मिस वर्ल्डचा लखलखाट

ऑस्कर पुरस्कारांच्या बरोबरीने ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचा दिमाख या आठवड्यात जगभरातील कलारसिकांचे डोळे दिपवून गेला. दोन्ही सोहळ्यांनी खास उंची गाठलीच, पण...
मिस वर्ल्डचा लखलखाट

-राधिका परांजपे

विशेष

ऑस्कर पुरस्कारांच्या बरोबरीने ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेचा दिमाख या आठवड्यात जगभरातील कलारसिकांचे डोळे दिपवून गेला. दोन्ही सोहळ्यांनी खास उंची गाठलीच, पण ऑस्कर विजेत्या ‘ओपनहायमर’च्या बरोबरीने मिस वर्ल्ड क्रिस्तिना झेकियाने कर्तबगारीचे नवे मापदंड प्रस्थापित केले. ऑस्करच्या चर्चेत ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतील क्रिस्तिनाचे यश काहीसे मागे पडले.

मनोरंजनाचे विश्व व्यापक झाले आणि बघता बघता मुख्य प्रवाह बनले आहे. यालाही आता एक काळ उलटून गेला आहे. अलीकडच्या काळात हे विश्व इतके व्यापक झाले आहे की, त्याची व्यापकता प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकत आहे. त्यामुळेच या क्षेत्रातील प्रत्येक घटनेची दखल घेतली जाते. त्यामध्ये स्वत:चे स्थान प्रस्थापित करणारे चेहरे पुढचा बराच काळ चर्चेत राहतात. कलेशी संबंधित विविध गोष्टींमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणारे हे चेहरे अनेकांपुढे आदर्श निर्माण करतात, तर अनेकांना प्रेरणाही देतात.

अलीकडेच मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेचा ‘ग्रँड फिनाले’ भारतात मोठ्या दिमाखात संपन्न झाला. केवळ शारीरिक सौंदर्यच नव्हे, तर वैचारिक आणि भावनिक पातळीवरही सहभागी सदस्यांचा कस बघणारी ही स्पर्धा मनोरंजनविश्वात एक महत्त्वाचे स्थान राखून आहे. जगभरातील फॅशन इंडस्ट्रीमध्ये नवनवीन ट्रेंड निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या या स्पर्धेतील आपल्या देशातील सौंदर्यवतींचा सहभाग देशवासीयांच्या औत्सुक्याचा विषय असतो. त्यामुळेच मुंबईतील ‘जियो वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर’मध्ये पार पडलेल्या ‘मिस वर्ल्ड २०२४’ स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे भारताचे खास लक्ष होते. सालाबादप्रमाणे या सोहळ्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी आपला परफॉर्मन्स सादर केला. या स्पर्धेत ११५ देशांमधील स्पर्धक तरुणींनी सहभाग घेतला होता. यातील प्रत्येकीचा परफॉर्मन्स वैशिष्ट्यपूर्ण होता. प्रत्येकीला स्पर्धा जिंकायची होती. ही महत्त्वाकांक्षाच प्रत्येकीला इतरांपेक्षा वेगळं ठरवत होती. स्पर्धेत उतरायचे ते जिंकण्यासाठी हा विश्वासच शेवटी तुम्हाला यशापर्यंत नेत असतो. शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या स्पर्धेमध्ये चेक रिपब्लिकच्या क्रिस्तिना पिजकोव्हा हिने विजेतेपद पटकावले, तर लेबनॉनची यास्मिना जायतौन पहिली उपविजेती ठरली. विजेत्या स्पर्धकांचे नाव घोषित केल्यानंतर गेल्या वर्षीची विजेती कॅरोलिना बिएलॉस्का हिने विजेती आणि उपविजेतीच्या डोक्यावर मानाचा मुकुट घातला. सहाजिकच सध्या समस्त जगात क्रिस्तिना पिजकोव्हाची चर्चा आहे. जगातील सर्वात सुंदर स्त्री ठरलेल्या २५ वर्षीय क्रिस्तिना पिजकोव्हाबद्दल अधिक माहिती घेण्यास जग उत्सुक आहे.

क्रिस्तिना पिजकोव्हाचा जन्म १९ जानेवारी १९९९ रोजी चेक रिपब्लिकमध्ये झाला. या देशाची राजधानी प्राग येथील चार्ल्स युनिव्हर्सिटीमधून ती कायद्याची पदवी घेत आहे. याशिवाय मॅनेजमेंटचा कोर्सही करत आहे. क्रिस्तिना पिजकोव्हा अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत असून प्रगतीच्या शिखरावर आहे, असेही म्हणता येईल. शिक्षणासोबतच ती आपली प्रत्येक आवडदेखील जाणीवपूर्वक जपत आहे. ‘मिस वर्ल्ड’चा किताब नावावर झाल्यामुळे सध्या तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रिस्तिनाला सामाजिक कार्याची आवड आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ती एक फाऊंडेशन चालवत असून त्याद्वारे अनेक उपयुक्त उपक्रम राबवते. गरजूंसाठी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात तिचा पुढाकार असतो. मानसिक अस्वास्थ्याची समस्या सध्या जगभरच वाढत आहे. मानसिक अस्वास्थ्यातून मनोरुग्ण तयार होतात. क्रिस्तिनाला मनोरुग्णांसाठीही काम करायचे आहे.

यंदाच्या मिस वर्ल्ड २०२४ स्पर्धेत भारताच्या सिनी शेट्टीनेदेखील चांगली कामगिरी केली. सहाजिकच तिला भारतीय चाहत्यांकडून प्रचंड पाठिंबा मिळाला. मुंबईत शिकलेल्या सिनीने आपल्या जन्मस्थानी म्हणजेच मुंबईत मिस वर्ल्ड स्पर्धा लढवली खरी, पण ती पहिल्या चौघींमध्ये स्थान मिळवू शकली नाही. सिनीने ११५ देशांमधल्या सहभागी मॉडेल्समध्ये चांगली कामगिरी बजावत ‘टॉप ८’पर्यंत झेप घेतली. पुढच्या फेरीसाठी सिनीची स्पर्धा लेबनॉनच्या यास्मिनशी होती. पण टॉप चार जणींमध्ये मात्र सिनीला स्वतःचे स्थान पक्के करता आले नाही. आता स्पर्धा संपल्यानंतरचा सिनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यात ती रडताना दिसत आहे. अर्थातच या अश्रूंमागे तिने आतापर्यंत घेतलेल्या कष्टांना अपेक्षित यश न मिळाल्याची भावना आहेच, पण यामुळे ती निराश होणार नाही हेदेखील तितकेच खरे. तिला सर्वोच्च यशाने हुलकावणी दिली असली तरी मिळालेल्या यशामुळे पुढील काळात मनोरंजन आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिला बऱ्याच संधी आजमावता येतील, यात शंका नाही. कामात सातत्य आणि श्रद्धा ठेवली तर ती बरीच मोठी मजल मारताना दिसेल. सिनीचे कुटुंब मूळचे कर्नाटकचे असून ती स्वत: प्रसिद्ध मॉडेल आहे. ती एका राजघराण्यातील मुलगी आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तिने ‘मिस इंडिया’चा किताब पटकावला होता. शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचे तर सध्या सिनी चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण घेत आहे. एवढेच नाही, तर ती उत्तम भरतनाट्यम नृत्यांगनाही आहे. या कार्यक्रमात तिने ‘निंबुडा’ गाण्यावर नृत्य सादर केले.

क्रिस्तिना, सिनी यांसारख्या तरुणींची मेहनत आणि महत्त्वाकांक्षा यावरच फॅशनचे हे जगत उभे आहे आणि त्यातून करोडोंची उलाढाल होत आहे. एक स्वतंत्र अर्थविश्व या सौंदर्य स्पर्धांभोवती उभे राहिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in