या शाळांच्या विविध प्रकारांनी युनिफॉर्ममधली ‘युनिफॉर्मिटी’ पूर्णतः संपुष्टात आणली ?

विद्यार्थी एकमेकांच्या युनिफॉर्मवरून एकमेकांना जोखू लागली. कॉन्व्हेंटची मुलं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागली.
या शाळांच्या विविध प्रकारांनी युनिफॉर्ममधली ‘युनिफॉर्मिटी’ पूर्णतः संपुष्टात आणली ?
Published on

आलोक जत्राटकर

म्युनिसिपालिटी, जिल्हा परिषदा अर्थात शासकीय संस्थांच्या मार्फत शाळा चालविल्या जात असत, तेव्हा सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांसाठी पांढरा शर्ट, खाकी चड्डी आणि काही ठिकाणी डोक्यावर गांधी टोपी, तर विद्यार्थिनींसाठी पांढरा ब्लाऊज आणि निळा किंवा गुलाबी स्कर्ट असा गणवेश असे. त्या ठिकाणी जमलेली सर्व मुलं ही विद्यार्थी म्हणून एक असायची.

आज या गोष्टीकडं मागं वळून पाहताना तत्कालीन शैक्षणिक धोरणकर्त्यांविषयी विलक्षण कौतुक मनी दाटून येतं. सर्व शाळांमध्ये गणवेश एकसारखा असावा, गणवेशामध्ये ‘युनिफॉर्मिटी’ असावी, यासाठी त्यांनी किती सखोल चिंतन, विचार केला असेल, हे जाणवते. स्वातंत्र्योत्तर कालखंडात सामाजिक, आर्थिकदृष्ट्या अजिबातच एकजिनसी नसलेल्या किंवा प्रचंड विषम अवस्थेत असलेल्या स्तरित भारतीय समाजामधील अनेक समाजघटक प्रथमच शिक्षणाच्या प्रवाहामध्ये सामील होत होते. त्यांना परवडेल असा कपडा हा गणवेशाचा भाग असला पाहिजे, असा विचार त्यामागे होता. मग खादीचा जाडाभरडा पांढरा कपडा आणि खाकी पाटलोणाचा कपडा हा समाजातल्या अगदी खालच्या स्तरातील लोकांनाही परवडू शकतो, असा विचार पुढे आला असावा. आता गणवेश तरी कशाला?, तर शाळा म्हणून काहीएक शिस्त या मुलांमध्ये असावी, केवळ यासाठीच. अन्यथा कर्मवीर भाऊराव पाटलांपासून ते कित्येक शिक्षकांनी मुलांना त्यांच्या दारातून उचलून कडेवरून आणि खांद्यावरून शाळेत नेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याची अनेक उदाहरणे मागल्या पिढीत आहेत, तर मुद्दा होता गणवेशाचा. समाजातल्या सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातली मुले शाळेत येत असताना त्यांच्या राहणीमानावरून, विशेषतः पेहरावावरून त्यांच्यात एकमेकांप्रती उच्चनीचतेची भावना उद्भवू नये, विद्यार्थी म्हणून त्यांनी शाळेमध्ये एका समान पातळीवर राहावे, या दृष्टीने हा एक साधा निर्णय फार महत्त्वाचा होता, असे माझे मत आहे. मात्र, पुढे शाळांचे वेगवेगळे प्रकार जसजसे वाढीस लागले, तसतसे त्यांचे ‘युनिफॉर्म’ही वेगवेगळे, रंगबिरंगी होऊ लागले. मराठी शाळांच्या पलीकडे कॉन्व्हेंट, सीबीएसई, आयसीएसई, इंग्लीश मीडियम, सेमी-इंग्लीश मीडियम, प्रायव्हेट, रेसिडेन्शियल, इंटरनॅशनल असे शाळांचे नानाविध प्रकार अवतरू लागले आणि तितकेच वेगवेगळ्या युनिफॉर्मचे लोणही फोफावले. या शाळांच्या विविध प्रकारांनी युनिफॉर्ममधली ‘युनिफॉर्मिटी’ पूर्णतः संपुष्टात आणली. आपण शिक्षणाच्या व्यावसायीकरणाच्या नादामध्ये या देशातल्या विद्यार्थ्यांमधील समतेच्या भावनेला हरताळ फासतो आहोत, हे त्यांच्या गावीही नव्हते. त्यांनी हे जाणीवपूर्वक केले, असे नक्कीच म्हणायचे नाही. आपापले वेगळेपण निर्माण करण्याच्या नादात त्यांच्या हातून हे पातक झाले, हे मात्र खरे.

विद्यार्थी एकमेकांच्या युनिफॉर्मवरून एकमेकांना जोखू लागली. कॉन्व्हेंटची मुलं स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागली. मराठी आणि म्युनिसिपालिटीच्या शाळांतील विद्यार्थी त्यांच्या दृष्टीनं शूद्र बनली. नवी शिक्षणव्यवस्था शिक्षणाच्या क्षेत्रात एका नव्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जन्म देती झाली. इंटरनॅशनल स्कूल, कॉन्व्हेंटची मुलं या व्यवस्थेतले नवब्राह्मण आहेत. सीबीएसईवाली मुलं क्षत्रिय आहेत. इंग्लीश, सेमी-इंग्लीशवाली वैश्य आहेत, तर म्युनिसिपालिटीच्या मराठी शाळांतली मुलं शूद्र आहेत. शिक्षणाच्या प्रवाहाबाहेरची मुलं तर कायमच अतिशूद्र आहेत. एकदा अंधेरी ते कुर्ला ‘बेस्ट’नं प्रवास करत होतो. वाटेत एका स्टॉपवर दोन अशाच ‘हाय-क्लास’ शाळेतल्या मुली चढल्या. सहावी-सातवीतच असतील, फार तर. मी बसलो होतो, त्याच्या पुढच्या बाकावर त्या येऊन बसल्या. त्यांच्यात त्या स्टॉपवर उभ्या असलेल्या अशा ‘शूद्र’ विद्यार्थिनींबद्दल बोलणं सुरू होतं. त्यांच्या इंग्रजीत सुरू असलेल्या चर्चेचा सूर थट्टेचाच, नव्हे तर कुचेष्टेचा होता. त्यांची शाळा, त्यांचा युनिफॉर्म, त्यांचं दिसणं, त्यांचं एकमेकींशी मराठीतून संवाद साधणं, या साऱ्याच बाबी या दोन मुलींच्या दृष्टीनं ‘लो-क्लास’ होतं. त्या मुली आता नव्हत्या त्यांच्यासमोर, पण त्यांचं वर्णन करीत त्या एकमेकींना टाळ्या देत फिदीफिदी हसत होत्या. माझ्या मनात त्या खालच्या दोघींविषयी नव्हे, तर समोरच्या या तथाकथित हायक्लास मुलींविषयी आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेविषयी करुणा दाटून येत होती. कारण या देशातल्या सामाजिक वास्तवापासून त्या कोसो दूर फेकल्या गेल्या होत्या. शिक्षणानं माणसामध्ये समतेची, समानतेच्या भावनेची रुजवात करायला हवी, बहुसांस्कृतिक भारताच्या प्रत्येक संस्कृतीविषयी आदरभाव रुजवायला हवा, मात्र प्रत्यक्षात शाळांच्या या नवनव्या प्रकारांनी हा नव्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला जन्म दिलेला आहे आणि त्या माध्यमातून परस्परांप्रती विषमतेची भावना अधिक फोफावू लागली आहे.

‘युनिफॉर्मिटी इन डायव्हर्सिटी’ हे खरंतर आपल्या देशाचं वैशिष्ट्य. प्रत्यक्षात शाळांचा युनिफॉर्म मात्र विषमतेला कारणीभूत ठरल्याचं वर केवळ एक प्रत्यक्षदर्शी उदाहरण दिलं. प्रत्यक्षात याहूनही अधिक गंभीर परिस्थिती आहे. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ ही जी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अगदी डिजिटल दरी निर्माण होते आहे, त्याला हे शिक्षणातील बहुस्तरितीकरण कारणीभूत ठरत आहे. गगनचुंबी टॉवरमध्ये राहणाऱ्या समुदायाला आपल्या शेजारी असणारी झोपडपट्टी नकोशी असते- त्या झोपडपट्टीतूनच त्यांच्या कामवाल्या, झाडूवाल्या, अगदी सुरक्षारक्षक येत असून सुद्धा. या घटकांच्या जगण्या-मरण्याशी कोणतंही नातं, हे टॉवर जोडू पाहात नाहीत. त्याचं दुखणं समजून घेण्याचा ते प्रयत्नही करत नाहीत. कारण ते जिथे शिकले, तिथल्या शिक्षणाने त्यांच्यामध्ये ही आस्था, कणव निर्माणच केलेली नसते. सन्माननीय अपवाद गृहित धरल्यानंतर सुद्धा हे प्रमाण खूपच नगण्य असतं.

केवळ युनिफॉर्म बदलल्यानं ही विद्यार्थ्यांची, विविध समाजघटकांची एकमेकांकडं विषमतेच्या भावनेनं पाहण्याची दृष्टी लगोलग बदलेल, असं मुळीच म्हणायचं नाही; मात्र, समतेचा दृष्टिकोन निर्माण करण्याची ताकदही युनिफॉर्ममध्ये असते, हेही तितकंच खरं!

(लेखक जनसंपर्क व माध्यम व्यावसायिक आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in