- डॉ. टी. आर. गोराणे
दखल
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी आणि खुनाला कारणीभूत असणारे सूत्रधार शोधण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या लक्षात आले होते. त्यासाठी संघटनेने जिल्हा प्रशासनापासून राज्य तसेच केंद्र सरकारपर्यंत प्रत्यक्ष भेटी देत अनेकांशी पत्रव्यवहार केला. मात्र तरीही सत्ताधाऱ्यांनी यात विशेष लक्ष घातले नाही, असा कटू अनुभव आहे. या खटल्याच्या ताज्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी समजून घ्यायला हव्यात.
समाजातील प्रत्येक व्यक्ती विवेकी विचारांची घडावी यासाठी आणि विवेकी समाजव्यवस्थेकडे समाजाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या विचाराने प्रेरित होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी काही समविचारी सहकाऱ्यांसमवेत नऊ ऑगस्ट १९८९ रोजी पुण्यात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची स्थापना केली. महाराष्ट्र अंनिस म्हणजे चमत्कार करणाऱ्या बुवा-बाबांचा भांडाफोड करणारी चळवळ, अशीच सुरुवातीला ओळख होती. त्यामुळे थोड्याच कालावधीत अंनिसला महाराष्ट्रात मोठा नावलौकिक प्राप्त झाला. विविध धर्मातील अंधश्रद्धांचा शोध घेऊन निर्मूलन करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध धर्मांमधील सर्व सण, उत्सव, समारंभ यांची कालसुसंगत, विधायक तसेच कृतिशील चिकित्सा करणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व सण, समारंभ, उत्सवांची कृतिशील चिकित्सा करून, कार्यकारणभाव तपासून त्यातील अनिष्ट गोष्टींचा फोलपणा उघड करण्यास अंनिसने सुरुवात केली. जास्तीत जास्त सण, उत्सव, समारंभांना पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त करून देण्याचे कार्यक्रम, उपक्रम अंनिसने अगदी सुरुवातीच्या काळापासून सुरू केले. त्यामुळे साहजिकच प्रत्येक धर्मातील अशा सर्वच सण-उत्सवांची चिकित्सा करणे सुरू झाले. हीच बाब डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला कारण ठरली, अशी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांसह अनेकांची पक्की भावना आहे. कोणताही धर्म वाईट उपदेश करत नाही; पण त्यात धर्मांधता, धर्मकट्टरता वाढली की विकृत स्वरूप प्राप्त होते. कोणत्याही धर्मात जाणीवपूर्वक पुरोहितशाही, कर्मकांडे घुसडवली जातात, तेव्हा त्यातून शोषणाचे विविध मार्ग निर्माण होत जातात. देवाधर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या शोषणाला ‘अंनिस’ सातत्याने विरोध करत आली.
देवाधर्माच्या, अध्यात्माच्या नावाखाली आपला उदरनिर्वाह साधणाऱ्या, अध्यात्माच्या नावाने अंधश्रद्धा सुरू ठेवणाऱ्यांना महाराष्ट्र अंनिसची नेहमीच भीती वाटत आली आहे. म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारखे प्रभावी संघटनकौशल्य असणारे नेतृत्व कायमचेच संपवले तर महाराष्ट्र अंनिस संपुष्टात येईल, कार्यकर्ते घाबरतील, मनात भीती निर्माण झाल्याने सैरभैर होऊन ते काम सोडून देतील, अशा दुष्ट विचाराने काही धर्मांध शक्तींनी २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात सकाळी सातच्या दरम्यान सार्वजनिक रस्त्यावर धर्माच्या नावाने डोके भडकवलेल्या तरुणांच्या हातून गोळ्या झाडून डॉ. दाभोलकरांचा निर्घृण खून घडवून आणला. खरे तर, खून झाला ती वेळ सकाळी सातच्या दरम्यानची असल्याचे नमूद आहे. म्हणजे तेथे बऱ्यापैकी उजेड होता. व्यायाम करणारी मंडळी तसेच काही कामानिमित्त बाहेर पडणारी मंडळी रस्त्यावरून जात-येत असणार. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉक्टरांचा खून झाला, त्या ठिकाणापासून शंभर-सव्वाशे फुटावर पोलीस चौकी आहे. म्हणजे डॉक्टरांचा खून काही कुठल्या घरात किंवा गल्लीबोळात झाला नव्हता. तरीही तपास यंत्रणेला पुरेसे साक्षी-पुरावे सापडले नाहीत. पोलीस यंत्रणा पोहोचली तेव्हा ओळख पटवण्यात वेळ गेला. वेळ सकाळची असल्याने संबंधित पोलिसांना तपासाचे पुढील आदेश मिळण्यास विलंब झाला. यात तास, दोन तास सहज निघून गेले. एवढ्या वेळेत मारेकरी पळून जाण्यात यशस्वी झाले असणार.
वस्तुत: वेळीच सर्व तपास यंत्रणा खडबडून जागी झाली असती, तातडीने शहराची नाकाबंदी झाली असती तर मारेकरी आणि लागोलाग त्यांच्या सूत्रधारांना पोलीस जेरबंद करू शकले असते; पण तसे घडले नाही. त्यानंतरही गतीने आणि तातडीने सखोल तपास व्हायला हवा होता; तो झाला नाही. खरे तर कार्यकर्त्यांनी ही बाब तेव्हाच पोलिसांच्या लक्षात आणून दिली होती. आग्रह धरला होता. अगदी सुरुवातीपासूनच मारेकरी आणि कटाचे सूत्रधार शोधण्यात तपास यंत्रणेचा ढिसाळपणा आणि हलगर्जीपणा दिसून आला होता. सातत्याने दैववादीपणाचा विरोध करणाऱ्यांचे मारेकरी शोधण्यासाठी प्लांचेटसारख्या अवैज्ञानिक, दैववादी आणि भंपक बाबींचा उपयोगही पोलिसांनी केल्याचे नंतर उघड झाले. ही अतिशय संतापजनक बाब होती. अशा प्रकारे तपास यंत्रणेने ढिसाळ आणि बेजबाबदारपणे तपास प्रक्रिया राबवली. त्यामुळेच सर्वच बाबींना प्रचंड विलंब झाला. सबळ पुरावे शोधण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरली. परिणामी, पावणेअकरा वर्षांनंतर डॉ. दाभोलकरांच्या खून खटल्यामध्ये न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दोन मारेकऱ्यांना जन्मठेप सुनावली आणि बाकीचे तीन निर्दोष सुटले. पोलीस यंत्रणांनी वेळीच आणि तातडीने सखोल तपास केला असता तर पुढील तीन विचारवंतांच्या हत्या नक्कीच टळल्या असत्या. दोन मारेकऱ्यांना जन्मठेप झाली आणि तीनजण निर्दोष सुटले; मात्र खुनामागचे सूत्रधार अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे पुढील काळात अजूनही काही कार्यकर्त्यांच्या किंवा विचारवंतांच्या हत्या करण्यास अशा धर्मांध शक्ती मागेपुढे पाहणार नाहीत.
धर्मनिरपेक्षता आणि धर्मचिकित्सा यांचा अंनिसने कायमच आग्रह धरत पाठपुरावा केला आहे. धर्माच्या नावाखाली कार्यरत असणाऱ्या धर्मांध शक्तींसाठी ही मोठीच अडचण ठरत आली आहे. या धर्मांध शक्तींचा वावर वाढत गेला, तसतसे समाजात विविध धर्मांच्या अनेक निरर्थक कर्मकांडांची संख्याही वाढत राहिली. त्यातून समाजाचे आणखी मोठ्या प्रमाणात शोषण होऊ लागले. धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाने चालणाऱ्या या कर्मकांडांची अंनिसच्या वतीने शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ मांडणी करण्यावर डॉ. दाभोलकर यांनी जास्त भर दिला. याच धर्मचिकित्सेच्या मांडणीने दाभोलकरांचा घात झाला. आजही धर्मातील अनिष्ट चालीरीती, रूढी, अंधश्रद्धा यांची चिकित्सा म्हणजे त्या धर्मावरचा हल्लाच आहे, असे मानले जाते. काही धर्मद्वेष्टी मंडळी स्वतःच्या हीन स्वार्थासाठी हे विष समाजात जाणीवपूर्वक पेरण्याचा प्रयत्न करतात. हे नेहमीच घडत आले आहे. धर्मचिकित्सा हा धर्म सुधारणेचाच मार्ग आहे. महाराष्ट्रामध्ये लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले यांनी हे दाखवून दिले आहे.
अनेक कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने अंनिसमध्ये सहभागी झाले आहेत. अनेक वेळा अनेक कार्यकर्ते स्वतःचा वेळ, श्रम, पैसा खर्च करतात. कोणत्याही शासकीय, देशी-परदेशी फंडिंगशिवाय हे काम चालू आहे. देश-परदेशातील संत, समाजसुधारक, विचारवंत, शास्त्रज्ञ यांच्या विवेकी आणि कृतिशील विचारांचा वारसा सोबत घेऊन आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत काम करण्याची पद्धत अवलंबून महाराष्ट्र अंनिस संघटितपणे आणि सनदशीर मार्गाने काम करत आहे. डॉ. दाभोलकर यांच्या दोन मारेकऱ्यांना जन्मठेप झालीच आहे; परंतु खुनामागचे सूत्रधार अजून मोकाट आहेत. त्या सर्वांना कायद्याच्या कचाट्यात आणून दोषी ठरवण्यासाठी यापुढेही संघटना प्रयत्न करत राहील.
(लेखक महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव आहेत.)