काय भुललासी वरलिया रंगा

तुरीची डाळ पिवळी धमक दिसण्यासाठी त्यात 'मेटॅनील यलो' सारखे अखाद्य रंग मिसळलेले असू शकतात. किंवा हळद पावडरीत रांगोळीचे अखाद्य रंग मिसळलेले असू शकतात. त्याचप्रमाणे ...
काय भुललासी वरलिया रंगा

- सुमिता चितळे

ग्राहक मंच

तुरीची डाळ पिवळी धमक दिसण्यासाठी त्यात 'मेटॅनील यलो' सारखे अखाद्य रंग मिसळलेले असू शकतात. किंवा हळद पावडरीत रांगोळीचे अखाद्य रंग मिसळलेले असू शकतात. त्याचप्रमाणे मिरची पावडरीत 'सुदान रेड' हा अखाद्य रंग मिसळलेला असू शकतो. म्हणूनच शक्यतो अशा वस्तू सुट्या खरेदी न करता खात्रीच्या दुकानातून आणि पॅकबंद घ्याव्यात. सामान्य माणसाला अशी भेसळ ओळखणे शक्य नसते. म्हणूनच भडक रंग असलेले खाद्य पदार्थ टाळायला हवेत.

‘वसुधैव कुटुंबकम‌्’ या उक्तीप्रमाणे जग हे कुटुंबाप्रमाणे जवळ आले आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे वेगवेगळ्या देशांतील गोष्टी आपल्याला लगेच कळतात. आपण याचा अनुभव आणि आनंद घेत आहोत. विविध ठिकाणचे पोशाख, खाद्यपदार्थ आपल्याला आवडतात आणि आपण त्यांचे अनुकरण करतो. आपल्या भारतात निरनिराळ्या राज्यांतील, प्रांतातील खाद्यपदार्थांचा आस्वाद आपण घेतोच आणि बरेच पदार्थ आपण घरीसुद्धा तयार करतो. शिवाय जगाच्या पाठीवरील कोणत्याही खंडातील देशात बनत असलेला अन्नपदार्थ आपण सहज आपलासा करतो. अमेरिकन, इटालियन, मेक्सिकन, थाई किंवा चायनीज पदार्थांच्या चवीची आपल्याला भुरळ पडते.

विविध प्रकारचे चायनीज पदार्थ तर हल्लीच्या तरुणाईसाठी ऑल टाइम फेवरेट आहेत. पारंपारिक पदार्थांबरोबरच थोडा चव बदल म्हणून या पदार्थांचा आपण आस्वाद घेतो. पण ते तयार करताना आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन स्वच्छता राखून केले असतील आणि त्यातील घटक पदार्थ आपल्या शरीराला घातक नसतील तर सेवन करण्यास काहीच हरकत नाही. पण सर्वच ठिकाणी ही काळजी घेतली जात नाही.

असाच एक चायनीज पदार्थ म्हणजे, गोबी मंचुरियन. लालभडक मसालेदार सॉसमधली कोबी पाहून आपली रसना चाळवली नाही तरच नवल. पण हल्लीच वाचनात आले आहे की, गोव्यामध्ये एका मंदिराच्या उत्सवाच्या ठिकाणी गोबी मंचुरियन हा पदार्थ विकला जात होता. पण तिथे हा पदार्थ विकण्यावर बंदी घालण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. कारण काय तर हा पदार्थ तयार करताना पुरेशी स्वच्छता केली जात नव्हती आणि त्यात सिंथेटिक म्हणजेच अखाद्य किंवा आपल्या शरीरासाठी घातक रसायने असलेले रंग मिसळले होते. त्यामुळेच या पदार्थाला आकर्षक असा लालभडक रंग आला होता. त्यापूर्वीसुद्धा गोव्यात दुसऱ्या ठिकाणी अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) छापे टाकून या पदार्थाची अवैध विक्री करताना पकडली होती. तसेच मानवी शरीरासाठी असुरक्षित असलेला निकृष्ट दर्जाचा सॉस वापरल्याबद्दल अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना दंड ठोठावला होता. बंदीबद्दल बोलताना, FDA मधील वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी म्हणाले की, पीठ आणि कॉर्नस्टार्चमध्ये घातक प्रकारची पावडर मिसळतात, जेणेकरून कोबी तळल्यानंतर बराच वेळ झाला तरी तो कुरकुरीत आणि ताजा वाटावा. असे करणे म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळच करणे आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही पावडर म्हणजे रिठा पावडर असू शकते; जी अखाद्य आणि स्वस्त असते. त्यामुळे रस्त्यावरील विक्रेते गोबी मंच्युरिअन हा पदार्थ कुठेही अतिशय स्वस्त दरात विकू शकतात. नुसता हा एकच पदार्थ कशाला, असे बरेच चायनीज पदार्थ आपल्या महाराष्ट्रातही रस्त्यावर अनेक विक्रेते स्वस्त दरात आणि आकर्षक रंगात विकताना दिसतात. अनेक लोक आवडीने खातातही. महाराष्ट्रात जरी हा पदार्थ किंवा असे काही घातक खाद्यपदार्थ विकण्याला बंदी नसली, तरी आपणच कोणताही पदार्थ सेवन करण्यापूर्वी तो पदार्थ स्वच्छतेची काळजी घेऊन तयार केला आहे ना ? तसेच त्यात आपल्या आरोग्याला धोकादायक किंवा निकृष्ट दर्जाचे घटक पदार्थ, कच्चा माल, अखाद्य किंवा रासायनिक रंग वापरले नाहीत ना याची शहानिशा केली पाहिजे. असे पदार्थ सेवन केल्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. ग्राहकांची पचनसंस्था बिघडू शकते. अशा प्रकारे आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. कोणताही खाद्यपदार्थ सेवन करताना नुसता त्याचा आकर्षक रंग, त्याची मोहक मांडणी याला न भुलता आपल्या निरोगी आरोग्यासाठी थोडी जास्त किंमत मोजून चांगल्या ठिकाणी तयार केले खाद्यपदार्थ सेवन केले पाहिजेत. कारण ती अधिकची किंमत आपल्या निरामय आरोग्याची आहे. स्वस्त किंमतीचे पदार्थ आपल्याला नंतर चांगलेच महागात पडू शकतात.

बर्फी आकर्षक रंगाची दिसण्याकरिता लाल, केशरी, पिवळा किंवा हिरवा रंग वापरला जातो. उत्पादनाची किंमत कमी ठेवण्यासाठी खाद्य रंगांऐवजी अखाद्य रंग वापरले जाऊ शकतात. हे आरोग्याला हानिकारक ठरतात. त्याचप्रमाणे बर्फी घेताना त्यावर चांदी असेल तर आपल्याला आवडते. पण बर्फीवरील हा वर्ख चांदीचा वर्ख नसून तो अल्युमिनियम या घातक धातूपासून बनवलेला असू शकतो. तेव्हा आपण हा विचारच करत नाही की, बर्फीच्या किंमतीत चांदी कशी परवडेल? अल्युमिनियम सारखा घातक धातू पोटात जाणे हे ‘ऑर्गन फेल्युअर’ला आमंत्रण ठरू शकते. त्यामुळे आपल्या आरोग्यास अत्यंत धोकादायक ठरू शकते.

तुरीची डाळ पिवळी धमक दिसण्यासाठी त्यात 'मेटॅनील यलो' सारखे अखाद्य रंग मिसळलेले असू शकतात. किंवा हळद पावडरीत रांगोळीचे अखाद्य रंग मिसळलेले असू शकतात. त्याचप्रमाणे मिरची पावडरीत 'सुदान रेड' हा अखाद्य रंग मिसळलेला असू शकतो. म्हणूनच शक्यतो अशा वस्तू सुट्या खरेदी न करता खात्रीच्या दुकानातून आणि पॅकबंद घ्याव्यात.

सामान्य माणसाला अशी भेसळ ओळखणे शक्य नसते. म्हणूनच भडक रंग असलेले खाद्य पदार्थ टाळायला हवेत. सरकार बंदी घालेल याची वाट न बघता आपणच ते न खाण्याचे नियंत्रण ठेवायला पाहिजे.

मुंबई ग्राहक पंचायत

mgpshikshan@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in