खेळाची इभ्रत मातीमोल!

कोणत्याही प्रकारच्या खेळात जातीयतेला, धर्मांधतेला, वंशभेद, वर्णद्वेषाला थारा नाही. खेळ म्हटला की त्यात राग नाही, लोभ नाही, द्वेष नाही, मत्सर नाही अन‌् राजकारणसुद्धा नाहीच नाही. दुर्दैवाने अलीकडच्या काळात खेळात घुसलेल्या बाहुबलींच्या हीन, दीन व गलिच्छ राजकारणाने केवळ खेळच नासवला नाही, तर खेळातील खिलाडूवृत्ती, सहनशीलता, सभ्यतेलाच नख लावले आहे..
खेळाची इभ्रत मातीमोल!

- प्रकाश सावंत

दुसरी बाजू

कोणत्याही प्रकारच्या खेळात जातीयतेला, धर्मांधतेला, वंशभेद, वर्णद्वेषाला थारा नाही. खेळ म्हटला की त्यात राग नाही, लोभ नाही, द्वेष नाही, मत्सर नाही अन‌् राजकारणसुद्धा नाहीच नाही. दुर्दैवाने अलीकडच्या काळात खेळात घुसलेल्या बाहुबलींच्या हीन, दीन व गलिच्छ राजकारणाने केवळ खेळच नासवला नाही, तर खेळातील खिलाडूवृत्ती, सहनशीलता, सभ्यतेलाच नख लावले आहे..

खेळ म्हणजे पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदादच्या ‘माकडउड्या’ नाहीत. खेळ म्हणजे गौतम गंभीरने श्रीसंतला ‘फिक्सर’ म्हणून हिणवणेसुद्धा नाही किंवा ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्शने ‘वर्ल्डकप’वर पाय ठेवण्याचा उद्दामपणाही नाही. या लाजिरवाण्या घटना खेळच नव्हे, तर खेळाडूंना कमीपणा आणणाऱ्या व देशाची मान शरमेने खाली घालायला लावणाऱ्या आहेत. खेळ म्हणजे केवळ रोजीरोटीचेच नव्हे, तर अनेकांच्या जगण्याचे साधन आहे. खेळ म्हणजे केवळ हार-जीत नाही. खेळ म्हणजे गावाचा, राज्याचा, देशाचा गौरव आहे. खेळ हा उत्सव आहे, महोत्सव आहे. खेळात थरार आहे, उत्कंठा आहे, भावभावनाही आहेत. त्यात शाळा, महाविद्यालय, जिल्हा, राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय असे चढत्या भाजणीने उंचावत जाणारी व मानसन्मान वाढविणारी यशोशिखरे आहेत. विविध क्रीडा प्रकारांमध्ये शारीरिक क्षमतेचा, बौद्धिक कौशल्याचा नि गुणवत्तेचा कस आहे. खेळात हुरहूर, चुटपुट, जिद्द, धडपड, चिकाटी, आवड आहे. नाराजी, दु:ख, खेद, संताप, चीड, आनंद असा संमिश्र भावभावनांचा अनोखा मिलाफ आहे. खेळात लोकप्रियतेचा जल्लोष आहे, पराक्रमाची शर्थ आहे अन‌् शौर्यही आहे. कडवी, अटीतटीची नि निकराची झुंजसुद्धा आहे. खेळात पराजयाच्या उंबरठ्यावर येऊनही जिंकण्याची उर्मी आहे. पराजयातही प्रेक्षकांचे मनोविश्व जिंकण्याची किमया आहे. म्हणूनच खेळ म्हणजे संस्कृती, परंपरा, एकात्मता, समानता, दिलदारपणा, खिलाडूवृत्ती, राष्ट्राभिमान अन‌् ती आहे मूर्तिमंत सभ्यता..

एकेकाळी क्रिकेटमधील युद्ध म्हणूनच भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांकडे पाहिले जात होते. क्रिकेटमधली हार-जीत ही थेट देशप्रेमाच्या भावनेशी जोडली गेली होती. त्यातच पाकच्या वाढत्या दहशतवादी कारवायांमुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंना भारताच्या भूमीत पाय ठेवू न देण्याची राजकीय सिंहगर्जना प्रत्यक्षात उतरविण्यात आली होती. त्यामुळे जिंकू किंवा मरू या इर्ष्येने खेळणाऱ्या खेळाडूंचाच नव्हे, तर त्यांच्या चाहत्यांचाही पुरता हिरमोड झाला होता. या पार्श्वभूमीवर साक्षात गुजरातच्या अहमदाबादेतील मोदी स्टेडियममध्येच भारत-पाक सामना खेळविण्याची केंद्रीय सत्ताधाऱ्यांची राजकीय इच्छाशक्ती फलद्रूप झाली. खरेतर, पूर्वीसारखी कट्टरता, कटुता आता ना खेळाडूंमध्ये उरली आहे ना प्रेक्षकांमध्ये. खेळ हा गुणवत्तेच्या, बुद्धिचातुर्याच्या कसोटीवर खेळला जायला हवा. तसाच तो खेळाडू व प्रेक्षकांच्या माध्यमातूनही उत्स्फूर्तपणे, समंजसपणे व्यक्त होऊन खेळाची उंची वाढविणारा हवा, असे मानणारा मोठा वर्ग आहे. अलीकडच्या काळात खेळातील खिलाडूवृत्ती व संवेदनशीलता अनेक प्रकरणांतून दिसून आली आहे. खेळाने जात, धर्म, पंथ, प्रांत, वर्ण अन‌् देशाच्या सीमा ओलांडल्या आहेत. त्यातूनच परस्परांविषयीचा आदर, मानसन्मान वाढला आहे. सहिष्णुता वाढली आहे. म्हणूनच पाकिस्तानचा कर्णधार बाबर हा भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याच्याकडून बॅटिंगच्या टिप्स घेताना दिसतो आणि पाकिस्तानचा एकेकाळचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम हासुद्धा भारतीय नवोदित गोलंदाजांना मार्गदर्शन करताना आढळतो. अशाप्रकारे शत्रू राष्ट्रांच्या क्रिकेट संघाविषयीचा दृष्टिकोन बदलू लागला आहे व कलूषित वातावरण हळूहळू निवळू लागले आहे. परस्परांविषयीची द्वेषभावना, असंवेदनशीलता, अखिलाडूवृत्ती लोप पावत चालली आहे. यात पूर्वग्रहदूषित राजकारण हरले आहे आणि खेळ, खिलाडूवृत्ती जिंकली आहे..

मागील पंधरा वर्षांत भारतीय खेळाचा दर्जा उंचावत चालला आहे. त्यात केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाने प्रथमच ‘खेलो इंडिया’अंतर्गत विविध उपक्रमांचे मोलाचे योगदान दिले आहे. देशभरातील गुणी खेळाडूंना विशेषत: महिला खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांना विविध क्रीडाप्रकारात अधिकाधिक संख्येने सहभागी करून घेण्याचाही मुख्य उद्देश तडीस नेण्याचा प्रयत्न चालविला आहे. देशात एक हजार क्रीडा केंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट आखण्यात आले असून त्याचा भारतीय क्रीडा प्राधिकरणाला चांगलाच उपयोग होणे अपेक्षित आहे. स्टेडियमसाठी पायाभूत सेवासुविधा पुरविणे, खेळाडूंना सराव, प्रशिक्षणासाठी पुरेशी साधनसामग्री उपलब्ध करणे, उच्च शिक्षित गुणीजनांकडे क्रीडा संघटना सोपविणे यावर केंद्र सरकारने भर देण्याचे ठरविले आहे. या साऱ्याचा एकत्रित व सकारात्मक परिणाम म्हणजे, आशियायी स्पर्धांमध्ये यंदा प्रथमच भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवून भारताची मान उंचावली आहे. एकीकडे खेळ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. दुसरीकडे केंद्रीय क्रीडा निधी पुरविण्यात पक्षपात, राजकारण झाल्याचे आरोप होऊ लागले आहेत. खेलो इंडिया अंतर्गत केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या ज्या प्रभावशाली राज्याला सर्वाधिक निधी मिळाला, त्या राज्याला आशियायी स्पर्धेत एकही पदक मिळविता आलेले नाही. उलट, ज्या राज्यांना केंद्र सरकारचा सर्वात कमी निधी मिळाला, त्या राज्यांनी या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी बजावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. हे निधी वाटपाचे स्वार्थी, पक्षपाती व संकुचित राजकारण, जे देशाच्या क्रीडा विकासाच्या आड येत आहे व त्यात खेळाडूंची गुणवत्ता मार खात आहे..

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील एक बाहुबली व्यक्तिमत्त्व. ते सहावेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा गोंडा, बलरामपूर व कैरसगंज या तीन लोकसभा मतदारसंघावर विशेष प्रभाव आहे. त्यांच्या अनेक शाळा, कॉलेज, हॉटेल, हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे त्यांचा राजकीय दबदबा वाढलेला आहे. उत्तर प्रदेशातील ते बडे राजकीय प्रस्थ बनले आहे. बृजभूषण यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असली तरी बहुसंख्य गुन्ह्यांमधून ते पुराव्याअभावी निर्दोष सुटले आहेत, हे विशेष. अलीकडे त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप होऊनसुद्धा त्यांच्या केसालाही धक्का लागलेला नाही. त्यामुळेच बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारतातील लोकप्रिय कुस्तीपटूंनी नववर्षाच्या प्रारंभी नवी दिल्लीत आंदोलन केले. हे आंदोलनसुद्धा पोलिसी बळाचा वापर करून अक्षरश: मोडून काढण्यात आले. या आंदोलनाच्यावेळी कुस्तीपटूंनी आपल्या शोषणाच्या करुण कहाण्या जनतेसमोर मांडल्या. त्या ऐकून सत्ताधाऱ्यांपैकी कुणाच्याही हृदयाला पाझर फुटला नाही. उलट, बाहुबली बृजभूषण यांचे राजकीय उपद्रवमूल्य लक्षात घेऊन कुणीही त्यांच्या वाटेला जाण्याची हिंमत केली नाही. मुख्य म्हणजे कुस्तीपटूंच्या आंदोलनाची केंद्र सरकारलाही गांभीर्याने दखल घ्यावीशी वाटली नाही. त्यात केंद्र सरकारला आपल्याच ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ वचनाचाही सोयीस्कर विसर पडला. पोलिसी बळावर दिल्लीतील कुस्तीपटूंचे आंदोलन मोडून काढण्याची केंद्र सरकारची कृतीही अखिलाडूवृत्तीच दाखवून देणारी होती. मागील आठवड्यात भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक झाली. या निवडणुकीत बृजभूषण यांचे बगलबच्चे संजय सिंह यांची सरशी झाली. त्यांनी आपल्या गुरूच्याच पावलावर पाऊल टाकीत कुस्तीपटूंसह कुणालाच विश्वासात न घेता आपले मित्र बृजभूषण यांचेच प्रभाव क्षेत्र असलेल्या उत्तर प्रदेशातील गोंडा येथे कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेचे परस्पर आयोजन करण्याचा घाट घातला. संजय सिंह हे बृजभूषण यांच्याच प्रभावाखाली काम करीत असल्याचे लक्षात येताच, जगभरात भारताचा नावलौकिक वाढविणारे कुस्तीपटू अधिकच संतप्त झाले. या दंडेलशाहीच्या निषेधार्थ भारताची एकमेव ऑलिम्पिक कुस्ती पदकविजेती व हरयाणाची ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानाची ब्रॅण्ड ॲम्बेसिडर साक्षी मलिक हिने निवृत्ती जाहीर केली. ऑलिम्पिक पदकविजेता बजरंग पुनिया याने पद्मश्री पुरस्कार सरकारला परत केला. कुस्तीपटू वीरेंद्र सिंह यांनीही पद्मश्री परत करण्याची घोषणा केली. कुस्तीपटू विनेश फोगाट हिनेही मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले. या वादाला पुन्हा गंभीर वळण लागण्याची चिन्हे दिसू लागताच, केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने आता भारतीय कुस्ती महासंघाची नवी कार्यकारिणीच निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी कुस्तीतून संन्यास घेण्याची घोषणा केली असून आगामी लोकसभा निवडणुकीकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. त्यांचे चेले संजय सिंह यांनी वाराणसीत ‘मर्सिडीज रोड शो’ आयोजित करून आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. यावरून आगामी काळात देशातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. मुळात, बृजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप होऊनही त्यांच्यावर वेळीच कारवाई करण्याबाबत केंद्र सरकारने चालढकल केली. त्यातून देशभरातील खेळाडूंमध्ये चुकीचा संदेश जाऊन दिल्लीतील कुस्तीपटूंचे आंदोलन चिघळले आहे. या गलिच्छ व असभ्य राजकारणाने खेळाची पत, इभ्रत मातीमोल करून सभ्यतेलाच गालबोट लावले आहे. त्यात खेळ व खेळाडूंच्या कारकीर्दीचीच माती होत आहे..

prakashrsawant@gmail.com

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in