'कर' नाही तिला...!

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी आणि ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ (‘टोरी’ किंवा ‘हुजूर’) पक्षाच्या अध्यक्षपदी लिझ ट्रस यांची निवड झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले
'कर' नाही तिला...!

ब्रिटनच्या आर्थिक टंचाईच्या काळात नागरिकांसाठी ‘कर आकारणी’ हा महत्त्वाचा मुद्दा होता. ऋषी सुनक यांच्या धोरणांमुळे त्यांच्यावर अधिक भार पडणार होता. याउलट लिझ ट्रस यांनी कर कमी करण्याचे आश्वासन देऊन मतदारांना आपलेसे करण्याचा सोपा मार्ग अनुसरला होता. आपल्याकडे म्हण आहे – ‘कर नाही त्याला डर कशाला?’ त्याचा संदर्भ वेगळा आहे. पण त्यात काहीसा बदल करून ‘कर’ नाही ‘तिला’ डर कशाला, असे म्हटले तर लिझ ट्रस यांच्या विजयाचे गमक समजू शकते.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी आणि ‘कॉन्झर्व्हेटिव्ह’ (‘टोरी’ किंवा ‘हुजूर’) पक्षाच्या अध्यक्षपदी लिझ ट्रस यांची निवड झाल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मूळ भारतीय वंशाचे आणि भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई असलेले ऋषी सुनक यांचा त्यांनी पराभव केला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुनक यांचे नाव मुख्य स्पर्धक म्हणून पुढे आल्यानंतर समस्त भारतीयांच्या आनंदाला उधाण आले होते. ज्या ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्या देशात पंतप्रधानपदी आता एक मूळ भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान होणार, या आशेने भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. मात्र, शेवटी सुनक हे ट्रस यांच्याकडून पराभूत झाल्याने भारतीयांचा हा उत्साह मावळलेला दिसत आहे.

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फेब्रुवारीत राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपद आणि पक्षाचे नेतेपद यासाठी निवडणूक झाली. ती प्रक्रिया साधारण दोन महिन्यांहून अधिक काळ चालली. त्यात ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आणि माजी परराष्ट्रमंत्री लिझ ट्रस हे आघाडीचे उमेदवार म्हणून समोरासमोर आले. पक्षांतर्गत नेतृत्व निवडीची प्रक्रिया बरीच दीर्घकाळ चालली. त्यात अंतर्गत मतदान, उमेदवारांच्या जाहीर चर्चा अशा अनेक फेऱ्या पार पडल्या. सुरुवातीला सुनक हे काहीसे आघाडीवर असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, पुढील टप्प्यांत ट्रस यांनी आघाडी घेतली आणि अंतिम बाजी मारली.

ब्रिटनमधील या निवडणुकीत अनेक मुद्दे महत्त्वाचे होते. रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियाकडून युरोपला होणारा इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्येही इंधनाचा चांगलाच तुटवडा जाणवत आहे. इंधनाचे भाव खूप वाढल्यामुळे देशाचा त्यावरील खर्चही वाढला आहे. आधीच डबघाईला आलेल्या ब्रिटनसाठी हे संकट दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखेच होते. ‘ब्रेक्झिट’पासून ब्रिटनमागे लागलेले शुक्लकाष्ठ सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यानंतरच्या दोन वर्षांत कोरोनाने अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम केला आहे. उदयोगधंदे, व्यापार-उदीम थंडावला आहे. महागाई आणि चलनवाढीचे संकट उभे आहे. अनेक नागरिकांनी रोजगार गमावलेले आहेत. उरलेल्या अनेकांचे उत्पन्न घटले आहे. सरकार आणि नागरिक अशा दोघांचीही खर्च करण्याची शक्ती घटली आहे. अशा बिकट काळात देशाची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी आपण पात्र आहोत, हे मतदारांना पटवून देण्याचे मोठे आव्हान ट्रस आणि सुनक या दोघांपुढेही उभे होते.

हे आव्हान पेलण्यासाठी योजण्याच्या उपायांबाबत मात्र दोघांमध्ये मतभिन्नता होती. सुनक यांच्या मते त्यांनी पूर्वी देशाचे अर्थमंत्रीपद भूषवले असल्याने ते या कामासाठी अधिक लायक उमेदवार होते. त्यांचे धोरण नागरिकांकडून अधिक कर वसूल करण्याचे होते. तर ट्रस यांनी त्यांच्या उलट, म्हणजे नागरिकांवरील करांचा बोजा कमी करण्याची भूमिका घेतली होती. एकंदर निवडणूक प्रक्रिया ‘कर आकारणी’ या एका महत्त्वाच्या मुद्द्याभोवती फिरत होती. आणि त्या बाबतीच मतदारांना आश्वासित करण्यात ट्रस यांनी बाजी मारलेली दिसते.

सुनक यांच्या विरोधात अनेक मुद्दे काम करत होते. ते मूळ भारतीय वंशाचे असल्याचा भारतीयांना अभिमान असला तरी ब्रिटनमध्ये ही बाब त्यांच्या काहीशा विरोधात जाणारी होती. सुनक यांच्या ब्रिटनवरील निष्ठेवरच शंका उपस्थित करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही सुनक यांनी त्यांच्या अमेरिकी ‘ग्रीनकार्ड’चा त्याग केला नव्हता. यावरून ब्रिटनमध्ये वाद निर्माण झाल्यावर त्यांनी ही सुविधा सोडली. पण त्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेली शंका पुरती पुसली गेली नव्हती.

भारतीय उद्योगपती आणि ‘इन्फोसिस’ या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ऋषी सुनक हे जावई होत. मूर्ती यांची कन्या अक्षता हिचे ते पती आहेत. त्यांची ही श्रीमंतीदेखील मतदारांच्या डोळ्यांवर आली. ब्रिटनचे सामान्य नागरिक आर्थिक अभावग्रस्त जीवन जगत असताना सुनक यांचा बडेजाव लोकांच्या चांगलाच नजरेत भरला आणि तो नकारात्मक चर्चेचा मुद्दा बनला. ब्रिटिश महाराणी दुसरी एलिझाबेथ यांच्यापेक्षा सुनक दांपत्य श्रीमंत आहे, ही बाब चर्चेत आली. ऋषी सुनक यांच्या श्रीमंतीचे मूळ अक्षता यांच्याशी त्यांच्या विवाहात आहे. ‘इन्फोसिस’ या कंपनीचे साधारण एक टक्का (०.९३ टक्के, म्हणजे साधारण ७९४ दशलक्ष डॉलर किंमतीचे) ‘शेअर्स’ (समभाग) अक्षता यांच्या मालकीचे आहेत. त्यांच्या वार्षिक लाभांशातून (डिव्हिडंड) त्यांना लाखो डॉलरचे उत्पन्न मिळते. यातून त्यांना गतवर्षी १५.१ दशलक्ष डॉलरचे उत्पन्न मिळाले होते. परदेशातून मिळणारे संपूर्ण उत्पन्न जाहीर केले नाही आणि त्या उत्पन्नावरील सर्व कर अक्षता यांनी ब्रिटनमध्ये भरला नाही, अशी तक्रार करण्यात आली. त्यानंतर सुनक दांपत्याने वाढीव कर भरल्याचे जाहीर केले.

तसेच, सुनक यांनी त्यांच्या मूळ करविषयक धोरणात बदल करून नागरिकांना काहीसा दिलासा देण्याचे जाहीर केले. सुरुवातीला आपला भर महागाई आणि चलनवाढ नियंत्रित करण्यावर राहील. त्यानंतर कर आकारणीत थोडी सवलत देण्यात येईल, असे सुनक यांनी जाहीर केले. मात्र, तोपर्यंत मतदारांच्या मनांत सुनक यांच्याविषयी किंतु निर्माण झाला होता. व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. यानंतर सुनक हे निवडणूक प्रक्रियेत ट्रस यांच्या मागे पडत गेले. त्याचा ट्रस यांना पुरेपूर लाभ झाला. इतके होऊनही सुनक यांच्या सार्वजनिक वर्तनात बदल होत नव्हता. एका कार्यक्रमात त्यांनी वापरलेल्या महागड्या जोड्यांची चर्चा झाली. सुनक यांनी ५९५ डॉलर किंमतीचे ‘प्राडा’ कंपनीचे बूट परिधान केले होते. तर सर्व ब्रिटनमधील जनता उष्णतेच्या लाटा सहन करत असताना सुनक मात्र हजारो डॉलर खर्च करून अलिशान पोहण्याच्या तलावात जिवाला गारवा अनुभवत होते. नॉर्थ यॉर्कशायर येथील प्रशस्त बंगल्यात घालवलेल्या सुटीवर त्यांनी ४ लाख ८० हजार डॉलर खर्च केल्याची चर्चा होती. अशा प्रसंगामधून सामान्य मतदारांपासून सुनक दुरावत गेले. लोकांना ते उच्चभ्रू वर्गाचे प्रतिनिधी वाटू लागले. याऊलट, ट्रस यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि वर्तन मतदारांना अधिक जवळचे आणि आपलेसे वाटू लागले. त्यांची ‘लिबरल डेमोक्रॅटिक’ प्रतिमा अधिक उजळून दिसू लागली .

आर्थिक टंचाईच्या काळात नागरिकांसाठी ‘कर आकारणी’ हा महत्त्वाचा मुद्दा होता. सुनक यांच्या धोरणांमुळे त्यांच्यावर अधिक भार पडणार होता. याऊलट ट्रस यांनी कर कमी करण्याचे आश्वासन देऊन मतदारांना आपलेसे करण्याचा सोपा मार्ग अनुसरला होता. आपल्याकडे म्हण आहे – ‘कर नाही त्याला डर कशाला?’ त्याचा संदर्भ वेगळा आहे. पण त्यात काहीसा बदल करून ‘कर’ नाही ‘तिला’ डर कशाला, असे म्हटले तर लिझ ट्रस यांच्या विजयाचे गमक समजू शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in