अयोध्या: सांस्कृतिक सौहार्दाचा इतिहास!

अयोध्येतील नव्या राम मंदिराचे पूर्ण बांधकाम झाले नसले, तरी त्याच्या उद्घाटनाची तारीख आधीच ठरलेली आहे. संघपरिवार आणि सलग्न संस्थांच्या कार्यकर्त्यांनी त्याचे निमित्त करून हा हिंदूंचा सांस्कृतिक विजय कसा आहे याबाबत वातावरण उन्मादी बनवण्याची सुरुवात केली आहे. अंधश्रद्धा कधी सत्य जाणून घेण्याच्या फंदात पडत नाही हे ओघाने आलेच.
अयोध्या: सांस्कृतिक सौहार्दाचा इतिहास!

- संजय सोनवणी

अयोध्येच्याच इतिहासाबाबत बोलायचे झाले तर पहिली बाब ही की अयोध्येचे मूळचे नाव विनिय हे होते. ते नंतर इख्खागुनगर आणि नंतर साकेत झाले. वाल्मिकी रामायणाची रचनाही याच काळातील म्हणजे इसवी सन चाैथ्या शतकातील. एका काव्याच्या नायकाला देवत्व दिले गेले ते फार उशिरा. आता जेथे राम मंदिर बांधले गेले आहे तेथे एवढी उत्खनने झाली असली तरी रामाचेच काय, तेथे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेबद्दल जो निर्णय दिला तोही तेथे कधी राम मंदिर होते या आधारावर दिलेला नाही. जो निर्णय दिला गेला तो मालकीहक्काच्या वादाबाबत आणि निर्णय दिला गेला तो वहिवाट कोणाची या मुद्द्यावर. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने इतिहास, पुरातत्त्व अवशेष, प्रवासवर्णने, काव्य इत्यादी पुराव्यांचा तसेच आजवरच्या दावे आणि त्यावरील निर्णयांचा आधार घेतला आहे..

बाबराने राम जन्मस्थान पाडून त्याजागी मशीद बांधली असा सर्वसाधारण समज असला तरी १५२८-२९ मध्ये मीर बाकी (अथवा मीर खान) या बाबराच्या सरदाराने हे कृत्य केले, असे बाबरी मशिदीतीलच शिलालेखावरून स्पष्ट दिसते. असे असले तरी या जागेची अथवा मशिदीची सनद किंवा मालकीहक्काचे कागदपत्र अगदी मीर बाकीचे वंशजही नंतर तत्कालीन सत्तांना सादर करू शकले नव्हते. त्यामुळे मुस्लिमांची बाजू येथेच कमकुवत झाली होती.

हिंदूंकडेही काही कागदोपत्री पुरावा होता अशातला भाग नव्हता. त्यामुळे या जागेत सलगपणे वहिवाट कोणाची या कायदेशीर मुद्द्यावर हा वाद बव्हंशी आधारित असल्याचे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला. यात बहुसंख्यावाद प्रभावी ठरलेला नाही, असे म्हणणेही धाडसाचे ठरेल.

बाबरी मशिदीच्या खाली काही वास्तू होती, मशीद रिकाम्या भूखंडावर बांधली गेलेली नाही. पण मशिदीखाली जे होते ते मंदिरच होते काय किंवा असल्यास कोणाचे होते हे पुरातत्त्व खात्याला स्पष्ट करता आलेले नाही हे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानेच नोंदवले आहे. शिवाय पुरातत्त्व खात्याला मशिदीखालील जमिनीत मिळालेले वास्तूचे अवशेष किमान १२व्या शतकातील आहेत. मशीद तर १६व्या शतकातील. मग मधल्या ४०० वर्षांच्या काळात तेथे काय होते, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे मशीद बांधताना मंदिराचे अवशेष वापरले गेले असे निश्चयाने म्हणता येणार नाही, असेही न्यायालयाने नोंदवले होते. हिंदू १८५७ पूर्वी मशिदीच्या नजीकच राम चबुतरा बांधून पूजा करत होते.

वैदिक/हिंदूव्यतिरिक्त जैन व बौद्धांनीही या जागेवर आपला दावा केला असला तरी तो मुख्यत्वेकरून हिंदू-मुस्लिमांमधील वाद आहे, असे समजले गेले. जैनांचा दावा अधिक प्रबल होता. कारण बी. बी. लाल यांनी १९७६ साली केलेल्या उत्खननात तेथे इसपू चाैथ्या शतकातील जैन तीर्थंकरांची एक मृण्मयी प्रतिमाही तेथे सापडली होती. या स्थळी सापडलेली सर्वात प्राचीन प्रतिमा जैन आहे. किंबहुना जैन प्रतिमांतील भारतात आजवर मिळालेली ही सर्वात प्राचीन प्रतिमा आहे. तेथे जी विविध कालखंडातील नाणी, प्रतिमा मिळाल्या त्यांचा संबंध राम, सीता अथवा दशरथाशी असल्याचे कोणतेही सूचन मिळत नाही, असा पुरातत्त्ववादींचा निर्वाळा आहे.

भारताचा सांस्कृतिक इतिहास पाहिला तर लक्षात येईल की रामकथेच्या पूर्वीच हे स्थळ समण संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान होते. जैन धर्माचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथ यांचा जन्म विनया (सध्याची अयोध्या) येथेच झाला. एवढेच नव्हे, तर अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतीनाथ आणि अनंतनाथ या तीर्थंकरांचा जन्मही अयोध्या येथेच झाला. बौद्ध साहित्यानुसार गौतम बुद्ध यांनी आठ वर्ष अयोध्या येथे वास्तव्य केले होते. ऋषभनाथ आणि अजितनाथ या ऐतिहासिक व्यक्ती होत्या, असे मत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि अनेक विद्वानांनी यजुर्वेदातील त्यांच्या उल्लेखावरून सिद्धही केले होते. असे असेल तर या तीर्थंकरांचा काळ निश्चयाने इसपू १००० पूर्वीचा आहे असे म्हणता येईल. म्हणजे अयोध्या ही पुरातन काळापासून एक बहुसांस्कृतिक नगरी होती. जैनांचे रामायणही वाल्मिकी रामायणपूर्व (इसवी सनाचे पहिले शतक) व प्रसिद्ध असून जैनांनीही रामास आपलेसे केले होते. राम हीसुद्धा ऐतिहासिक व्यक्ती असून ती नंतरच्या काळात झाली असे मानावे, असे साहित्यिक पुरावे उपलब्ध आहेत. रामाचा जन्म अमुकच ठिकाणी झाला व तेथे नंतर रामाचे मंदिर बांधले गेले होते असे मात्र अगदी कोणत्याही पुराणांतही निर्देश नाहीत. राम मंदिराचे पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत की नाहीत यावर अनेक उत्खनने होऊनही आजही प्रश्नचिन्ह आहे. असे असले तरी हे स्थळ रामजन्मभूमीच अशीही भारतभर श्रद्धा निर्माण केली गेली ते हिंदू-मुस्लीम संघर्ष पेटवण्याच्या असांस्कृतिक प्रेरणेमुळे.

मंदिर नव्हते म्हणून रामजन्मही अयोध्येला झाला नाही असा मात्र निष्कर्ष काढता येत नाही. इख्खागुनगर हे नाव अयोध्येला रामाचा इक्ष्वाकू वंश त्याच्यामुळे प्रबळ झाल्यावर मिळाले असणे संभवनीय आहे. रामायणात येणारी रामकथा ही सरळ सरळ वैदिक धर्माचा प्रचारार्थ लिहिले गेल्याने त्यात साहजिकच अनेक बदल व प्रक्षेप करण्यात आले व रामाला सर्वस्वी नव्या स्वरूपात जगासमोर ठेवले गेले. असे असले तरी जनमानसातील राम मात्र एक उदात्त भव्य व्यक्तित्व म्हणूनच राहिल्याने त्याला देशभरच नव्हे तर सयाम-कंबोडियासारख्या देशातही अपार महत्त्व मिळाले. भारतीय नैतिकतेचा तो एक मानदंड बनून गेला. अयोध्येचा इतिहासही अपवाद वगळता सांस्कृतिक सौहार्दाचा राहिला आहे.

अहिल्यादेवी होळकरांनी अयोध्येला राममंदिरासकट अजून चार मंदिरे बांधली तेव्हा अयोध्येवर आसिफौद्दुला अमानी या सुभेदाराचे राज्य होते. १७३६ मध्ये अयोध्येच्या सुभेदाराचा दिवान केसरी सिंग याने अयोध्येला जन्म घेतलेल्या पाच तीर्थंकरांची पाच मंदिरे उभारली. मुस्लीम शासक असूनही ही मंदिरे उभारली गेली हा सांस्कृतिक सौहार्दाचा नमुना होता. प्राचीन काळी येथे अनेक तात्त्विक वाद-विवाद लढले गेले असले तरी हिंसक संघर्षाचा इतिहास मात्र नाही. अयोध्या या नावाचा अर्थच आहे ‘जेथे युद्ध केले जात नाही अशी भूमी.’ या नगरीवर कोणा एका धर्माने “फक्त आमचीच” म्हणून दावा करणे या नगरीच्या सांस्कृतिक सहजीवनाच्या इतिहासावर अन्याय करणारे आहे. राममंदिर झाले आहे त्याचे स्वागत करत असताना हा इतिहासही लक्षात ठेवला पाहिजे, अन्यथा आमच्यासारखे इतिहास करंटे आम्हीच असू!

logo
marathi.freepressjournal.in