धुरा एकनाथ शिंदेंकडे !

विधानसभेत शक्तिपरीक्षा करण्यास बुधवारी रात्री अनुमती दिल्यानंतर राज्यामध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडल्या
धुरा एकनाथ शिंदेंकडे !

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या आदेशानुसार गुरुवार, ३० जून रोजी विधानसभेत शक्तिपरीक्षा करण्यास बुधवारी रात्री अनुमती दिल्यानंतर राज्यामध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामागे शिवसेनेचे अगदी थोडे आमदार शिल्लक राहिल्याने आणि शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार बंडाचा झेंडा फडकवून एकनाथ शिंदे यांच्या मागे असल्याचे लक्षात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला सामोरे जाण्याआधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते पायउतार झाले! त्यानंतर घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडीमध्ये राज्यपालांची भेट घेऊन भाजप आणि शिंदे गटाने सत्तास्थापनेचा दावा केला. राज्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून ‘मी पुन्हा येईन’, असे म्हणणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ऐवजी राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली! ही घोषणा सर्वांसाठीच धक्कादायक होती. त्याचप्रमाणे आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले. भारतीय जनता पक्ष पदासाठी संघर्ष करीत नाही तर तत्वासाठी लढतो, असे स्पष्ट करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, भाजपचा हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजप यांचे सरकार कार्य करील, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही पुढे गेलो. पण महाविकास आघाडी सरकारच्या मर्यादा होत्या. त्या लक्षात घेऊन राज्याच्या हितासाठी, राज्यातील जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊन आम्ही स्वतंत्र गट करण्याचा निर्णय घेतला, असे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले. अडीच वर्षांमध्ये राज्याच्या विकासाचे जे विषय मागे पडले आणि अन्य महत्वाचे जे विषय रेंगाळत राहिले ते वेगाने पुढे नेण्याचे कार्य नवे सरकार करील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. आपल्यावर मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले. गेल्या २० जूनपासून एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक ‘नॉट रिचेबल’ झाल्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे चिरे ढासळण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर बघता बघता शिवसेनेचा गड ढासळला. या घटनेने संजय राऊत यासारख्या नेत्यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांवर आणि भाजपवर आगपाखड करण्यास प्रारंभ केला. एवढेच नव्हे तर या बंडखोर गटावर आणि त्यांच्या नेत्यांवर अत्यंत असभ्य भाषेत तोंडसुख घेण्यात आले. भाजपकडे गेला तर तो पक्ष तुमचा वापर करील आणि नंतर तुम्हास फेकून देईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले असतानाही त्याकडे शिंदे गटाच्या आमदारांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले. वाट्टेल ते झाले तरी पुन्हा माघारी फिरायचे नाही, असा निर्धार शिंदे आणि त्यांच्या सर्व समर्थक आमदारांनी केल्याने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पराभवाची चाहूल लागली. कायदेशीर मुद्दे उपस्थित करून शिंदे गट आणि भाजप यांच्या सत्तेचा मार्ग रोखता येईल का, असे प्रयत्नही करण्यात आले. पण त्या सर्व प्रयत्नांना यश आले नाही. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेत शक्तिपरीक्षा करण्यास अनुमती दिल्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. राज्यातील जनतेला उद्देशून उद्धव ठाकरे यांनी ‘फेसबुक लाईव्ह’ भाषण केले आणि त्या भाषणात आपण मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे आणि यापुढे शिवसेना भक्कम करण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे त्यांनी घोषित केले. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा विचार सोडलेला नाही, हे दाखवून देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत, औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला. अडीच वर्षे सत्तेवर असताना उद्धव ठाकरे यांना हा निर्णय कधीच घेता आला असता! आता, आपल्यामागे उभे असलेले शिवसेनेचे नेते आपणास का सोडून गेले, याचे आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे आणि त्यांच्यामागे उरलेल्या शिवसेना नेत्यांनी करण्याची नितांत गरज आहे. भाजपसमवेत युती करून हिंदुत्वासाठी मते मागणाऱ्या शिवसेनेने, भाजप नको म्हणून जो दुसरा घरोबा केला त्यामुळेही शिवसेनेचे नेते नाराज होते. त्यांच्यामानातील ही खदखद अडीच वर्षांनंतर बाहेर पडली इतकेच! राज्याची धुरा आता शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आली आहे. राज्याच्या प्रगतीच्या मार्गात ज्या विविध कारणांमुळे अडथळे आले ती कारणे दूर करून राज्य वेगाने प्रगतीपथावर नेण्याचे कार्य नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या हातून घडेल अशी अपेक्षा!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in