नैतिकतेचं बीज रुजवणारा...दो बीघा जमीन

१६ जानेवारीला या चित्रपटाला ७१ वर्षे पूर्ण होतील, पण इतक्या वर्षांनंतरही ‘दो बीघा जमीन’ची लोकप्रियता वादातीत आहे.
नैतिकतेचं बीज रुजवणारा...दो बीघा जमीन

-प्रिया भोसले

प्रासंगिक

१९५४ साली फिल्मफेअरच्या पुरस्काराची सुरुवात झाली. स्वतंत्र भारतात पहिल्या फिल्मफेअर पुरस्काराचा जो चित्रपट मानकरी ठरला होता त्याच्या दिग्दर्शकाने चित्रपटावर समीक्षकांनी केलेल्या टीकेमुळे समारंभाला जायला स्पष्ट नकार दिला. हा तोच चित्रपट होता जो तिकीटबारीवर सपशेल अयशस्वी ठरला, तरी भविष्यात येणाऱ्या हिंदी चित्रपटांसाठी नैतिकतेचं मापदंड आखणारा म्हणून त्याच्याकडे सिनेसृष्टी बघणार होती. तो चित्रपट होता ‘दो बीघा जमीन’. आज दिनांक १६ जानेवारीला या चित्रपटाला ७१ वर्षे पूर्ण होतील, पण इतक्या वर्षांनंतरही ‘दो बीघा जमीन’ची लोकप्रियता वादातीत आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीवर नेहमीच बंगाली दिग्दर्शकांचा प्रभाव राहिलाय. आपल्या कलाकृतीतून सामाजिक भान जपणारे मृणाल सेन असो किंवा बिमल राय. बंगालने नेहमीच बेशकिमती हिरे हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेत. जेव्हा मृणाल सेन बंगाली भाषेत समांतर सिनेमांची निर्मिती करत होते त्याचदरम्यान बिमल राॅयही इटालियन चित्रपट ‘बायसिकल थीव्हज’पासून प्रेरित होऊन व्यावसायिक आणि समांतर चित्रपटांचा मेळ घालून ‘दो बीघा जमीन’सारख्या चित्रपटांची निर्मिती करत होते. चित्रपटाची कथा संगीतकार सलील चौधरी यांची, पटकथा हृषिकेश मुखर्जी यांची, तर रवींद्रनाथ टागोर यांच्या बांग्ला कविता ‘दुई बीघा जोमी’वरून सिनेमाचं शिर्षक घेतलं गेलं. १९५३ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट तिकीटबारीवर अयशस्वी ठरला. तरीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.

स्वातंत्र्यानंतरची स्थिरस्थावर होऊ पाहणारी भारतातील आर्थिक परिस्थिती. देशातील शेतकऱ्याचं आपल्या जमिनीप्रति असणारं प्रेम, जिव्हाळा आणि त्याच प्रेमापायी त्याचं आणि कुटुंबाचं देशोधडीला लागणं, बिमलदांनी ‘दो बीघा जमीन’मध्ये फार प्रभावीपणे दाखवलं. भारत देश कृषिप्रधान म्हणून प्रसिद्ध असला तरी शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचं वास्तव नजरेआड करू शकत नाही. गावात मिल बांधण्यात अडसर ठरलेल्या गरीब शेतकऱ्याच्या जमिनीचा सौदा न होऊ शकल्यामुळे कर्जाची रक्कम फुगवून सांगत कर्जवसुलीसाठी जमीन गिळंकृत करणारा सावकार आणि आपल्या दो बीघा जमिनीला वाचवण्यासाठी शहरात येऊन मोलमजुरी करून, रक्ताचं पाणी करूनही वाचवू न शकलेल्या शेतकऱ्याची कथा ‘दो बीघा जमीन’मध्ये दिसते. शोषण करणाऱ्या उच्च वर्गाकडून निम्न वर्गाची पिळवणूक नवी नाही. अशिक्षित गरीब लोकांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिजोऱ्या भरणारे सावकार हे प्रत्येक गावाचं चित्र आहेच. दो बीघा जमीन हेच वास्तव जळजळीतपणे मांडतो. सोबत, संकटे कितीही आली तरी कष्टाला, प्रामाणिकपणाला आणि सचोटीला पर्याय नाही यासारखा संदेशही हा चित्रपट देतो.

कष्टाळू, मेहनती शंभू माथो शेतकऱ्याची कष्ट करण्याची सवय त्याच्या इतकी नसनसांत भिनलीय की शहरात जाऊनही तो चुकीच्या मार्गाने पैसा कमवत नाही किंवा परिस्थितीपायी मुलाने चोरी करून आणलेला पैसा स्वीकारत नाही. “खून बहा बहा कर पैसे जमा किये है अब उसी पैसे से खुन खरीदना पडेगा” म्हणतो तेव्हा त्याची हतबलता मनाला भिडते. ज्या जमिनीसाठी रक्त आटवून पैसे जमवले तेच पैसे बायकोला वाचवण्यासाठी रक्त विकत घेण्यासाठी वापरतो, पण चोरीच्या पैशाला हात लावत नाही. हीच नैतिकता पुढे कित्येक सिनेमात दिसू लागली. म्हणूनच ‘दो बीघा जमीन’ला सिनेसृष्टीत नवीन पठडीच्या चित्रपट विश्वात नेणारा चित्रपट म्हणून ओळखले जाते.

या चित्रपटासाठी अभिनेता बलराज सहानी यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. उपाशी राहत, अनवाणी पायाने रिक्षा ओढत ते भूमिकेशी खऱ्या अर्थाने एकरूप झाले होते. इतके की कधी ज्या कपड्यांवर सिनेमाचं शूटिंग चालायचं तेच कपडे घालून ते कधी हाॅटेलवर परतत, तर कधी सिगारेट पिण्यासाठी एखाद्या दुकानात जात. कपड्यांवरून जोखणाऱ्या माणसांच्या दुनियेत त्यांना अपमानास्पद वागणूकही वाट्याला आली.

काही काळापुरतं गरीबाचं अवहेलना झेलणारं त्रासदायक आयुष्य अनुभवल्यानंतर तो खरेपणा त्यांच्या अभिनयातही उतरला. अभिनेत्री निरुपा राॅयना काही हृदयद्रावक दृश्यांमुळे अश्रूंसाठी ग्लिसरीन लावायची गरज पडली नाही, अशा कसदार अभिनयाने सजलेल्या, उत्तम दिग्दर्शन आणि धरती कहे पुकार के, आजा रि आ निंदिया तू, अजब तोरी दुनिया यांसारखी श्रवणीय गाणी लाभलेल्या चित्रपटाला अपेक्षित यश मिळालं नाही. परंतु १९५४ साली सुरू झालेल्या फिल्मफेअर अवाॅर्डने ‘दो बीघा जमीन’ला सर्वोकृष्ट चित्रपट आणि सर्वोकृष्ट दिग्दर्शक असे दोन पुरस्कार देऊन सन्मानित केले. फिल्मफेअरचा पुरस्कार पटकावणारा हा पहिला चित्रपट ठरला तसेच कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये स्वातंत्र्यानंतरचा पुरस्कार मिळणाराही हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

जमिनीला आई समजून तिची पूजा करणाऱ्या शेतकऱ्याचा आधार काढून घेतला जात असेल तरी त्याचं शेवटच्या श्वासापर्यंत तिला वाचवण्याचा लढा लढण्याची ताकद असलेला शेतकरी बघताना आजच्या भारतातला आत्महत्या करणारा शेतकरी आठवतो. बलराज साहनीच्या शंभू माथो भूमिकेसाठी प्रेरणा देणारा एक खराखुरा शेतकरी होता जो आपली जमीन वाचवण्यासाठी १५ वर्षे मानवी रिक्षा ओढण्याचं काम करत होता. आयुष्य कितीही परीक्षा घेत असलं तरी हार न मानता आपल्यापरीने त्याच्यावर मात करत जगणं हे महत्त्वाचं अधोरेखित करणारा दो बीघा जमीन म्हणूनच आजही सिनेमाच्या इतिहासात मानाचं स्थान पटकावून आहे.

भारतासारख्या कृषिप्रधान देशातील ७०% लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून असूनही सरकारी अनास्था, कर्जाचा बोजा, शेतकरीविरोधी कायदे, अनुदानातील भ्रष्टाचार, पीक अपयश, मानसिक आरोग्य, वैयक्तिक समस्या आणि कौटुंबिक समस्या यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना दिसतं. जोवर ही व्यवस्था आहे तोवर पिळवणूक होणार. मग जगण्याचा संघर्षही ठरलेला आहे आणि म्हणूनच ‘दो बीघा जमीन’सारखे चित्रपट कधीच कालबाह्य होऊ शकत नाही.

logo
marathi.freepressjournal.in