जगन्नाथ पुरी मंदिर: चमत्कार, दावे आणि वास्तव

नुकतेच ओरिसा राज्यातील पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार राज्य सरकारने उघडले आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रांत आणि टीव्ही चॅनेलवर, सोशल मीडियात या जगन्नाथ पुरीतील मंदिराच्या अद्भुत रहस्याच्या (अंधश्रद्धेच्या) बातम्या चालवल्या गेल्या. त्याबद्दल नेमकी वस्तुस्थिती मांडणारा हा लेख.
जगन्नाथ पुरी मंदिर: चमत्कार, दावे आणि वास्तव
Pinterest
Published on

- राहुल थोरात

भ्रम-विभ्रम

नुकतेच ओरिसा राज्यातील पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे रत्न भांडार राज्य सरकारने उघडले आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील अनेक वर्तमानपत्रांत आणि टीव्ही चॅनेलवर, सोशल मीडियात या जगन्नाथ पुरीतील मंदिराच्या अद्भुत रहस्याच्या (अंधश्रद्धेच्या) बातम्या चालवल्या गेल्या. त्याबद्दल नेमकी वस्तुस्थिती मांडणारा हा लेख.

ओरिसातील विवेकवादी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मी आणि आमचे कार्यकर्ते अण्णा कडलास्कर यांनी ऑक्टोबरला २०२२ मध्ये आठ दिवसाचा अभ्यास दौऱ्यासाठी गेलो होतो. त्यावेळी आम्हाला जगन्नाथ पुरीला भेट देण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही १५ ऑक्टोंबर ला दोघे जगन्नाथ पुरीत पोचलो. जगन्नाथ मंदिराविषयी कथित चमत्कारांच्या अनेक दंतकथा आम्ही ऐकल्या होत्या. त्यामध्ये जगन्नाथ मंदिराच्या शिखरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरूद्ध दिशेला फडकतो. या मंदिराच्या शिखराची सावली कायमच गायब राहते. पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर कधीही विमान उडत नाही किंवा मंदिराच्या शिखरावर पक्षी बसत नाही. हे भारतातील कोणत्याही मंदिरात पाहिले गेले नाही. शिखरावरील नीलचक्र सगळीकडून सारखेच दिसते, शिखरावरून पक्षी उडू शकत नाहीत, जवळच्या समुद्रलाटांचा आवाज मंदिरात ऐकायला येत नाही, रत्नभांडाराचे संरक्षण विषारी साप करतात… अशा एक ना अनेक अंधश्रद्धा!

सकाळी लवकर उठून जगन्नाथपुरी मंदिराला भेट द्यायला निघालो. भगवानांची वेषपूजा, भोजपूजा सुरू असल्याने भलीमोठी दर्शनरांग थांबवून ठेवलेली. रांगेत स्थानिकापेक्षा परराज्यातील टुरिस्ट भक्तांचा भरणा ज्यादा होता. हजारो भक्तांची रांग ‘जय जगन्नाथ’चा नारा देत होती. अबाल-वृद्ध उकाड्याने हैराण होत दीड तास थांबले होते. बाजूच्या, मंदिर प्रशासनाच्या डिजिटल पडद्यावर सतत मंदिरातील हुंडीत मिळाल्याच्या सोने, चांदी, पैसे दानाची माहिती फिरत होती. भक्तांना आत गेल्यावर ‘तुम्हीही हे करू शकता,’ अशीच जणू साद घालून सांगत होती. दीड तासांनी रांग सुरू झाली. प्रचंड चेंगराचेंगरी, गर्दी करत मंदिरात प्रवेश मिळाला.

दोन्ही बाजूला पंडे (पुजारी) ‘अभिषेक कीजिये, पूजा कीजिये, दान कीजिये!’ असे म्हणत एकेका भक्ताला गळ घालत होते. त्यांना चुकवण्याची कसरत करत मंदिरात गेलो. आम्ही प्रथमच एखाद्या मंदिरात असे शेकडो पुजारी पाहत होतो. या मंदिराभोवती साधारण वीस फूट उंचीची कडेकोट भिंत आहे. आत विविध देवतांची चाळीसएक लहान मंदिरे आहेत. मुख्य गाभाऱ्यात जगन्नाथ (कृष्ण) बलभद्र आणि सुभद्रा यांच्या लाकडी काष्ठमूर्ती आहेत. गाभाऱ्यापासून वीस फुटांवरून दर्शन घ्यायला परवानगी असते. याच गाभाऱ्यात महात्मा गांधी, गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर, आचार्य विनोबा भावे, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रवेश नाकारला होता. एका मिनिटात गर्दीच्या धक्क्याने तुम्हाला आपोआप बाहेरच्या रस्त्यावर आणले जाते. मुख्य मंदिराचा दरवाजा ओलांडला की, मुक्ती मंडपात साठ-सत्तर पंडे, ‘श्राद्ध करा, तांत्रिक क्रिया करा,’ असे म्हणत तुमचा पिच्छा पुरवतात. लांब लाकडी छडीने मारून पंडे भक्तांना ‘आशीर्वाद’ देतात. त्यानंतर दक्षिणेसाठी हात पसरतात. तंत्र-मंत्र साधना करण्यासाठी येथे वेगळं तांत्रिक मंदिर आहे. मुक्ती मंडपासमोरच्या नृसिंह मंदिराच्या प्रवेशव्दाराच्या दगडी भिंतीवर कोरलेले मोठमोठे शिलालेख आम्ही पाहिले. “यावर काय लिहिले आहे,” असे आम्ही तेथील पंड्यांना विचारले असता ते म्हणाले, “हे पाली भाषेतील प्राचीन शिलालेख आहेत, पाली भाषा आम्हाला येत नाही. त्यामुळे त्यावर काय लिहिले आहे, ते आम्हाला माहिती नाही.”

चमत्कार आणि वास्तव : आम्ही ऐकलेले चमत्कार तपासायला सुरुवात केली. मंदिराच्या शिखरावर समुद्री पक्षी, घारी, कावळे आरामात उडत होते. ध्वज वाऱ्याच्या दिशेने नाही, तर उलट निसर्गनियमाप्रमाणे फडकत होता. आजूबाजूच्या घरांवरील पताकाही त्याच दिशेने फडकत होत्या! नीलचक्रही वेगळे-वेगळे दिसते. मंदिरापासून दीड-दोन किलोमीटर दूर किनारा असल्याने समुद्राच्या लाटांचा आवाज मंदिराच्या आत येणे शक्य नाही. एकंदर, लोकांना चमत्कारी कथा रंगवून सांगत मंदिराचे माहात्म्य वाढवण्याची चलाखी इथेही दिसली.

पुरीतील पुरोगामी : मंदिराला भेट दिल्यानंतर आम्ही पुरीतील प्रागतिक विचारांच्या कवी लेखिका ज्योत्स्नामाई मिश्र यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. त्या ‘प्रगतशील पाठचक्र’ नावाने अभ्यासवर्ग चालवतात. त्या ‘वैज्ञानिक मनोभाव’ या मासिकामध्ये कॉलम ही चालवतात. त्यांचे सहकारी राखी नारायण मिश्र, सुरेंद्र तपस्सू यांचीही भेट झाली. “आम्ही महाराष्ट्रातून आलोय, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहोत,” हे सांगितल्यावर त्यांना अत्यानंद होऊन त्यांनी उभे राहून आमचे स्वागत केले. या तिघांशी आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली.

त्यांनी सांगितले, “आम्ही डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर पुरी शहरामधील ‘चिंतनचक्र’ हॉलमध्ये जाहीर निषेध सभा घेतली होती. ओरिसामधील प्रसिद्ध लेखक पवित्र दास यांना यासाठी बोलवले होते. पुरी जिल्ह्यातील प्रागतिक विचारांचे शेकडो कार्यकर्ते या निषेध सभेला उपस्थित राहिले होते.’ डॉ. दाभोलकरांचा विचार येथे जगन्नाथ पुरीमध्येही पोचला आहे, हे पाहून आम्ही भारावून गेलो.

ज्योत्स्नामाई सांगायला लागल्या की, पुरीच्या मंदिरात आजही जातीव्यवस्था पाळली जाते. तेथे प्रत्येक जातीला त्यांच्या जातीनुसार कामे वाटून दिली आहेत. पण स्त्रियांना या कामात कोठेही स्थान नाही; फक्त देवापुढे नृत्य करणारी ‘माहरी (देवदासी) प्रथा’ होती, त्यात तेवढा महिलांचा सहभाग होता. पूर्वी शेकडो देवदासी देवाच्या परंपरागत सेवेसाठी होत्या. आता मात्र ही ‘माहरी’ प्रथा बंद झाली आहे.

राखी नारायण मिश्र म्हणाले, ‘जगन्नाथ हा मूळ आदिवासी समाजातील नीलमाधव देव आहे, असे म्हणतात. तो पूर्वी जंगलात होता. वैष्णव संप्रदायाचे अनुयायी असलेल्या राजांनी त्यांचे रूपांतर वैदिक देवतेत करून त्याला पुरीच्या समुद्रकिनारी आणले.’

राखी नारायण मिश्र पुढे म्हणाले, “ओरिसातील प्रसिद्ध ‘महिमा’ धर्माचे संस्थापक, कोंढ आदिवासी जातीत जन्मलेले ‘भीम भोई’ नावाचे एक विद्रोही संत होऊन गेले. त्यांनी समाजातील जातिभेद नष्ट करण्याची मोठी मोहीम राबवली. आजही ‘महिमा’ धर्माचे लाखो अनुयायी ओरिसात आहेत. वैदिक धर्मातल्या अंधश्रद्धांवर आघात करणारा आणि ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देणारा पंथ म्हणून त्याला तीव्र विरोधही त्याकाळी झाला होता.” (महाराष्ट्रातील आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणेच हा एक पंथ ओरिसात आहे).

मिश्र अधिक माहिती सांगताना म्हणाले की, ‘या महिमा धर्माचे एक अनुयायी पुरीच्या राजाचे राजवैद्य होते. पुरीच्या राजाने या राजवैद्याची हत्या केली, तेव्हा महिमा धर्माचे लाखो अनुयायी राजाला जाब विचारायला पुरीला आले. भीम भोईंच्या अनुयायांनी जगन्नाथ मंदिराला घेराव घातला. जगन्नाथाची मूर्ती ते मागत होते, तेव्हा पंड्यांनी त्यांना अडवले. तेथे झालेल्या धूमश्चक्रीत अनेक आदिवासी लोक मारले गेले. तेव्हापासून दलित, आदिवासींना मंदिरप्रवेश बंद आहे; ते हिंदू असले तरीही. जगन्नाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावरच ‘फक्त हिंदूंनाच प्रवेश’ अशी पाटी आजही लावलेली दिसते. जगन्नाथाच्या गाभाऱ्यात हिंदूंना प्रवेश आहे; पण उच्चवर्णीय हिंदूंना. बलराम दास नावाच्या लेखकाने अनेक लेखांमधून इथले वास्तव सांगितले आहे. सीताकांत महापात्रा यांनीही यावर ओडिया भाषेत बरेच लिखाण केले आहे.

जगन्नाथ रथयात्रेसंबंधी माहिती देताना सुरेंद्र तपस्सू सांगत होते की, “जगन्नाथाचा लाकडी रथ दरवर्षी बनवला जातो. त्याला ओढण्यासाठी लाखो लोक येतात. हा रथ ओढल्यानंतर स्वर्गप्राप्ती होते, अशी लोकांची श्रद्धा आहे. ज्या दोरखंडाने रथ ओढतात, त्याचे धागे लोक घरी नेऊन त्याची पूजा करतात. हात-पाय, सांधे दुखू लागले की ते पवित्र दोरखंडाचे धागे अंगाला बांधतात. जगन्नाथ मंदिरामध्ये प्राचीन रत्न भांडार आहे. त्यामध्ये करोडो रुपयांचा खजिना पडून आहे. हा खजिना उघडून त्याचा वापर सार्वजनिक आरोग्य, शिक्षणासाठी करावा अशी आमची मागणी आहे. पण हे प्राचीन रत्न भांडार उघडले तर पुरी शहरावर अरिष्ट संकट येईल अशी अंधश्रद्धा मुद्दाम पसरवली गेली आहे. त्यामुळे हे धन तसेच पडून आहे.”

“जगाच्या कल्याणासाठी काम करणे खूप मोठे आहे.” – संत भीम भोई

(आदिवासी संत भीम भोई यांच्या याच वचनाने ओरिसाच्या सुकन्या आणि आपल्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या शपथविधीची सुरुवात केली होती.) संत भीम भोई यांच्या या संतवचनाप्रमाणेच ओरिसातील हे विवेकवादी कार्यकर्ते समाजाच प्रबोधन करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. आपल्या महाराष्ट्रासारखा त्यांना फुले-शाहू-आंबेडकर आणि वारकरी परंपरेचा वारसा नसल्यामुळे त्यांची समाज परिवर्तनाची लढाई थोडी अवघड आहे. पण ते चिकाटीने लढताय. त्यांना बळ देणे हे आपली जबाबदारी आहे. (लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in