मतदानानंतर राजकारणाचा विचार करू नका!

सेनेचा मतदार प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीमुळे आणि बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकेमुळे वाढला. १९८५ नंतर मतदारसंघावर जबर पकड असलेले काँग्रेसनेत्यांचे गड डळमळीत झाले ते यामुळेच. तुम्हालाच शिवसेना नको असेल तर मी तरी काय करू, अशी सेनेची भूमिका आहे.
मतदानानंतर राजकारणाचा विचार करू नका!
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुलुख मैदान

रविकिरण देशमुख

सेनेचा मतदार प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीमुळे आणि बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकेमुळे वाढला. १९८५ नंतर मतदारसंघावर जबर पकड असलेले काँग्रेसनेत्यांचे गड डळमळीत झाले ते यामुळेच. तुम्हालाच शिवसेना नको असेल तर मी तरी काय करू, अशी सेनेची भूमिका आहे.

उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार फुटणार या बातम्यात नाविन्य नव्हते. शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते वाघ म्हणवले जात, त्यामुळेच त्यांच्या फुटाफुटीच्या घडामोडी ‘ऑपरेशन टायगर’ या नावाने चर्चिल्या जात होत्या. हे लेबल कोणी डकवले माहिती नाही पण वाघ दिवसा बेडरपणे समोरून हल्ला करतो. तो अंधारात लपवा-छपवी करत नसतो. पण हे राजकारण आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन जवळ येत आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण कसेही करून संमत करायचे. त्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची जुळवाजुळव करायची आणि मतदारसंघ पुनर्रचना करूनच पुढील लोकसभा निवडणुकांना सामोरे जायचे ही भाजपाची व्यूहरचना गेले काही दिवस राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. त्यासाठीच तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटवले आणि आता ठाकरेंच्या सेनेची वेळ आहे, असे म्हटले जात आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत ठाकरेंचे सैनिक चेव आल्यासारखे लढले. लोकांनी दोन शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकृत धनुष्यबाण चिन्ह असतानाही ठाकरेंचे उमेदवार निवडून दिले. हे त्यांच्या स्वतंत्र राजकीय विचारसरणीचे कौतुक करण्यासारखेच. महायुती प्रचंड ताकदीने महाविकास आघाडीला जेरीला आणत असताना महाराष्ट्राचा मतदार महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांनी ४८ पैकी ३० जागा काँग्रेस, ठाकरे सेना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दिल्या. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे, स्वतंत्र बाण्याने मतदान करावे असे आवाहन केले जाते. त्या पार्श्वभूमीवर मतदारांची ही भूमिका कौतुकास्पद होती.

पण त्या कौतुकाचे मातेरे होणाऱ्या घडामोडी घडत आहेत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक होत आहे. सोलापूर येथे थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीचे तीन आमदार महायुतीच्या सोबत आहेत, असे दिसते. सहा ठिकाणी तर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. नाशिकला ठाकरे सेनेचा उमेदवारच दिसलेला नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे सहा खासदार फुटणार ही बातमी फार धक्कादायक नव्हती.

महाराष्ट्रातल्या जनतेचे वैचारिक भरण-पोषण तेजस्वी इतिहास पुरुषांनी व राष्ट्रपुरुषांनी केले आहे. या राज्याला क्रांतीकारक, समाजसुधारक यांच्या उज्ज्वल कामगिरीचा वारसा आहे. त्यामुळेच इथे सत्तेसाठी अत्यंत सवंग अशा तडजोडी झाल्याचा इतिहास १९९० च्या आधी सापडत नाही. ठरवले असते तर भाई उद्धवराव पाटील यांच्यासारखा शेका पक्षाचा एक अत्यंत बुद्धिमान संसदपटू ६०च्या दशकातच यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय प्रभावाखाली राज्याचा मुख्यमंत्री झाला असता. पुढे थोड्या-फार प्रमाणात लोक पक्षांतर करत गेले पण घाऊक पद्धतीने पक्षांतरे घडवून जनमताचा लिलाव झाला नाही.

ठाकरेंचे खासदार फुटणार या बातमीने समाजमाध्यमांत प्रतिक्रियांचा पाऊस पडला. नाराजी, चिडचिड दिसली. लोकशाही मुल्यांवर थोडाफार विश्वास शिल्लक राहिलेल्यांची ही धुसफूस. ‘अजून तरी आमच्या घरी कोणी आलेलं नाही’, असे म्हणणारांसाठी त्या फारशा धक्कादायक नाहीत. तीच गत व्यावसायिक, उद्योगी उच्चभ्रू वर्गाची आहे. कोणीही सत्तेत असले तरी काही गोष्टी ज्या शिरस्त्याने चालतात तशाच चालणार असा या त्यांचा सूर असतो. खरा अस्वस्थ होतो तो लोकशाही मुल्यांवर विश्वास असणारा एक वर्ग.

राजकारणाची परवड त्याला अस्वस्थ करते. लोकांनी जाणीवपूर्वक ठाकरेंना राजकीय ताकद दिलेली असताना त्यांचे लोक का सोडून जातात या भावनेने तो उगाच अस्वस्थ होतो. खरे तर त्याची कोणती लढाई कोणता राजकीय पक्ष त्वेषाने लढतोय हे विचारले तर तात्काळ उत्तरही येत नाही. महागाई, घरांचे दर, शिक्षणाचा खर्च, परदेशी शिक्षण घेण्याचा खर्च वाढण्याचे व नोकऱ्यांची संधी अल्प असणे थांबत नाही. साधारणपणे रोजचे प्रश्न तेच आहेत.

पूर्वी विरोधी विचारांचा आदर केला जात असे. काँग्रेसच्या तुलनेत अतिशय लहान असलेले प्रजा समाजवादी, जनसंघ, कट्टर डावे, शेका पक्ष, पुढे भाजपा, फुटीर काँग्रेसचे गट यांनी मतदारसंघात लोकांच्या हिताची कामे अडवली जातात अशा तक्रारी केल्याचे ऐकिवात नाही. सत्ताधारी पक्षाने सरसकट विरोधी विचारांच्या लोकप्रतिनिधींचे निधी अडवत त्यांचा छळ केला अशी फार उदाहरणे नाहीत. कारण त्यावेळी लोकशाही व्यवस्था लोकांसाठीच असते अशी ठाम धारणा होती. नाही म्हणायला साखर कारखाना किंवा इतर सहकारी संस्था उभारायच्या असतील तर येता का आमच्या पक्षात असे प्रलोभन काँग्रेस दाखवत असे.

आता परिस्थिती इतकी बदलली आहे की, कार्यकर्ते अथवा समर्थक विचारांची लढाई लढण्यास तयार नाहीत. राजकारण व्यवसाय झाला. आपला नेता विरोधी पक्षात असल्याने सरकारी तिजोरी खुली होत नाही. मग छोटी-मोठी कंत्राटे मिळणार नसतील, बदल्यांची कामे होणार नसतील तर सत्तापक्षासोबत राहण्यात काय चूक आहे असे कार्यकर्ते विचारू लागले.

विरोधी पक्षीयांसाठी विकासनिधीची झारी शुक्राचार्य लाजतील इतकी अरुंद झाली. एखादा मतदारसंघ विरोधी पक्षाकडे असला की तिथले प्रशासनसुद्धा सत्तापक्ष नाराज होऊ नये याची काळजी घेऊ लागले. परिणामी हळूहळू कार्यकर्ते, समर्थक त्या नेत्यापासून दूर जाऊ लागले.

धाराशिव येथे बहुदा हेच झाले. ठाकरे सेनेचे ओमराजे निंबाळकर ३.२९ लाख एवढ्या प्रचंड बहुमताने विजयी झाले. पण त्यांचे कार्यकर्ते, समर्थक भराभर कमी होत असल्याचे लोकांना दिसू लागले. सध्या उस्मानाबाद-लातूर-बीड या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. तिथे ठाकरे सेनेच्या एका नेत्याने उमेदवारी अर्ज दाखल केला. पण ओमराजे यांच्यासमक्ष त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपाचे उमेदवार बसवराज पाटील यांच्यासाठी माघार घेतली म्हणतात.

थोड्याफार फरकाने अशाच घडामोडी ठिकाणी घडत आहेत. विरोधात असताना पक्ष चालवणे सोपे राहिलेले नाही. राजकारण आणि लक्ष्मीदर्शन या एकाच नाण्याच्या दोन बाजू झालेल्या असताना ठाकरे सेनेचे नाणे थोडेफार चालते ते बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या पायाभरणीमुळेच. त्यांनी शिवसैनिकांना कार्यक्रम दिला. स्पष्ट भूमिका, निर्भिडपणा आवडल्याने लोकांनी शिवसेना मोठी केली. अन्यथा चंद्रपूर, गोंदिया, नांदेड, परभणी, धाराशीव, धुळे अशा भागात सेना कशाला पोहोचली असती?

सेनेचा मतदार प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारसरणीमुळे आणि बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकेमुळे वाढला. १९८५ नंतर मतदारसंघावर जबर पकड असलेले काँग्रेसनेत्यांचे गड डळमळीत झाले ते यामुळेच. पण आता काळ बदलला. तुम्हालाच शिवसेना नको असेल तर मी तरी काय करू, अशा भूमिकेत सेनेचे नेतृत्व आले आहे. त्यांची भाषा, देहबोली या सर्व गोष्टींना कंटाळली आहे असे दिसत आहे. सहा-सात महिन्यांपूर्वी राज्यात नगरपालिका, नगर पंचायती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ठाकरे पिता-पुत्रांनी किती सभा घेतल्या, किती उमेदवारांना आश्वासित केले हे विचारले जाऊ लागले.

लोकांना गरज आहे तेव्हा लोकच पक्षाची काळजी घेतील ही मानसिकता कमालीची चिंताजनक आहे. राज्यासमोर अनेक समस्या आहेत, सर्व थरातील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. राज्याची फार घौडदौड चालू आहे असेही नाही. पण सर्व समस्यांवर आवाज उठवला जातोय असे दिसत नाही. समस्याग्रस्त विरोधी पक्षाला दोष द्यायचा? की मतदान झाले आता राजकारणाकडे दुर्लक्ष करून मानसिक स्वास्थ जपा, या संभ्रमात जनता आहे.

ravikiran1001@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in