-उदय पिंगळे
ग्राहक मंच
सरंक्षण निधी, धर्मादाय सामाजिक संस्था, शैक्षणिक आणि संशोधन संस्था यांना मदत करणे हे व्यक्तीचे समाजभान जागृत असल्याचे लक्षण आहे. या सामाजिक जाणिवेला जुनी आयकर प्रणाली प्रोत्साहन देत असून अशा संघटना-संस्था यांना दिलेल्या देणगीस आयकर कायद्यातील कलम ८० जी आणि ८० जीजीए नुसार काही सवलती देण्यात आल्या आहेत. या सवलती नव्या पद्धतीने करमोजणी करणाऱ्या करदात्यांना लागू नाहीत.
करगणना ही करदात्यांच्या निव्वळ करपात्र उत्पन्नावर केली जाते. ८०जी नुसार दिलेल्या देणगीवर अनेक ठिकाणी ५०% तर काही ठिकाणी १०० % सवलत मिळते. ८०जीजीए नुसार केवळ शैक्षणिक आणि संशोधन करणाऱ्या संस्थेला दिलेल्या देणगीवर १०० % सवलत मिळते. या दोन्ही सवलतींनुसार एकूण सामाजिक उत्पन्नाच्या (८०जी नुसार मिळू शकणारी सवलत वगळून येणारे उत्पन्न) १० % या मर्यादेत सूट मिळते.
याचाच अर्थ असा की, करदात्यांच्या ●सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची बेरीज केली जाईल. यात अल्पकालीन दीर्घकालीन भांडवली नफा मिळवला जाईल. याशिवाय त्यात जे उत्पन्न करपात्र नाही तेही मिळवले जाईल.
●त्यातून ८०जी अथवा ८० जीजीए खाली मिळू शकणारी वजावट वगळून अन्य वजावटी घेतल्या जातील.
●आता जे उत्पन्न मिळाले ते करदात्याचे सामाजिक उत्पन्न समजले जाईल. त्याच्यातून जास्तीत जास्त १०% या मर्यादेत देणगी वजा केली जाईल.
करपात्र उत्पन्न काढताना, सामाजिक उत्पन्नातून करपात्र नसलेले उत्पन्न, कायद्याने मिळणाऱ्या सर्व वजावटी पात्र देणगीच्या वजावटीसह घेतल्यास निव्वळ करपात्र उत्पन्न मिळेल.
८० जी आणि ८० जीजीए नुसार
सवलत मिळण्यासाठी आवश्यक गोष्टी -
- २००० रुपयाहूनअधिक देणगी रोख दिली असेल तर सूट मिळत नाही. याहून अधिक रकमेची देणगी चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा ऑनलाइन पद्धतीनेच द्यावी. तरच सूट मिळेल.
- दिलेल्या देणगीच्या पावतीवर देणगीदाराचे नाव, पॅन, रक्कम आणि देणगी कोणत्या पद्धतीने दिली याचा उल्लेख असावा.
- याच पावतीवर देणगी स्वीकारणाऱ्या निधी किंवा संस्थेचा नोंदणी क्रमांक, वैधता, संस्थेचा पॅन आणि सूट पात्रता टक्केवारी यांचा उल्लेख असावा.
- अलीकडे विवरणपत्र भरताना देणगी संदर्भ क्रमांक मागितला जातो. तेव्हा तो आहे की नाही ते पाहावे.
- देणगी स्वीकारणारी संस्था स्वदेशी असावी.
यासंदर्भात विचारले जाणारे
सर्वसाधारण प्रश्न आणि त्याची उत्तरे-
★देणगीसाठी असलेल्या सवलतीचा लाभ आपला मालक आपल्याला देऊ शकेल का?
- देणगी थेट करदात्यांच्या पगारातून कापून थेट देण्यात आली असेल तर त्याचा लाभ मालक देऊ शकतो.
★विवरणपत्र सादर करताना देणगी पावती देण्याची गरज आहे का?
- आता विवरणपत्र कागद विरहित पद्धतीने सादर केली जात असल्याने देणगी पावती देण्याची गरज नाही. खात्याने देणगीचा तपशील मागितला तरच पावतीची गरज लागेल.
★देणगीची पावती विशिष्ठ नमुन्यातच असावी असे काही आहे का?
- नाही. देणगी देणारा आणि स्वीकारणारा यांची वर दिल्याप्रमाणे सर्व माहिती आणि संदर्भ क्रमांक पावतीमध्ये असायला हवा.
★जर मालकाने सर्वांची एकत्रित देणगी दिली असेल तर पावती कशी असावी?
- अशा परिस्थितीत कंपनी लेटर हेडवर जबाबदार व्यक्तीने दिलेले पत्र आणि सर्वांचा वेगळा एकत्रित तपशील पुरेसा आहे.
★देणगीवर मिळणाऱ्या कर सवलतीचा लाभ सर्व प्रकारच्या उत्पन्नातून घेता येतो का?
- हो, विहित मर्यादेत पगार, पेन्शन, व्याज, घरभाडे भांडवली नफा व अन्य उत्पन्न या सर्वांसाठी या कर सवलतीचा लाभ घेता येतो.
★अनिवासी भारतीय या सवलतीचा लाभ घेऊ शकतात का?
- हो, अनिवासी भारतीय त्याच्या भारतातील उत्पन्नावर हा लाभ घेण्यास पात्र आहेत.
★विवरणपत्र भरून झाले आहे आणि ते खात्याकडून मान्य केले गेले आहे. परंतु माझ्याकडून देणगीचा लाभ घेण्याचे राहून गेले. अशा प्रसंगी हा लाभ मला कसा मिळवता येईल?
- विवरणपत्र सादर करून हा लाभ मिळवता येईल.
★देणगीचे वर्गीकरण आणि खात्री कशी करता येईल?
- देणगीची सवलत पूर्ण आहे का ५० % आहे, त्याची माहिती आणि खात्री संस्थेचे नाव आणि पॅन याचा वापर करून आयकर विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊन मिळवता येईल.
★पैश्याव्यतिरिक्त अन्य पद्धतीने दिलेल्या देणगीवर सूट मिळते का?
- नाही. फक्त पैशांच्या स्वरूपातील मदतीसच ही सवलत मिळते. आपण कपडे, धान्य, वस्तू स्वरूपात मदत करू शकत असलो तरी त्यास अथवा २ हजार रुपयांहून अधिक रोख स्वरूपातील मदतीवर ही सवलत उपलब्ध नाही.
★व्यक्तिशिवाय अन्य कोणाला या सवलतीचा लाभ मिळतो का?
- हिंदू अविभाज्य कुटुंब, कंपनी, भागिदारी व्यवसाय यांची गणना कायद्याने निर्माण केलेल्या कृत्रिम स्वतंत्र व्यक्तीत होते. त्यांनाही ८० जी खाली लाभ घेता येतो.
★काही न्यास, उदा. सेव द चाईल्ड, अक्षयपात्र यांना केलेल्या मदतीवर ही सवलत मिळते का? एनजीओला देणगी देऊन मला कर कसा वाचवता येईल?
- नमूद केलेल्या न्यासांना ५०% सवलत आहे. अन्य संस्था, न्यास, निधी, एनजीओ याबाबत आयकर विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन सवलत मिळते की नाही, मिळत असल्यास किती मिळते? याची माहिती मिळवता येईल. त्याप्रमाणे सवलत मिळेल.
अनेक संस्था, ट्रस्ट बहुमोल सामाजिक कार्य करत असतात. त्यांना कार्यकर्ते, मदतनीस आणि पैसे यांची चणचण भासते. अनेक अडचणींना तोंड त्यावे लागते. तरी ते निष्ठेने आपले काम करीत असतात. आपण त्यात आपला प्रत्यक्ष सहभाग देऊ शकत नसलो तरी मदत नक्कीच करू शकतो. ही मदत वस्तुरूपात अथवा पैशात कशीही करता येऊ शकते. केवळ आयकरात सवलत मिळवावी असा हेतू यामागे नसावा, असे मला वाटते. केवळ पैशांच्या स्वरूपातील मदतीस आयकर सवलत मिळते. अशी सवलत मिळून काही कर वाचल्यास त्यात भर टाकून अधिक मदत करावी. (मुंबई ग्राहक पंचायत)
(Email : mgpshikshan@gmail.com)