धमक्यांची भाषा नको

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृतपणा शिकविला, याची आठवण करून देऊन, त्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा ही भाषा केली जाते
धमक्यांची भाषा नको

महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. पण सार्वजनिक जीवनात आपला व्यवहार कसा असावा, काय बोलावे, काय बोलायला नको असे जे विविध संस्कार या महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक नेत्यांवर पूर्वसूरींनी केले ते संस्कार विद्यमान राजकारणी विसरत तर चालले नाहीत ना, असे वाटण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृतपणा शिकविला, याची आठवण करून देऊन, त्या महाराष्ट्रात तोडा, फोडा, मारा ही भाषा केली जाते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपला हे पटते का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. खरे म्हणजे लोकशाही शासन व्यवस्थेत अशा प्रकारची भाषा कोणीही करता कामा नये. धमक्या देणाऱ्या, मारहाण करणाऱ्या आमदारांचे समर्थन करणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्पष्ट केले आहे. तसेच असे वर्तन करणाऱ्या आमदारांची चौकशी करून त्यात दोषी आढळल्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषित केले आहे. पण अलीकडील काळात राजकीय वर्तुळात काही नेत्यांकडून ‘अरे’ ला ‘का रे’ करण्याची भाषा वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. शिंदे - फडणवीस यांच्या सरकारचे समर्थक आमदार संघर्षाची भाषा करून कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी केलेले बंड आणि आघाडी सरकार कोसळण्याच्या अवस्थेत असताना महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या काही नेत्यांनी जी भाषा वापरली होती त्यावेळी अजित पवार यांना सुसंस्कृतपणा आठवला नाही का? शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख ‘आत्मा नसलेली जिवंत प्रेते’ असा केला होता. त्यानंतर त्यांनी सारवासारव केली होती. शिवसेनेचे नेते आणि तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला होता. कोणी ‘डुकरे’ असा उल्लेख केला होता. कोणी महिलांच्या बाबत असभ्य भाषा वापरली होती. कोणी कामाख्या देवीस बळी देण्यासाठी ४० रेडे पाठविले असल्याची भाषा वापरली होती. त्यावेळी अशी भाषा वापरणाऱ्या नेत्यांना सुसंस्कृतपणाचे वळसे पाजण्याचा प्रयत्न अजित पवार किंवा या महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी का केला नाही? का हा सर्व, शिवसेनेचा पक्षांतर्गत मामला असल्याचे समजून मौन बाळगणे त्यांनी पसंत केले? तसेच आपल्या हाती सत्ता असताना सत्तेतील काही नेत्यांकडून विरोधकांबाबत कशी भाषा वापरली जात होती हे अजित पवार यांना माहीत नाही का? सध्याचे विरोधक सोयीस्करपणे भूतकाळातील आपली वक्तव्ये कशी काय विसरतात? अन्य एका संदर्भात, विरोधकांना ‘गझनी’ची लागण झाली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटले आहे त्यात चुकीचे काय? सत्तेवर असलेल्या काहींना सत्तेची मस्ती आली आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी अशा मस्तीखोरांवर टीका केली आहे. पण महाविकास आघाडीचे सरकार असताना काही जणांकडून असे वर्तन घडले, हे अजित पवार विसरून गेले की काय? लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असोत त्यांच्याकडून लोकशाही संकेतांनुसारच व्यवहार व्हायला हवा. त्या संकेतांचे उल्लंघन करणाऱ्यास दयामाया न दाखविता शासन व्हायला हवे. त्यामुळे शिंदे - फडणवीस सरकारच्या समर्थक आमदारांकडून धमक्या देण्याचे किंवा मारहाण करण्याचे प्रकार घडले असतील तर त्याची सखोल चौकशी करून त्यानुसार शासन व्हायला हवे. काही आमदार महाराष्ट्रात संघर्ष पेटविण्याची भाषा करून कायदा - व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत, असे अजित पवार म्हणाले आहेत. पण अशी परिस्थिती निर्माणच होणार नाही हे शिंदे - फडणवीस सरकार पाहील ना! कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकडे गृहखात्याची जबाबदारी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्कीच लक्ष देतील! लोकप्रतिनिधींनी लोकशाही व्यवस्थेला गालबोट लागेल असे वर्तन करता कामा नये आणि कोणीही अशा वर्तनाचे कदापि समर्थन करता कामा नये. पण अशा राजकीय हेवेदाव्यांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे लक्ष देण्याकडे हेळसांड होत नाही ना, याचाही गंभीरपणे विचार राजकारण्यांनी करायला हवा. ज्या जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले त्यांचे विस्मरण होणे यापैकी कोणालाच परवडणारे नाही!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in