बहुआयामी राजकीय कारकीर्द

भिक्षुकी करणारी व्यक्ती आपल्या कर्तृत्व, संघटनकौशल्य, प्रामाणिकपणा आणि निष्ठेच्या जोरावर राजकारणातील सर्वोच्च पदे भूषवते.
बहुआयामी राजकीय कारकीर्द

- बाबासाहेब डमाळे

श्रद्धांजली

भिक्षुकी करणारी व्यक्ती आपल्या कर्तृत्व, संघटनकौशल्य, प्रामाणिकपणा आणि निष्ठेच्या जोरावर राजकारणातील सर्वोच्च पदे भूषवते. बाळासाहेब ठाकरेंच्या एका चिठ्ठीवर राजीनामा देऊन ‘इदं न मम’ ही वृत्ती दाखवते, हे देशाने मनोहर जोशी यांच्या निमित्ताने अनुभवले. बाळासाहेब ठाकरे स्मारकावरून गैरसमज झाल्यानंतर अखेरच्या काळात शिवसैनिकांनी विरोधात आंदोलन केले, तरी त्यांनी अढळ निष्ठेची प्रचिती दिली.

शिवसेनेच्या चांगल्या काळात तर अनेकांनी साथ दिली; परंतु पडत्या काळातही शिवसेनेसोबत अविचल निष्ठा ठेवणारे जोशी सर अपवादच. त्यांच्या निधनाने अनेक आठवणी जाग्या झाल्या. मी बाळासाहेबांच्या निकटवर्तीयांपैकी एक. जोशी सरांनी नगरसेवक, महापौर, विधानसभा आणि विधान परिषद सदस्य, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकसभा खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यसभा सदस्य आणि लोकसभा अध्यक्ष अशी संसदीय राजकारणातील जवळपास सर्वच प्रमुख पदे भूषवली. त्यांची राजकीय कारकीर्द बहुआयामी राहिली आहे. बाळासाहेबही अनेक बाबतींत जोशी सरांचा सल्ला घेत. अनेकदा बाळासाहेब आणि ते एका व्यासपीठावर असत. बाळासाहेबांची भाषणे बिनधास्तपणाची असत. जोशी मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांनी केलेल्या भाषणावरून अनेकदा वाद होत. त्यावेळी जोशी यांना त्याबाबत विचारणा करून, सरकारची अडचण करण्याचा प्रयत्न केला जाई; परंतु बाळासाहेब काय बोलले हे मी ऐकलेच नाही, असे सांगून ते वेळ मारून नेत. त्यांच्यावर त्यावरून अनेकदा टीकाही झाली; परंतु बाळासाहेबांना सांभाळून घेण्याचे त्यांचे कसब वेगळेच होते. एन्रॉन प्रकरणावरून वादंग झाले. आरोपांच्या फैरी झडल्या आणि त्याच एन्रॉनच्या प्रमुख शिष्टाचार सोडून सरकारऐवजी थेट बाळासाहेबांकडे चर्चेला गेल्या. त्यावरूनही टीका झाली; परंतु बाळासाहेबांमुळेच सत्ता मिळाली आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही कारभार करतो. त्यांना परदेशी पाहुण्यांनी भेटण्यात गैर काय, असा उलट सवाल ते विचारून निरुत्तर करत.

महाराष्ट्राचे पहिले गैरकाँग्रेसी मुख्यमंत्री होण्याचा मान जोशी सरांना मिळाला होता. त्यांनी चार वर्षे मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्या सुमारास शेती महामंडळाची जमीन मिळावी, म्हणून खंडकरी शेतकरी आंदोलन करत होते. ते अनेक वर्षांपासून सुरू होते. सर मुख्यमंत्री असतानाच शेती महामंडळाच्या जमिनी खंडकरी शेतकऱ्यांना देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. राज्यात ब्राह्मण जातीच्या व्यक्तीला मुख्यमंत्री केल्यावरून त्यावेळी शिवसेनेवर टीका झाली होती; परंतु बाळासाहेबांनी कायम त्यांची पाठराखण केली. मनोहर जोशी यांच्या जाण्याने शिवसेनेचा सुवर्णकाळ पाहिलेला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. शरद पवार यांच्याशी बाळासाहेबांचे जसे चांगले संबंध होते, तसेच जोशी सरांचेही होते. पवार यांच्या सांगण्यानुसार तर सुधीर जोशी यांच्याऐवजी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याची चर्चा होती. असे असतानाही राजकीय विरोधक म्हणून जोशी यांनी शरद पवार यांच्यावर टीका करण्यात कधीच हात आखडता घेतला नाही.

मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्षात काम केले होते. बाळासाहेबांच्या खास मर्जीतील नेता म्हणून त्यांची ओळख होती. मातोश्री वृद्धाश्रम, सैनिक स्कूलची सुरुवात त्यांनी केली. बाळासाहेब यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक होते. जोशी यांचा जन्म महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील नांदवी गावात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी कायद्याची पदवी घेतली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत ते अधिकारी म्हणून रूजू झाले. त्यांनी युवकांसाठी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्यांनी १९६७ मध्ये राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून ते शिवसेनेच्या निष्ठावंतांपैकी एक राहिले. त्यांच्या बंडखोरीच्या अफवा अनेक प्रसंगी उठल्या असल्या तरी त्यांनी शिवसेना सोडली नाही. छगन भुजबळ, नारायण राणे असे अनेक सहकारी शिवसेना सोडून गेले; परंतु त्यांनी शिवसेना सोडली नाही. जी. एम. सी. बालयोगी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर लोकसभेचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून जोशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता. शिवसेनेच्या वर्तुळात मनोहर जोशी यांना प्रेमाने पंत म्हणायचे. शिवसेनेसाठी ते आदर्श व्यक्तिमत्त्व होते. ते एक झुंजार आणि लढवय्ये नेते होते. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर असायचे.

सीमाप्रश्नी झालेल्या आंदोलनप्रसंगी बाळासाहेबांना अटक झाली होती. तेव्हादेखील सर बाळासाहेबांसोबत होते. ते शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगले. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, लोकसभा खासदार आणि लोकसभा अध्यक्ष अशा जवळपास सर्व संसदीय पदांवर काम केले. यासाठी ते कायम शिवसेनेचे ऋणी राहिले. ते एक हाडाचे शिक्षक होते. उत्तम वक्ते होते. पक्षपात न करता संसदेचे कामकाज कसे चालवावे, याचा उत्तम वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. वक्तशीरपणा हा त्यांच्यातील एक मोठा गुण होता. ते दिलेली वेळ नेहमी पाळत असत. राजकारणात राहून दिलेली वेळ कशी पाळायची असते, हे त्यांनी दाखवून दिले होते. जोशी मुख्यमंत्री असताना काश्मिरी पंडितांना इंजिनिअरिंग ते अन्य शैक्षणिक विभागांमध्ये राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर जोशी यांनी राजकारणातील धडे गिरवले; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या शिवसेना सोडण्याची चर्चा सुरू झाली. मात्र तसे काही घडले नाही. युती तुटल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी इच्छा मनोहर जोशी यांनी व्यक्त केली होती.

राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले. १९९५ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली; मात्र १९९९ मध्ये बाळासाहेबांनी त्यांना एक चिठ्ठी पाठवली. त्यात लिहिले होते, ‘प्रिय मुख्यमंत्री, तुम्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा आणि तत्काळ महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करा. कृपया त्यानंतर मला भेटायला या. कृपया मला भेटायला येण्यापूर्वी तुम्ही राजीनामा दिला असल्याची खात्री करा.’ मातोश्रीवरून आलेला हा आदेश वाचल्यानंतर जोशी यांनी तत्काळ आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला. पुणे येथील प्रभात रोडवरील त्यांच्या जावयाच्या अनधिकृत इमारतीचे एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने ही इमारत पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. या ठिकाणी भूखंडावरील आरक्षण हटवताना कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले होते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास यांना १५ हजार रुपयांचा दंड केला होता. जावई गिरीश व्यास यांच्यामुळे जोशी यांना कारकीर्द पूर्ण होण्यापूर्वी मुख्यमंत्रीपद सोडावे लागले.

राजकारणात सारे काही मिळूनही यशस्वी कोणाला म्हणायचे, याची एक वेगळीच व्याख्या मनोहर जोशी यांनी केली होती. व्यवहाराचा विचार करता पहिली बाब म्हणजे तुमच्याकडे विद्या-ज्ञान असले पाहिजे. चांगले शिक्षण झाले पाहिजे. पैसा मिळाला पाहिजे. तो चांगल्या उद्योगातून मिळाला पाहिजे. कुटुंब सुखी असले आणि हे सर्व मिळाले तर तो सुखी माणूस.. आपण जे स्वप्न पाहतो त्याप्रमाणे कृती करून यशस्वी होणे आवश्यक आहे. जबाबदारी जेवढी मोठी, तेवढी दु:खेही मोठी असतात, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. असा निर्मोही, सत्शील, निष्ठावान, निष्कलंक शिवसैनिक इहलोकीच्या यात्रेला निघून गेला. त्यांचे जाणे शिवसेनेतल्या अनेकांसाठी कुटुंबातला मोठा भाऊ गेल्यासारखे आहे.

(लेखक उत्तर नगर जिल्हा शिवसेनेचे माजी प्रमुख आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in