विधिमंडळाकडून मनोरंजनाची अपेक्षा नको !

दिवसा उजेडी किंवा रात्रीच्या अंधारात आपण केलेल्या भल्याबु-या कृत्यांची कबुली निःसंकोचपणे द्यावी
विधिमंडळाकडून मनोरंजनाची अपेक्षा नको !

विधिमंडळ हे लोकांचे प्रश्न मांडण्याचे, त्यांची सोडवणूक करून घेण्याचे ठिकाण आहे. परंतु अलीकडे लोकांच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. लोकांना विधिमंडळाकडून प्रश्नांची सोडवणूक नव्हे, तर मनोरंजन हवे आहे. लोकप्रतिनिधींनी तिथे जाऊन प्रश्न मांडावेत, सत्ताधा-यांना धारेवर धरून सामान्य माणसांची सोडवणूक करून घ्यावी असे लोकांना अजिबात वाटत नाही. तिथे जाऊन खटकेबाज भाषणे करावीत. शेरोशायरी करावी. हातवारे करावेत. विरोधकांना टोमणे मारावेत. चिमटे काढावेत. बोचकारावे. दिवसा उजेडी किंवा रात्रीच्या अंधारात आपण केलेल्या भल्याबु-या कृत्यांची कबुली निःसंकोचपणे द्यावी. चर्चमधल्या कन्फेशनसारखी. जो अधिक खोटे बोलेल, अधिकाधिक चुकांची कबुली देईल तो सर्वात थोर. सार्वजनिक व्यवहारातील चारित्र्य ही गोष्ट जणू कालबाह्य झाली आहे. जसे विधिमंडळाच्या कामकाजातून फुले-शाहू-आंबेडकरांची नावे हद्दपार झाली आहेत. त्याऐवजी तिथे ठाकरे-दिघेंची नावे आली आहेत. एकनाथ शिंदेंच्या कानात सांगून हळुच तिथे कधीतरी सावरकरांचे नाव जोडले जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना यापैकी कशाचेच काही देणेघेणे नसल्यामुळे त्यांच्यातही उद्या दिघे-ठाकरेंची नावे घेण्याची चढाओढ लागली तरी आश्चर्य वाटायला नको. इथे कार्लाईलचे वाक्य सहजपणे समोर येते – खुज्या माणसांच्या सावल्या लांब पडायला लागल्या की संध्याकाळ जवळ आली असे समजावे.

माध्यमांनी, समाजमाध्यमांनी माणसांच्या मनावर खूप खोलवर परिणाम केले आहेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा बदलायला लागल्या आहेत. दिवसभर शेतात, रानात, रस्त्यावर काबाडकष्ट करणा-या लोकांबद्दल मी बोलत नाही. राजकीय घडामोडींवर अखंड लक्ष ठेवून असणा-या आणि आपण सुजाण नागरिक आहोत, आपण लोकशाहीचे तारणहार आहोत, असे समजणा-या लोकांबद्दल बोलतोय. हेच लोक भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठमोठ्या गप्पा मारत असतात. परंतु आपल्या लोकप्रतिनिधींच्या सार्वजनिक जीवनातल्या व्यवहाराबाबत या लोकांना काहीही वाटत नाही. त्यांच्या अनैतिक वर्तनाबद्दल काही वाटत नाही. उलट त्यांच्या चुकीच्या गोष्टींचेच उदात्तीकरण केले जाते. महाराष्ट्राच्या विधानसभेत विधानसभा अध्यक्ष निवड आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधातील विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी अनेक भाषणे झाली. ही सगळी भाषणे ऐकल्यानंतर आणि या भाषणांसंदर्भातल्या समाजमाध्यमांवरील, जनमानसातील प्रतिक्रिया ऐकल्यानंतर एकूण परिस्थिती काळजी करण्यासारखी असल्याचे लक्षात येते.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांचे बंड आता इतिहासजमा झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाची जेव्हा जेव्हा उजळणी होईल, तेव्हा तेव्हा शरद पवार यांचे १९७८ चे बंड आणि एकनाथ शिंदे यांचे २०२२ चे बंड यांचा उल्लेख नेहमी होत राहील. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बंडाचा विषय मागे पडला आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची त्यांच्याबाबतची भूमिका वेगळी असू शकेल. परंतु संपूर्ण महाराष्ट्राची ती तशीच असायला पाहिजे असे नाही. या बंडात ज्यांनी भाग घेतला, त्या शिवसेनेच्या आमदारांचे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होते, एवढाच यासंदर्भाने भविष्यातला कुतूहलाचा विषय असेल. बाकी विषय संपला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे त्यांचे मूल्यमापन मुख्यमंत्रिपदावरून ते जे काम करतील त्या आधारावर होईल. बंड वगैरे गोष्टी राजकीय इतिहासापुरत्या मर्यादित राहतील.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढेच महत्त्व देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रिपदाला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील, असे जाहीर करतानाच सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हाती असेल, असे सूचित करणा-या फडणवीस यांना सरकारमध्ये दुस-या क्रमांकाच्या पद स्वीकारावे लागते. ज्या फडणवीस यांचे समर्थक ते मोदी यांचे उत्तराधिकारी असल्याची कुजबुज करीत होते, त्याच फडणवीस यांचे अवमूल्यन करून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना राज्यातील दुय्यम पदावर बसवले. फडणवीस यांची गेले काही महिने सुरू असलेल्या समृद्धी एक्सप्रेसला अमित शाह यांनीच ब्रेक लावला आहे. राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याची क्षमता असलेल्या आणखी एका मराठी नेत्याचे पंख कापण्याची खेळी दिल्लीतून केली गेली आहे. पक्षाचा निर्णय शिरसावंद्य मानून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. पक्षाविरुद्ध बंड करणारी, बंडाचे समर्थन करणारी मंडळी फडणवीस यांच्या त्यागाचे पोवाडे गात आहेत, हा विरोधाभासही लक्षात घ्यायला हवा. अवमूल्यन दीर्घकाळसाठी असले तरी नाराजी तात्पुरती असते आणि ती झटकून फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे. त्यांच्या विषयपत्रिकेनुसार ते कामही सुरू करतील. महाविकास आघाडीच्या समर्थकांनी सत्ता गेल्याच्या दुःखापेक्षा फडणवीसांचे अवमूल्यन झाल्याचा आनंद सरस मानण्याचे कारण नाही. फडणवीस पुन्हा कधीही भरारी घेऊ शकतात. यानंतरच्या काळात तुम्हाला सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करणे गरजेचे आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून गृहखाते ही या सरकारची कमकुवत बाजू राहिली. करोना काळात अनिल देशमुख यांनी गृहमंत्री म्हणून उत्तम काम केले. परंतु परमवीर सिंग प्रकरणानंतर सगळेच चित्र बदलून गेले. सरकार महाविकास आघाडीचे असले तरी पोलिसांकडून सगळी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आधी पोहोचत होती. आपापल्या प्यांद्यांची वर्णी लावण्याच्या नादात सरकार कधी एकजीव झाले नाही, परिणामी पोलीस दलात भीषण गँगवॉर बघायला मिळाले. तेच सरकारच्या मुळावर आले. सरकारचे कर्तेधर्ते शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला होण्यापर्यंतची पोलिस दलाची निष्कि्रयता पाहायला मिळाली. यातला उत्कर्षबिंदू कोणता असेल तर एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागहात सांगितलेला. सगळे झोपल्यावर मी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जायचो आणि बाकीचे उठायच्या आधी परत यायचो. सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री आणि विरोधी पक्षनेते मध्यरात्री गाठीभेटी घेत राहतात आणि स्कॉटलंडयार्डशी स्पर्धा करणा-या पोलीस दलाला कानोकान खबर नसते. किंवा खबर असली तरी सरकारमधील नेतृत्वाला त्याबाबत माहिती दिली जात नाही, या निष्कि्रयतेनेच महाविकास आघाडी सरकारला खड्ड्यात घातले.

सरकारपुढे आव्हाने अनेक आहेत. अलीकडच्या काळातील प्रचलित शब्दप्रयोग वापरायचा तर महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार आले आहे. त्याचा परिणाम दिसायला हवा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा उत्साह गेल्या काही दिवसांत ऊतू जायला लागला आहे. केंद्रसरकारने गेल्या अडीच वर्षांत जी अडवणूक केली आणि कोश्यारी यांनी खोडे घातले त्यापैकी कुठलीही अडचण सरकारला येणार नाही. पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करून इंधन दर कमी करण्याची घोषणा नव्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ते किती रुपयांनी कमी होते हे पाहावे लागेल. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असे म्हणायची पाळी लोकांवर येऊ नये. महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून सुसाट धावायला लागेल, अशी हवा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तो खरोखर धावायला हवा. मोदी सरकारप्रमाणे नुसता होर्डिंगवरचा विकास नको. लोकांना तो प्रत्यक्ष अनुभवता यायला हवा. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात समृद्धी महामार्गाचे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे होते तेव्हापासून दोघांचे डबल इंजिन धावते आहे. मधल्या काळात एक इंजिन बाजूला असले तरी, दोन इंजिनांची होते मध्यरात्री भेट.... हे गाणे सुरू होते. आता पुन्हा दोन्ही इंजिन एकत्र आली आहेत. फक्त पुढचे मागे आणि मागचे पुढे झाले आहे. त्यामुळे गतीवर परिणाम होण्याचे कारण नाही. ही गती कशीही राहो. आजच्या काळात महाराष्ट्राचे सामाजिक सौहार्द बिघडणार नाही, एवढीच काळजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतली तरीही एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची इतिहासात नोंद होईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in