेजारी, नातेवाईक, चुकीचे मित्रमंडळ यांच्या अविवेकी वर्तनाचा परिणाम असू शकतो. आपल्याकडे आपले ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून ही अशी एक म्हण आहे. सतत दुसऱ्यांच्या घरात लुडबुड केल्याने विचित्र समस्या निर्माण होतात. आपल्याला इतरांच्या विचार क्षमतांबरोबर समायोजन करता येत नाही.

आजूबाजूच्या लोकांमध्ये मनमोकळा संवाद साधता येत नाही. असे दुहेरी तिहेरी ताणांचे अनेकपदरी वास्तव्य टाळता येऊ शकतं. कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी समुपदेशन प्रक्रियेतून जाण्याने भावनांची तीव्रता कमी करण्यास निश्चितच मदत होते; परंतु आपल्याकडे समुपदेशन अजूनही रुळलेले नाही. आपल्याकडे नातेसंबंधांचा गोतावळा असतो. त्यामुळे कुठल्याही प्रश्नांवर बोलणे, चर्चा करणे घडू शकते; परंतु समस्या शास्त्रीय दृष्टिकोनातून सोडवल्यास त्या समूळ नष्ट होण्याची शक्यता वाढते हे लक्षात येत नाही.

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा करत असताना आत्महत्या होऊ नयेत म्हणून १०० टक्के प्रयत्न करणे गरजेचे आहेच. त्याआधी आत्महत्या प्रतिबंध करण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी करायच्या याचे स्पष्ट आकलन होणे गरजेचे आहे. कारण आत्महत्या थांबविण्यासाठी थेट उपाययोजना शक्य नाही, हे समजून घ्यावं लागेल. आत्महत्येसंबंधी जनजागृती करताना मानवी मन कोणत्याही पद्धतीने त्या शब्दाचा, विपर्यास करणार नाही याची काळजीही घ्यावी लागेल. नाहीतर आत्महत्येची कारणं, दुष्पपरिणाम, उपाययोजना अशा गोष्टींच्या सततच्या भडिमारामुळे एखादा आणखी निराश व्हायचा. करायला गेलो एक आणि झालं भलतंच अशी अवस्था व्हायची. आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करायचेच असतील तर जन्माने मिळालेले नातेसंबंध, आपण ठरवून निवडलेले नातेसंबंध यांची काळजीपूर्वक जपणूक करावी लागेल.

आत्महत्या प्रतिबंधात्मक उपाय जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच आत्महत्येनंतर कुटुंबीयांवर होणाऱ्या दुष्परिणामांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कारण आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींच्या जवळच्या माणसांचं आर्थिक आणि कौटुंबिक आयुष्य कोलमडतं. त्यांना समाजाकडून कळत नकळत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. इतकं टोकाचं पाऊल उचलेपर्यंत घरच्याना कळलं कसं नाही, वगैरे ऐकवले जाते.

आत्महत्येसाठी कुटुंबीयांनी स्वत:ला जबाबदार धरण्यासंबंधी अपराधी भावना कमी करण्याचा प्रयत्न करावा. कारण त्यांच्यावर शारीरिक मानसिक दुष्परिणाम होऊ शकतो. आत्महत्येबाबत इतर लोकांचे समज आणि गैरसमज काहीही असतील. लोक काय म्हणतील याला महत्त्व देऊन स्वत:ची मानसिकता बिघडवण्याची गरज नसते. असंवेदनशीलतेमुळे किंवा अज्ञानामुळे काही लोक वेडेवाकडे प्रश्न विचारू शकतात हे लक्षात घ्यावे. कारण लोकांना जे वाटतं, तेच सत्य असतं असं नाही. दु:ख कमी करण्यासाठी भविष्यामधल्या एखाद्या उद्दिष्टावर लक्ष ठेवावे. त्यामुळे भूतकाळात जाण्याचा मनाचा खेळ कमी होऊ शकतो. दररोज एखादा व्यायाम करावा. आहाराकडे लक्ष द्यावे. जेणेकरून आपले शारीरिक, मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in