पक्षांच्या दर्जाची वधघट!

अलीकडेच राष्ट्रीय राजकारणामध्ये उतरलेल्या आम आदमी पक्षाने आपल्या कर्तृत्वावर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविला
पक्षांच्या दर्जाची  वधघट!

निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षास राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला असतानाच आतापर्यंत जे राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखले जात होते किंवा ज्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून आतापर्यंत मान्यता देण्यात आली होती अशा काही पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. मार्च महिन्यात निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष यांच्या दर्जाबाबत आढावा घेतला होता. त्यानंतर आयोगाने कोणते पक्ष राष्ट्रीय आहेत आणि कोणत्या पक्षांचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला आहे, त्यांची घोषणा केली. राष्ट्रीय दर्जाचे निकष लक्षात घेऊन, दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्तेवर आलेल्या, गोव्यामध्ये निवडणूक रिंगणात उतरलेल्या व राष्ट्रीय राजकारणात आपला ठसा उमटविणाऱ्या आम आदमी पक्षास आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे.

अलीकडेच राष्ट्रीय राजकारणामध्ये उतरलेल्या आम आदमी पक्षाने आपल्या कर्तृत्वावर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविला आहे. त्याउलट राष्ट्रीय राजकारणात आपले अस्तित्व राखून असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा राष्ट्रीय दर्जा आयोगाने काढून घेतला आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्येही ज्यांचा दबदबा आहे असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाने काढून घेतला आहे. आयोगाचा हा निर्णय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला जबर धक्का आहे, असे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आयोगाने नोटीस बजाविल्यानंतर आयोगापुढे राष्ट्रवादी काँग्रेसने आपली बाजू मांडली होती. पण त्या पक्षाकडून जो युक्तिवाद करण्यात आला तो आयोगास मान्य झाला नसावा! त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा आयोगाने काढला. राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका बजाविण्याची मनीषा बाळगून असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रीय दर्जा आयोगाने काढला. आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात उतरण्याचा तयारीत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे अस्तित्व राष्ट्रीय पातळीवर आयोगाने नाकारले आहे.

देशाच्या बऱ्याच भागात केवळ नाममात्र अस्तित्व राखून असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षांचाही राष्ट्रीय दर्जा आयोगाने काढला आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात आपले महत्व वाढवू इच्छिणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या मार्गात यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमविणे हा आमच्या मार्गातील अडथळा आहेच;मात्र आम्ही त्यावर मात करू, असावा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसने व्यक्त केली. तर आयोगाच्या निर्णयाची तपशीलवार माहिती मिळाल्यानंतर फेरविचारासाठी आयोगाकडे दाद मागितली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने, राष्ट्रीय दर्जा खूप महत्वाचा असतो पण तो आम्ही गमावला असल्याचे मान्य केले. पण त्याचवेळी ‘पडलो तरी टांग वर’ या म्हणीप्रमाणे, आमच्या पक्षाला लोकांनी मनोमन राष्ट्रीय दर्जा दिलेलाच आहे, अशी प्रतिक्रिया देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय दर्जासाठीच्या तीन निकषांपैकी एकाही निकषांची पूर्तता न करता आल्याने या पक्षांची मान्यता आयोगाने काढून घेतली. राष्ट्रीय दर्जा गमविल्याने या पक्षांना देशभर समान निवडणूक चिन्ह मिळणार नाही.

प्रचारासाठी अधिक स्टार प्रचारक मिळणार नाहीत. त्याचप्रमाणे राष्ट्रीय वाहिन्यांवर प्रचारासाठी अधिक वेळ मिळणार नाही. राष्ट्रीय दर्जामुळे जी प्रतिष्ठा प्राप्त होते ती गमावल्याने जे नुकसान होणार ते निराळेच! आयोगाने घेतलेल्या अन्य काही निर्णयानुसार, आंध्र प्रदेशात भारत राष्ट्र समितीचा राज्यस्तरीय दर्जा काढून घेतला आहे. तेलंगणमध्ये सत्तेवर असलेल्या भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा असलेले के. चंद्रशेखर राव हे तर भावी पंतप्रधान म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करू पाहत आहेत. पण आयोगाने दिलेल्या झटक्यामुळे त्यांच्या या महत्वाकांक्षेला नक्कीच धक्का बसला असेल! एकेकाळी दबदबा असलेल्या राष्ट्रीय लोकदलाने उत्तर प्रदेशात राज्य पक्षाचा दर्जा गमावला आहे. आयोगाच्या निर्णयाचे असेच धक्के अन्य राजकीय पक्षांनाही बसले आहेत. आयोगाच्या निर्णयामुळे ज्या पक्षांच्या दर्जाची घसरण झाली आहे अशा विविध राजकीय पक्षांना आपली गेलेली पत सावरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. आयोगाच्या या निर्णयाचे विविध राजकीय पक्षांवर, आगामी निवडणुका लक्षात घेता दूरगामी परिणाम होणार हे नक्की!

logo
marathi.freepressjournal.in