दिवाळी भेट!

रवा, चणा डाळ, साखर आणि पाम तेल या चार वस्तू गरीबांसाठी अवघ्या १०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
दिवाळी भेट!

महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्या सरकारला येत्या ८ ऑक्टोबर या दिवशी १०० दिवस पूर्ण होत आहेत. या कालावधीत राज्य सरकारने अनेक निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. राज्यातील गरीब जनतेची दिवाळी आनंदात, गोडधोड खाऊन साजरी व्हावी या हेतूने राज्य सरकारने असाच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंपैकी रवा, चणा डाळ, साखर आणि पाम तेल या चार वस्तू गरीबांसाठी अवघ्या १०० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या चार वस्तूंचा संच दिवाळी भेट म्हणून सरकारकडून दिला जाणार आहे. रवा, चणा डाळ आणि साखर प्रत्येकी एक किलो आणि पाम तेल एक लिटर अशा स्वरुपात ही दिवाळी भेट असणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येणाऱ्या अंत्योदय आणि अन्य योजनांमधील शिधापत्रिकाधारकांना हा शिधा संच देण्यात येणार आहे. राज्यातील एक कोटी ७० लाख शिधापत्रिकाधारकांना म्हणजे सात कोटी नागरिकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सरकारच्या या दिवाळी भेट शिधा संचाचा लाभ एक महिन्याच्या कालावधीतच घेता येणार आहे. एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात न्यायालयीन लढाई सुरु आहे. तसेच खरी शिवसेना कोणती, धनुष्यबाण हे चिन्ह नेमके कोणाचे, याबाबत निर्णय होणे बाकी असताना, त्याची विशेष चिंता न करता शिंदे गट आणि भाजप यांच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. शिंदे सरकार सत्तेवर येऊन सव्वा तीन महिने होत आहेत. या सरकारने मुंबई महानगर कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा केली. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना, बेस्टच्या २९००० कर्मचाऱ्यांना आणि हजारो शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ होणार आहे. किमान २२, ५०० रुपये बोनस देण्याची घोषणा सरकारने केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत हे लक्षात घेऊन त्या निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा पुन्हा फडकता कामा नये, या हेतूने महापालिका क्षेत्रातील मतदारांच्या मोठ्या गटास आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न या निर्णयामागे असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे प्रश्न भेडसावत आहेत त्यामध्ये आपण प्राधान्याने लक्ष घालू, पण त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांनी मुंबईच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच केले आहे. गेल्याच आठवड्यात शेतकरी वर्गासाठी ७५५ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळीय उपसमितीने केली. या पॅकेजचा लाभ राज्यातील पाच लाख शेतकऱ्यांना होणार आहे. पावसामुळे पिकांचे जे नुकसान झाले त्यासंदर्भात नुकसान भरपाईचे निकष पूर्ण करू न शकलेल्या शेतकऱ्यांना या पॅकेज अंतर्गत मदत दिली जाणार आहे. या आधी राज्यातील ३० लाख शेतकऱ्यांना जी ३,९५४ कोटींची मदत देण्यात आली होती त्याच्या व्यतिरिक्त हे विशेष पॅकेज आहे. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या बीडीडी चाळींमध्ये पोलिसांसाठी अवघ्या १५ लाखांमध्ये ५०० चौरस फुटाचे घर देण्याचेही सरकारने घोषित केले आहे. शिंदे सरकारने सत्तेवर येताच पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला होता. शिंदे गट आणि भाजप सरकारने आपल्या अल्प काळात जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन आपले सरकार जनतेची काळजी घेणारे आहे हे दाखवून दिले आहे. सत्तेवर आल्यानंतर शिंदे - फडणवीस यांच्या सरकारवर महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून टीका केली जात आहे . सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यात आल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले. प्रचंड आमिषे दाखवून आमदारांना आपल्याकडे वळविण्यात आले, असे आरोप शिंदे गटावर करण्यात आले. विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देत असतानाच राज्याच्या हिताचे निर्णय घेऊन आपले सरकार हे कल्याणकारी सरकार असल्याचे या सरकारने दाखवून दिले आहे. सरकारचे भवितव्य काय असेल, न्यायालय काय निर्णय देईल, निवडणूक आयोग काय भूमिका घेईल याची विशेष चिंता न करता सरकार कामाला लागले आहे, असे या सरकारने जे निर्णय घेतले त्यावरून दिसून येत आहे. राज्यातील गरीब जनतेला अवघ्या १०० रुपयात शिधा संच देऊन जी ‘दिवाळी भेट’ दिली आहे त्यामुळे गरीब जनता सरकारला दुवा दिल्यावाचून राहणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in