देवेंद्रजींचे ध्यासपर्व!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अलीकडची काही वाक्ये मला भावली. ती म्हणजे नवा महाराष्ट्र घडतो आहे, विकसित महाराष्ट्राकडे दमदार पाऊल पडते आहे. स्वप्न बघणे, त्याचा विस्तार करणे, ते प्रत्यक्षात उतरवणे यामधील अंतर देवेंद्रजींनी त्यांच्या ताकदीवर कमी केले.
देवेंद्रजींचे ध्यासपर्व!
देवेंद्रजींचे ध्यासपर्व!
Published on

विशेष

चंद्रशेखर बावनकुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अलीकडची काही वाक्ये मला भावली. ती म्हणजे नवा महाराष्ट्र घडतो आहे, विकसित महाराष्ट्राकडे दमदार पाऊल पडते आहे. स्वप्न बघणे, त्याचा विस्तार करणे, ते प्रत्यक्षात उतरवणे यामधील अंतर देवेंद्रजींनी त्यांच्या ताकदीवर कमी केले.

भारताच्या ‘पाच ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र ‘एक ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेचा सिंहाचा वाटा उचलेल, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान महाराष्ट्र-विकसित महाराष्ट्राच्या दिशेने आश्वासक व निर्णायक पाऊल टाकतो आहे याची खात्री पटवून देते. ते एवढ्यावरच थांबत नाहीत, तर यासाठी अल्प, मध्यम व दीर्घकालीन उद्दिष्ट समोर ठेवून विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आराखडा तयार करतात. अंमलबजावणी यंत्रणांचा पाठपुरावा आणि वास्तवाचा आढावा घेतात. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र लोकाभिमुख होतानाच अधिक विकसित होतो आहे. “विकसित भारताच्या स्वप्नासाठी महाराष्ट्राचा सहभाग महत्त्वाचा आहे,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत देवेंद्रजींच्या विकसित महाराष्ट्राचा रोड मॅप किती अचूक आणि प्रबळ आहे याचेच मूल्यमापन करणारे आहे.

देवेंद्रजी ध्येय ठरवून वाटचाल करतात. आपल्या आदर्शाचा गौरव करतात. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा ११ किल्ल्यांचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश करण्यासाठी केलेले प्रयत्न, केवळ अहवाल व समित्यांमध्ये रखडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी कृतिशील जोड तसेच, पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण या घटनांनी महाराष्ट्राचा जागतिक स्तरावर सन्मान वाढला आहे.

आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्राच्या योगदानाचे दिले जाणारे दाखले किंवा पायाभूत सुविधांसाठी होणारे त्यांचे प्रयत्न लक्षवेधक आहेत. राज्यभर होणारे रेल्वेचे जाळे, मुंबई-नागपूर-पुणे मेट्रो विस्तार नवी मुंबई विमानतळ, वाढवण बंदर आणि शक्तिपीठ महामार्ग यांसारख्या कितीतरी मोठ्या व महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे.

केवळ मोठी शहरे नव्हे, तर देवेंद्रजींनी गडचिरोलीसारख्या पूर्वी मागासलेल्या भागाकडे लक्ष केंद्रित केले. भयमुक्त गडचिरोलीचा नारा त्यांनी कृतीतून सिद्ध केला. नक्षलवाद्यांचा बिमोड तर केला आणि बरोबरीने युवकांच्या हाताला काम मिळावे, आदिवासी भागातील अर्थव्यवस्था बळकट व्हावी यासाठी त्यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना तोड नाही!! गडचिरोलीत गुंतवणूक आणली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ‘नव्या विकास पर्वाची सुरुवात’ आहे, या शब्दांत देवेंद्रजींच्या प्रयत्नांचे कौतुक केले. शेतकरी, महिला शेतकरी, विद्यार्थी, कामगार, उद्योजक, पर्यटन, पोलिसिंग सर्वच क्षेत्रांचा साकल्याने विचार ते करतात.

इज ऑफ डुइंग बिझनेस आणि इज ऑफ लिव्हिंग ही वाक्ये हल्ली नेहमी वापरात आहेत. या दोन आधारावर जीवनमानाचे मूल्यांकन होते. आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण, रोजगार, उत्पन्नाच्या संधी, पर्यावरण हे सगळे मापदंड यामध्ये आहेत. याच वाटेने महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून देवेंद्रजींचा ध्यास जनतेला सुखी व राज्याला विकसित करण्यासाठी चालला आहे.

राज्याच्या विकासासाठी देवेंद्रजी अठरा तास झटत आहेत. हाती घेतलेले काम झपाट्याने पूर्ण करीत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ते जनतेशी जुळले आहेत. राज्यातील रस्ते, वीजपुरवठा, उद्योग, सिंचन या बाबी राज्याचा विकासदर निश्चित करण्यासाठी कामी येत असल्या तरी, गरीब-सर्वसामान्य, तळागाळातील नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच प्रगती मोजण्याचा मापदंड असतो. म्हणूनच, देवेंद्रजी आधुनिकतेची कास धरताना गरीबांच्या विकासाची काळजी घेतात. गरीबांच्या घराच्या योजना, अन्नधान्यांची काळजी, आरोग्याची तळमळ या सगळ्यांवर त्यांची नजर आहे. विलक्षण बुद्धिमत्ता, अचाट बुद्धिसामर्थ्य आणि अंगात टिकून असलेला साधेपणा हे त्यांच्या यशाचे गमक आहे.

देवेंद्रजींचे ध्येय स्पष्ट आणि महत्त्वाकांक्षी आहे. ते म्हणजे, ‘महाराष्ट्र क्रमांक एक राज्य बनविणे’. त्यांनी दोन वर्षांपूर्वी झालेल्या ‘इंडिया ग्लोबल फोरम नेक्स्ट’मध्ये सांगितले की, “महाराष्ट्राला वैश्विक पुरवठा साखळीचा केंद्रबिंदू बनवायचे आहे, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राज्य अग्रेसर असेल.” देवेंद्रजींना ‘इन्फ्रामॅन’ ही उपाधी त्यांनी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आणलेल्या क्रांतिकारी बदलांमुळे मिळाली. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी ३० वर्षांचा पायाभूत सुविधांचा बॅकलॉग पाच वर्षांत भरून काढला. त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक चित्राला नवसंजीवनी दिली.

‘महसूल विभाग सुधारला तर सबंध राज्य सुधारेल..’ असे ते म्हणतात. त्यांनी घेतलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या परिषदांमधून नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, मानवनिर्मित चुका टाळल्या पाहिजेत, सातबारापासून सगळे अभिलेख ऑनलाइन करण्यावर वेळोवेळी भर दिला. घरबसल्या जनतेला सेवा मिळाली पाहिजे हे त्यांनी निक्षून सांगितले. मी महसूल मंत्री झालो. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत त्यांनी मला गृहपाठ दिला होता. त्यांच्या सूचनेनुसार, महसूल विभागाचा कारभार कृतीमध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सेवा हक्क कायद्यातील ५४ सेवांपैकी दहा सेवा सुलभ आणि गतिमान झाल्या आहेत. कागदपत्रांची संख्या व मंजुरीचे स्तर घटवले. गव्हर्नन्स प्रोसेस रिइंजिनिअरिंग-जीपीआर या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अत्यंत कमी वेळात दाखले वा प्रमाणपत्रे जनतेला देणे सुरू झाले आहे. अल्पभूधारक, अधिकार लेखाची प्रमाणित प्रत, प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे, उत्पन्न प्रमाणपत्र, भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला, नॉन क्रिमिलेयर, ज्येष्ठ नागरिक, तात्पुरता रहिवास, वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास अशी प्रमाणपत्रे झटपट मिळू लागली आहेत. अनेक निर्णय घेतले. त्याची अंमलबजावणी सुरू झाली. ज्याप्रमाणे गृह विभाग जनतेच्या जीविताचे रक्षण करतो त्याचप्रमाणे आमचा महसूल विभाग जनतेच्या मालमत्तांचे रक्षण करतो, हा विश्वास त्यांच्या कृतिशील मार्गदर्शनामुळे आम्हाला मिळू शकला.

लोककल्याणकारी राज्यासाठी दूरदृष्टी महत्त्वाची असल्याने त्यांचे आरोग्यक्षेत्रातील कार्य खूप प्रभावी ठरले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची स्थापना १९६७ मध्ये झाली; पण २०१५ मध्ये देवेंद्रजींनी त्याला नवे परिमाण मिळवून दिले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्याचा या निधीचा उद्देश आहे. हृदयविकार, कर्करोग, किडनी आणि लिव्हर प्रत्यारोपण, बोनमॅरो ट्रान्सप्लांट यांसारख्या महागड्या आणि जटिल शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना आधार देण्याचे काम यातून होते. या कक्षामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ झाली, पारदर्शकता आली आणि गरजूंना वेळेत मदत मिळू लागली. यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक संकटातून बाहेर पडताना जीवनदान मिळाले आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत तब्बल ४०,७७६ रुग्णांना ३३३.६० कोटी रुपयांचे वैद्यकीय अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे. दुर्धर आजारांशी लढणाऱ्या कुटुंबांसाठी ते देवदूत ठरले आहेत. जेव्हा एखादा हताश पिता आपल्या चिमुरड्याच्या उपचारासाठी पैसे नसल्यामुळे डोळ्यात पाणी आणून उभा असतो, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने निघणारा मदतीचा धनादेश त्या संपूर्ण कुटुंबाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. ही आकडेवारी केवळ सरकारी बजेट दर्शवत नाही, तर ती ४० हजारांहून अधिक कुटुंबांच्या सुरक्षित भविष्याची साक्ष देते. लाभार्थ्यांचे आकडे महाप्रचंड आहेत. त्या प्रत्येक आकड्यामागे एक माणूस, एक कुटुंब आणि त्यांच्या आशेची कहाणी आहे.

माझ्या या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माझ्या डोळ्यांसमोर आमच्या नात्याची ३५ वर्षे उभी होतात. त्यातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय आहे. विकासाची स्पष्ट दृष्टी, निश्चित दिशा आणि कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न बाळगता काम करत राहण्याचा स्वभाव ही लोकनेत्याची कुशलता आहे.

महसूल मंत्री, महाराष्ट्र

(शब्दांकन : रघुनाथ पांडे, माध्यम सल्लागार, महसूल मंत्री)

logo
marathi.freepressjournal.in