पाऊस लवकर येण्याचा फायदा की तोटा?

मोसमी पावसाचे केरळमध्ये आठ दिवस आधी आगमन झाले असून, हे १६ वर्षांतील सर्वात लवकर आहे. यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला, पण हवामान बदलामुळे ही सुरुवात चिंताजनक ठरते. लवकर पावसामुळे शेतीच्या पेरणीवर अडचणी निर्माण झाल्या असून, महाराष्ट्रात ३४,८०० हेक्टरवर नुकसान झाले आहे. अतिरिक्त आर्द्रतेमुळे पिके कुजण्याची शक्यता असून, अन्नधान्य आणि भाजीपाला महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

चौफेर

प्राजक्ता पोळ

मोसमी पावसाचे केरळमध्ये आठ दिवस आधी आगमन झाले असून, हे १६ वर्षांतील सर्वात लवकर आहे. यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला, पण हवामान बदलामुळे ही सुरुवात चिंताजनक ठरते. लवकर पावसामुळे शेतीच्या पेरणीवर अडचणी निर्माण झाल्या असून, महाराष्ट्रात ३४,८०० हेक्टरवर नुकसान झाले आहे. अतिरिक्त आर्द्रतेमुळे पिके कुजण्याची शक्यता असून, अन्नधान्य आणि भाजीपाला महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारताच्या दक्षिणेकडे, म्हणजे केरळमध्ये २४ मे रोजी मोसमी पावसाचे आगमन झाले. ही नेहमीच्या वेळेपेक्षा आठ दिवस आधीची सुरुवात असून, गेल्या १६ वर्षांतील सर्वात लवकर होणारे आगमन आहे. पावसाच्या या वेळेआधीच्या आगमनामुळे उष्णतेच्या लाटेतून दिलासा मिळाला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, हे आगमन नेहमीच्या एक जूनच्या सरासरी तारखेच्या आठ दिवस आधीच झाले असून, २००९ नंतर प्रथमच इतक्या लवकर पावसाचे आगमन झाले आहे. पावसाच्या लवकर आगमनामागे काही हवामानशास्त्रीय कारणेही आहेत. यावर्षी एल निनो-दक्षिणी कंप पद्धती (ENSO) ‘न्यूट्रल’ स्थितीत असल्याचे निरीक्षणात आले, जे सामान्य किंवा अधिक सक्रिय पावसाला पोषक असते. याउलट, एल निनोच्या काळात भारतात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. याशिवाय, हिमालयीन भागातील बर्फाचे प्रमाण कमी असल्याचेही निरीक्षणात आले आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, यामुळेही पाऊस वाढतो.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निम्न दाबाच्या पट्ट्यामुळे आणि विदर्भापर्यंत पसरलेल्या द्रोणरेषेमुळे वातावरणात ओलावा आणि संवहन क्रिया वाढली. यामुळे मोसमी पावसाच्या गतीला चालना मिळाली. त्याचबरोबर, १३ मे रोजीच मोसमी पावसाने दक्षिण अंदमान समुद्र व लगतच्या भागांत प्रवेश केला होता. ही तारीख नेहमीच्या २१ मेच्या सरासरी तारखेच्या आधीची आहे. यामुळेच त्याची केरळकडे लवकर आणि जलद हालचाल होऊ शकली. सोमाली जेट हा मॉरिशसजवळून उगम पावणारा एक महत्त्वाचा, कमी उंचीवरचा वाऱ्याचा प्रवाह आहे, जो अरब सागरातून आर्द्रतेने भरलेली हवा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे केरळ, कर्नाटका, गोवा आणि महाराष्ट्र इथे पोहोचवतो. मे २०२५ मध्ये या जेटचा जोर असामान्यपणे वाढला होता. हवामान तज्ज्ञांच्या मते, यामागे मानवनिर्मित हवामान बदलांचाही प्रभाव असू शकतो.

पावसाने आता केरळसह शेजारच्या तमिळनाडू, कर्नाटक व ईशान्य भारतातील मिझोरामच्या काही भागांना व्यापले आहे. त्याचा फायदा म्हणजे भारतातील जवळपास निम्मी शेती ही सिंचनाविना असल्याने ती जून ते सप्टेंबरदरम्यानच्या पावसावर पूर्णपणे अवलंबून असते. भारताची ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था या मोसमी पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. देशातील सुमारे ७० टक्के पर्जन्य पाण्याची गरज पावसामुळे भागते, जे शेतजमिनी, भूजल व जलाशय भरून काढण्यासाठी अत्यावश्यक असते. मुंबईस्थित ‘फिलिप कॅपिटल इंडिया’ या संस्थेच्या रिसर्चनुसार, ‘मोसमी पावसाच्या वेळे अगोदर झालेल्या अधिक पावसामुळे आणि त्याच्या लवकर सुरुवतीमुळे विशेषतः दक्षिण व मध्य भारतातील शेतकऱ्यांना उघड्या पेरणीसाठी योग्य संधी मिळेल.’

पण लवकर येणाऱ्या पावसाची कारणेही चिंताजनक आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे युरेशिया आणि हिमालयातील बर्फाचे आवरण लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे. यंदा जानेवारी ते मार्च दरम्यान बर्फाचे क्षेत्र १९९०-२०२० च्या सरासरीच्या तुलनेत १५ टक्के कमी होते. कमी बर्फामुळे जमिनीची परावर्तकता घटते आणि त्यामुळे जमिनीचे तापमान वाढते, जे मे महिन्याच्या मध्यात पावसाला चालना देणारे एक महत्त्वाचे कारण ठरते.

प्रत्येक एक अंश सेल्सिअसच्या जागतिक तापमानवाढीमुळे वातावरणातील आर्द्रता सुमारे सहा-आठ टक्क्यांनी वाढते. २०२५ मध्ये जागतिक तापमान औद्योगिकीकरणपूर्व काळाच्या तुलनेत सुमारे १.२ अंश सेल्सिअसने वाढलेले आहे. यामुळेच यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीसच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात जास्त आर्द्रता दिसून आली, ज्यामुळे ढगनिर्मिती लवकर सुरू झाली. कर्नाटका-गोवा किनारपट्टीवरील चक्रीवादळांसारख्या घटकांनी हा प्रभाव अधिक तीव्र केला.

हवामान बदल आणि मानवनिर्मित तापमानवाढीचे परिणाम हे आता केवळ सैद्धांतिक चर्चेपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष हवामान पद्धतींमध्येही ते दिसू लागले आहेत. यामुळे मोसमी पावसाच्या वेळेत आणि तीव्रतेत लक्षणीय बदल होताना दिसत आहेत. या लवकर येणाऱ्या पावसाचा शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, अन्नधान्यांच्या किमतीत वाढ होऊ शकते. जर महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले, तर भारताचा कांदा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यांतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात आतापर्यंत ३४,८४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पूर्वीची आकडेवारी ३१,८८९ हेक्टर होती. अमरावती, जळगाव, बुलढाणा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

एकट्या नाशिकमध्ये ३,२३० हेक्टरवर नुकसान झाले आहे. सोलापूरमध्ये १,२५२ हेक्टर आणि पुण्यात ६७६ हेक्टर क्षेत्रावर हानी झाली आहे. केळी, आंबा, कांदा, लिंबू आणि इतर भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यांमुळे उभी पिकं आणि बागायती झाडे सुद्धा उखडून पडली आहेत. याआधी उशिरा होणारी पेरणी व पूरस्थितीमुळे निर्माण होणारी अस्थिरता होती. केवळ भाज्यांचे दर २८ टक्क्यांनी वाढले होते, तर तांदूळ, डाळी व इतर अन्नधान्यांमध्ये ८-१७ टक्के वाढ झाली होती. त्यामुळे अन्नधान्य महाग होण्याचे संकेत आहेत.

लवकर सुरू झालेल्या पावसामुळे खरीप पेरणीच्या तयारीवरही मोठा परिणाम झाल्याचे कृषी तज्ज्ञांनी नमूद केले आहे. शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी जमीन तयार करण्यासाठी साधारण १५-२० दिवस कोरड्या हवामानाची गरज असते; मात्र यंदा मेच्या सुरुवातीलाच प्री-मॉन्सून सरी सुरू झाल्या आणि अजूनही त्या थांबलेल्या नाहीत, त्यामुळे जमिनीत खूप जास्त ओलावा निर्माण झाला आहे.

माती ओलसर पण पाण्याने भरलेली नसावी, तरच ती नांगरणीस योग्य ठरते, असे काही कृषी तज्ज्ञ सांगतात. ही अशी जमीन नसताना पेरणी करणे जवळजवळ अशक्य असते. महाराष्ट्रातील इंदापूर, बारामती आणि जुन्नरसारख्या भागांतील शेतकरी सांगतात की, जोरदार पावसामुळे शेतातील मातीची धूप झाली आहे. साठवलेला कांदाही अतिरिक्त आर्द्रतेमुळे कुजण्याच्या धोक्यात आहे, ज्यामुळे कमी पुरवठ्याचे संकट अधिकच वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भाज्यांच्या किमती आणि पूर्ण खरीप हंगामावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

prajakta.p.pol@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in